[अहमदनगर येथे विविध ठिकाणी केलेल्या व्याख्यानांचा गोषवारा].
निर्गुण व निराकार अशा एकाच परमेश्वराचे वर्णन सर्व धर्मांत केले आहे. हा ब्राह्मण, हा क्षत्रिय, हा वैश्य, हा शूद्र असा भेदाभेद परमेश्वराच्या घरी नाही. मनुष्यमात्राने निर्माण केलेल्या सर्व जातीच्या व स्थितीच्या लोकांस जो समान दृष्टीने पहातो, रंक असो अथवा राव असो, उच्चवर्णीय असो अथवा अस्पृश्य असो, जो कोणी त्यास शरण जातो त्यास तो सारखाच प्रसन्न होतो. संत तुकाराम, नामदेव शिंपी, रोहिदास चांभार व चोखा महार ह्या सर्व सदभक्तांस परमेश्वर सारख्याच प्रमाणात प्रसन्न झाला.
निष्ठा व नास्तिक्य हे दोन शब्द परस्पर विरोधवाचक असले तरी निष्ठेशिवाय नास्तिक्य भाव उत्पन्न होऊन त्यांचे छळ होण्याचे कारण छळकांची आपल्या धर्ममतांवरील निष्ठाच होय. हिंदुस्थानात आज धर्माबद्दल अनास्था निर्माण झाल्याचे दिसून येते. ज्याप्रमाणे पतिपत्नीचा आमरण संबंध असतो, तसेच हाती घेतलेल्या विशिष्ट कार्याचा व आपला आमरण संबंध असावा. राममोहन रॉय व केशवचंद्र सेन ह्यांचे ठायी कार्यनिष्ठा व धर्मनिष्ठा ह्या दोहोंचाही मिलाप झाला होता. आपले आचरण आपल्या धर्माप्रमाणे ठेविले असता आपल्या आध्यात्मिक जिण्याची वाढ होते व आपल्या धर्माचे महत्व वाढते.
धर्मांचे सहकार्य
सर्व धर्मांत एकाच परमेश्वराच्या अस्तित्वाचे वर्णन केले आहे. भेद एवढा असतो की, निरनिराळ्या धर्माचे परमेश्वर वर्णनाचे निरनिराळे मार्ग आहेत. वर्तुळाच्या परिघावरून शेकडो रेघा मध्यबिंदूकडे ओढता येतात. हाच प्रकार सर्व धर्माचा आहे. म्हणजे धर्मामध्ये बिंदू परमेश्वर आहे, हे लक्षात आणून परधर्माशी आपली नेहमी सहिष्णुता प्रकट करून इतर धर्माशी सहकार्य करावे. पापाबद्दल पाप्याचा द्वेष न करिता खुद्द त्या पापाचाच द्वेष केला पाहिजे. रोग्याची शुश्रुषा करण्याऐवजी त्यास आरोग्यावर व्याख्यान दिले असता त्या बिचा-या रोग्यास काय फायदा? त्याची शुश्रुषाच केली पाहिजे. व तद्वत कोणत्याही धर्माचा मनुष्य असो, आपला धर्माभिमान एका बाजूला ठेवून आपण त्याची सेवा करावी व त्याच्या अंत:करणातील अंमगलता काढून टाकावी. हा पापी आहे, हा परधर्मीय आहे, हा अस्पृशअय आहे असा कोणत्याही प्रकारचा भेदभाव न धरिता त्याची वृत्ती खरी खरी धार्मिक बनवावी असे केले असता सर्व धर्मांमध्ये सहकार्याचे बीज उत्पन्न होईल.