बंदिस्त बळीराजा

आपल्या मुलाबाळांच्या प्राथमिक गरजा भागविण्याइतके उत्पन्न जो स्वतः शेतीमध्ये मशागत करून मिळविण्याचा प्रयत्न करतो तो शेतकरी, तोच बळीराजा.
भांडवलदार शेतक-यांच्या छातीवर बसलेला कायमचा दावेदार, शेतकरी व कामगार हे खरे राष्ट्राचे धारक व चालक. वास्तविक भांडवलदाराने शेतक-यांच्या आणि कामगारांच्या मांडीखाली तट्टासारखे चालले पाहिजे. कारण ह्या तट्टाची चंदी शेतकरी कामगारांच्या हातात असते. आणि “ज्याची चंदी त्याचाच लगाम असावयास हवा;” पण घडते उलटे ! तट्टाच्या हातातच मालकाचा लगाम !! तट्टू जिकडे जाईल तिकडे ससेहोलपट शेतकरी कामगारांची !!!
जमीन मालकीहक्क कल्पना ब्रिटिश काळात जमिनीचे अति लहान तुकड्यात विखुरण्यास कारणीभूत झालेली आहे. हे लहान तुकडे एकत्र केले पाहिजेत. त्याशिवाय कृषि-उत्पादनक्षमता वाढणार नाही. म्हणून १९२८ साली जसे तुकडेबंदी बिल आणले होते तशी आजही तुकडेजोड कायद्याची कार्यवाही निरनिराळी राज्ये करताहेत. जमीन मालकी व्यक्तीची वा व्यक्तीसमूहाची असूच शकत नाही. जमीन ही सर्व समाजाच्या सर्वकालीन समाईक मालकी हक्काची आहे. एक आपद् धर्म म्हणून राज्यसत्ता निरनिराळ्या व्यक्तीला मालकीहक्काचे वितरण करते. जमीन लहान असल्याने उत्पादनवाढीस अडथळा येतो. असे भांडवलदार कट (Clique) करून ओरड करतात. त्यांचे ओरडणे वजनदार असल्याने, सामाजिक न्यायाची पायमल्ली होत असताना सुद्धा स्वीकारली जाते. शेतकरी असंघटित असल्याने व तो असंघटित राहील ह्या दृष्टीने भांडवलदारांनी केलेल्या क्लृप्त्या यशस्वी होत राहातात. त्यातल्या त्यात गोरगरीबांना नाना त-हेच्या व्यसनात गुरफटण्यात आनंद वाटत राहील अशी परिस्थिती निर्माण करण्यात भांडवलदार यशस्वी होतात. शेतक-यांची दानत (फूट नोट- रयत शिक्षण पत्रिका, सातारा १९७३, [ता. २४ ऑक्टोबर १९३७ रयत शिक्षण संस्था, आजीव सेवक शपथविधीचे वेळी काढलेले उद्गार.]) बिघडविली जाते. आणि त्यामुळे साधनसामग्रीचे समान वाटप म्हणजे गरिबीचे वाटप असे त्यांना दृष्टोत्पत्तीस आणता येते.
संन्याशाच्या लग्नाची जशी शेंडीपासून तयारी तशी हीनदीन शेतक-यांच्या व अस्पृश्यांच्या उन्नतीची त्याच्या मनापासून तयारी करावयास हवी, त्यासाठी त्यांना शिक्षण, सामाजिक शिक्षण मिळावयास हवे.
महार व मराठे हे चुलतबंधू आहेत. त्यातही महार थोरल्या घरचे आहेत. ही भावना निर्माण झाली पाहिजे. ह्यालाच लोककल्याण म्हणावयाचे, लोककल्याण म्हणजे शीलाची, अंतःकरणाची पालट, सनदेची अदलाबदल नव्हे. प्रत्येकाने ती कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर “ज्याचे त्याने अनहित केले तेथे कोणाचे बा (काय) गेले ?” अशी गत व्हायची.
सामाजिक एकी निर्माण झाली की, अर्थगाड्याच्या बैलाची शिंग-दोरी नेहमी खेचता येते. शेतक-यांचा राजकारणावर, व्यापारावर ताबा राहू शकतो. विकासाच्या परिपोषक संस्था निर्माण होतात. एकमेकांत सहकार्याची भावना निर्माण होते.
