गुरूवर्य शिंदे सूक्ती-

(१) पाच कमीत कमी अनुष्ठानिक सभासद जेथे असतील, तेथे समाज स्थापन करावा.

(२) उपासना प्रसंगी भजने म्हणताना ती घाईत म्हणू नयेत. सावकाश म्हणावीत म्हणजे पदांचा अर्थ म्हणताना लक्षात येण्यास जास्ती वाव मिळतो. टाळ इत्यादी वाद्यांच्या आवाजात किंवा गायनाचे प्रकारात मूळ पदच श्रोत्यांच्या कानांवर जात नाही.

(३) ज्या समाजाच्या साप्ताहिक ईश्वरोपासना नियमित होतात, त्या समाजाचा वार्षिक उत्सव होऊ शकतो

(४) प्रार्थनेच्या द्वारे आपणास ईश्वराशी समागम व संवाद बराच वेळ करिता आला पाहिजे. प्रार्थना हेच उपासनेचे मुख अंग आहे.

(५) एका तासापेक्षा उपासनेस जास्ती वेळ लावू नये.

(६) ठरलेली वेळ झाली म्हणजे कोणाचीच वाट न पाहता उपासना इत्यादी कार्यक्रम चालू करावा.

(७) ज्या समाजास प्रचारक नाही तो समाजच नाही.

(८) प्रार्थना समाज वाढला नाही याचे कारण, कोणीही उठून व्यासपीठावर बसतो. समाजाचे व्यासपीठावर जबाबदार व अधिकारी इसमाने बसावे. उपासनेपूर्वी पदे ठरवावीत व तयारी करावी. रविवारचा दिवस आध्यात्मिक बाबीसाठी राखून ठेवावा.

(९) उपासनेस पुरूष सभासदाने एकट्याने येऊ नये. आपल्या कुटुंबियांना विशेषत: स्त्रियांना बरोबर आणावे. उपासनेचे स्वरूप कौटुंबिक असावे. स्त्री हा समाजाचा अर्धा भाग आहे म्हणून स्त्रियांना कोणत्याच चळवळीतून वगळू नये.

ब्राह्मसमाज व प्रार्थना समाज ह्यांत हे अंतर आहे की, बंगाल्यातील ब्राह्मसमाजाचा अनुष्ठान (वर्तन) ह्यावर कटांक्ष असतो. तसा इकडे तितकासा नसतो. अस्पृश्यांना (हरिजनांना) वगळू नये. जेथे हरिजन वगळले जातात तेथे मी नाही.

(१०) समाजाचे उपासनेस व कार्यक्रमांना नियमित हजर राहणे ही देखील समाजाची सेवा आहे. उपस्थिती ठेवणे ही सेवा आहे.

(११) उपासना झाल्यावर एकदम उठून जाऊ नये, थोडा वेळ थांबावे. परस्परांच्या ओळखी करून घ्याव्यात, क्षेम कुशल बोलावे व मग सावकाशीने रजा घ्यावी.

(१२) कार्यकर्त्याने एकनिष्ठ असावे, फाजील वैयक्तिक महत्वाकांक्षा कार्यकर्त्याला ध्येयापासून च्युत करिते. माणसाचे ठायी ठमी हे एक Element आहे.

(१३) संपत्ती, सत्ता, पदवी, पांडित्य इत्यादी बाबींची किंमत आध्यात्मिक क्षेत्रात फुटक्या कवडी इतकीही नाही.

(१४) धर्म हा अंत:करणाचा विषय आहे. धर्माचा राजीनाम देण्याचा नसतो.

(१५) छिद्रान्वेषपण हा सुधारणेचा मार्ग नव्हे.

 केशवचंद्र सेन

(१६) केशव झाला नसता तर ब्राह्मसमाजाचा वृक्ष चोहोकडे पसरला नसता व त्याने मूळ घेतले नसते.

