ब्राह्मपरिषदेचे जे तीन मुख्य हेतू (१) नाताळच्या सुट्टीतील राष्ट्रीय महोत्सवात निरनिराळ्या प्रांतांतून जे ब्राह्म एकत्र जमतात व जमण्यासारखे असतात, त्यांमध्ये विशेष परिचय व दळणवळ घडवून आणणे, (२) ह्या महोत्सवात इतर जो मोठा जमाव जमतो त्याच्या निदर्शनास ब्राह्मसमाजाचे उद्देश आणि तत्त्वे आणून देणे, (३) जेणेकरून ब्राह्मसमाजाची बढती होईल अशा हितकर उपायांची चर्चा करून ठराव पास करणे, ह्यांपैकी तिस-या हेतूसंबंधी बरेच काम ह्या वर्षी शांततेने आणि समाधानपूर्वक करण्यात आले.
परिषदेचे अध्यक्ष प्रो. विनयेंद्रनाथ सेन हे होते. ता. २७ डिसेंबर सोमवार सकाळी परिषदेची पहिली बैठक भरली. रा. रा. वि. रा. शिंदे ह्यांनी जनरल सेक्रेटरी ह्या नात्याने प्रथम प्रास्ताविक भाषण केले. त्यांनी सांगितले की, परिषदेची मूळ कल्पना, प्रथम मुंबईस सन १८८९ च्या राष्ट्रीय परिषदेच्या वेळी निघाली. तेव्हापासून १९०४ पर्यंत परिषदेचे काम केवळ पहिल्या हेतूने आणि अनियमितपणाने कसे तरी झाले व तेही मुंबई, कलकत्ता, मद्रास अशा मुख्य शहरांत तेथील समाजामुळे झाले.
सन १९०३ साली मद्रास येथील परिषदेची परमावधीची हेळसांड पाहून ती अधिक व्यवस्थित रीतीने व मोठ्या प्रमाणावर भारत ब्राह्मपरिषद भरविण्याचा रा. शिंदे ह्यांनी निश्चय केला व त्याप्रमाणे मुंबई प्रार्थनासमाजाच्या आश्रयाखाली पहिली व्यवस्थित परिषद भरली. त्यावेळी ब-याच निरनिराळ्या ब्राह्म व प्रार्थना समाजांकडून प्रतिनिधी बोलविण्यात आले होते व चर्चेसाठी विषयही सुचविले गेले होते. अशा रीतीने काशी, कलकत्ता, सुरत, मद्रास ह्यांही ठिकाणी क्रमाने दरसाल परिषदा घेण्यात आल्या आणि शेवटी लाहोरला ही परिषद भरविण्यात आली होती.
एवढ्या अवधीत प्रौढी मिरवण्यासारखा एकादा मोठासा कार्यभाग उरकला आहे असे कोणालाही जरी वाटण्यासारखे नसले तरी निराश होण्याचेही कारण नाही. समाजाच्या अभिवृद्धीसंबंधी बरेच ठराव वेळोवेळी पास झाल्यामुळे काही महत्त्वाच्या बाबतीत सर्वसाधारण मत ठामपणे प्रदर्शित झाले आहे. समाजाच्या सामान्य गरजा व उणिवांची सर्वांना कल्पना आलेली आहे. परिषदेची हिंदुस्थानातून एक फेरी पूर्ण झाली व लवकर दुसरी सुरू करणे आवश्यक भासू लागले.
वेळोवेळी पास झालेले ठराव अंमलात आणावयाचे झाल्यास स्वत: परिषदेलाच काही तरी सनदशीरपणा आला पाहिजे. परिषदेचे कायमचे दप्तर, कायमचा फंड व काही कायमचीच तिला वाहिलेली माणसे तयार झाली पाहिजेत. परिषद अशीच पुढे ढकलीत नेण्यात काही अर्थ नाही. ह्या संबंधाने मद्रासच्या परिषदेत श्रीगणेशा झाला होता आणि वर्षभर काम चालू ठेवण्यास जनरल सेक्रेटरींना ३०० रूपये देण्यात यावेत असे ठरले. पण ही जबाबदारी अविनाशचंद्र मुजुमदार ह्यांनीच घेतल्यामुळे त्यांना ती पार पाडता आली नाही. म्हणून ती आता सर्वानाच घेणे भाग आहे.