खेडे-शहर कारखानदारी-शेती हा भेद रहाणार नाही. ह्यासाठी वाहतुकीच्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला पाहिजे. सार्वत्रिक शिक्षण व वाहतुकीची साधने जितकी वाढतील तेवढी सर्वसामान्यांची जागृती वाढेल. सर्वसामान्यांच्या जागृती वाढीबरोबर भांडवलशाहीचे चिरंजीवीत्व लयास जाईल. त्याचबरोबर स्वराज्य मिळेल. स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात होईल.

सामाजिक त्रिविधता “तिरपगडा”
देशाचा त्रिफळा होऊ नये. सर्व हिंदू समाज हा एक साप आहे. ह्या सापाचे विषारी तोंड म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजणा-या अल्पसंख्य पण पुढारलेल्या जातीजमाती. समाजस्वरूपी ह्या सापाचा मधला भाग म्हणजे, सुस्त व बेडूक गिळालेला मधला बहुजनसमाज ! ह्यात मराठे व तत्सम शेतकरी, कारागीर, बहुजनता समावेशित होते; व शेपटी म्हणजे मागे अस्पृश्य मानलेली व आता हरिजन-बौद्ध ह्या नावाने ओळखिली जाणारी तळातील अल्पसंख्य ग्रामीण मोल-मजूर व दास मानलेले हे लोक होत. ही दास-प्रथा ह्या देशात जन्मजात व नैसर्गिक ठरली. ती जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ह्या न्यायाने ह्या अस्पृश्यतेच्या रूढीची भयानकता त्यांची त्यांनाच जास्ती ठाऊक असणे शक्य आहे. आजही भारतात ठिकठिकाणी अस्पृश्य मानलेल्या लोकांवर अन्याय होत असल्याची वृत्ते सर्व प्रांतांतून अधूनमधून वरचेवर येतात !
भरतखंड हे खेड्यांचा फार मोठा समुदाय व त्यातील जनता ह्यांनीच बनलेले आहे. आणि ह्या अफाट लोकसमुदायाची पुनर्रचना करण्याचा बिकट प्रश्न विचारात घेता नुसत्या त्याच्या शिवेपर्यंतही समाज सुधारणेचा पल्ला पोचलेला नाही. आतापर्यंतचा समाजसुधारक हा शहरापुरताच मर्यादित असून त्याचे कार्य फुरसतीच्या वेळातच झालेले आहे... अशीच स्थिती जोपर्यंत राहील तोपर्यंत बहुजन समाजावर ह्या प्रयत्नाचा म्हणण्यासारखा परिणाम घडण्याची आशा नाही.
भारतवासीयांनो, स्वार्थाला, मानवजातीला आणि ईश्वराला स्मरून हा घातकी, पातकी आत्मबहिष्कार नाहीसा करा. आपल्या ह्या चमत्कारिक देशात जातिभेदरूपी सहस्त्रलिंग म्हणजे दुहीच्या हजारो खुणा किंवा लहरी दाखविणारा जबरदस्त तलाव आहे. आज हजारो वर्षे ह्यातले पाणी स्थिर आहे; पण त्याच्या तळाशी गाळामध्ये असंख्य नीच मानिलेले जातिबांधव जिवंत असे वंशपरंपरेने रुतलेले आहेत. एकंदर हिंदुसमूहाकडे पाहिले असता इतका विचित्रपणा व विस्कळीतपणा दिसून येतो की, कोणत्याही दृष्टीने एका विवक्षित कारणासाठी ह्या जनसमूहाचे नीटसे वर्गीकरण करू म्हटले असता जवळ जवळ अशक्यच वाटते.
इंग्रजी राज्यात ख्रिस्ती धर्मात, हिंदू लोकांची धर्मांतरे होत राहिल्यास राष्ट्रीय दृष्ट्या आता जी हिंदु-मुसलमानांची दुही आहे तिच्याऐवजी हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती असा सामाजिक तिरपगडा होणार आणि तो राष्ट्रीय ऐक्याला बाधक झाल्याशिवाय राहणार नाही !


