मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. २९-११-१९०१
पुण्यात जशी पर्वती, मुंबईत जसा बाबुलनाथ, तसे हे वरील नावाचे देऊळ मार्सेय येथे आहे. ह्या फ्रेंच नावाचा मराठीत अर्थ ‘आमची रक्षक माता’ असा होतो. ही माता म्हणजे श्री येशू ख्रिस्ताची आई कुमारी मेरी ही होय. हीच ह्या देवळातील मुख्य आराध्य-दैवत आहे.शहराला लागूनच आग्नेय बाजूस एक उंच टेकडी आहे. तिच्या माथ्यावर हे सुंदर देऊळ बांधले आहे. टेकडी चढून वर जाईपर्यंत थकवा येतो. टेकडीच्या पायथ्यापासून तो माथ्यावर देवळाच्या दारापर्यंत लिफ्टने प्रेक्षकजनांस वर उचलून नेण्याची योजना केली आहे, असे आम्हांस वर गेल्यावर कळून आले. ही टेकडी समुद्राच्या काठावर असल्याने येथून एका बाजूस अनंत महासागराचा व दुस-या बाजूस चित्रविचित्र मार्सेय शहराचा देखावा एकाच वेळी दिसत होता. माथ्यावर पोहोचल्यावर देवळाचा दगडी घाट लागला. आजूबाजूस आतबाहेर चहूकडे झाडून साफ केले असल्यामुळे, मनाला फार निर्मळ वाटले. तसेच या उंच एकांत पवित्र स्थळी माणसाची फारशी चाहूल नव्हती. म्हणून येथे लवकरच मन नि:शंक होऊन खेळू लागले. देऊळ भक्कम दगडांचे बांधळे असून काम साधे, सफाईदार व सुबक झाले आहे. तळमजल्याचे दार झाकले होते व आत अंधार दिसत होता. देवळाचा मुख्य भाग दुस-या मजल्यात होता म्हणून आम्ही वर गेलो. आम्ही हिंदुस्थानचे लोक परकीय यवनांस आमच्या पवित्र देवळात येऊ देत नाही, तसेच ह्या देवळातही आम्हा हिंदजनांस जाऊ देतील की नाही ही अपवित्र शंका आमच्या मनांत येऊन आम्ही सगळे दारातच घुटमळू लागलो. इतक्यात एका वृद्ध मनुष्याने आत जाण्यास खूण केली.
देवळात शिरलो, तेव्हा १२ चा अम्मल होता. चोहीकडे शांत व गंभीर देखावा दिसत होता. विरळा एकादा प्रेक्षक अगर उपासक पावलांचा आवाज न करता जपून पाहून अगर प्रार्थना करून नकळत जात असे. आत गेल्याबरोबर दोन्ही बाजूंस दोन मोठ्या ७-८ फूट उंच पितळेच्या लखलखीत ठाणवया दिसल्या.
त्यांवर २-३ फूट लांब बारीक मोठ्या शेकडो मेणबत्त्या जळत होत्या. हे ख्रिस्ती नंदादीप पाहिल्यावर कॅथालिक धर्माचे साक्षात् स्वरूप पुढे दिसू लागले. खालपासून वरती गाभा-यापर्यंत विशाल भिंतीवरून पौराणिक चित्रे टांगली आहेत. कोठे येशू मुलांस खेळवीत आहे, कोठे दु:खितांचे अश्रू पुशीत आहे, कोठे आजा-यांस बरे करीत आहे तर दुसरीकडे कोठे स्वत: येशूचीच छळणा चालली आहे, कोठे त्यास सुळावर खिळून टाकले आहे, अशी नानात-हेची चित्रे हुबेहुब रेखिली होती. शिवाय कोप-यांत, कोनाड्यंत, चौकात चौरंगावर निरनिराळ्या धातूंचे ओतलेले व दगडांचे घडविलेले येशूचे व त्याच्या शिष्यांचे पुतळे बसविले होते व त्यापुढे धूप, दीप पुष्पादिकांचा थाट सजला होता. ही दिव्य शोभा पहात पहात आम्ही शिखराखालच्या मुख्य गाभा-यात उच्च स्थानी दैदिप्यमान् देव्हा-यावर उभी असलेली कुमारी मरीआमा हिच्यापुढे