कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व प्रगती पत्रातील अहवाल

दिनांक १३ रोजी रात्री राजाराम कॉलेज हॉलमध्ये श्रीयुत विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे सुरस व सुबोध मराठीत हरिकीर्तन झाले. ता. १४ रोजी सकाळी राजाराम कॉलेज हॉलमध्ये भाई प्रथमलाल सेन ह्यांनी हिंदीत उपासना चालविली. ता. १५ रोजी सायंकाळी प्रेमदास बुवा ह्यांचे नगर संकीर्तन झाले. रात्री ८-३० वाजता राजाराम कॉलेज हॉलमध्ये रा. ब. डॉ. खेडकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली प्रो. वासवानी ह्यांचे “ब्राह्मसमाज आणि राष्ट्र घटना” ह्या विषयावर विस्तृत विवेचनपूर्ण, सुबोध, सुविचारपरिपूर्ण आणि अस्खलित दीड तासपर्यंत व्याख्यान झाले. ता. १६ रोजी संध्याकाळी येथील जगदगुरू श्री. शंकराचार्य स्वामी ह्यांचे संस्थानी रा. शिंदे ह्यांचे हरीकीर्तन झाले. श्री. स्वामी महाराजांनी कीर्तन समाप्तीनंतर रा. शिंदे ह्यांना रेशमी उपरणे व प्रसाद अर्पण करून ब्राह्मसमाज धर्माची मूलतत्त्वे आपणांस मान्य आहेत असे सर्वांस विदित केले. ह्याप्रमाणे ब्राह्म मंडळीने करवीरस्थांस ब्राह्मधर्माची व्याख्यानाद्वारे, कीर्तनाद्वारे आणि भजनाद्वारे ओळख करून दिली. सदर मंडळीने इकडे येऊन ब्राह्मधर्माच्या तत्त्वाविषयी इकडे जागृती उत्पन्न केली आहे. इतकेच नाही तर सर्व हिंदू लोकांना पूज्य व पवित्र असे जे शंकराचार्यांचे पीठ, त्यावरील सांप्रत विराजमान पुरूषानेही आपली उघड पसंती दर्शवून सदर ब्राह्ममंडळीचे आपल्या पवित्र मठात त्यांचे कीर्तन करवून अभिनंदन केले आहे. ह्यावरून वारा कसा वाहत आहे व सत्यधर्माचाच कसा विजय होत आहे हे दिसून येईल.

श्रींस तरूणबुवांचे कीर्तन पसंत पडले. श्री. जगदगुरू ह्यांनी रा. रा. शिंदे ह्यांस आपणाजवळ बोलावून जवळ बसवून घेतले व म्हणाले की, “तुमच्या प्रकृतीस विकृती झाली असून तिकडे लक्ष न देता फार सुरस कीर्तन केलेत. आम्हांस फार संतोष वाटला. तुम्ही जे प्रतिपादन केलेत ते यथार्थ आहे. तुमची मते आम्हांस पसंत वाटतात. तुम्ही हाती घेतलेले कार्य पवित्र असून तुम्ही सत्यधर्माचा लोकांत प्रसार करीत आहात” हे श्री. जगदगुरूंचे भाषण ऐकून रा. शिंदे म्हणाले की, “धर्मसंबंधी सुधारणा स्वामी महाराजांच्या पीठावरून अधिकाराने झाल्या असता त्या सहज लोकांस पटणार आहेत. स्वामी महाराजांनी त्या अवश्य कराव्यात. अशी माझी विनंती आहे. मद्रासकडे व महाराष्ट्रातील पुष्कळ कनिष्ठ जातींचे लोक ख्रिस्तीधर्मात जातात व त्यामुळे हिंदुधर्माची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. ह्याकरिता श्री. जगदगुरूंनी अशा लोकांची इच्छा असेल तर त्यांस परत हिंदुधर्मात येण्याची मोकळीक देण्याविषयीचे आज्ञापत्र प्रसिद्ध करावे.” रा. शिंदे ह्यांची ही विनंती ऐकून श्री. जगदगुरूंस त्यांचे म्हणणे रास्त आहे असे वाटले व त्यांनी असे स्पष्ट बोलून दाखविले की, ही व अशा सुधारणा लवकरच घडवून आणण्याचा श्रींचा मानस आहे. परधर्मात गेलेले आपले लोक परत आपल्या धर्मात घेण्याविषयी परवानगीचे आज्ञापत्र काढण्याविषयी श्रींचा विचार चालू आहे आणि श्रींनी असेही बोलून दाखविले की, योग्य त्या धर्मसंबंधाच्या सुधारणा आपल्या कारकीर्दीत घडून याव्यात व रा. शिंदे ह्यांच्यासारख्या लोकांचा आपणांस नित्य समागम घडावा अशी आपली फार इच्छा आहे.

कोल्हापूरच्या प्रगतीकरांनी आपल्या एका लेखात पुढील उत्तेजक उदगार काढले आहेत:-

“ह्या मंडळीस आमची अशी विनंती आहे की, त्यांनी जागोजाग प्रवास करून हे धर्म प्रसाराचे पवित्र कार्य सारखे चालू ठेवावे. मुंबईस, कराचीस अथवा पुण्यास एके ठिकाणी राहून हे धर्म प्रसाराचे कार्य होणार नाही. नेहमी प्रवास करणे अत्यंत इष्ट आहे. सांप्रत जो शिक्षणाचा प्रसार ह्या देशात झाला आहे, त्यामुळे लोकमत जागृत झाले आहे. पण राजकीय, सामाजिक व औद्योगिक बाबतीत जशी काम करणारी मंडळी पुढे येत आहेत, तशी धर्मसंबंधी बाबींत काम करणारी रा. शिंदे प्रभृतीसारखी मंडळी पुढे येईल तर ब्राह्मधर्माचा अथवा प्रार्थनासमाजाच्या धर्माचा प्रसार अधिकाधिक होत जाईल”.