[८ फेब्रुवारी माघ शुद्ध ११, महर्षींच्या मातोश्रींचे श्राद्धानिमित्त त्यांचे कीर्तन-आख्यान श्री वैष्णव रोहिदास हे लाविले होते. त्या निमित्ताने.]
“अहंकार नासा भेद| जगी निंद्य ओवळा|| बाह्य जगात ओवळे आणि अस्पृश्यता असे काहीच नाही. अस्पृश्यता आहे ती मनातच अहंकाररूपाने असते आणि तीच भेदाभेद भ्रम उत्पन्न करते. अशिक्षित वर्गामध्येही अहंकारामुळेच केवळ अद्यापि अज्ञान साचून राहिल्यामुळे “दगडाच्या देवा बगाड नवस| बाईल कथेस जाऊ नेदी|| असा प्रकार आढळून येतो. मूर्तिपूजा पुरूषास नको असली तरी बायकांच्या अहंकाराला बळी पडलेले पुरूष कशी करतात ते वरील अभंगावरून स्पष्ट होत आहे.
दीडशे वर्षापूर्वी होऊन गेलेल्या महिपती नावाच्या ब्राह्मण कवीन कर्मठपणा, जातिभेद आणि मूर्तिपूजा ह्यांच्या उलट जो हल्ला केला तो हल्लीच्या प्रार्थनासमाज किंवा सत्यशोधक समाज ह्यांच्या हल्यापेक्षा कमी तीव्र मुळीच नव्हता. श्री. रोहिदास अगोदर भजन करून मग स्नान करून एकांती एका चामड्याच्या आसनावर बसून चामड्याच्या संबळीत शाळिग्राम ठेवून ध्यानस्थ होत. ते त्या वेळच्या कर्मठ ब्राह्मणांना न समजल्यामुळे त्यांनी त्याला विष्णूची पूजा अस्पृश्य वर्गानी करणे अयोग्य ठरवून हरकत घेतली. त्यास आपणही वैष्णव आहो हे सिद्ध करण्यासाठी रोहिदासांनी आपली आतडी बाहेर काढून तेच आपले जानवे असे सिद्ध केले. वगैरे कथा आपणास ठाऊक आहेच. आतडी सर्व मनुष्यासच नव्हे तर इतर प्राण्यांसही परमेश्वराने दिली आहे. आईच्या प्रेमाचे चिन्ह आतडे असे समजले जाते. ख-या कळकळीने धर्मकृत्ये करावी ह्यासाठीच जानव्याची खूण वैष्णवांना अथवा शिवलिंगाची खूण शैवांना असते असे सांगण्यात येते, ते किती यतार्थ वाटते!