संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष

संतांचा धर्म
ब्रह्म सर्वगत सदा सम| जेथे ज्ञान नाही विषम||
तया जाणतो ते अति दुर्गम| तयांची भेटी झालीया भाग्य परम||१||
ऐसे ऐसियाने भेटती ते साधु| ज्यांच्या दर्शने तुटे भवबंधु ||
जे कां सच्चिदानंदी नित्यानंदु| जे का मोक्षसिद्धि तीर्थाबंद्यु ||२||
भाव सर्व कारण मूळबंदु| सदा समबुद्धि नास्त्यिक्य भेदू||
भूत कृपा मोडी द्वेषकंदु| शत्रुमित्र पुत्र सम करा बंधु||३||
मन बुद्धि काया वाचा शुद्ध करी| रूप सर्वत्र देखोनि नमस्कारी||
लघुत्व सर्वभावे अंगिकारी| सांडी मांडी मी तू पण ऐसी थोरी||४||
अर्थ काम चाड नाही चित्ता| मानामानहि मोहमाया मिथ्या||
वर्ते समाधानी जाणोनि नेणतां| साधु भेटी देती तया अवचिता||५||
मनी दृढ धरी विश्वास| न करी सांडी मांडीचा सायास||
साधुदर्शन नित्यकाळ त्यास| तुका म्हणे जो विरला जाणिवेस ||६||

There is a certain composite photograph of universal saintliness, the same in all religions of which the features can easily be traced.

(1) Afeeling of being in a wider life than that of this world’s selfish little interests; and a conviction of the existence of an Ideal Power.

(2) A sense of friendly continuity of the ideal power with our own life and a willing self-surrender to its control.

(3) An immense elation and freedom as the outlines of the confining self-hood melt down.

(4) A shifting of the emotional centre towards loving and harmonious affections; towards ‘yes, yes’ and away from ‘no’ where the claims of the non-ego are concerned. These fundamental inner conditions have characteristic practical consequences as follows:-

(a) Asceticism:- The self-surrender may become so passionate as to turn into self-immolation. It may then so Overrule the ordinary inhibitions of the flesh that the saint finds positive pleasure in sacrifice and asceticism measuring and expressing as they do the degree of his loyalty to the higher power.

(b) Strength of Soul:- The Sense of enlargement of life may be so uplifting that personal motives and inhibitions commonly omnipotent, become too insignificant for notice, and new reaches of patience and fortitude open out. Fears and anxieties go,and blissful equanimity takes their place, Come Heaven, come hell, it makes no difference now!

( C ) Purity :- The Sensitiveness to Spiritual discord is enhanced and the cleansing of existence from brutal and sensual elements becomes imparative. Occasions of contact with such elements are avoided the saintly life must deepen its spiritual consitency and keep unspotted from the world.

(d) Charity:- The ordinary motives to antipathy which usually set such close bounds to tenderness among beings are inhibited. The saint loves his enemies and treats loathsome beggars as his brothers, (varieties of Religious Experience, by Prof. W. James, PP, 271-4) वर जे दोन उतारे दिले आहेत. त्यांपैकी पहिला आपल्या एका जुन्या संताचा आहे व दुसरा एका प्रमुख आधुनिक तत्त्ववेत्त्याचा आहे. देश, काल आणि दृष्टी ह्या तिन्ही बाबतीत संत तुकाराम आणि पंडित जेम्स हे परस्परांहून अगदी भिन्न आहेत, तरी पण संतपणाची लक्षणे काय आहेत, हे ठरविण्याचे कामी दोघांचे कसे अपूर्व मतैक्य झाले आहे हे दाखविण्यासाठी वरील लांब उतारे घेतले आहेत. आणि ह्यांवरून दोघांमध्येच एकमत आहे असे नव्हे, तर संत कशा प्रकारची माणसे असतात ह्याविषयी सर्व देशी, सर्व काळी सर्व दर्जाच्या लोकांत बहुत करून फारशी गैरमाहिती किंवा मतभेद नसतो हे उघड होते. असे असून जर संतांविषयी अपवाद ऐकू आले किंवा त्यांचेवर आक्षेप घेण्यात आले, तर ते सहज चुकून किंवा त्यांच्याविषयीच्या गैरमाहितीमुळे नव्हेत तर जाणूनबुजून घेतले असले पाहिजेत.

सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘संत आणि संताळ्याचा धर्म’ अशा मथळ्याखाली सुधारक पत्रातून अपवादक लेख येत होते. शेवटी ‘तुकाराम श्रेष्ठ की वाग्भट श्रेष्ठ’ ह्या प्रश्नाचा निकाल बिचा-या संतांच्या बहुतेक उलटच झाला होता. त्यानंतर मधून मधून हा विषय चर्चेसाठी पुढे येत आहे. आज पुन: त्याच ‘तुकाराम विरूद्ध वाग्भट’ दाव्याची एका दृष्टीने फेरतपासणी चालली आहे. परवा पुण्यास ग्रंथकारांचे संमेलन भरले असता एका निबंधकाराचा रोख असा होता की, फार तर रामदासाला तेवढे वगळले असता इतर कोणत्याही महाराष्ट्रीय संतांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव नव्हती आणि म्हणून अर्थातच त्यांच्या हातून राष्ट्राच्या उत्कर्षासाठी काही झाले नाही. ह्या आक्षेपानंतर तेथल्या तेथेच तुकारामाबद्दल थोडीशी तरफदारी करण्यात आली होती, आणि मागाहून येथील एका दैनिक पत्रात एक अनुकूल लेख आला होता. पण एकंदरीत संतांविषयी जे दुर्लक्ष अलीकडे वाढत्या प्रमाणावर आहे, त्याचा ओघ काही अद्यापि फिरला नाही. आणि ह्या धामधुमीत पुन: नवीन संतच उत्पन्न झाल्याशिवाय तो ओघ लवकर फिरण्यची चिन्हही दिसत नाहीत. तथापि, दहा वर्षांपूर्वी हा प्रश्न प्रथम निघाला होता. तेव्हा ह्या पीठावरून ह्याचा विचार झाला होता, तसा आताही धर्मदृष्टीने विचार होणे जरूर आहे.

प्रथम आपण संतांवर कोणते कोणते आक्षेप घेण्यात येतात ते पाहू:-

पहिला आक्षेप:- हा येतो की संत हे नेहमी ईश्वरद्रष्टे असतात, ज्या वास्तविक जगात ते राहतात तेथील अपूर्णता आणि विषमता त्यांचे नजरेत भरत नाही. त्यांचा सर्व काळ आदर्शमय पूर्म जगाकडेच लय लागला असल्याने ह्या प्रासंगिक जगातील निरनिराळ्या जबाबदा-या सांभाळण्याची पात्रता त्यांचे अंगी नसते. येथील अडीअडचणीत इतरांप्रमाणे त्यांचेही पाय अडखळत असता पारलौकिक सुखातच ते निमग्न असतात. त्यामुळे त्यांचे वृत्तीत वाजवीपेक्षा जास्त तृप्तता येऊन त्यांचे स्वत:चे आणि भोवतालचे सामाजिक जीवन हळूहळू शिथिल होऊ लागते. येथील वेळोवेळी बदलणारी स्थिती व त्यातून सतत चालू असलेला विकास वगैरे इहलोकचा सोहळा, त्यांना न कळल्यामुळे त्यांची स्वत:ची वाढ खुंटलेली असते. एकंदरीत एकदेशीयता, अरसिकता व म्हणून अपूर्णता त्यांचे ठायी असते.

दुसरा आक्षेप:- संतांचे मनात नेहमी पूर्ण जगाचेच वारे खेळत असल्यामुळे ते केवळ निंदास्तुतीचाच नव्हे तर प्रत्यक्ष सुखदु:खाचा आनंद, अद्वेगाचा किंबहुना ब-यावाईटाचाही सबगोलंकार करून सोडतात. इकडे व्यवहारात सुधारक जातिभेद मोडण्याचा नुसता प्रयत्नच करीत आहेत, तर इकडे ह्या संत-सुधारकांनी विचारसृष्टीतील सर्वच द्वंद्वांचा फन्न उडवून दिला आहे. न्याय, अन्याय, धन आणि ऋण ही सारी टक्का शेर मापाने मोजणे, पुत्र आणि शत्रू, रंक आणि राव ह्यांवर प्रेमाचा सारखाच पाऊस पाडणे हा शुद्ध अविवेक नव्हे, तर काय?