रा. शिंदे ह्यांच्या वरील भाषणावर सुमारे दोन तास चर्चा झाली आणि शेवटी असे ठरले की, परिषदेची सनदशीर व्यवस्थेविषयी प्रत्यक्षपणे वाटाघाट करण्याचा काळ आताच आलेला नाही. तरीपण परिषदेच्या पुढील कामासंबंधी दिग्दर्शन करण्याच्या हेतूने काही त्रोटक सूचना दुस-या दिवशीच्या बैठकीत आणण्यासाठी प्रो. विनयेंद्रनाथ सेन ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक सब्-कमिटी नेमण्यात आली. त्या समितीवर सेक्रेटरी म्हणून रा. वि. रा. शिंदे ह्यांची निवड झाली.
त्याच दिवशी सायंकाळी ह्या सब्-कमिटीची बैठक होऊन तिने खालील सूचना एकमताने मान्य केल्या:
(१) पूर्वीप्रमाणे परिषद राष्ट्रीय सभेबरोबरच भरावी.
(२) स्टॅडिंग कमिटीने काही योग्य आणि निवडक विषयांचा तक्ता तयार करून त्यावर निरनिराळ्या समाजांच्या प्रतिनिधींकडून निबंध मागवावेत व परिषदेत वाचल्यावर पसंतीप्रमाणे प्रसिद्ध करावेत.
(३) जाहीर सभा, मेळे, पुस्तके वाटणे इ. द्वारा ब्राह्मधर्माच्या तत्त्वाच्या प्रसारार्थ परिषदेच्या ठिकाणी व वेळी प्रयत्न करावेत.
(४) सामाजिक मेळे, कौटुंबिक उपासना, सहली वगैरेंच्या द्वारा निरनिराळ्या प्रांतांतून आलेल्या पाहुण्यांमध्ये दळणवळण वाढविण्याचे उपाय योजावे.
(५) पुढील परिषद अलाहाबाद येथे स्टँडिंग कमिटीच्या सल्ल्याने भरविण्याची तजवीज करण्याकरिता बाबू अविनाशचंद्र मुजुमदार ह्यांना विनंती करण्यात यावी.
(६) दुस-या दिवशीच्या बैठकीत हे ठराव पास झाले. नं. ३ व ४ ह्यांतील कामे ज्या ठिकाणी स्वागत कमिटी असेल तेथे तिच्या सल्ल्याने करावी असाही ठराव पास झाला. ह्याशिवाय,
(७) अमेरिका व इंग्लंडमधून उदार धर्माचे काही प्रतिनिधी १९१०-११ साली पृथ्वीपर्यटनास निघून हिंदुस्थानात मुंबई, बनारस व कलकत्ता येथे येऊन व्याख्यान देणार आहेत. त्या प्रतिष्ठित पाहुण्यांच्या आगमनाचा लाभ निरनिराळ्या समाजांनी घ्यावा अशी ही परिषद शिफारस करीत आहे.
(८) श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड ह्यांनी वेळोवेळी ब्राह्मधर्मासंबंधी सहानुभूती दर्शवून व यंदा आपल्या दोघा कामदारांना परिषदेत प्रतिनिधी म्हणून पाठविल्याबद्दल परिषद समाधान व्यक्त करीत आहे.
(९) सन १८७२ च्या विवाहासंबंधाच्या तिस-या अँक्टसंबंधी सरकारकडून काय सुधारणा घडवून आणणे शक्य आहे हे समजून घेण्याकरिता कलकत्ता येथील ब्राह्मसमाज कमिटीने नामदार एस. पी. सिंह ह्यांजकडे एक डेप्युटेशन पाठवावे अशी सदर कमिटीस विनंती करण्यात यावी.
(१०) सरकारी विद्याविषयक संस्थांतून योग्य रीतीने नीतिशिक्षण देण्याची तजवीज करण्यात यावी, अशा अर्थाची हिंदुस्थान सरकारास विनंती करण्यात यावी.
(११) मोघोत्सवाबद्दल सर्वत्र सुट्टी असावी, अशाबद्दलचा ठराव पास झाला.
त्यानंतर हिंदुस्थानातील निरनिराळ्या प्रांतांतील १२ गृहस्थांची एक स्टँडिंग कमिटी नेमण्यात आली. त्या कमिटीचे जनरल सेक्रेटरी रा. रा. वि. रा. शिंदे आणि बाबू अविनाशचंद्र मुजुमदार हे होते. कमिटीच्या सर्व सभासदांनी वार्षिक खर्चासाठी प्रत्येकी २५ रूपये वर्गणी जमवून जनरल सेक्रेटरीकडे पाठवावी असाही ठराव पास झाला.