दुसरा संगिया साह्यकारी ह्याची वाट मागे फिरून न पाहता अस्पृश्य वर्गाच्या उद्धारार्थ काम आज जवळजवळ १३ वर्षे येथील ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी रा. के. रंगराव हे निश्चयाने करीत आहेत. हल्ली तर त्यांनी आपला २५-३० वर्षांचा वकिलीचा धंदा गेल्या ऑगस्टात आवरून संपूर्णपणे अंत्यजांचीच सेवा स्वीकारली आहे. ते आपल्या कुटुंबासह आता ब्राह्ममंदिरासमोरील प्रचाराश्रमात येऊन राहिले आहेत व नावाशिवाय अनभिषिक्त प्रचारकच बनले आहेत. स्वीकारलेल्या कामात वेळोवेळी त्यांची मित्रमंडळी त्यांचे दोष काढीत आहेत, त्यांना सरसकट एकच उत्तर म्हणून आपल्या टेबलाजवळील “Fault finders will find fault even in Paradise” हे वाक्य भव्य अक्षरांनी एका तांबड्या फळीवर कोरून ठेविलेले आहे. त्यांच्या शाळेतील हजेरीपटावर ७३ पारियांच्या मुलांची नावे आहेत. रोजची सरासरी सुमारे ६० आहे. एक मुलगा शिकून शिक्षक बनला आहे. मुले २—३ मैलांवरून शिकावयास येतात, म्हणून त्यांस दोनप्रहरचे एक जेवण शाळेत द्यावे लागते. ६ हातमागांपैकी ३ चांगले चालले आहेत. पण कापडाला मागणी चांगली नाही. कारण गिरणीतील हलक्या स्वस्त दराच्या व वरून सारखेच दिसणा-या नगापुढे हातमागाच्या भरीव पण महाग कापडाचा टिकाव लागत नाही, पण एरंडी रेशमाच्या किड्यांची लागवड करण्यात रा. रंगरावांनी बरेच श्रेय व प्रसिद्धी संपादन केली आहे. कोईमतूर येथील शेतकीच्या कॉलेजातून ह्या किड्यांसाठी त्यांच्याकडे पुष्कळ मागणी येत आहे. हे रेशीम तयार करण्याचे कामी उच्च शिक्षण मिळविण्याकरिता मि. मेलोथ नावाच्या एका अनुभवी गृहस्थास रा. रंगरावांनी मिशनच्या मार्फतीने बंगाल्यातील पुसा येथील कॉलेजात पाठविले आहे. मंगळूरच्या कलेक्टरसाहेबांनी ह्या कामगिरीचे महत्त्व जाणून सरकारातून ५०० रु. देणगी देवविली आहे. रा. मेलोथ हे लवकरच परत येतील व पश्चिम किना-यावर जागजागी मिशनची ठाणी उघडण्यात आपल्यास मदत करतील अशी रा. रंगरावांना मोठी उमेद आहे. रा. रंगरावांचे सर्वांत नावाजण्यासारखे व मदतीस अवश्य पात्र असे काम म्हणजे मंगळूरहून एका मैलावरील एका सुपीक टेकडीवर त्यांनी घातलेली पारियांची वसाहत होय. तेथे हल्ली १७ कुटुंबांची कशी तरी सोय झाली आहे, पैकी चौघांस मात्र पक्क्या इमारती मिळाल्या आहेत. बाकी तात्पुरत्या झोपड्या आहेत. सरकारने इमारती लाकूड फुकट दिले असल्याने व मजुरी ज्याची त्यानेच पुरवावयाची असल्याने ३६ रुपयांत एका कुटुंबासाठी एक पक्के घर मिळेल अशी रंगरावांनी सोय केली आहे. ५० रुपये दिल्यास दोन कुटुंबांची कायमची सोय होईल असे घर तयार होते. एकंदर साठ कुळे राहतील एवढी जागा आहे. इकडे श्रीमंत उदार गृहस्थांचे लक्ष जाईल काय ? एक मोटरगाडी म्हणजे २०० पारियांच्या झोपड्या हे रंगरावांचे कोष्टक मुंबईचा एकादा भाटिया शिकेल तर गरिबांचे कोटकल्याण होणार आहे ! ह्या वसाहतीत दोन विहिरी काढल्या आहेत, दोन्हीसही गोडे पाणी लागले आहे. पैकी एकीचा खर्च ५०० रु. अंदमान बेटातील कैद्यांकडून मि. सदाशिव पिले नावाच्या एका सद्गृहस्थाने जमवून दिला आहे, म्हणून तिचे नाव अंदमान विहीर असे पडले आहे. एकूण अंदमानातील कैद्यांना हिंदुस्थानातील पारियांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहे काय?