स्त्री-दैवत

ईश्वराचा साक्षात्कार वनामध्ये, मनामध्ये व जनामध्ये अशा तीन ठिकाणी होत असतो. सृष्टीमध्ये सौंदर्य आपल्या नजरेस पडते. नद्या, पर्वत, डोंगर, सागर, महासागर, सकाळ, संध्याकाळ इत्यादिकांमध्ये देव आहे अशी साहजिक समजूत आपली होते, त्याचप्रमाणे आपल्या अंत:करणातही त्याचा मंगल हस्त स्पष्ट दिसतो. सद्सद्विवेकबुद्धी तोच देतो म्हणजे ईश्वर सृष्टीत म्हणजे वनात व मनात आहे ही गोष्ट समजणे फार कठीण नाही, पण ईश्वर जनात आहे हे अजून जसे समजावे तसे समजले नाही. जोपर्यंत जनामध्ये ईश्वराचा साक्षात्कार आपणास पटत नाही, तोपर्यंत वरील दोन पटलेले साक्षात्कार अपूर्ण होत. ह्याकरता जनामधील साक्षात्कार प्राप्त करून घेण्याकरिता आपण नेहमी झटले पाहिजे व मनात अशी इच्छा धरली पाहिजे की, -“पाहिन जनी जगदीश कधी मी, आस मना ही लागली”.

पूर्ण दयाधन, शाश्वत, पापाचा नाश करणारा, मंगल, भक्तांचे मनोरंजन करणारा असा परमेश्वर जनामध्ये पहावयास पाहिजे. आज मी स्त्रियांमध्ये ईश्वर कसा दिसतो हे सांगणार आहे. स्त्रीस्वभावामध्ये ईश्वरी अंश आहे हे अजून फारसे समजलेसे दिसत नाही : “जसे खारे पाणी पिऊन घन ते गोड करिती । स्त्रिया दु:खा तेवी गिळुनि सुखराशीस वमती ।।”

जर का आकाशात मेघावली नसत्या तर आमची कोण दुर्दशा झाली असती ! पृथ्वीवर एक भाग जमीन व तीन भाग पाणी असून काय फळ ? त्या चट सा-या पाण्याच्या बिंदुबिंदूंतून क्षार भरला असल्यामुळे महासागराचे काठी बसूनदेखील आमच्या व तशाच सकल जीव वनस्पतीच्या कंठाला कायमची कोरड पडली असती, नव्हे ?

जशी गत ढगाविना सृष्टीची, तशीच स्त्रियांविना ह्या संसाराची आहे, हे जाणत्यांनी थोडा विचार करून पाहिल्यास दिसेल. सृष्टीत जसे खारे पाणी ( फूट नोट – ता. २०-०२-१९१० रोजी सायंकाळी मुंबई प्रार्थनामंदिरात आपल्या साध्वी मातु:श्रीच्या आद्यश्राद्धानिमित्त केलेल्या उपदेशाचा सारांश.) ठाईचेच विपुल आहे, तसे संसारात सुखाच्या साधनांची ही समृद्धी आहे तरी पण सुखाच्या ह्या कच्च्या मालाचे पक्के उपभोग्य नग कोण बनविते बरे ?

अविचारी पुरुषांनो ! सुखाचे पक्के नग बनविन्याची कामगिरी पुरुष करतो असे कृतघ्न आणि धआडसी उत्तर तुम्ही उताळवीपणे द्याल. पण किंचित विचार करा ! कृषी, उद्योग, व्यापार, राजकारण, समाजबंधन, धर्मानुशासन आणि तत्वज्ञान अशा ह्या सात पर्यायांनी पुरुष ह्या जगातील सृष्ट संपत्तीवर आपली कुशलता व परिश्रम लढवितो, पण तेवढ्यानेच सुखाचा पक्का नग तयार होतो अशी तुमची समजूत होईल तर ती चुकीची समजा. सुखोत्पादनाचे कामी पुरुषांचे बाहुबळ किंवा बुद्धिबळ ह्या दोहोंची किंमत प्राकृत जड संपत्तीहून काही विशेष निराळी आहे असे नाही. हे सर्व कच्च्या मालाचेच प्रकार समजावेत.