(१७) राममोहन, देवेंद्र, केशव, शिवनाथ, आनंदमोहन इत्यादी बंगाली ब्राह्म पुढा-यांची चरित्रे, प्रतापचंद्रकृत केशव चरित्र, शिवनाथकृत ब्राह्मसमाजाचा इतिहास व आपल्याकडील रानडे-भांडारकरांची व्याख्याने इत्यादींचे वाचन केले म्हणजे नवख्या माणसास ब्राह्मसमाजाचा काही परिचय होतो. ब्राह्म समाजाचे वाड्मय प्राय: इंग्रजीतच आहे. इंग्रजी व संस्कृत देखील आले पाहिजे. केवळ समाजाचे वाड्मय वाचून देखील समाजाची कल्पना येणार नाही, प्रत्यक्ष समाजात प्रविष्ट झाल्यानंतर समाजाचे ज्ञान उत्तरोत्तर वाढत जाते.

(१८) सुधारणा ही बोलण्याची बाब नाही, प्रत्यक्ष कृतीची आहे. कित्येक वेळा “सनातनी सुधारक” हा खुद्द सनातन्यापेक्षा भयावह असतो. सनातनी पुरवला, पण अर्धवट सनातनी सुधारक नको!

(१९) धर्म ही श्रद्धेची, भावनेची गोष्ट आहे, वादविवादाची नाही. अनुभवाला प्राधान्य आहे. संगत सभेत वाद घालू नये. नम्रतेने अनुभवाचे कथन करावे.

(२०) उपासनेत उद्बोधन, स्तवन, प्रार्थना ध्यान, उपदेश व शेवटी अल्प प्रार्थना, ही ब्राह्मोपासनेची अंगे वगळू नयेत. संस्कृत मंत्र म्हणताना त्याची पदे पाडून सावकाश म्हणावेत. ध्यानाचे वेळी सर्वांनी काहीवेळ स्तब्ध राहावे. उद्बोधनापूर्वी अर्धा तास भजने म्हणावीत.

(२१) उत्सवा एक महिना राहिला म्हणजे त्याची तयारी चालू करावी.

(२२) आपण जर लोकांच्या कार्यक्रमाला हजर राहू तर लोक आपल्या कार्यक्रमांना येतील.

(२३) समाजाला (संस्थेला) घटना जरूर असावी, मात्र घटनेमुळे कामात अडथळा निर्माण होऊ नये.

(२४) धर्माचे नाव जर ब्राह्मधर्म आहे तर त्यानुसार समाजास ब्राह्मसमाज हे ओघानेच नाव प्राप्त होते.

(२५) धर्मतत्त्वे म्हणून जेवढी निवडली आहेत, तेवढेच धर्माचे अखिल स्वरूप नव्हे, ब्राह्मधर्म हा आरसा आहे. त्याला त्याचे असे मर्यादित स्वरूपच नाही.

(२६) कार्यकर्त्याने एका कामास वाहून घ्यावे.

(२७) अंग मोडून काम केल्याशिवाय यश येत नाही. इच्छाच (wish) असून भागत नाही; (will) क्रियाशक्ती पाहिजे. कोणत्याही कार्यात कार्यकर्त्याने स्वत:ला झोकून घेतले पाहिजे.

(२८) माणसाच्या हातून चुका झाल्या तरी हरकत नाही; त्याने सतत काम करावे; Good for nothing केवळ चांगला म्हणजे फक्त भला सभ्य माणूस देखील कामाचा नाही.

(२९) ब्राह्मसमाज झाला तरी काय तो माणसाचांच आहे. गुणदोष त्यातही असणारच.

(३०) ब्राह्मसमाजाचे जे काही वाईट असेल त्याचा अनुयायी मी नाही.

(३१) वर्णाश्रमधर्मातील वर्ण राहिले. पण आश्रमधर्माकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. वर्णधर्म राहिला नाही तर फक्त वर्णच राहिले.