तिसरा आक्षेप:- ब-या वाईटाला सारखेच आलिंगन दिल्याने ब-याची वाढ आणि वाईटाचा प्रतिकार करण्याची बुद्धी नाहीशी होऊन संत स्वत: दुबळे होतात व दुस-याला दुबळेपणाचा कित्ता घालून देतात. अशक्तांना आपला कमकुवतपणा एक गुणच वाटतो, सशक्तांच्या शक्तीचा उपयोग न झाल्यामळे ती जागच्या जागीच लयाला जाते. कोणी एका गालावर मारील तर त्याच्या दोन्ही गालांवर रोकडा न्याय ठेवून दिला तरच आतताईपणावर नीट वचक बसेल. नाही तर एका संतामागे दहा गुंड आणि शंभर दुबळे जन्मास येणार आणि आपली आज्ञा मोडल्याबद्दल सृष्टीदेवीही, संत असंत काहीच न पाहता सरसकट आपला सूड उगविणार खास!

येणेप्रमाणे एकदेशीयता, अविवेक आणि दुर्बलता ह्यांची वाढ केल्याने तीन आरोप संतमंडळीवर ठेवण्यात आले आहेत. फिर्यादीतर्फे बळकट पुरावा सादर करण्यात आला आहे. आणि इकडे आरोपींना तर आपली नुसती तरफदारी देखील करण्याची इच्छा नाही. शिवाय ह्या खटल्याचा फैसला करण्याकरिता तुम्हा आम्हा जनसमूहाची जी प्रचंड ज्युरी बसली आहे, तिच्यात आरोपीच्या जातीचे कोणी दिसत नाही, तो प्रकार असा:

माणूसपणाचे दोन प्रकार आहेत. एक संतांचा आणि दुसरा वीरांचा, मग ते वीर्य लेखणीचे असो किंवा तलवारीचे असो किंवा तराजूचे असो, वीर्य ते एकच. जे स्वत: संतही नाहीत आणि वीरही नाहीत अशा नामधारी माणसांचाच भरणा पुष्कळ आणि हो खोगीरभरतीच प्रस्तुत खटल्यात ज्यूरीच्या उच्च पदावर विराजमान झाली आहे, ह्या भरण्यातली तुम्ही आम्ही साधी माणसे बहुतकरून वीरपक्षाची म्हणजे वीरांचेच चहाते आणि अनुयायी असतो. कारण संताचे चाहाते होण्याला अंगी तेवढ्यापुरता तरी संतपणाच यावा लागतो, आणि तो आला की आमची गणना ज्यूरीतून आरोपीत होऊ लागते. पण उलटपक्षी वीरांचे चहाते होण्याला अंगी वीर्य पाहिजे असे नाही. इतकेच नव्हे तर ज्या प्रमाणाने अंगी वीर्याचा अभाव जास्त, त्या प्रमाणाने वीरांची चहाही जास्त असण्याच संभव आहे. एक वीर दुस-याशी फटकून असतो. पण संत संताला भेटला, तर परस्पर लोटांगणच व्हावयाचे. पंढरपूरसारख्या ठिकाणी ह्या गोष्टीचा निदान प्रघात तरी पाहण्यात येतो. एकंदरीत तुम्ही-आम्ही वीरपंथी माणसे. ह्या संतांच्या अपूर्व खटल्याची चवकशी करण्यास्तव ज्यूरीच्या ठिकाणी बसलो आहो!