आलो. ही उंचीने वीस वर्षांच्या कुमारीइतकी होती. रंग सावळा, पोसाक अगदी साधा व पायघोळ आणि चेहरा उदात्त पण सचिंत आणि उदास दिसत होता. हिने डाव्या कडेवर लहानग्या येशूस घेतले होते. ह्या उतावळ्या अर्भकाचे वय केवळ १|| वर्षाचे असून तो काही केल्या आईच्या बगलेत ठरत नव्हता, ती आई तशीच बालकाकडे अर्धवट दुर्लक्ष करून, त्याचे पुढे कसे होईल ह्याच विवंचनेत तटस्थ उभी होती. इकडे पोरालाही आईच्या चिंतेची पर्वा मुळीच नसून उलट त्याच्या गुबगुबीत गालावर हास्याचे कमल फुलले होते!! त्याच्या डोईवर काट्यांचा सोनेरी मुकुट लकाकत होता. दीनोद्धारासाठीच जणू ह्या अचाट कीर्तीच्या लहान मूर्तीने आईच्या कडेवरून पुढे झेप टाकिली होती. ह्या मया-लेकरांच्या दोन्ही बाजूंस नंदादीपाच्या तेजाची हजारो कारंजी सतत वाहात होती! अशा प्रकारे ह्या दैवी गुणांचे हे मंगल प्रदर्शन पाहून मन आपल्या स्वाभाविक धर्मास अनुसरून सर्व मंगल गुणांचे जे मूळ त्यास आळवू लागले! क्षणमात्र सात्विक वृत्तीच्या उच्च वातावरणात विहार करून पु: मानवी कृतीचे कौतुक करण्यास ते खाली उतरले. इतक्यात १२ चा ठोका पडून चर्चमधील मध्यान्ह-घंटा दणदणू लागली. आम्हांला इतर ठिकाणे पहावयाची घाई होती म्हणून आम्ही देवळाच्या दुस-या बाजूची चित्रे व पुतळे लगबगीने पाहून बाहेर पडलो.
तुळजापुरची भवानी, सौंदत्तीची यल्लमा, कोल्हापूरची महालक्ष्मी इत्यादी जी जी काही पुरातन हिंदू देवस्थाने पाहिली आहेत त्यांची सहजच आठवण होऊन मार्सेयच्या मरीआमाच्या देवळाचे त्यांच्याशी साम्यभेद काय आहेत. ह्याविषयी मनात विचार येऊ लागले. साम्य हे की हिंदू उपासकांस बारमाही आणि आठी प्रहर आपल्या देवळात मोठमोठ्या दिव्यांची आवश्यकता वाटते, तशीच येथेही ख्रिस्ती उपासकांस वाटत आहे. हिंदू आपल्या देवळांतील भिंतीवर रामरावणाची व कौरव पांडवांची चित्रे काढितो तर ख्रिस्त्यानेही येथे आपल्या भिंती, चित्रविचित्र केल्या आहेत. हिंदू आपल्या देवळात मुख्य स्थानी झगमगीत देव्हा-यावर पार्थिव मूर्तीची स्थापना करितो, तशी येथे ख्रिस्त्यानेही आपल्या उपास्य देवतेची मूर्ती उ केली आहे. येथेपर्यंत दोघांचे केवळ साम्य आहे. ख्रिस्त्याने हिंदूस हीदन, ऑयडॉलेटर (मूर्तिपूजक) इ. नावे ठेवून कितीही हिणविले तरी त्याने येथे आपली आकारप्रियता पूर्ण व्यक्त केली आहे. ही उणीव एकाद्या विशिष्ट धर्मपंथाची अगर मनुष्यवर्गाची नव्हे, तर हिचे मूळ मानवी स्वभावातच आहे. म्हण आहे की, वाघ्याचा पाग्या बनला तरी त्याचा यळकोट जात नाही! त्याचप्रमाणे तिकडे पौरस्त्याने आपल्यास पूर्ण ब्रह्मज्ञानी, अद्वैती इ. इ. जाड्या संज्ञा देऊनही त्याच्या पाठीची लिंगपूजा अद्यापि सुटली नाही, आणि इकडे पाश्चात्य पॅगनचा ख्रिस्ती झाला तरी मूर्तीपूजा आणि विभूतिपूजा यांनी कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने त्यास घेरले आहेच.