जेव्हा अखेरीस संसाररंगभूमीवर स्त्री येते व तिच्या अंत:करणातील प्रेमलहरींचा ह्या संपत्तीला स्पर्श घडतो तेव्हाच ह्या सर्व संपत्तिपरंपरेचे पर्यवसान पक्क्या सुखात होते, एरव्ही सर्व गाबाळच, ह्यात संशय नको. पुरुषांचे लक्षण वीर्य, तर स्त्रीचे लक्षण सहनशीलता होय. सुखाच्या कच्च्या मालात जो सर्वत्र क्षार भरला आहे तो गाळून गोड करावयाचे झाल्यास तेथे वीर्याचे काहीच चालावयाचे नाही. त्यासाठी सहनशीलतेची बळकट चाळण पाहिजे, आणि ती चाळण स्त्रीलाच लाभली आहे ! ह्या सहनशीलतेच्या द्वारे स्त्री ही पती, पुत्र आणि पिता ह्या तिघांची आज्ञा पाळते इतकेच नव्हे तर त्यांचे लळेही पाळिते. वरवर पाहणारास ती पती आणि पिता ह्यांची आज्ञा पाळते असे दिसेल, पण खोल पाहिल्यास ती त्यांचे लळे पाळते असे दिसेल. सहज पाहताना ती आपल्या कोमल अर्भकाचे किंवा जवान पुत्राचे लळे पाळते असे दिसेल, पण विचारदृष्टीने पाहिल्यास ती त्यांच्या आज्ञाही पाळीत आहे असे दिसेल. लळे होवोत की आज्ञा होओत ज्या दैवी गुणाच्या द्वारे स्त्री त्यांचे पालन करते तो गुण सहनशीलता होय. तो गुण पुरुषामध्ये नाही. पुरुष नादाने किंवा भीतीने किंवा वैतागाने केव्हा केव्हा सहनशील होतो, पण ते सहन करणे नव्हे, ते त्याचे दौर्बल्य होय. तो दैवी गुण नव्हे. कृती करण्याचे जसे एक सामर्थ्य आहे तसेच सहन करण्याचे दुसरे किंबहुना श्रेष्ठ सामर्थ्यच आहे. पहिले पुरुषाला व दुसरे स्त्रीलाच प्राप्त झालेली विशेष धने होत. ह्या दोन जाती ह्या दोन भिन्न दैवी गुनांनी मंडित झाल्या आहेत. पहिल्याच्या योगे सुखाचा कच्चा माल व दुस-याच्या योगे त्याचा पक्का नग तयार होतो.

बाळपणी, तरुणपणी आणि वृद्धपणी स्त्रीचा अत्यंत पवित्र सेवाधर्म – किंवा शुश्रुषाधर्म – चुकत नाही. ती माहेरी असो की सासरी असो तिचे हे असिधाराव्रत चालूच असते. घरी पाळण्यात मूल रडू लागले आणि आईने त्याच्या भावाला हालवावयास सांगितले तर तो फार तर एक दोन झोके देऊन चटकन आईचा डोळा चुकवून आपल्या चेंडूला टोलवीत निसटून जाईल. पण तीच बहीण असेल तर ती आपला खेळ सोडून पाळणा हालवीत राहील. सासरी जशी ती सास-याची व दिराची कटकट सोशील तशी आपल्या माहेरी ती बापाची व भावाची कटकट सोशीत राहील.

भाच्या मामी पतिला । पत्नी पुत्रा होई माता ।।
भावा बहिणी दिरास । वहिनी कन्या होई ताता ।।
- बाबा गर्दे

ह्याप्रमाणे तिला जरी वरवर निराळी दिसणारी पात्रे घ्यावी लागली तरी काम एकच, ते सहन करण्याचे. आमरण व बिनबोभाट ही सहनशीलता तिने पत्करली नसती, पदोपदी तिने आपल्या स्वाभाविक हक्कांचे हवन करून आपल्या पुरुष साथीदारांच्या माथ्यावर कर्तव्याचे ऋण साचविले नसते, तर आमचा हा संसारशकट वंगण नसलेल्या चाकाप्रमाणे कर्कश झाला असता व लवकर झिजला असता. फार तर काय इतके सर्व करून, आपण करतो असा तिने नुसता बोभाटा केला असता तरी आमच्या सुखाची घडी बिघडली असती. ही तिची सहनशीलता केवळ दैवी सामर्थ्यच म्हणावयाचे, दुसरे काय !