संतांच्यासंबंधाने वर जे मुख्य तीन आक्षेप घेण्यात आले आहेत, त्यांचा थोडा विचार केला असता कळून येईल की ते सर्व आक्षेप वीरांच्या दृष्टीने वीरपंथीयांनी घेतले आहेत. संतांना आणि वीरांना समोरासमोर उभे केले तरी जे आक्षेप वीरदृष्ट्या संतांवर लागू झाले आहेत, त्यांचीच दुसरी बाजू बरोबर वीरांना लागू होते आणि ह्याच तुलनेचा विचार करताकरता शेवटी श्रेष्ठ कोण ह्यासंबंधाचा अगदी निर्णय जरी झाला नाही तरी बरीच सूचना तरी मिळते. पहिला आक्षेप एकदेशीयत्वाचा संतांप्रमाणेच वीरांनांही लागू आहे. संत जर केवळ ईश्रवद्रष्टे किंवा आदर्शाकडेच पाहणारे असले, तर वीरही नुसते जगद्रष्टे अथवा वस्तुस्थितीकडेच पाहणारे आहेत. इहलोकीच्या व्यवहारधुराने वीरांचे डोळे नेहमी इतके भरलेले असतात की त्यांना संतांच्या अंतरीच्या दृढ शांतीची ओळखदेखील नसते. तसेच इहलोकातील व्यवहारसुख संतांना समजत नाही. म्हणून त्यांना अरसिक असे म्हणता येत नाही. आपली नातवंडे काठीचा घोडा आणि मेणाची बाहुली घेऊन खेळताना आजोबांना जसे कौतुक वाटते तसेच संतांनाही वीरांचे शौर्य-धैर्य-चातुर्याचे व्यवहार पाहून कौतुकच  वाटत असते. पण विशेष थोरवी वाटणार नाही. ज्या डोळ्यांनी ईश्वरी लीला पाहिली त्यांना मानवी कृत्यांची थोरवी वाटणे म्हणजे घोडेस्वाराला चिरगुटाच्या घोड्याबद्दल अभिमान वाटण्याइतकेच संभवनीय आहे. ह्यावरून ह्या बाबतीत संतांवर अरसिकपणाचा आक्षेप येत नाही. तर उलट वीरांवरच अप्रबुद्धपणाचा आक्षेप येऊ पाहतो. तसेच संतांमध्ये फाजील समाधान असल्यामुळे जीवनकलहाला आवश्यक असा त्यांच्यामध्ये मनगटाचा जोर (Strenuous Life) नसतो, हाही आक्षेप बरोबर नाही. सर्वव्यापी ईश्वराची पूर्णता ज्यांनी केवळ विचारानेच नव्हे तर स्वानुभवाने निरखिली त्यांचा जीवनकलहच बंद होतो आणि जीवनानंदाचा शाश्वत झरा वाहू लागतो. तेथे मनगटाच्या जोराची भान कोणाला राहणार आहे ! अशा वेळी त्याची आठवण देखील ठेवणे म्हणजे पालखीत बसूनही कुबड्यासाठी हळहळण्याप्रमाणे ग्राम्यपणाचे होणार आहे.

ह्याचप्रमाणे संतांवर अविवेकाचा जो आरोप आला आहे त्याची दुसरी बाजू म्हणजे अविश्वासाचा आरोप बरोबर वीरांच्या माथी येत आहे. आम्ही जर एकाद्या आप्त पुरूषाच्या घरी गेलो तर त्या आप्तावर आमचा जो अभेद विश्वास असतो त्यामुळे त्याच्या घरची गोष्ट अमुक आपल्याला हितकर असेल तमुक हितकर असेल अशी वेडगळ शंका घेणे मुळीच संभवत नाही. आप्ताचे घरी शिरल्याबरोबर जाणीव आणि संकोच सर्व सहजच गुंडाळून ठेविली जाते. ईश्वर आप्त झाल्याने संतांना सर्व विश्व आपले घर वाटते. विश्वास आणि विभ्रम ही मनाची स्वाभाविक स्थिती होते. विवेकाला अवकाशच उरत नाही. हे शब्दांनी सांगून कोठवर भागेल! हा प्रत्यक्ष प्रमाणांचाच विषय होय. तिसरा आक्षेप दुबळेपणाचा तर सर्वात अज्ञानमूलक आहे. संत वाईटाचा प्रतिकार करीत नाहीत ह्याचे कारण त्यांचा दुबळेपणा नव्हे तर विश्वामध्ये जे सर्वगामी सामर्थ्य नांदत आहे त्याचे त्यांना जे प्रत्यक्ष दर्शन होत असते ते होय. ज्याला साम्राज्य दिसत नाही तोच मनुष्य आपल्या संरक्षणाची तयारी करील. ऐहिक साम्राज्यापेक्षा ईश्वरी साम्राज्य कमी दर्जाचे असेल काय? ऐहिक राजनिष्ठेपेक्षा ईश्वरासंबंधी राजनिष्ठेची किंमत कमी ठरेल काय? तर मग ऐहिक राज्यामध्ये आम्ही जर पदोपदी शस्त्र धारण करून वर्दळीला येत नाही तर ईश्वरी साम्राज्यात शस्त्रांचा म्हणजे प्रतिकाराचा प्रयोग ह्याहूनही कमी व्हावयाला नको काय? आणि ईश्वरी साम्राज्य जर पूर्ण प्रकारचे आहे तर प्रतिकाराचा तेथे अत्यंताभावच राखला पाहिजे! नको काय? ह्या दृष्टीने पाहता वीरांची कृत्ये म्हणजे एक तर त्यांच्या आंधळेपणामुळे घडत असावी, नाही तर त्यांच्या आतताईपणामुळेच घडत असतात असे दिसते.

