पुण्यास भोकरवाडी येथे बहुतेक अस्पृश्य वर्गातील अगदी गरीब लोकांची वस्ती आहे. हल्लीच्या तेथील स्थितीसंबंधाने निराश्रित साहाय्यकारक मंडळीने काढलेल्या पत्रकात पुढील मजकूर आहे.
“पुणे येथील भोकरवाडीच्या मांग वस्तीत अहमदनगर जिल्ह्यातून येणा-या दुष्काळ पीडितांची अतोनात भर पडल्यामुळे तेथील स्थिती फारच हृदयद्रावक झाली आहे. अगोदरच ही वस्ती फार गर्दीची व रोगजनक होती. तशात आणखी हजार दीडहजारपर्यंत बेकारांची व भिका-यांची भर पडून हा सर्व जमाव येथील आमच्या मिशनच्या मैदानातच उघडा पडून आहे. कपड्याचे अभावी ह्या अनाथ लोकांची विशेषकरून मुलांची फार आबाळ होत आहे. शेकडो म्हातारी माणसे, आंधळे, पांगळे आणि लहान अर्भके रात्रभर उघडी पडतात. पाघरायला जुन्यापान्या कपड्याची जर कोणी मदत पाठवील, व्यापारी लोक जर आपल्या जुन्या साठ्यातून काही कापड पाठवतील, घरोघरी जाऊन जुने कपडे व धान्य गोळा करून आणण्यासाठी तरूण स्वयंसेवक पुढे येतील तर आपत्ती निवारण्याचे कामी आमच्या मिशनला मोठी मदत होईल” अशा प्रकारे विनंती करून रा. शिंदे हे स्वस्थ बसलेले नाहीत. त्यांनी ह्या कामी पुण्याच्या म्युनिसिपालिटीचे अध्यक्ष रा. आपटे ह्यांची सहानुभूती मिळविली असून दोन लोकांना साहाय्य देण्याच्या कामास आरंभ झाला आहे. मदत मागणारे लोक फार, साहाय्य करणारे लोक थोडे असा प्रकार असल्यामुळे रा. शिंदे व त्यांचे साहाय्यक मित्र ह्यास ह्या दोन लोकांचे हाल पहावत नाहीत. हल्ली जिकडून तिकडून पैशाच्या मागण्या होत आहेत. दुष्काळाची स्थिती सर्वत्रच आहे पण ह्या अस्पृश्य लोकांची स्थिती सहसा वरच्या वर्गातील लोकांच्या कानांवरही जात नाही, मग तो जाणून त्यास मदत करण्याची गोष्ट दूरच. ह्यावेळी राष्ट्रीय सभेच्या ठरावांची व आज्ञांची बढाई मारणा-या लोकांनी आपली तोंडे न लपविता राष्ट्रीय सभेच्या ठरावानुसार वागावयास पुढे यावे. गांधीजी आठ महिन्यांमध्ये स्वराज्य मिळवून द्यावयास तयार आहेत पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही झाले आणि अस्पृश्यता राहिली तर आम्हाला स्वराज्य केव्हाही मिळावयाचे नाही, असे त्यांचेच म्हणणे आहे. तेव्हा अस्पृश्यता घालविण्याच्या पूर्वी निदान ह्या अन्नान्न दशेला येऊन मिळालेल्या हजारो म्हाता-या, तरण्या, पुरूष स्त्रियांना, मुलांना दोन घास मिळतील व थंडीपासून त्यांचे संरक्षण करावयास तरी राष्ट्रीय सभेच्या ठरावांचे व आज्ञांचे स्तोम माजविणारे आपल्या सत्वास जागतील काय?
नुकतेच कायदे कौंसिलचे सभासद झालेले रा. घोलप ह्यांच्या दृष्टीने तर निराश्रितांसाठी मिळविलेल्या पैशांवर चरणाचे जे विठ्ठलराव शिंदे त्यांनीच आणखी चरावयास हे नवीन कुरण तयार केले आहे असे ठरण्याचा संभव आहे. विठ्ठलरावांच्या सारख्या कुचकामाच्या माणसाने आजपर्यंत आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करून १५-१६ वर्षांमध्ये जवळ मायाही बरीच केली असावी, त्यात आता दुष्काळाने त्यास आणखी साहाय्य केले आहे. अशा ह्या वेळी रा. शिंदे पुण्याच्या म्युनिसिपालिटीच्या ब्राह्मण अध्यक्षांच्या कानी लागून, काय काय गोंधळ घालताहेत एवढे तरी निराश्रितांचे खरे कैवारी जाऊन पाहतील काय? रा. घोलप हे अखिल इलाख्यातील अस्पृश्य लोकांच्या वतीने सभासद नेमले गेले आहेत. त्यांनी पुण्यास जो महारमांगाचा एकदम जमाव जमला आहे त्यांच्या आपत्तीच्या निवारणासाठी काही करावयास नको काय?