स्वभावताच जे सुखवादी, आनंदवादी त्यांना नैराश्यवाद खोटा असे सांगत रहाणे म्हणजे लहान मुलापुढे मद्यपान निषेधावर व्याख्यान देण्याप्रमाणे निरर्थक आहे. एवढेच नव्हे तर असे वर्तन परिणामी घातुकही होण्याचा संभव आहे. दारू पिऊ नका, त्या व्यसनापासून दूर रहा, जे कोणी व्यसनाधीन झाले त्यांचा नाशच झाला आहे. असे वारंवार ऐकून दारू म्हणजे काय वस्तु आहे हेही ज्यास माहित नाही अशा मुलांच्या मनात ती काय चीज आहे हे तरी एकदा पहावे हा विचार येणे ज्याप्रमाणे संभवनीय आहे, त्याप्रमाणे निराशा म्हणजे काय असते पाहू तर खरी, असे म्हणून बळेच निराशा ओढून घेऊन काहीजण नुसत्या दु:खात पडण्याचा संभव आहे. परंतु स्वभावत:च जे नैराश्यवादी त्यांनी मात्र घोर साधन करणे फार अगत्याचे आहे. इष्ट मित्रांनी आपल्या समागमाचा लाभ व सुख अशा लोकांना देऊन त्यांच्या निराशेचे बीज नाहीसे निदान कमजोर तरी करण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. आता, आपण जे साधारण जन ते सर्व केवळ सुखवादी किंवा आनंदवादी अगर केवळ नैराश्यवादी नसतो. आपण मधल्या स्थितीमध्ये नेहमी असतो म्हणजे आपणाला केवळ सुखवादी, दु:खी किंवा नैराश्यवादी म्हणता यावयाचे नाही. म्हणून आपल्यावर दु:खाचे प्रसंग आले म्हणजे आपण अतिशय दु:खी होतो. त्यावेळी हा आनंदवाद आपल्या मनात आला पाहिजे.
आता हा आनंदवाद स्थापित कसा करावयाचा? ह्यावेळी एका वेड्याची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्या वेड्याच्या मनाने घेतले की, आपण मेलो आहे व मेलेले लोक जेवत नाहीत म्हणून तोही जेवेचना. ही त्याची स्थिती पाहून एका कुशल डॉक्टरने दहा जणांना मेल्याचे सोंग घेण्यास सांगितले. त्या वेड्यालाही वाटले की हे मेलेलेच आहेत. काही वेळाने ते हळूहळू एकमेकांत कुजबुज करू लागले. त्यातला एक म्हणाला-आपम मेलो म्हणून काय झाले, मेलेले लोक जसे जेवतात तसे आपण जेवू या. म्हणून ते जेवायला बसून जेवू लागले. अर्थात त्यांच्याबरोबर तो वेडाही जेवू लागला. डॉक्टरचे काम झाले. पण व्याधी एकीकडे व उपाय एकीकडे असे केले तर डॉक्टर खरा यम होतो. ज्या कारणामुळे आजार त्याच कारणाशी हात घातला म्हणजे तो बरा होतो. म्हणून ज्या आपल्या वाड़मयात एकदेशीय नैराश्यवाद भरलेला आहे त्याच वाड़मयातून आनंदवाद निघतो की काय हे पाहताना एखाद्या गरीबाने आपले एकच पागोटे पण तेच परतून परतून ज्याप्रमाणे निराळे बांधावे व त्यात आनंद मानून घ्यावा तसे जरी आपणास करावे लागले तरी हरकत नाही. तुकोबाच्या अनेक अभंगामध्ये नैराश्यवाद भरलेला आहे. परंतु बुद्धासारखे कर्मवादी, शंकराचार्यासारखे आत्मवादी आणि रामानुजाचार्य व मध्वाचार्य ह्यांच्यासारखे ईश्वरवादी अशा कोणत्याही दृष्टीने तुकोबांची गाथा चाळली असता आपणास आनंदवाद आढळून येणार आहे. उदा. झाला प्रेतरूप शरीराचा भाव, आपुले मरण पाहिले म्या डोळा व सरले आता नाही. हे अभंग अनुक्रमे पाहण्यसारखे आहेत. अशा दृष्टीने आपले वड़मय वाचावे, केवळ रडतियासवे रडत बसू नये.
