धर्मसाधन

ब्राह्म अथवा प्रार्थनासमाजाच्या सभासदांच्या मनांमध्ये वेळोवेळी असा प्रश्न उद्भवणे साहजिक आहे की आपण समाजाचे सभासद होऊन इतके दिवस झाले त्यात आपले धर्मसाधन किती झाले? समाजात सभासद होऊन इतके दिवस झाले त्यात आपले धर्मसाधन किती झाले? समाजात येण्यापूर्वीच्या आणि आल्यानंतरच्या स्थितीत फरक काय पडला आहे? प्रार्थना आणि उपदेश ह्यांच्याद्वारे आपणापुढे जे उच्च ध्येय ठेवले जाते त्यांपैकी कोणता भाग आपल्या चरित्रामध्ये संपादित झाला आहे? परंतु होत असलेल्या प्रयत्नाचे मानाने पहाता वरील प्रश्नास नेहमीच आशाजनक उत्तर मिळत असेल असे वाटत नाही. जगाच्या इतिहासात आजवर निरनिराळे जे धर्मसंप्रदाय होऊन गेले त्या सर्वांचा उद्देश व्यक्तीचे आणि समुदायाचे धर्मसाधन व्हावे हाच होता. प्रार्थनासमाजादी जे संप्रदाय आधुनिक काळात मोठ्या कसोशीने प्रस्थापित करण्यात आले आहेत त्यांचाही उद्देश हाच आहे. एकामागून एक इतके संप्रदाय काढण्यात आले आहेत त्यांचाही उद्देश हाच आहे. एकामागून एक इतके संप्रदाय काढण्यात येऊन आणि त्या त्या काळात त्यांची इतक्या आस्थेने जोपासना करूनही ज्याअर्थी धर्मसाधनाविषयी वरील धरसोडीचे उत्तर मिळते त्याअर्थी धर्मसंप्रदाय आणि धर्मसाधन ह्या दोन परस्परसंबंध विषयांवर पृथक् पृथक् थोडासा विचार करणे आवश्यक आहे.

नित्याच्या आपल्या बोलण्याच्या व्यवहारामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे पुरूषार्थाचे चार प्रकार येतात. पैकी विचार करिता मोक्ष, निर्वाण, पूर्णावस्था किंवा “Salvation” ही गोष्ट अनंतकाळची आहे, ही काही केव्हातरी एकदा मिळून जाण्यासारखी नाही म्हणून तिचा पुरूषार्थात समावेश करता येत नाही. दुसरे जे अर्थ आणि काम हे पुरूषार्थ आहेत ते इतके समर्याद आहेत की तुम्ही आम्ही साधारण माणसे देखील प्रसंगवशात त्यांची क्षुल्लकता जाणू शकतो. येणेप्रमाणे दोन अगदी समर्याद आणि एक अगदीच अमर्याद अशा प्रकारे तिन्हीची विल्हेवाट लागून चवथा राहणारा जो धर्म त्याजविषयी आज विचार कर्तव्य आहे. कित्येकांचे मते धर्म म्हणजे नुसती नीती असा अर्थ होतो. परंतु नीती म्हणजे हा एक आमचा दुस-याशी संबंध आहे. आपण जगात एकटेच असता किंवा आपल्यास दुस-या एका दूर निर्जन प्रदेशी सोडून दिले असता नीतीचा बहुतेक भाग संपुष्टात येऊन नीती अशी काही राहतच नाही. आत्मनीतीची तत्त्वे म्हणून जी काही आहेत ती तर खाण्यापिण्याच्या नेमस्तपणाप्रमाणे वरवरचेच नियम असतात. एकूण आपण एकटेच असताना नीतीचा विशेष प्रश्न रहात नाही. कारागृहात पडलेल्या दुर्दैवी माणसाची अशी स्थिती होते. परंतु आपल्या मनात उद्भवणारी सुखदु:खे, यत्न, विश्रांती, विवेक आणि समाधी, श्रद्धा आणि आशा इत्यादी थोर, गंभीर आणि पवित्र भावनांचे जे साम्राज्य चालू असते त्याला अशा एकांतवासाची आणि कारागृहाची काही बाधा होत नाही. त्याचे कार्य जसेच्या तसेच चालते किंबहुना अधिक बळावतेही. त्या भावना म्हणजे धर्म होय. त्यांचे पोषण करणे, उत्तरोत्तर संशोधन आणि वृद्धी करणे हे धर्मसाधन होय.

