आनंदवाद

ब्रह्मज्ञान नव्हे लेकराच्या गोष्टी| तेथे व्हावा पोटी अनुताप||
दगडाहूनि जीव करावा कठीण| अंतरीचा शीण तेव्हा जाय||
मेल्या मनुष्याची न धरिती आस| तैसा हो उदास संसारासी||
तुका म्हणे येथे कराराचे काम| मग सुखधाम जवळीच||

मागील खेपेस आपण नैराश्यवादाचे विवेचन करून तो कसा व्यर्थ आहे आणि आपणांस कसा पटत नाही हे पाहिले. ह्या खेपेस आनंदवादाचे विवेचने करून त्याचे साधन काय आहे ते पाहू. सुदैवाने जे स्वभात:च सुखी, जन्मत:च आनंदी, आणि उल्हासी असे असतात, संसारातल्या कोणत्याही प्रसंगाने ज्यांच्या उपजत सुखमय स्थितीला बाधा येत नाही, अशांना आनंदावर निराळा उपदेश करण्याची गरज नाही. लहान मुलास मद्यपाननिषेधसंबंधी व्याख्यानाची जरूरी नाही, किंबहुना त्यामुळे धोकाच आहे. कारण त्याच्या कोवळ्या मनाला मद्य म्हणजे काय ह्याची कल्पनाही नसते. ती कल्पना कदाचित अशा प्रकारच्या व्याख्यानामुळे येऊन त्याच्या उच्छृंखळ बाळस्वभावानुसार मद्याविषयी अनिष्ट जिज्ञासाही उत्पन्न होण्याचा संभव आहे. तद्वत वरील स्वाभाविक उल्हासवृत्तीच्या लोकांची स्थिती होण्याचा संभव आहे. उलटपक्षी, जे लोक स्वभावत: दु:खी आणि उदास असतात, ज्यांच्या मनाची मूस जणू काय उद्वेगाच्या धातूनेच ओतलेली असते, अशांनाही केवळ असल्या उपदेशापासून विशेष फायदा होण्याचा संभव नाही. त्यांच्याशी उल्हासी माणसाचा निरंतर समागम घडावयाला पाहिजे आणि त्यांच्या आनंदी मित्रांनी मनाचे आकर्षण करून त्यांच्या मनाची मूळ रचना बदलण्याचा सतत प्रयत्नच केला पाहिजे. पण तुम्ही आम्ही साधारण माणसे अशा वरील दोन अपवादक आणि अतिरेकाच्या स्थितीतील नसतो. उल्हास आणि उदासीनता ह्या दोन्ही भिन्न भिन्न स्थितींची परिवर्तने, प्रसंग, समागम आणि अभ्यास ह्यांच्यायोगे आमच्या मनात चालली असतात. तेव्हा अशा साधारण बहुसमुदायासाठीच आजचा उपदेश आहे. असा साधारण माणसाच्या विचारामध्ये जो निराशावाद आलेला असतो तो त्यांना दुस-याच्या विचारामुळे, अनुभवामुळे, दूषित वाङ्मयामुळे, अपुरत्या किंवा खोट्या तत्त्वज्ञानामुळे आलेला असतो. तो घालवावयाचा झाल्यास ज्या कारणांनी तो आलेला असतो त्याच कारणांनी, तो काढला पाहिजे. एकदा एका वेड्याचे मनाने असे घेतले की, आपण मेलो आहो. ह्या भ्रमामुळे त्याने जेवण मुळीच सोडून दिले. त्याचा हा भ्रम एका कुशल डॉक्टराने जाणून तो काढून टाकावयासा त्याने पुढील उपाय केला. सुमारे दहाजणांस आपण मेल्याचा पूर्ण भास त्या वेड्यास करून देण्यास त्या डॉक्टराने सांगितले. त्याप्रमाणे बराच वेळ अगदी मेल्यासारखे पडल्यावर व आपण मेलो आहो अशी त्या वेड्याची खात्री पटविल्यावर हे दहाजण आपआपसांत बोलू लागले, खेळू लागले व काही वेळाने त्यांच्यासाठी भोजनगृहात उत्तम तयारी करून ठेविली होती तिकडे निघाले. हे सर्व त्या वेड्याच्या देखतच चालले असल्यामुळे मृत मनुष्येही आपल्या परीने चालतात, बोलतात व जेवतात असा त्याचा दुसरा भ्रम होऊन त्यामुळे त्याच्या पहिल्या भ्रमाचे निरसन झाले, आणि तोही त्या दहाजणांबरोबर यथेच्छ जेवला. असाच उपाय आम्हांला ह्या वरील दु:खवाद्यासंबंधी करावयास पाहिजे. आम्हांला आमच्यात स्वदेशी वाङ्मयातून व विचारातून आनंदाची बीजे शोधिली पाहिजेत. पण आमचे वाङ्मय एककल्ली असल्यामुळे तसे करणे थोडे कठीण जाईल. तथापि एकच पागोटे असले तरी ते मोठे असल्यास आलटूनपालटून बांधल्यास साजरे करता येते तसाच प्रकार आमच्या वाङ्मयाचा करता येईल. आपण आज नुसत्या तुकारामाच्याच अभंगातून आनंदवाद कसा निघतो ते पाहू.