सुखाच्या साधनाविषयी विचार करताना महाभारतातील अश्वमेधीक पर्वातील इंद्र व वृत ह्यांची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरे पाहता विषय सुखाचे एक साधन आहे. विषय इंद्रिय ह्यांचा संनिकर्ष झाला म्हणजे जो प्रत्यय येतो, जी एक प्रकारची समाधानाची स्थिती होते, जो योग घडतो त्याचा अनुभव साधारणपणे सर्वांना असतोच. हे साधन इतके उघड आहे की, त्याविषयी मुद्दाम कोणास काही सांगावयासही नको पण विषय हे अनादर करण्याचेच विषय आहेत असे धार्मिक म्हणतात. विषयसुखाचा अतिरेक झाला असता विषय विरक्तीचा प्रादुर्भाव होतो तेव्हा विषयांचा अनादर म्हणजे विषयाचा उत्पादक जो ईश्वर त्याचा अनादर होय. विषयांचा अनादर करून पुन्हा इतर विषयासंबंधीच धंदे करीत राहणे म्हणजे पापच. सारांश सरळपणे विचार करता आपले स्वत:चे व इतरांचे विषयसुख संपादन करण्याच्या प्रयत्नात वावगे काहीच नाही व विषयसुख तरी जोपर्यंत आपला प्रयत्न असतो तोपर्यंतच होत असते.
दुसरे, या संसारात त्रास तरी किती प्रकारचा आहे बापापासून मुलास त्रास, मुलाकडून बापास, सासूपासून सुनेला, सुनेपासून सासूला, धनी व नोकर ह्यांना परस्परापासूनचा त्रास, प्रवासात इतराकडून त्रास होऊ लागला असता यावे तर घरच्या मंडळीकडून त्रास, अशा आपत्ती पावलोगणती आपणावर येत असतात. त्या काही टळत नाहीत अशा स्थितीत सुख संपादन कसे करावयाचे? तर ह्या आपत्ती सोसणे हे एक सुखाचे साधन आहे. आपत्ती सहन करून मिळणारे सुख विषयसुखापेक्षा उच्च दर्जाचे होय. वारसाने मिळालेल्या संपत्तीचे सुख व स्वकष्टाने मिळविलेल्या संपत्तीचे सुख ह्यामध्ये जो फरक आहे तोच फरक वरील दोहोंमध्ये आहे. पण आपत्तींना सुखाचे साधन म्हटले म्हणून त्यांना हुडकत बसायचे नाही किंवा इतरावर त्या मुद्दाम आणावयाच्या नाहीत. त्या न आल्या किंवा आणल्या तर इतर किंवा आपण दु:खी बनतो असे मात्र नव्हे. आपत्ती आपण होऊन आली पाहिजे. ईश्वराने पाठविली पाहिजे. आपला दोष नसताना जेव्हा सृष्टीक्रमाने आपत्ती येतात तेव्हा त्यांचा आदराने स्वीकार केला पाहिजे. मुद्दाम ओढून आणलेली आपत्ती सुखकारक होत नाही म्हणून आपणावर किंवा इतरावर होता होईल तोवर आपत्ती येऊ न देण्याचा शक्य तेवढा प्रयत्न केलाच पाहिजे. तेव्हा ह्या तीन प्रकारच्या मनोभावना सांगितल्या. एक प्रयत्न करणे, दुसरे सहन करणे आणि तिसरे टाळणे. आणखीही दुस-या सांगता येतील. या प्रकारे आपण वागलो तर आपला तसाच इतरांचाही संसार अत्यंत सुखमय होऊन जाईल.