असो, मला येथे मूर्तिपूजेच्या युक्तायुक्ततेबद्दल विचार मुळीच कर्तव्य नाही, उलट बाह्य देखावा व आकृती ह्यांच्या साह्याने ईश्वराकडे मन जास्त लवकर लागते, निदान साधारण मनुष्यास तर हाच मार्ग योग्य आहे, हा जो मूर्तिपूजेच्या अभिमान्यांचा मोठा मुद्दा आहे तो मी तूर्त येथे गृहीत धरून चालतो! आणि मी वर जे हिंदू व ख्रिस्ती देवळांमध्ये साम्य दाखविले आहे त्यावरूनही वरील मुद्यालाच बळकटी येते, पण पुढे ह्या दोन्ही देवळांत भेद काय आहे तो पहा. देवळात मुख्य स्थानी ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली असते त्याविषयी विचार केला तर बराच भेद दिसून येतो. कित्येक ठिकाणी मारूतीच्या, कित्येक ठिकाणी गणपतीच्या, कित्येक ठिकाणी भयंकर देवीच्या मूर्ती असतात. काही ठिकाणी शेंदूर आणि तेल ह्यांच्या थराखाली व काही ठिकाणी बेढब वस्त्रालंकारांसाठी मूर्तीच्या मूळच्या रूपाचा लोप झालेला असतो. देवळाच्या भिंतीवरील चित्राकडे लक्ष गेलेच तर तेथे गावठी जिनगराचे कौशल्य झळकत असते. चित्रातील विषय पाहू गेल्यास कोठे मारूतीने कुभकर्णाच्या डोक्यावर गदा मारिली आहे, तर कोठे कृष्णाने राधेस कवटाळले आहे, कोठे महिषासुरवध तर कोठे रासक्रीडा इत्यादी प्रकार चाललेले असतात.
धर्मसाधनाचे बाबतीत चित्रकार व शिल्पकार ह्यांची मदत अगदी अवश्यच वाटल्यास वाटो; पण ती घ्यावयाची झाल्यास सौंदर्यशास्त्री आणि नीतिशास्त्री ह्यांच्या सल्ल्याने तरी ती घ्यावयाला पाहिजे ना? विशेषत: जेथे केवळ साधारण जनसमूहाच्याच फायद्यासाठी मूर्तीची योजना झालेली असते, तेथे तर अधिक काळजी घ्यावयाला पाहिजे. एकाद्या ति-हाईताने इकडची देवळे व त्यांतील मूर्ती पाहिल्या तर तो मूळचा निराकारवादी असला, तरी कदाचित मूर्तिपूजक होण्याची इच्छा करील. पण त्याच ति-हाईतास आमच्या एका देवळात नेले आणि त्याच्यापुढे मूर्तिपूजेवर कितीही लांब व्याख्यान दिले, तरी तो विषय त्याच्या मनात नीटसा भरणार नाही. इतका मोठा भेद पडण्याचे कारण काय असावे बरे? आमच्यांत कलाकौशल्य कमी आहे काय? आम्ही नीतीने कमी आहो काय? का आमच्या पुराणांत, दंतकथांतून व इतिहासातून उदात्त विषयांची वाण आहे? छे, ह्यांपैकी एकही गोष्ट वरील भेदाचे कारण असावे असे आमच्या शत्रूसही वाटणार नाही. श्री ख्रिस्ताच्या चरित्रातील देखाव्याचे इकडे जसे प्रदर्शन केले जात आहे, तसे तिकडेही श्रीकृष्णाच्या काही कृत्यांचे प्रदर्शन करता येणार नाही काय? आपल्या भक्तांचे घोडे धुणे, उष्टी काढणे, आपल्या भक्ताची जी दासी तिची वेणी घालणे, तिला दळू लागणे, इत्यादी पवित्र प्रेमाचे मासले ज्या विभूतीसंबंधान ऐकतो, तिचीच विडंबना जागोजागी व वेळोवेळी काव्यांतून व चित्रांतून होत आहे आणि ती धर्माभिमान्यास खपत आहे! गौतमबुद्धाचा स्वार्थत्याग, बाबा नानकाची सुधारणा, कबीराची सत्यप्रीती आणि तुकोबाची भक्ती इ. अनेक सुबोधपर विषयांची निवडणूक करून रविवर्म्यासारख्या मार्मिक चित्रकारांनी त्यावर आपले चातुर्य खर्चिले, तर आमच्या देवळांच्या सौंदर्यात व पावित्र्यात किती भर पडेल बरे! पण अलीकडे जे नवीन नवीन धर्माच्या नावाने उत्सव निघू लागले आहेत आणि त्यांत ज्या मूर्तींचे व चित्रांचे प्रदर्शन होत आहे, त्यावरून पाहता आमच्याकडील मूर्तिपूजकांचे लक्ष ह्या गोष्टीकडे लागेल, ह्याचा काही संभव दिसत नाही.