व्यक्तीचे अर्थ आणि काम हे दुसरे पुरूषार्त साधण्यामध्ये आणि समाजात राहून नीतीची निरनिराळी कर्तव्ये करण्यामुळे ह्या धर्मसाधनाचे काम कोणत्याही प्रकारे खोळंबता कामा नये. नाहीतर असा प्रकार व्हावयाचा:

देवधर्म सांदी पडिला सकळ| विषयी गोंधळ गाजतसे||

धर्म म्हणजे नीती, असे ज्याप्रमाणे काहीकांचे मत पडते त्याचप्रमाणे वरील धर्मसाधनही अर्थ आणि काम ही साधीत असताना आणि समाजाचे निरनिराळे व्यवहार करीत असतानाच घडते, त्याला धर्माच्या नावाने निराळेच असे काही करावयास नको असे कित्येक सूज्ञ माणसांचे म्हणणे पडते आणि त्यांचा तसा अनुभवही असतो. ह्या म्हणण्यात जरी पुष्कळ तथ्यांश आहे तरी ते सर्वांशी खरे नाही. मनुष्यजातीचा किंबहुना सर्व जड सृषअटीचा जो सतत विकास होत चालला हे त्याचाच एक भाग आमचे हे धर्मसाधन आहे. ते आम्ही बुद्ध्या केले नाही तरी तो स्वभावत:च घडणारा एक परिणाम आहे. असा केव्हा केव्हा शहाण्या माणसाचा समज होतो, परंतु वर सांगितलेल्या पवित्र भावना अशा रीतीने केवळ अंधपरंपरेने किंवा आपोआप आम्हांस मिळालेल्या नसतात. त्यांचा पूर्वापार संबंध यद्यपि ह्याच क्षणी आपणांस आठवत नसला तरी केवळ इतर पुरूषार्थामध्ये त्याची कशी तरी भेसळ करून देऊन तो निराळा असा मुळी नाहीच असे म्हणण्याचे धाडस आम्हांस तरी होत नाही.

उलटपक्षी आमचे जे निरनिराळे जुने, नवे धर्मसंप्रदाय चालू आहेत त्यांच्या योगे आमचे धर्मसाधन घडते असे समजून कित्येक लोक स्वस्थ राहतात. धर्मसंप्रदाय काढणे हा एक धर्मसाधन करण्याचा मुख्य मार्ग आहे, ह्यात शंका नाही आणि ह्याचा विचार आपण पुढील खेपेस करू. परंतु आज आपल्यास जी गोष्ट ध्यानात ठेवावयाची ती ही की, केव्हा केव्हा ह्या धर्मसंप्रदायामुळेच धर्मसाधनास अडथळा येतो. मागे एका उपासकानी वाचून दाखविलेल्या उता-यांत सांगितल्याप्रमाणे धर्माचे प्रचारक आणि पुरोहित हे ज्या प्रेम, पश्चात्ताप, आत्मपरीक्षण इत्यादी धर्मभावनांचे नित्य प्रवचन करीत असतात त्यासंबंधी संवयीमुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची जडता येते, कोरडेपणा येतो आणि ते त्यांपासून इतरांहूनही जास्त पराङमुख होण्याचा संभव आहे. आजपर्यंत एकामागून एक असे नवीन संप्रदाय काढण्याची जरूरी लागली आणि अजूनही पुढे लागले. ह्यावरूनही संप्रदायावरच सर्वस्वी अवलंबून राहून चालणार नाही हे उघड दिसते. आम्ही ज्या काही सांप्रदायिक प्रार्थना आणि उपदेश करतो त्यांच्यायोगे इतरांस जागृती होऊनही स्वत: ती न होण्याच संभव असतो. शुद्ध काचेतून ज्याप्रमाणे प्रकाशाची किरणे पार जातात त्याचप्रमाणे ईश्वरी प्रकाशाची किरणे आमच्यातून पार निघून गेलेली स्वत: आम्हांसच कळत नाहीत असे होते!

ह्यावरून वर म्हटल्याप्रमाणे, जरी संसारातील अर्थ आणि काम हे दोन पुरूषार्थ साधीत असताना काही अंशाने धर्मसाधन होते तरी तेवढ्यावरून जसे भागत नाही तसेच जरी एकाद्या संप्रदायात शिरून पूर्णपणे तन्मय होऊन ब-याच अंशाने धर्मसाधन होण्यासारखे आहे तरी तेवढ्यानेही भागत नाही हे उघड होते. धर्मसाधन हे प्रत्येक व्यक्तीने चिंतन, मनन, आत्मसंयमन, आत्मपरीक्षण, परसेवा व सहनशीलता इत्यादीद्वारा स्वत:च्या अनुभवाने व प्रयत्नानेच केले पाहिजे. ह्याहून अन्य उपाय आहेत पण त्यांची खात्री सांगवत नाही.