नमुनेदार वसतिगृह
ता. २४ ऑक्टोबर १९३७, रविवार दिवशी, सातारा येथील श्री छत्रपती शाहू वसतिगृहाचा द्वादश वार्षिकोत्सवाचा समारंभ होता. श्री. भाऊराव पायगोंडा पाटील नावाच्या एका विचित्र जैन गृहस्थानी हे गृह उघडले. तेव्हा त्यात एकच अस्पृश्य विद्यार्थी होता. जगद्वंद्य महात्मा गांधी ह्यांच्या हस्ते ह्या गृहाचा नामकरणविधी होऊन, सध्या त्यात १९५ विद्यार्थी आहेत. (पैकी १२ मुसलमान, ९ जैन, ८७ अस्पृश्य आणि ८७ मराठे आणि तत्सम जातीचे आहेत. सातारा येथील राजवाड्यामधील सुमारे १० एकरांची शेतकीची बाग, धनीणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे. ती भाऊरावांनी खंडाने घेतली आहे. गगनचुंबी वृक्ष, सुंदर काळी सुपीक जमीन, मोटा लावलेली मुबलक पाण्याची विहीर अशा ऐश्वर्यात भाऊरावांनी आपले १९५ विद्यार्थी ठेवले आहेत. प्रथम स्वतःचे होते नव्हते ते ८-१० हजार रुपये खर्च करून झाल्यावर मुलांच्या शिष्यवृत्त्या, त्यांचे श्रम व बाहेरचे पैसे ह्यांवरच भाऊराव हे शेत-घर चालवीत आहेत. आजपर्यंत बाहेरून (सरकारी ग्रँट धरून) सुमारे २० हजार रुपये मिळाले आहेत. पण मुलांच्या प्रत्यक्ष पोटगीवर एक पैही खर्चण्यात आली नाही. कारण हरामाचे खाऊन कोणीही पुस्तकी विद्या शिकू नये अशी चालकाची इच्छा आहे. म्हणून भाडे, फी सादिलवार वगैरे खर्चाकरिताच बाहेरच्या मदतीचा व्यर्थ व्यय झालेला आहे. मुलांनी मग ते क्षत्रिय कुलावंतंस असोत की मांग, महार असोत, फुकटचे असोत की, ७-८ रु. फी कदाचित देवोत, सर्वांनी बंधुभावाने वागून सारखे राबून खाल्ले पाहिजे असा निष्ठूर दंडक आहे. त्यामुळे सर्व शागीर्द तेजस्वी, ताजे, आज्ञाधारक व ध्येयवादी आहेत. पोटपोषा एकही नाही. मग चंगी भंगी कोठून असणार ? अशासाठी पुण्यामुंबईतील कॉलेजची वसतिगृहे पाहावीत.
ह्या बारा वर्षाच्या उत्सवात एक स्मरणीय विधी झाला. सभा, खेळांच्या शर्यती, जेवण, नाटक, मिनिस्टरचा सत्कार, ही मामूली सोंगे झाली, त्यात विशेष नाही. ह्या घरातून पास झालेले १०-१५ पदवीधर (त्यात काही एलएल. बी. झालेले, काही एम. ए., बी. इ. होऊ घातलेले हजर होते.) त्याचेही मला विशेष वाटले नाही. पण त्यांतील १५ तरुणांचा आपले भावी आयुष्य भाऊरावांच्या ह्या व अशाच इतर स्वावलंबी शिक्षण संस्थांस वाहून घेण्याचा गंभीर शपथविधी झाला, हाच विशेष होय. हा स्फूर्तिदायक विधी मी व माझी बहीण श्रीमती जनक्का ह्यांचेसमोर व्हावा असा ह्या गृहातील सर्व विद्यार्थ्यांनी अगदी आग्रह धरला की त्यापुढे आम्हांला मान वाकवावीच लागली. वरील १५ पैकी २ मुसलमान, १ जैन, ५ मराठे, ४ अस्पृश्य, २ साळी व १ धनगर असे होते. त्यांतील बहुतेक ग्रॅज्युएटस् होते. त्यांत मांग जातीतील एक विद्यार्थी श्री. भिंगारदेवे हे संस्कृत घेऊन ऑनर्समध्ये आलेले आहेत. ह्या सर्वांनी आमचे पुढे जाहीर रंगभूमीवर उभे राहून शपथ घेण्यापूर्वी श्री. भाऊरावांनी थोडक्यात त्यांची बालचरित्रे सांगितली. ती रोमांचकारी होती.
