जाणोनि नेणते करी माझे मन| तुझी प्रेमखुण देऊनिया||१||
मन मी व्यवहारी असेन वर्तत| जेवी जळा आत पद्मपत्र||२||
ऐकूनि नाइके निंदास्तुति कानी| जैसा का उन्मनी योगीराज||३||
तुका म्हणे ऐसे झालिया वाचून| करणे ते ते शीण वाटतसे||४||
संसार करीत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या व्यवहारात निमग्न रहावे लागते. आणि हे व्यवहार करीत असताना आपली स्तुती ऐकण्याचे प्रसंग प्रत्येकास येतात. निंदेचेही प्रसंग येतात, त्यांचा विचार पुढे करू. परंतु आपले हातून सदव्यवहार घडो, किंवा अविचाराची कृत्ये होवोत, आपली कोणी ना कोणी केव्हा तरी स्तुती करणारे आढळतेच! बाहेरचे कोणी नसले तरी आपले आप्त, आपली बहीण, पत्नी असे कोणी तरी आपली स्तुती करतेच. तूर्त हा स्तुतिनिंदेचा विचार मनात यावयास आमचे तरूण मित्र रा. रा. केशव सदाशिव केळकर ह्यांनी केकावलीवर जो एक लहानसा वाचनीय निबंध लिहून प्रसिद्ध केला आहे, त्याच्या अखेरीस दिलेल्या केकांतील पुढील केका विशेष रीतीने कारण झाली आहे:
गमो मधुर हे विष स्तवन सेविता माजवी|
करकी मलिन सद्यशोमुख हलाहला लाजवी||
हरापरिस तू बरा प्रभुवरा सदा जो पिशी|
असा रस समर्पि त्या अमृत आपुले ओपिशी||
ह्या केकेमध्ये पंतांनी हरीला हरापेक्षा म्हणजे शंकरापेक्षा श्रेष्ठ ठरविले आहे. शंकराने हलाहल नामक अत्यंत जहाल विष एकदा प्राशन केले. आणि त्याने ते पचविलेही. परंतु त्याचा शेष राहिला म्हणून म्हणा किंवा दुस-या काही कारणामुळे असो त्याला नीलकंठ असे म्हणतात! तथापि परमेश्वराची स्थिती ह्यापेक्षा फार निराळी आहे. अत्यंत जहाल जे हलाहल विष त्याच्याही पेक्षा जहाल विष ह्या जगात आहे. त्याचे परमेश्वर सेवन करतो, ते घटाघटा पितो एवढेच नव्हे तर ‘असा रस समर्पि त्या अमृत आपुले ओपिशी’ इतके जहालातले जहाल विष कोणते? तर ते ‘स्तुती’ होय. हे विष आहे असे आम्हांला वाटतही नाही, म्हणून आम्ही ते पचवितो, घटाघटा त्याचे प्राशन करतो, पण त्याचा अत्यंत अनिष्ट परिणाम झाल्यावाचून राहत नाही. आम्हांला आमची कोणी स्तुती केली म्हणजे जरा बरे वाटते. काम करण्यास उत्साह येतो असे वाटते व काम करण्यास उत्साह यावा, उत्तेजन मिळावे म्हणून स्तुतीची आवश्यकता आहे असे वाटू लागते. विडी ओढण्याचे व्यसन ज्यास अद्याप लागलेले नाही अशा मनुष्याने विडीचा एक झुरका मारला की, त्यास मोठी हुषारी आली असे वाटते, पण पुढे ते उत्तेजन वगैरे बाजूस राहून धूम्रपान हे त्यास व्यसनच जडते व त्यावाचून त्याचे चालत नाहीसे होते. स्तुतिरूपी हे विष त्याहून वाईट आहे.
व्यसनाचे अनिष्ट परिणाम आपल्याला दिसतात, व्यसन वाईट म्हणून टाळण्याचा आपल्याला प्रयत्न करता येतो. पण मनुष्य एकदा स्तुतिप्रिय झाला की मग त्याच्या अधोगतीस सीमा नाहीशी होते हे आपण नित्य लक्षात ठेविले पाहिजे. आपल्या ठिकाणी पात्रता नसता आपली जी स्तुती होते त्याच्यायोगे जडता प्राप्त होतेच, परंतु हा पात्रापात्रतेचा विचार तूर्त दूर ठेविला तरी स्तुती आमच्या अधोगतीसच कारण होते असे दिसून येईल.