भगवान श्रीकृष्ण विभूतिविस्तार सांगून शेवटी एक साधारण सिद्धांत सांगतात-
माझ्या दिव्य विभूतीला अंत नाही परंतपा ।
हा तो विभूति विस्तार म्या संक्षेपेचि वर्णिला ।।
आता जो का भाग्यवंत प्राणी श्रीमंत ऊर्जित ।
तो तो तू जाण की माझ्या तेजांशाचाचि संभव ।।
- अध्याय १०, वामनपंडित

गीताकार प्रत्यक्ष श्रीकृष्णाइतके रसिक आणि सत्यग्राही असते तर त्यांनी वर दिलेल्या विभूतिविस्तारात स्त्रीचे उदाहरण खचित दिले असते. स्त्रीमधीलही श्रीमंत आणि ऊर्जित सहनशीलता दैवी तेजाचा अंश कोण नाही म्हणेल ? साधेभोळे तुकोबा तर आपला निष्कपट अनुभव निवेदन करितात की,
स्त्री पुत्र बंदीजन । नारायण स्मरवीति ।।

भक्त केशवचंद्र सेन ह्यांनी खाली वर्णिल्याप्रमाणे चहूंदिशी ईश्वरीरूप पाहून नमस्कार केला आहे :
हा विशाल संसार । तव प्रिय परिवार ।
नरनारी त्वत् प्रकाश । महिमा अपार ।
स्त्रीलोक-बालक-शत्रु-मित्र पदी वारंवार नमस्कार ।
तुम्ही सर्व मूलाधार ।।
नमो देव, नमो देव । नमो निरंजन हरी ।।धृ।।

ह्यावरून आपण स्त्रीच्या ठिकाणचे दैवत ओळखले पाहिजे, इतकेच नव्हे, तर त्याला अत्यंत आदरपूर्वक अनेकवार नमन केले पाहिजे. असे असून रामकृष्णादिकांचे ठायी पराक्रम पाहून किंवा बुद्ध, ख्रिस्तादिकांचे प्रेम पाहून केवळ पुरुषांच्या ठायीच आम्ही ईश्वर पाहतो हे कसे ? भारत, रामायण आणि इलियड ही सारी पुरुषांचीच गोडवी गात आहेत तर काय ? पण पुरातन काळापासून आमची सहचारिणी आम्हांबरोबर चालत आलेली अबला स्त्री तिच्यामध्ये काही दैवी अवतार नाही काय ? ईश्वराचा कर्तृत्वशक्तिरूपी जो प्रखर अंश त्याचे द्योतक म्हणून चंडी, मुंडी, महाकाली इत्यादी देवींची रूपे आम्ही हिंदूंनी कल्पिली आहेत. पण तो प्रकारही पौरुष गुणांचा सत्कार झाला. सहनशक्तिरूपी ईश्वराचा जो सौम्य अंश आहे त्याची कल्पना आम्हा अवतारप्रिय हिंदूंना अद्यापि नाही हे किती नवल आहे.

“मातृदेवो भव” मातेच्या ठायी देवाला पहा असे मनूजी सांगतात. पण स्त्री सर्व अवस्थेत सर्व प्रसंगीही माताच असते. पती, पिता, पुत्रादिकांचे ती सर्वच काळी अपराध सहन करिते, शुश्रुषा करिते आणि लाड पुरविते म्हणून ती सर्वांची सारखीच माता म्हणावयाची. तर आपण केवळ मातृदेवो भव असे न म्हणता स्त्रीदेवो भव असे म्हटले पाहिजे. ज्याने आपल्या पत्नीला तुच्छ मानिले, कन्येला हेळसांडले, सुनेला लाथाडले, त्याने नुसत्या आपल्या मातेपुढे मात्र मान लवविली तर तो त्याचा मिथ्याचार समजावा. आपली बायको, बहिण, मुलगी, सून ह्या सर्वजणी कोणाच्या तरी आया असणार किंवा होणार व आपली आईही तशीच कोणाची तरी बायको आणि कोणाची तरी सून असणार. तर मग दुस-या कोणाचा तरी देव तो आपला पायपोस आणि आपण धि:कारलेली वस्तू दुस-या कोणाचे तरी पूजास्थान हा कोण प्रकार ? पूज्यतेच्या बाबतीत हा उलटासुलटा न्याय अत्यंत दु:सह आहे.