श्री. भाऊरावांनी अशी घरे मुंबई, पुणे, निपाणी वगैरे ठिकाणी उघडली आहेत. डिप्रेस्ड क्लास मिशनचे वसतिगृह आम्ही भाऊरावांनाच बहाल केले आहे. पण ते नमुनेदार कधी होईल ते देवालाच माहीत.
पुण्यात फर्ग्युसन कॉलेजच्या पश्चिम कुंपणाला लागून प्लेग कँपच्या पुणे शहर म्यु. च्या पत्र्याच्या मोडक्या ओसाड झोपड्या आहेत. त्यात भाऊरावांनी आपल्या सुमारे २५ कॉलेज विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह काढले आहे. त्यांना प्रत्येकी पोटाला खर्च दरमहा ३-१२-० रुपयांपेक्षा जास्त येत नाही. हा खर्च देखील त्यांच्या सातारच्या बोर्डिंगच्या मानाने एक रुपया अधिकच आहे. ऑनर्स ग्रॅज्यूएटचे हे ऐश्वर्य की, म्यु. ने ह्यांना कंदील की, नुसते पाणीही अजून पुरविले नाही. ह्यात ब्राह्मणांखेरीज इतर सर्व जातींचे विद्यार्थी आहेत. त्यांत बरेचसे हरिजन आहेत. ब्राह्मणांनाही घेण्याची भाऊरावांची तयारी आहे. पण ब्राह्मणांची तयारी दिसत नाही. त्यांतील विद्यार्थी बिनबोभाट मोठमोठ्या परीक्षेत वरचे नंबर पटकावितात. एका माजी विद्यार्थ्याने तर चालू साली पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये फेलोशिप मिळविली आहे. आंघोळीपुरते फर्ग्यूसन कॉलेजच्या आवारात ते जातात व येतात व येताना पिण्याचे पाणी आणतात. कित्येकांच्या दारांना कड्या कुलपेही नसतात. डर तो पिछे रहा, त्याबाबत नजीकच्या कॉलेज वसतिगृहात डोकावा म्हणजे सोन्याचा धूर निघत असलेला आपणास दिसेल. इतके असूनही पुण्यातील संतमहंतांना श्री. भाऊरावांचे युनियन बोर्डिंग हाऊस कोठे आहे हे माहीत नाही. मग ते कसे चालत असेल ह्याची चौकशी कोण करणार ? 
पुण्याच्या शुक्रवार पेठेत श्री. शिवाजी हायस्कूलला लागून श्री. बाबूराव जगताप ह्यांनी एक कौटुंबिक उपासना मंडळ चालविले आहे. त्यात त्यांच्या हायस्कूलच्या वसतिगृहाचे ४० विद्यार्थी दर रविवारी जमत असतात. गेल्या रविवारी वरील युनियन बोर्डिंग हाऊसचे सर्व विद्यार्थी उपासनेस हजर होते. ततप्रसंगी पुणे येथील अहल्याश्रमाच्या डी. सी. मिशन वसतीगृहाचे अधिकारीही हजर होते. एकंदर ६०-७५ जमाव होता. येत्या २५ तारखेला नाताळचे दिवशी ख्रिस्त जयंतीनिमित्त वनोपासनेसाठी वरील तिन्ही संस्थांच्या विद्यार्थ्यांनी कौटुंबीय उपासना मंडळाच्या ह्या उपासनेस हजर रहाण्याचे ठरविले आहे. येणेप्रमाणे ह्या तिन्ही वसतिगृहांतील तरुणांना एकत्र आणून पद्धतशीर वळण लावण्याचा विचार आहे. काय होते ते पाहू.