रा. शिंदे आपल्या भाषणात म्हणतात:
“परंतु समाजसुधारणेचे कार्य आमच्या देशात जे इतक्या सावकाशीने व अल्पप्रमाणात प्रगती करीत आहे, त्याच्या आणखी एका कारणाचा (माझ्या मते सर्वात महत्वाच्या अशा कारणाचा) अद्यापही उल्लेख करावयाचा आहे आणि ते म्हणजे शुद्ध सामाजिक सुधारणेचे म्हणविले जाणारे कार्य अद्यापही बुद्धिपुरस्सर धर्मापासून अलिप्त ठेवले हे होय. कै. आगरकरांच्यासारखे जुन्या परंपरेतील समाजसुधारक ह्या कार्याची उभारणी अद्यापही उपयुक्ततावाद, युक्तिवाद, भूतदया वगैरे दुस-या कोणत्याही तत्वावर करण्यास तयार असतात. पण धार्मिक मनोवृत्तीच्या पायावर मात्र उभारण्यास तयार नाहीत. त्यांना एकतर अशा प्रकारच्या धार्मिक मनोवृत्ती नसतात किंवा असल्या तरीही त्यांचा उपयोग करण्याची त्यांची प्रवृत्ती नसते आणि अशा त-हेची ही धर्मविन्मुख प्रवृत्ती समाजसुधारकामध्य असावी ही अगदी दुर्दैवाची गोष्ट आहे. इतके तरी निदान म्हटल्यावाचून माझ्याच्याने रहावत नाही.”