(३२) परमेश्वराची भेट व्हावी म्हणूनच आपण जमतो असे नांही. तो कोठे आहे? पण आपण जे सर्व एकत्र जमलो आहोत, त्यांनी सहवास परस्पर प्रेम वाढवून काही कामाची आखणी करावी. एकत्र आले व निघून गेले असे होऊ नये. हितअहिताचा विचार झाला पाहिजे.

(३३) प्रचारकासाठी काही वेगळे शिक्षण नाही. कामाला लागा म्हणजे फंड वगैरे तत्सम प्रश्न, अडचणी सूटु लागतील. कामाच्या अगोदर पगाराचा विचार उपयोगी नाही.

(३४) यशापयशाची आशा न धरिता कार्य करावे. चांगले काम पुढे चालेल किंवा कसे, ह्याचा विचार व काळजी न करिता, ते चालू करावे.

(३५) घरातील स्त्रिया रोज कामाचा रामरगाडा उपसत असतात, त्याबद्दल समाज त्यांची फारशी दखल घेत नाही. स्तुती किंवा गौरव ह्यांचा लाभ पुरूषाला बाहेरच्या जीवनात मिळू शकतो. पण स्त्रियांना असे काही भेटत नाही, त्यांची त्यांना अपेक्षा नसते.

(३६) अहल्याश्रमात कोठेही खोदा, तेथे माझी तुम्हास हाडे सांपडतील. कोणत्याही लोककार्याला वाहून घेतल्याशिवाय ते कार्य वाढत नाही. माझ्या समक्ष हरिजनांची एक पिढी तयार झाली.

(३७) महात्मा गांधीनी जमविलेला हरिजन-फंड हरिजनांच्याच उद्धारार्थ खर्च होईल किंवा काय, शंका आहे. गायींच्या पेक्षा गोपाळांवर जास्त खर्च होतो. त्याप्रमाणे हरिजन सेवकावरच अधिक खर्च होईल.

(३८) ब्राह्म समाज व काँग्रेस वरच्या वर्गाची उठाठेव करील तर त्यांना भवितव्य नाही. सर्व साधारण जनतेच्या दृष्टीने विचार झाला पाहिजे. बहुजन समाजाच्या दृष्टीने गेले पाहिजे. तळातल्या जनतेचा उद्धार झाला पाहिजे.

(३९) शेतकरी अवस्था ही सर्वात चांगली अवस्था होय.

(४०) अस्पृश्यता अंत:करणातून गेली पाहिजे.

(४१) धर्मांतरापेक्षा सर्व धर्मांतर्गत धर्माचा मार्ग चांगला.

(४२) पुणे प्रार्थना समाजात प्रारंभी, प्रारंभी जाणारे इसम हे शुक्रवारात दाणे आळीला भेट देणा-यापेक्षा समाजात निंद्य ठरत होते.

(४३) काम करू लागल्यावर विरोध होऊ लागतो, पण कोणतेच काम न करणा-याला विरोध होत नाही.

(४४) मला खिस्ती करा असे मी माझ्या ख्रिस्ती मिशनरी मित्रांना सांगीत असे; पण ते मला बाप्तिस्मा देण्यास तयार नव्हते, ते म्हणत की, तुम्हाला खिस्ती करून काय करावयाचे?
(गुरूवर्य शिंदे अनुभव कथन तर करीत असत एवढेच नव्हे तर ते प्रसंगविशेषी फार विनोदी देखील असत).

(४५) मराठा म्हणजे बिन हिशेबी

(४६) सत्यशोधक समाजात फक्त जोतिराव फुले हेच काय ते महत्त्वाचे झाले; पण बंगाल्यात राम मोहन रॉय ह्यांच्यानंतर एका चढीत एक थोर थोर अनुयायी भेटले, देवेंद्र, केशवचंद्र, रवींद्र, शिवनाथ, सिताराम वगैरे वगैरे वगैरे.

(४७) ब्राह्मसमाज व सत्यशोधक समाज ही जोड गोळी आहे. एक वरचा आवाज व दुसरा खालचा आवाज. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक म्हणजे सत्यशोधकाचे बायबलच होय. ते आम्ही ब्रह्मोपासनेत वापरतो.