“हरीचिया भक्ता नाही भय आणि चिंता| दु:ख निवारिता नारायण||”

असे तुकारामाने म्हटले आहे. पण भक्तीच्या ह्या लक्षणामुळे आळस वाढण्याचा संभव आहे असे कोणास वाटेल पण-

“पोशा आळशी पातकी| एक आहे मी त्रिलोकी| ‘व’
झालो कासावीस वेढिलो आळसे| शरीराचा त्रास आला मज||
तुका म्हणे धाडी पाडिले आळसे| तुझे नाम कैसे राहे आता||”

ह्यावरून तुकारामाला आळसाची किती चीड होती ते दिसून येते. दुसरे ठिकाणी तर त्यांनी म्हटले आहे की,

“नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे| आणूनि निराळे द्यावे हाती||
इंद्रियांचा जय साधूनिया मन| निर्विषय कारण असे तेथे||
उपास पारणी अक्षरांची आटी| सत्कर्मा शेवटी असे फळ||
आदरे संकल्प वारी अतिशय| सहज ते काय दु:ख जाण||
स्वप्नीच्या धाये विवळसी वाया| रडे रडतियासवे मिथ्या||
तुका म्हणे फळ आहे मुळापाशी| शरण देवासी जाय वेगी||”

ह्यात तुकारामाने म्हटले आहे की, ‘रडे रडतियासवे मिथ्या’ म्हणजे रडणा-याबरोबर आपण रडणे हे वेडेपणाचे आहे. दुस-याला दु:ख झाले आणि तो आपल्या दु:खाचा अनुभव सांगतो तेवढ्यानेच आपण दु:खी होण्याचे कारण नाही. आपल्या मनामध्ये धीर आणि समाधान ठेविल्यास ईश्वर जवळच आहे. पण तोही मोक्षाचे आयतेच गाठोडे देतो असे नाही. त्याला घोर यत्न केला पाहिजे. प्रथम मन निर्विषय आणि निर्वासन करण्याचा निषेधात्मक यत्न करून नंतर सत्कर्माचा विध्यात्मक यत्न करावयास पाहिजे, म्हणजे दु:ख हे पोकळ आहे असे कळून येईल. अशा प्रयत्नान्ती परमेश्वर आहे आणि तो सुखस्वरूप आहे हे कळून येईल.

झाला प्रेतरूप शरीराचा भाव| लक्षियेला ठाव श्मशानीचा||
रडती रात्रंदिवस कामक्रोधमाया| म्हमती हायहाय यमधर्म||
तुका म्हणे रक्षा झाली आपोआप| उजळीला दीप गुरूकृपा||”
ह्यामध्ये बौद्धाचे निर्वाण,
“आपुले मरण पाहिले म्यां डोळा| तो झाला सोहळा अनुपम्य||
एकदेशी होतो अहंकारे आथिला| त्याच्या त्यागे झाला सुकाळ हा||”
ह्यामधील ब्रह्मवाद्यांचा अभेद साक्षात्कार,
“सरले आता नाही|न म्हणे वेळ काळ काही||
विठ्ठल कृपाळु माउली| सदा प्रेम पान्हायेली||
शीण न विचारी भाग| नव्हे निष्ठुर नाही राग||”

ह्यामध्ये ईश्वरवादाचे रहस्य सांगितले आहे. पण हे तिन्हीही प्रकारचे ब्रह्मज्ञान झाले तरी शेवटी तुकाराम म्हणतात की त्याच्या साक्षात्काराला प्रयत्न हे मुख्य कारण आहे. त्या केवळ लेकराच्या गोष्टी नव्हेत. ते कराराचे काम आहे आणि अशा करारानेच सुखाचे माहेरघर आपल्या जवळ आहे, ती आपली सहज स्थिती आहे असे कळून येणार आहे, तर आपल्या दु:खाची कारणे एक तर दुस-यांनी सांगितलेले दु:ख किंवा आपला आळस हीच होत. ह्या दोहोंचा त्याग करून आपण सुखी आहो हे समजून घेतले पाहिजे.