ब्राह्मणेतर समाजातर्फे मानपत्र

गुरूवर्य श्री. विठ्ठल रामजी शिंदे, बी. ए.

ह्यांचे सेवेशी-

सद्धर्म-प्रचारक अण्णासाहेब, सामाजिक विषमतेचे विष रोमारोमात भिनल्यामुळे, निर्जीव झालेल्या आमच्या हिंदुस्थानास, सद्धर्मछत्राखाली समतेच्या अमृताचे घुटके पाजून त्यास धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी महात्मा गौतमबुद्ध, महावीर, चोखामेळा, नामदेव, एकनाथ, तुकाराम, राममोहन रॉय, दयानंद, जोतिराव फुले, विवेकानंद इत्यादी धर्मवीरांच्या परिश्रमाने पुनीत झालेल्या कार्यासच आपण आजन्म वाहून घेतले, ह्याबद्दल आम्हा अखिल ब्राह्मणेतर समाजास फार धन्यता वाटत आहे. आपण गेल्या पंचवीस वर्षांत केलेल्या राष्ट्रीय कार्याबद्दल ह्या देशातील कोणत्याही धर्माच्या, मताच्या अथवा राजकीय पक्षांच्या लोकांनी आपल्याविषयी गौरवपूर्वक अभिमान बाळगणे जरूर आहे.

ता. २३-४-२३ रोजी आपल्या ५१ व्या वाढदिवशी आपल्या स्नेही व अनुयायी मंडळींनी आपणास दिलेले मानपत्र आपल्या स्मरणात असेलच. त्यानंतर गेल्या दोन वर्षात आपण बंगाल, मध्यप्रांत, ओरिसा, तेलंगण, तामीळप्रांत, मलबार, कर्नाटक आणि महाराष्ट्र देशांत बाह्य धर्माच्या प्रसारासाठी संचार करीत असताना इतर धर्मपंथांविषयी उदारपणाची वृत्ती ठेवून जे कार्य केले, ते सत्यशोधक समाजाच्या उद्देशास पटण्यासारखे आहे, हे आम्ही नम्रतापूर्वक नमूद करितो.

आपण दक्षिण हिंदुस्थानात असताना, वैकोम येथे चाललेल्या सत्याग्रहाचे समक्ष हजर राहून निरीक्षण केले व तेथील सत्याग्रही मंडळीस योग्य उत्तेजन दिले ह्यांबद्दल आम्ही आपणास अनेक धन्यवाद देतो. कर्मठ ब्राह्मण्याचा अविर्भाव आणणा-या लोकांनी आपण व महात्मा गांधी ह्यांनी आदि-हिंदू समाजाचे न्याय्य हक्क त्यांना देण्यासाठी केलेल्या सूचनांकडे बुद्धिपुर:सर दुर्लक्ष केले, हे आपल्या लक्षात आले असेलच, त्यावरून ब्राह्मणेतरांची स्वतंत्र चळवळ अधिक जोराने चालविण्यासाठी आपला आशीर्वाद व पाठिंबा असावा अशी आम्ही अपेक्षा करितो.

आपल्या वरील प्रवासामध्ये आपण इतिहास व भाषाशास्त्राचाही व्यासंग कायम ठेवून त्यासाठी प्राचीन स्थळे व पवित्र क्षेत्रे ह्यांचे निरीक्षण करून त्याबद्दल आपले विचार वारंवार भाषण व लेखनाद्वारे प्रसिद्ध केले ह्याबद्दल आम्ही आपले फार आभारी आहो.

कर्मवीर अण्णासाहेब, आपण स्थापन करून प्राणांपलिकडे जतन केलेल्या The Depressed Classes Mission Society of India भारतीय निराश्रीत साह्यकारी मंडळीमध्ये नाना त-हेचे मतभेद व अनेक अडचणी उत्पन्न झाल्या, त्या सर्वांना शांतपणे व धैर्याने तोंड दिले व शेवटी काही मंडळींनी मुंबई हायकोर्टात आपल्या उलट दावा लाविला असता आपण त्यात विजयी झाला हे केवळ आपण केलेल्या असिधाराव्रताच्या तपश्चर्येचे फळच होय, असे आम्हांस वाटते. अण्णासाहेब, आपण अस्पृश्यता निवारक चळवळीचे मुख्य केंद्र पुणे येथेच ठेवून आपली इतर कार्ये पुण्यास राहूनच करावी व आपल्य समागमाचा आणइ उपदेशाचा लाभ आम्हांस सतत द्यावा अशी आपणास आमची कळकळीची विनंती आहे.

राष्ट्रवीर अण्णासाहेब, आपल्या कार्यात आपल्य परमप्रिय भगिनी सौ. जनाबाई शिंदे ह्यांनी योग्य पाठराखी केली ह्याबद्दल त्यांनाही आम्ही शतश: धन्यवाद देतो, व शेवटी भरतखंडात आपल्यासारख्या विबुद्धमान्यनरवर महात्म्यांना दीर्घायु, यश व आरोग्य प्राप्त व्हावे, आणि आपल्यासारखी नररत्ने ह्या भरतखंडाला उत्तरोत्तर अधिक लाभावीत अशी त्या जगन्नियंत्याजवळ आमची मन:पूर्वक प्रार्थना आहे.

आपला नम्र,
अखिल ब्राह्मणेतर समाज