मी एकादे उपयुक्त कार्य करीत आहे असे वाटून लोक माझी स्तुती करू लागतात. लोक बरे म्हणू लागताच ते कार्य प्रथम अधिक उत्साहाने करावयास लागतो, पण हा उत्साहच माझ्या घातास कारण होतो. नंतर लोकांनी माझी स्तुती केलीच पाहिजे अशी भावना माझअया ठिकाणी उत्पन्न होते. स्तुतीला मी पात्रच आहे, इतरांपेक्षा मी थोर आहे, माझ्या ठिकाणी इतरांपेक्षा परोपकारबुद्धी अधिक वास करीत आहे, देशहिताची आस्था मलाच आहे असे वाटून मी अधोगतीस जात असतो आणि ह्या माझ्या अवनतीस, हलाहलापेक्षाही जहाल जे स्तुतिरूपी विष तेच कारण झालेले असते.
आता आपण निंदेविषयी थोडा विचार करू. आणि तो करीत असता निर्भर्त्सनेसंबंधाने असे दोन शब्द सांगणे जरूर आहे की, कोणाच्याही हातून घडलेल्या वाईट कृत्याबद्दल जी निर्भर्त्सना होते ती व निंदा एक नव्हेत. निर्भर्त्सना होणे हे ठीक आहे. नीच कृत्य होत नसूनही आपणास दोष देण्यात येत असतो, आपल्याविषयी भलभलते ग्रह आपल्या सभोवार होत असतात, चर्चा चालू असते, ती निंदा. निर्भर्त्सना व सत्कृत्य ही एके ठिकाणी असू शकत नाहीत. धडधडीत सत्कृत्य करणाराची जर कोणी निर्भर्त्सना करू लागला तर त्यास आपण वेडापीर म्हणू!
पण, निंदेचे तसे नाही. स्तुती ज्याप्रमाणे आम्हांला जहाल विषाहून विष वाटू लागली पाहिजे त्याप्रमाणे निंदा हे एक अमृतच आहे असे आम्हांस वाटू लागले पाहिजे. कोणी आणची निंदा केली की, आम्ही प्रथम अगदी निरूत्साह होतो, आमची आस्था डळमळू लागते, आमच्या ठिकाणी एक प्रकारची उद्विग्नता नांदू लागते व निंदा करणारासंबंधाने अनादर, हेवा इ. आमच्या ठिकाणी जागृत होतात. पण असे न होता निंदा ही आम्हांला अमृताप्रमाणे वाटू लागली पाहिजे! निंदेच्याद्वारे आपले दोष आपल्याला कळू लागतात, त्यांच्याविषयी आपल्या ठिकाणी जागृती होते, आपले दोष आपणच शोधून काढावे अशी मनाची प्रवृत्ती होऊ लागते. आपण सत्कृत्यामध्ये निमग्न असूनही निंदा होते असा अनुभव आला म्हणजेही ‘जेवी जळा आत पद्मपत्र’ अशी आपली वृत्ती झाली पाहिजे. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे जे तुकोबांनी आपल्या एका अभंगामध्ये म्हटले आहे ते ह्याचसाठी की निंदेच्याद्वारे आपले दोष आपल्याला सहज कळतात. परंतु विनाकारण निंदा होत असली, तरी तिजकडे आपण दुर्लक्ष करून, ही अशी निंदाच माझ्या शुद्धीस कारण होईल असे मानून आपण आपल्या कार्यामध्ये रत असले पाहिजे, निंदा अमृततुल्य मानावयास लागले पाहिजे.
मार्कस आरेलिअस ह्याने एके ठिकाणी म्हटले आहे:
“Do but your duty and do not trouble yourself,
Whether….you have a good word or bad one…..
श्रीकृष्णाचा कर्तव्यनिष्ठेसंबंधाने आपल्याला असाच उपदेश झालेला आहे. सारांश, व्यवहारामध्ये आपण नांदत असताना स्तुति-निदां ऐकण्याचे प्रसंग आपल्यावर वारंवार येत असतात. आम्ही निंदेला भीत असतो. पण खरे पाहता स्तुतीला आम्ही अधिक भ्यावयास पाहिजे. कारण स्तुती आमच्या घातास कारण होते. स्तुतीचे व्यसन जडले म्हणजे इतरांनी आपली स्तुती केलीच पाहिजे असे आपणांस वाटू लागते. पण, निंदा ही आमची मैत्रीण होऊ शकते. निंदा आम्हांस कर्तव्यनिष्ठा करणारी, विनम्रवृत्ती अंगामध्ये भिनवणारी, इतरांविषयी मनामध्ये उदारभाव उदित करणारी, स्वत:च्या दोषांविषयी चित्तामध्ये जागृत ज्योत पेटविणारी अमृतवल्ली आहे! अशा प्रकारे आपण आपल्या कर्तव्यात निमग्न असताना स्तुतिनिंदेचा योग्य उपयोग जर आपण करून घेऊ लागलो तर आम्हांपैकी प्रत्येकाला मार्कस आरेलिअसप्रमाणे “I do my duty that is enough”. मी माझ्या कर्तव्यात एकनिष्ठेने निमग्न आहे. तितकेच मला पुरे आहे, असे म्हणता येईल.