‘तीन वर्षांपूर्वी ज्यांचा स्पर्श झाल्यास ‘अब्रह्मण्यम्’ असे सर्वत्र वाटत होते, त्याच समाजास यक्षिणीची कांडी फिरल्याप्रमाणे एकदम निराळे स्वरूप यावे’. असे उद्गार प्रो. कर्वे ह्यांनी परवा ता. १८ ऑक्टोबर रोजी पुणे येथील किर्लोस्कर थिएटरमध्ये भरलेल्या निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या जाहीर सभेत काढले.
नंतर ह्या सभेची हकीकत शिंद्यांनी सांगितली. ‘निकृष्ठांना वर आणण्याच्या कामी आम्ही स्वतःलाच वर आणीत आहो. वरील मंडळीची स्थापना इलाख्याच्या मुख्य शहरी होण्याच्यावेळी तिच्या अध्यक्षांनी प्रांजलपणे म्हटले होते.
पुणे शाखेचे उपाध्यक्ष प्रिं. परांजपे ह्यांनी आपल्या भाषणात ‘महार मांगाच्या उन्नतीचा प्रश्न म्हणजे हा आपल्या सुधारणेचा प्रश्न आहे’. असे जे म्हटले ते वरील वाक्याचाच अनुवाद योग्यवेळी केला म्हणावयाचा.
पुढील तीन वर्षांत ही चळवळ तालुक्याच्या गावी जाणार असेल आणि एकंदर दहा वर्षांच्या आत जर ही खेडोखेडी पसरणार असेल तर प्रत्यक्ष काम करणारांमध्ये वरील सात्विक वृत्ती आतापर्यंत जशी कायम आहे तशी पुढेही कायम राहूनच ह्या चळवळीचा विस्तार होईल व हिचा विजय होईल.
मंडळीला पैशाची गरज नाही, माणसांची आहे. कारण, माणूस पैसा मिळवितो, पैसा माणसाला मिळवीत नाही, उलट केव्हा केव्हा पैशाच्या उपाधीमुळे माणसाचा माणूसपणा जातो. खेड्यापाड्यांतून काम व्हावयाचे असेल तोपर्यंत कामाला खरी सुरुवातही झाली म्हणता येणार नाही—तर माणसे पाहिजेत. काम करावयास पुढे यावे तर ते : (१) पोट भरायला येऊ नये, (२) अधिकार गाजवायला येऊ नये, (३) धडा शिकवायला येऊ नये, (४) मेहेरबानी करायला येऊ नये, तर केवळ प्रेरणेने व श्रद्धेने आपले कर्तव्य दिसत असेल तर बजावयास यावे. म्हणजे वरील सारी फळे आपोआप मिळतील. (फुट नोट - मासिक मनोरंजन, मुंबई, दिवाळी अंक सन १९०९, पृ. ६०.)
शिक्षण आधी का सांपत्तिक सुधारणा आधी ? सामाजिक सुधारणा करावी का धार्मिक सुधारणा करावी हा वाद नको आहे ! जळत्या घराचा वासा जसा ओढावा तसे ज्याने त्याने आपल्या हातास येईल ते काम करावे, तरच कळकळ खरी.
मंडळीच्या चार उपदेशांपैकी धर्मोपदेश हा एक उद्देश आहे. कदाचित पुढे मागे त्या मुद्यावर आमच्या ह्या वादप्रिय देशात वाद उपस्थित होण्याचा संभव आहे. ह्यावर तूर्त एवढेच सांगणे आहे की, ‘धर्म’ पदाचे दोन अर्थ आहेत. एक सात्विकपणा व सत्त्वाचा प्रवर्तक जो ईश्वर त्याकडे प्रवृत्ती; आणि दुसरा—पंथाचा अभिमान. मंडळी जो उपदेश करते तो पहिल्या अर्थाने. ज्या दिवशी पहिल्या अर्थाचा लोप होऊन दुसरा माजेल त्या दिवशी तेवढ्या उद्देशापुरते तरी मंडळीचे काम दुष्कर होऊ लागेल आणि ह्यासंबंधी दहशत मंडळीलाच वाटावयास पाहिजे व तशी ती वाटते, इतरास काळजी नको.