रावसाहेब थोरात ह्यांनी सुरू करून वाढविलेले नाशिक येथील “मराठा विद्यार्थी वसतिगृह” ज्यांनी समक्ष पाहिले आहे, त्यांनाच रावसाहेबांच्या कर्तृत्वाची व तडफेची कल्पना येणार आहे. विद्यार्थ्यांना वश करून घेऊन त्यांच्यात स्फूर्ती आणणे हा त्यांचा विशेष गुण आहे. ह्या गुणाचेच रहस्य पुढील “बोधामृत” लेखात अस्पष्ट का होईना पण चमकत आहे. नुसती जेवणाखाण्याची आणि राहण्याची सोय करूनच विद्यार्थी-वसतिगृहाची उभारणी होत नसते. कारण विद्यार्थी केवळ वनस्पती नाहीत. ते होतकरू माणसे असून त्यांना विद्यालोलुप बनवावयाचे असते. बोधामृतासारखा खासगी पत्रव्यवहार ठेवून त्यांच्या मनाची मशागत करावयाची असते. ही गोष्ट रा. थोरात जाणून आहेत असे दिसते. वसतिगृहात आपल्या आप्तेष्टांची भरती होऊ न देण्याचा निश्चय फार स्तुत्य आहे. एकंदरीत विद्यार्थीच आपले सगेसोयरे आणि त्यांच्या ठिकाणीच आपला आराम, अशी जीविताची वृत्ती ठेवणारे पुरुष मराठे लोकांत जास्त निर्माण होतील तर श्रीशिवाजीच्या वंशजांस मागासलेले म्हणवून घेण्याची जी आज चटक लागली आहे ती टिकण्याचा संभव नाही. रावसाहेब थोरात आपला वानप्रस्थाश्रम आजन्म सांभाळोत, अशी ईश्वराजवळ प्रार्थना करून ही अल्प प्रस्तावना पुरी करतो.
भोकरवाडी, पुणे. ता. १९ जुलै १९२१ -–विठ्ठल रामजी शिंदे.