सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण

माझे तरुण मित्र ‘हंटर’कर्ते श्री. माधवराव बागल ह्यांनी हे छोटेसे सुंदर पुस्तक लिहिले आहे. माधवराव हे कलाभिज्ञ चित्रकार असल्याने आपल्या ह्या वाङ्मयीन कृतीतही त्यांना आपली सौंदर्याभिरुची प्रकट केल्याविना राहावले नाही. छोटे पुस्तक, सुटसुटीत प्रकरणे, लहान लहान पॅरेग्राफ, मार्मिक आणि समर्पक अवतरणे, साधी मराठी भाषा वगैरे उपकरणांनी त्यांनी आपले अभिनव विचार महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाच्या गळी उतरविण्याचा जो प्रयत्न केला आहे, तो केवळ अभिनंदनीय होय. हा प्रयत्न एकाद्या कथा-कीर्तनाप्रमाणे जनतेलाही रुचेल असे वाटते. एकंदर विचारसरणी नवी असल्याने अर्थात ह्यातील अवतरणे कार्ल मार्कस्, एच. जी. वेल्स. बर्नार्ड शॉ, टॉलस्टॉय, लेनीन इ. पाश्चात्य आचार्यांच्या शिकवणीतूनच घेणे भाग होते. पण मधून मधून टागोर, उमर खय्याम, तुकाराम, एकनाथ, ज्योतिबा फुले अशा पौरस्त्य महानुभावांचे उतारेही घेतले आहेत. ते जास्त घेतले असते तर बरे झाले असते. निदान पाश्चात्यांचे जे उतारे घेतले आहेत, त्या सर्वांची मराठीत भाषांतरे दिली असती तरी बरे होते. जनतेसाठी तरी भाषांतरे अवश्य होती.

सत्यशोधक समाजाचे एक सभासद, पुस्तककर्ते स्वतः असून पुन्हा त्या समाजासच इशारा देण्यास व त्याची कार्यव्याप्ती वाढविण्यास तयार आहेत, ह्यावरून ते सत्याग्रही ठरतात. “मोहित्यांची मंजुळा” नावाची एक नवी कादंबरी झाली आहे, असे ऐकतो. ती सत्यसमाजाची सुधारणा करण्याच्या उदात्त हेतूने लिहिली आहे, असे म्हणतात. पण त्या पुस्तकात सत्यसमाजाच्या अत्याचाराचे लालभडक चित्र उठविले आहे असेही ऐकतो. सुधारणेचा छिद्रान्वेषण हाच मार्ग आहे काय ह्याची मला खात्री नाही, पण ही प्रस्तुत सुंदर चोपडी पुढे आली आहे, तिला दोन नावे कर्त्यांनी दिली आहेत, तरी “बागलाची मंजुळा” हे तिसरे अधिक सार्थ नाव त्यांच्या परवानगीशिवाय मी देऊ पहात आहे. कारण हिच्याकडून सत्यशोधक समाजाची अधिक सहानुभूतीने सुधारणा होईल असे मला वाटते. (फुट नोट- श्री. माधवराव खंडेराव बागल ह्यांच्या पुस्तकास प्रस्तावना १९३१.)

धर्म, समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण ह्यांपैकी चौथ्याच क्लिष्ट तत्त्वाकडे कर्त्याचा अधिक ओढा दिसत आहे. ८५ पानावरच्या पहिल्या ओवीत त्यांनी स्वतःच आग्रहाने तसे म्हटले आहे. ते तरुण आहेत. त्यांना हे शोभतेच. पण एकंदर त्यांच्या विवेचनात अर्थकारणाची जी नवी घडी आजकाल बसत चालली आहे तिचाच प्रभाव अधिक दिसत आहे. बागलांची ही मंजूळा कितीही पडदानशीन असली तरी त्यांच्या राजकारणाच्या दाट पडद्याच्या आडून तिचे ताजे (आर्थिक) सौंदर्य दिसल्यावाचून राहात नाही.

अर्थकारणाची धडाडी माधवराव बागलांच्या ह्या छोट्या पुस्तकातच नव्हे तर त्यांनी अलीकडे स्वीकारलेल्या जनसेवेच्या कार्यक्रमातही स्पष्ट दिसत आहे. नुकतेच त्यांनी घडवून आणिलेल्या वाळवे तालुका शेतकरी परिषदेत, सातारा जिल्हा काँग्रेस परिषदेत त्यांनी आणिलेल्या व्याजाबद्दलच्या ठरावात आणि कोल्हापुरात त्यांनी चालविलेल्या खादी प्रसाराच्या कामातही त्यांची हीच आर्थिक नवी वृत्ती दिसून येत आहे.

बागलांनी सत्यशोधकांना दिलेला इशारा स्वतः सत्यशोधकासच कितीसा पटेल ह्याची मात्र मला खात्री नाही, तरी ख-या सत्यशोधकास अंतःकरणात न पटेल असे कोणतेच विधान ह्या इशा-यात कोठेही नाही. पण हल्लीचा काळ नुसता अंतःकरणाचाच उरलेला नसून बाह्यकृतीतील त्याच्या आविष्कारणाचा आणि सा-या समाज परिवर्तनाचा जास्त आहे. हा उद्देश अंशतः तरी सिद्ध होवो, अशी वाचकांपुढे माझी प्रार्थना आहे.