असो. संतांच्या दृष्टीने वीरांना दोषी ठरवावे का वीरांच्या दृष्टीने संतांना दोषी ठरवावे हे ठरविण्याचे काम माझे नाही, फक्त वर सांगितलेला दृष्टिभेद किती महत्त्वाचा आहे हे दाखविण्याचा माझा उद्देश होता. संत मंडळींवर एकदाच निवाडा करण्यासाठी तीन आरोप ठेवण्यात आले. बळकट पुरावा मांडण्यात आला. संत स्वत: तर स्तब्धच बसले आणि निकाल देणारी ज्यूरी पहावी तर अन्य जातीय. हा सर्व करूणास्पद प्रकार पाहून वरील दृष्टिभेद स्पष्ट दाखविला नाही, तर एकतर्फी निकाल होऊन घोर अन्याय होणार अशी भीती पडली! म्हणून वरील भेद दाखविला तो पाहून काय ठरवावयाचे ते ज्याने त्याने ठरवावे.

जगामध्ये संत आणि वीर अशी दोन प्रकारची माणसे असतात असे वर सांगितले. पण जे संत असतात त्यांमध्ये वीर्य मुळीच नसते किंवा जे वीर असतात त्यांमध्ये संतपणाचा अत्यंताभाव असतो असेही नाही. तथापि, दोघांचे विशेष गुण भिन्न असतात. वर जी दोघांची तुलना केली तिजवरून एक गोष्ट दिसते ती ही की वीरांमध्ये नाही असा संतांमध्ये एक विशेष गुण आहे. आदर्शमय अथवा आगामी जगाचा प्रकाश संतांना जसा व जितका मिळालेला असतो तितका व तसा वीरांना मिळाला नसतो. अर्थात वीरांना हा वरील प्रकाश थोड्या अंशांने का होईना, मिळाल्याशिवाय त्याला वीर्याची स्फूर्तीच येणार नाही. पण ज्या प्रकाशाचे थोडेच किरण वीराच्या स्फूर्तीला कारण होतात त्या प्रकाशाचा सतत वाहणारा झोत संतांवर पडत राहिल्यामुळे त्यांची सारी वृत्ती बदलून जाते. त्यांचे इहलोकीचे व्यवहार लटपटतात. पण वीरांचे अशी विव्हल दशा झाली नसल्यामुळे व स्फूर्तीपुरताच किरणांचा लाभ झाल्यामुळे ते आपल्या अंगच्या शक्तीचा संचय करू शकतात, व्यय करू शकतात आणि विकासही करू शकतात, प्रस्तुत जग त्यांच्या कर्तृत्वाला योग्य क्षेत्र होते. आणि त्यांच्या चरित्राचा परिणाम राष्ट्राच्या उत्कर्षात झालेला उघडउघड दिसतो. पण संतांचा असा उघड प्रकार होत नाही. म्हणून तेवढ्यावरून संतकोटी वीरकोटीहून कनिष्ठ दर्जाची म्हणता येत नाही. इतकेच नव्हे तर प्रकाशाचा वाटा त्यांना अधिक मिळाल्यामुळे अंतरीचे सुख आणि शांती, समाधान आणि शक्ती इ. गुण वीरांपेक्षाही त्यांच्यात फार उच्च दर्जाचे आणि बळकट जोमाचे असतात म्हणून राष्ट्राच्या इतिहासात नाही तरी मनुष्यजातीच्या इतिहासात त्यांचे तेज अधिक फाकते. असो.

संतांची ही थोरवी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने राष्ट्राच्या उत्कर्षाला कशी कारणीभूत होते हे पुढे केव्हा तरी ईशकृपेने पाहू.