आज पुन्हा वर नीतीचा हा प्रश्न आम्हांला हाती घ्यावयाचा असेल तर अगोदरच त्याची पूर्वतयारी सुस्पष्ट रीतीने करावयास पाहिजे. प्रस्तुतच्या सक्षुब्ध सामाजिक स्थितीमध्ये ख-या नीतीचे संपादन आम्हांला कधीच करता येणार नाही. हल्ली गाजत असलेला गोंधळ खाली टाकून वर उंच निराळ्याच वातावरणात गेले पाहिजे. तदनंतर जगाचे समष्टी स्वरूप आणि त्या स्वरूपामधील आमची स्वत:ची पदवी एतत्संबंधी सम्यक आणि निश्चित ज्ञान आम्हांला झाले पाहिजे. नीती म्हणून काही निराळा स्वत:सिद्ध आणि स्वयंभू असा पदार्थ नाही. जीवनाच्या समष्टी स्वरूपाचे ज्ञान झाल्याशिवाय ख-या नीतीचा उदयच संभवत नाही. नैतिक आचरण घडून येण्यापूर्वी जडातून चैतन्याकडे जीविताचे आक्रमण झालेच पाहिजे. हे आक्रमण घडून आल्यावर, जीवाची निसर्गाच्या नियंत्रणातून सुटका होऊन त्यास एकपक्षी नैतिक स्वातंत्र्य प्राप्त होते, तर दुसरेपक्षी केवळ स्वसंरक्षणाची (एकदेशीय हीन) भावना लयास जाऊन त्याच्या पुढे अतींद्रिय ध्येयाचा उदय होतो, म्हणजे ह्या दोन साक्षात्कारामुळे जड सृष्टीतून निराळ्याच सृष्टीचा भास त्याला होऊ लागतो. ह्या इंद्रियनिर्मित जगतामध्ये हे वरील दोन्ही साक्षात्कार जवळजवळ अशक्यच वाटतात. कारण ज्या कार्यारंभाचे पर्यवसान कर्त्याच्या कल्याणामध्ये अतएव त्याच्या स्वसंरक्षणामध्ये होत नाही अशा कार्यारंभाची कल्पना तरी कशी व्हावी? जे आपण नव्हे अशा कशासाटी तरी आपल्या शक्तीचा लय करावा असे विधान केले असता अनवस्था दोष येत नाही काय?
प्रस्तुत काळी नीतीच्या प्रश्नाचे महत्त्व आम्हांला खरोखरच पूर्णपणे कळले असेल आणि ख-या नीतिप्रीत्यर्थ आम्हांला वर निर्दिष्ट केल्याप्रमाणे दारूण युद्ध जुंपावयाचे असेल तर आम्हांला आमच्या सा-या अस्तित्वाचा पाया कोठे आहे तो पाहिला पाहिजे. आणि केवळ वरवरच्या मायिक अनुभवावरच अवलंबून न राहता आमचे अढळपद कोठे आहे व कसे आहे ह्याचा मार्ग काढला पाहिजे. आतापर्यंत आम्ही चालविलेल्या जीवनमीमांसेवरून पाहता आम्ही निर्दिष्ट केलेल्या स्वयंभू आध्यात्मिक जीवनामध्येच वरील अढळपद आणि त्यातून प्रादुर्भाव पावणारी विवक्षित नीती आम्हांला लाभणे शक्य आहे. जगाला प्रथम आत्मसंविती आणि नंतर खरे सत्य जे लाभते ते ह्या स्वयंभू आध्यात्मिक जीवनामुळेच. वर सांगितलेले दोन भिन्न साक्षात्कार जे ह्या मायिक जगात अशक्य वाटतात ते ह्या जीवनाच्या अनुरोधाने पाहता शक्य दिसतात. आध्यात्मिक जीवनामध्येच खरे स्वातंत्र्य प्राप्त होणे कसे शक्य आहे, हे ज्ञान आम्ही मागील एका भागात करून घेतले आहे. ह्या आध्यात्मिक जीवनामध्येच नवीन शुद्ध आणि अद्वैत अशा आत्म्याची प्रतीती घडल्यामुळे आचाराला केवळ मायिक अहंकारावरच अवलंबून राहण्याचे कारण उरत नाही. म्हणून आचाराला ह्या नवीन नीतिमध्ये स्वातंत्र्य प्राप्त होते. ह्या नीतिमध्ये प्रयत्नाची प्रेरणा आपणाबाहेर कोठून यावयाची नसते किंवा प्रयत्नाचे पर्यवसानही आपणाबाहेर कोठेतरी व्हावयाचे नसते, हा सर्व प्रयत्न-व्यवहार आपणामध्येच चालावयाचा असतो, कारण आपणामध्ये अखिल विश्व सामावलेले असते. स्वसंरक्षणाचा हेतू अगदी तात्विक अर्थाने आध्यात्मिक जीवनामध्ये ह्या नवीन कर्तृत्वाचेयोगे संपादला जातो. बाह्य नैसर्गिक सृष्टीमध्ये जो (तामसी द्वैतपर) स्वरक्षणाचा व्यवहार चालला असतो, त्याच्याशी वरील तात्विक स्वरक्षणाचे नुसते नाममात्र सादृश्य रहाते.