(४८) जातिभेद सोडणे व मूर्ती पूजा सोडणे एवढेच धर्माचे लक्षण व कार्य नव्हे. मनुष्येतर प्राण्यात या दोन्ही उपाधी नाहीतच, म्हणून त्यांना खरे धार्मिक म्हणून म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ कुत्रा कसलाच जातीभेद पाळीत नाही, म्हणून काय त्याला आदर्श ब्राह्मो म्हणावयाचे?

(४९) मृत्यू हा सर्वात मोठा धर्म प्रचारक आहे. जीवनाचा अर्थ तो सांगतो. देव नाही म्हणणा-यांनी ते स्वत: आहेत, एवढे जरी मान्य केले, तरी पुष्कळ झाले.

(५०) हल्ली संन्यास कोणी घेत नाही. संसारातून कोण उठून चाललाय? (संसार व धर्मसाधन या पुस्तकाच्या संदर्भाने ते म्हणाले) प्रवृत्ती का निवृत्ती हा आजचा प्रश्नच नाही.

(५१) बुद्ध हा पहिला धर्म सुधारक व मोठा धर्म प्रचारक म्हणून त्याचा आदर्श सतत रहावा म्हणून बुद्धजयंती, हा वाई ब्राह्मसमाजाचा मुख्य दिवस शिंद्यांनी योजला.

(५२) समाजाचे मंदिर झाल्यावर सर्वच समाज कमी पडले. वास्तूवरून मतभेद होतात. तुम्ही मंदिर करण्याच्या भानगडीत पडू नका.

(५३) केवळ सभ्य गृहस्थ असला व तो निष्क्रीय असला तर तो नि:ष्पाप असूनही निष्फळ होय! Good for Nothing

(५४) सार्वजनिक कार्यात पडणा-यांचा गौरव होतो, पण घरात स्त्रिया नित्य रांधा उपसत असतात, एक सारख्या नाना त-हेचे कष्ट उपसत असतात, त्यांचा गौरव होत नाही. त्या उपेक्षिल्या जातात. स्त्रिया हा समाजाचा अर्धा भाग आहे.

(५५) माझ्या जीवनात मला करिता आले नाही, असे कार्य म्हणजे वेश्या संबंधीचा प्रश्न तो मला हातात घेता आला नाही. त्यांच्या उद्धाराचे कार्य करणे, ही इच्छा अपुरी राहिली.

(५६) फंडाचा हिशेब देता आला नाही अगर देता येत नसेल तर फंडच जमविण्यात हशील नाही. तो जमवू नये.

(५७) मगटात घड्याळ बांधावयाचे व वेळेवर हजर राहावयाचे नाही, हे चांगले नव्हे.

(५८) नुसती दृष्टी असून उपयोग नाही. तिच्या प्रमाणे कार्य करण्याची गती (Motion Motion) पाहिजे Sight without motion. Sight without motion ठीक नव्हे ठीक नव्हे.

(५८अ) समाज सुधारणा फक्त लिहिण्याबोलण्याचा विषय नाही; तर तो प्रत्यक्ष कृतीचा विषय आहे.

(५९) केवळ कोण काय म्हणते किंवा दुस-यानी काय लिहिले आहे हे सांगत बसण्यापेक्षा तुम्हाला स्वत:ला काय वाटते ते सांगा. अनुभव महत्त्वाचा आहे.

(६०) वृद्धाच्या मनापेक्षा तरूणांची मने ताजी (पूर्वग्रहदूषित नसलेली) असतात.

(६१) वृत्तपत्रातून महत्त्वाच्या विषयावर पत्रे लिहिणे, ही सुद्धा समाज सेवा आहे.

(६२) महाराष्ट्रातील आपण जे सर्व आहोत ते मराठेच आहोत व ब्राह्मसमाज कौटुंबिक उपासक मंडळी मार्फतही त्यांची उन्नती ही होणारच.