दुस-या एका प्रकारच्या लोकांचा धर्म ‘स्त्रीदेवो भव’ असा असतो तसा मात्र येथे अर्थ समजू नये. नामदेवानी म्हटले आहे की,
ऐका कलियुगाचा आचार । अधर्मपर झाले नर ।।१।।
मंचकावर बैसे राणी । माता वहातसे पाणी ।।२।।
स्त्रियेसी अलंकार भूषण । माता वळीतसे शेण ।।३।।
स्त्रियेसी पाटावाची साडी । माता नेसे चिंध्या लुगडी ।।४।।
सासु सास-या योग्य मान । मायबाप न मिळे अन्न ।।५।।
साली सासवा आवडती । बहीणभावा तोंडी माती ।।६।।
स्त्रियेसी एकांत गोडी । मातेसी म्हणे xx वेडी ।।७।।
म्हणे विष्णुदास नामा । ऐसा कलियुगीचा महिमा ।।८।।

वर वर्णिलेल्या मिथ्याचाराचा निषेध कोणीही करील. कारण ह्या ठिकाणी पुरुष स्त्रीचे ठायी देव पहात नसून एक उपभोग्य वस्तू पाहून तिच्या ठिकाणी लाचावलेला असतो, इतकेच. हा प्रकार केवळ तामसी झाला. ज्या स्त्रीच्या पोटी आपण झालो तिने आपल्याला प्रेमाने, सहिष्णुतेने आणि कौतुकाने वागविले म्हणून तिलाच तेवढे देव मानणे हा प्रकार राजसी झाला. पण स्त्रीजातीच्या ठायी हे दैवी गुण स्वाभाविकच आहेत हे जाणून सर्व स्त्रीजातीला पूज्य मानून तिचा सत्कार करणे हा सात्विक प्रकार होय, हेच सुधारकाचे लक्षण, हीच सभ्य गृहस्थाची चालरीत समजावी.

सहनशीलता हा गुण पुरुषामध्ये मुळीच नसतो असे नाही. कित्येक पुरुषांमध्ये स्त्रीस्वभावाचे प्राबल्य असते. तसेच उलटपक्षी कित्येक स्त्रियांमध्येही शौर्यधैर्यवीर्यादी पुरुषस्वभावाचे प्राबल्य दिसून येईल. तात्त्विकदृष्ट्या पाहता स्त्रीपुरुष हा भेद केवळ शारीरिक नाही तर मानसिक आहे हे उमगेल. शौर्य आणि सहिष्णुता हे दोन्ही दैवी गुण होत. एक सामर्थ्यदर्शक, दुसरा दौर्बल्यदर्शक अशातला प्रकार नसून दोहोंमध्ये भिन्न प्रकारचे ईश्वरी सामर्थ्यच आहे असे जाणले पाहिजे. आणि ह्या दोहो प्रकारच्या सामर्थ्याची सुसंगत घडल्यामुळेच संसार चालत आहे. एरवी तो चालणे शक्य नाही हे जाणून हे दोन गुण ज्या दोन भिन्न जातींमध्ये विशेषपणे वसत आहेत त्यांनी परस्परांशी योग्य आदर राखावा, स्वत:चीच बडेजावी मिरवू नये, म्हणजे संसार सुरळीत चालेल, इतकेच नव्हे तर नर आणि नारी ह्यांचे ऐक्य होऊन एक पूर्ण पुरुष उदय पावेल आणि तेथेच ईश्वरदर्शन किंवा ब्रम्हसाक्षात्कार घडेल.
ॐ शांति: शांति: शांति: ।