आध्यात्मिक जीवन जेव्हा स्वसंवेद्य, स्वयंप्रेरित आणि स्वतंत्र होते, तेव्हा नीती हा त्याचा मध्यबिंदू झालाच म्हणावयाचा. ह्या अवाढव्य संसारामध्ये जीवाला नीती म्हणून काही बाहेरून मिळालेली देणगी नव्हे, तर ती स्वत:च जीवनविकासातील एक प्रमुख अवस्था होय. आध्यात्मिक जीवनामध्ये स्वसंवेदना तेव्हाच प्रादुर्भूत झाली म्हणावयाची की जेव्हा त्यामध्ये नीतीचा उद्गार निघाला आणि तद्नंतर हा त्या जीवनाचा भावी विकार नीतिद्वाराच व्हावयाचा असतो. नीतिमुळेच मनुष्य आध्यात्मिक जीवनाकडे वळतो असा ह्याचा अर्थ नव्हे, तर नीती म्हणजे आध्यात्मिक जीवनाची एक पायरी उंच जाणे होय. ह्यावरून सर्व मानवी नीतीचा पाया ह्या आध्यात्मिक नीतिमध्येच रोविला असला पाहिजे हे सिद्ध होते.
इतक्या खोल पायावर उभारलेल्या नीतीचा संबंध जीवनाच्या सर्व व्यवहाराशी जडला पाहिजे. ह्या संसारातील अगदी भिन्न भिन्न संबंध आणि अनुभव हे सर्वच नीतीच्या कक्षेत आले पाहिजेत व ते तिच्या कसाला उतरले पाहिजेत. पण ह्या आध्यात्मिक नीतीच्या (मंगलमय) कक्षेत ज्या ज्या म्हणून गोष्टी घेण्यात येतील त्यांच्या मूळ स्वरूपात ह्या कक्षेबाहेर असलेल्या गोष्टीत न आढळून येणारे असे काहीतरी उच्चतर रूपांतर घडून आले पाहिजे. (नीतीच्या बाहेर काव्य आणि तत्त्वज्ञान ह्यांच्याही स्वतंत्र कक्षा आहेतच) नीतीच्या पायावरच सर्व व्यवहार करावेत असे जे आमचे म्हणणे आहे, त्याचा अर्थ असा नव्हे की, कला आणि शास्त्रे ह्यांचा अभ्यास मनुष्याने निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करावा. हा अर्थ (अगदी बालबोध आहे, इतकेच नव्हे तर) ब-याच कोत्या दृष्टीचा समजला जाईल. आमचा खरा अर्थ एवढाच आहे की, (केवळ मीमांसेच्या दृष्टीने) जे जे काही नीतीच्या कक्षेच्या बाहेर असेल ते ते सर्वही जीवाने आत्मसात करून घेतले पाहिजे. सत्य आणि सौंदर्य ही केवळ आपल्या अध्ययनाचे बाह्य विषय होत. म्हणून त्यांना आपल्या अंतर्जीवनाचे बाहेरच ठेवून अलगपणे त्याचा अभ्यास करीत राहू नये. त्यांच्याशी तादात्म्य पावले पाहिजे. अशा तादात्म्यानेच बाह्य विषयाचा लाभ घडला असता अंतर्जीविताची वाढ होऊ शकते. जीवन अशा प्रकारे अंतर्बाह्य द्वंद्वातीत जेव्हा होते, तेव्हाच बाह्य विषयातही आत्मा आहे आणि स्वातंत्र्य म्हणून काही एकादी भाकड कल्पना नसून तो एक वास्तविक अनुभव आहे असे कळून चुकते.
इतिहासाचा शोध करून पाहता असेच आढळून येईल की, जेव्हा जेव्हा म्हणून आध्यात्मिक जीवनाच्या मध्यबिंदूचे स्थान नीतीचे स्वीकारले नाही तेव्हा तेव्हा इतर दृष्टीने बाह्य संपत्तीचा अवडंबर कितीही माजला असला तरी अंतर्जीवित शुष्क आणि अस्थिर होऊन डळमळू लागले आहे. व्यक्तीच्याही बाबतीत हाच प्रत्यय येतो की, अंत:करणात नीतीची जबाबदारी ओळखल्याशिवाय संसारातील गूढ प्रश्नांचा अखेरचा निकाल कधीच लागणार नाही. ही जबाबदारी पटली म्हणजे आणि ती द्वेषामध्ये आणि कलहामध्येच पटावयाला पाहिजे........मग अंत:करणामध्ये जे स्वराज्य नांदत आहे त्याचे दर्शन घडते. बाह्य मायिक जगात परस्पर विघातक किती जरी बंडे घडून आली तरी अंत:स्वराज्य त्यायोगे कधीच पदच्युत होत नाही, परंतु जर का अंत:करणातच नीतीची ओळख पटली नाही तर मात्र बाहेरील बंडाचा जय होऊन आध्यात्मिक जीवन पदभ्रष्ट होण्याची आपत्ती कदापि टळण्यासारखी नाही.