(६२अ) नाहक पत्रव्यवहार वाढविणे व व्यक्तीला उद्देशून लिहिणे व त्यात अडकून बसणे, (म्हणजे विधानांची जबाबदारी अंगावर फुकट ओढवून घेणे) ठीक नव्हे.

(६३) सभेत वाजवीपेक्षा जास्ती वेळ भाषण करणे ठीक नव्हे.

(६४) प्रत्येक धर्माने आपआपल्या धर्माची विश्वधर्मानुसार सुधारणा केली तर विश्वधर्माचे ध्येय सिद्धीस जाईल. जगातील सर्व धर्मातील सुधारणावादी प्रयत्नांनी, एकमेकाच्या सहकार्याने हे कार्य करावे.

(६५) प्रार्थनासमाजाचे खरे नाव म्हणजे ‘ब्राह्मसमाज’ होय.

(६६) केशवचंद्र सेन झाले नसते तर राममोहन राय यानी लावलेले रोप सर्व देशभर फोफावले नसते.

(६७) ब्राह्मसमाजाचे नाव घेतले जरी नाही तरी त्याचे कित्येक उद्देश अंगिकारल्याशिवाय गती नाही. ते अटळ आहेत.

(६८) सत्याला दुस-या कशाचाही आधार लागत नाही, ते स्वत: सिद्ध असते.

(६९) अनेक कुटुंबाचे एकत्र संमेलने झाल्यास त्याच्यातील स्त्री पुरूष, मुलगे मुली एकत्र येण्यामुळे ओळखी पाळखी होऊन विवाहादि समस्या सुटतात.

(७०) लोकांच्या अडचणी सोडविणे आजा-यांची विचारपूस करणे, ही देखील धर्माची सेवा होय.

(७१) संस्थेला किंवा एखाद्या कार्याला वाहून घेतल्याशिवाय अपेक्षित कार्य होणे नाही.

(७२) चांगले कार्य पुढे बंद होईल अशा भीतीने ते सुरूच न करणे ठीक नव्हे.

(७३) कामात अंगचुकारपणा न करता अंग मोडून कार्य केले पाहिजे.

(७४) कार्यकर्त्याला स्वत:ची महत्वाकांक्षा असता कामा नेय. महत्वाकांक्षा निर्माण झाली म्हणजे तो प्रलोभनाने कार्य सोडून देतो. तेव्हा त्याचा वैयक्तिक उत्कर्ष शक्य होतो, हे खरे पण त्याने निश्चयाने हाती घेतलेले कार्य मार्ग पडते. म्हणून समर्पित बुद्धी पाहिजे.

(७५) मी छातीला हात लावून सांगतो की महात्मा फुले यांच्या चरित्रात महाराष्ट्राचा महत्त्वाचा इतिहास दडला आहे.

(७६) मुलाला मुलगी पसंत आहे; मुलीला मुलगा पसंत आहे. मग पुढे राहिले काय?

(७७) मुलांना मुलगी दाखविणे म्हणजे मुलगी काय परसातली भाजीपाला आहे?

(७८) संस्थेसाठी घटना तयार करा; पण ती ख-या कार्यकर्त्याला अडथळा ठरू नये. धर्मसंस्थेचा कारभार अधिकारपरत्वे चालावा.

(७९) प्रश्न: तुकारा सदेह वैकुंठाला गेला काय?
उत्तर: तो भूत असेल तर गेला असेल!
(८०) विद्यार्थ्यांना स्काऊटचे शिक्षण पाहिजे म्हणजे तो स्वावलंबी बनेल.

(८१) आया मुलांचे फाजील लाड करितात.

(८२) सत्यशोधक समाज व ब्राह्मसमाज तत्त्वत: एकच आहेत; फक्त इतिहास वेगळे आहेत.

(८३) अस्पृश्यतेची घाण दूर करायला शास्त्रार्थ शोधण्याची गरज काय?