बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?

वुडसाइड रे. कार्लाईल

इंग्लंडच्या दक्षिण किना-यावर ब्रिडपोर्ट नावाचा एक टुमदार गाव आहे. त्याचे पूर्वेस तीन मैलांवर बर्टन नावाचे एक सुमारे ७०० वस्तीचे चिमुकले खेडे आहे. खेड्याबाहेर गावकुशीत एका जुन्या पण स्वच्छ इमारतीत मी एक शाळा पाहिली. तिच्या भोवताली निर्मळ, साधे पण विस्तीर्ण पटांगण होते. येथून एका हाकेवर टेकडीच्या पलीकडे समुद्र पसरला होता. शाळेत शिरताना एक लहानशी देवडी लागली. तीत मुलांच्या टोप्या ठेवण्यास भिंतीत खुंट्या ठोकल्या होत्या. खाली नंबर लावले होते. प्रत्येकाचा नंबर ठरलेला होता. शाळेची मधली मोठी मुख्य खोली ६० फूट लांब व २० फूट रूंद होती. तीत मुलांच्या वयाच्या मानाने केलेले दोन मोठे वर्ग बसले होते. मुलांची संख्या ७१ व मुलींची ६७ होती. ती सर्व मिळूनच बसल्यामुळे मुलगे व मुली अशा फाजील जातिभेदास ह्या शाळेत कोठे जागा राहिली नव्हती. माणसांच्या निरनिराळ्या जातिभेदास तर ह्या बेटातूनच हद्दपार केले आहे, हे येथे नव्याने सांगावयास नकोच.

शाळेत गेल्यावर प्रथम भिंतीवर ख्रिस्ताची मोठमोठी चित्रे अगदी लहान मुलांसही कळतील अशी दिसली. समोरच्या तसबिरीत तो काही लहान मुलांस आपल्या जवळ घेत होता. खाली हे त्याचेच वाक्य होते. ‘लहानग्यास मजकडे येऊ द्या. स्वर्गीय राज्य अशांचेच आहे.’ भोवताली त्याच्या इतर परोपकाराचे प्रदर्शन केले होते. शिवाय भिंतीवर चंद्र, चौक, कोन, गोल इ. अनेक रंगांच्या निरनिराळ्या आकृती जागोजाग लावल्या होत्या. मधून खंडाचे व देशाचे नकाशे कायमचे सोडले होते. शिवाय काही प्रसिद्ध पुरूषांचे व स्थळांचे लहान मोठे फोटो टांगले होते.

हेडमास्तर हुषार, दक्ष व अत्यंत आदरशील दिसले. त्यांची पत्नीही शाळेत शिकवीत होती. व दुसरी एक मदतनीस शिक्षकीण होती. वहिवाटीप्रमाणे मुलांच्या सात इयत्ता होत्या, पण शिक्षकांच्या अनुभवाप्रमाणे, शिक्षणाच्या सोयीप्रमाणे व मुलांच्या हुषारीप्रमाणे मुलांचे खरे वर्ग चारच होते.

वर्षातून एकदोनदा शाळेत येणा-या उंटावरील शहाण्या इन्स्पेक्टरांची मास्तरांच्या मागे कोरडी पिरपिर फारशी दिसली नाही. त्यास व्यक्तिस्वातंत्र्य बरेच आहे.

६ व्या अगर ७ व्या वर्षी मुलांचा शाळेतील नियमित अभ्यासक्रम सुरू होतो. त्याच्यापूर्वीही काही अर्भके शाळेत खेळावयास येतात. गरीबांची मुले १५ व्या वर्षी शाळेतून बाहेर काम पाहण्यास जातात. शाळा खेड्यातील असल्यामुळे मुलामुलींच्या शिक्षणात काही फरक दिसला नाही. मुलांपेक्षा मुली मोठ्या दिसल्या. कारण मुलास आपला धंदा शिकण्यास लवकर शाळेतून सुटण्याची घाई असते. शाळेतून बाहेर पडल्यावर ५-६ वर्षांत कोणता तरी विशेष धंदा शिकून स्वत:चा निर्वाह साधावा लागतो. मुलीस तितकी घाई नसते. शाळा सकाळी ९ पासून १२ पर्यंत व दुपारी २ ते ५ पर्यंत उघडी असते. दररोज २ प्रमाणे वर्षातून निदान प्रत्येक मुलाच्या ४०० तरी हजि-या असल्या पाहिजेत.

बाजूच्या एका खोलीत लहान मुलांचा वर्ग अगर बिनयत्ता होती. ह्यांच्या स्लेटीवर खिळ्याने कायमच्या आडव्या-उभ्या रेघा मारल्या होत्या. अक्षरे व आकडे लिहावयाचे ते प्रत्येक चौकात एक असे लिहीत. त्यामुळे लहानपणापासूनच प्रमाणशीर, व्यवस्थेने व रांगेने लिहिण्याची सवय लागे. ह्याचा परिणामही मला लवकरच दिसला. काही लेखी परीक्षेच्या उत्तरांचे कागद मी पाहिले. कागदाचे छापलेले व आखलेले ठरीव नमुने होते. उत्तरे इतक्या व्यवस्थेशीर रीतीने लिहिली होती की परीक्षेच्या घाईत ती लिहिली असावीत हे संभवनीय वाटेना. पण ती तशी लिहिली होती ह्यात शंका नाही. कोठेही डाग अगर ठिपका दिसला नाही. तीन चार वर्षांनी तीन अर्भके लाकडाच्या निरनिराळ्या आकृतींच्या तुकड्यांनी घरे बांधून एका बाजूस खेळत होती.

एका मोठ्या कपाटात शाळेची म्युझिअम होती, ती अशी: वरच्या खान्यात साबण तयार करण्याची सामग्री, क्षार, तेले वगैरे व निरनिराळे साबणांचे मासले, खालच्या खान्यात दगडी कोळसा व इतर उद्भिजे, दुस-या बाजूस साखरेची सामग्री, उसाचे कांडे, मक्याचे कणीस इ. पासून तयार झालेल्या साखरेपर्यंत रूपांतरे, त्याच्या खाली रेशमी किड्यांच्या वेष्टनापासून तो तयार केलेल्या सुंदर लडीपर्यंत रूपांतरे, दुस-या बाजूस शेजारच्या कॉगडन डोंगरावर सापडलेले जुन्या रोमन लोकांचे दात, हाडे, थडग्यातील भांडी, हत्यारे वगैरे; खालच्य खणात धान्ये, बीजे आणि कापसापासून तो कापडापर्यंत गिरणीतील रूपांतरे, दुसरीकडे भूमितीचे ज्ञान करून देण्यास निरनिराळ्या आकाराचे लहान मोठे ठोकलळे ठेविले होते. एका तावदानी पेटीत शिसपेन्सिलीचे पर्याय व दुसरीत पोलाद व तांब्याच्या पट्टीपासून तो टाकाच्या टोकापर्यंत कृती दाखविली होती. एका बाजूस चित्रांचे काही कित्ते ठेविले होते. त्यांत खेड्यातील दोंदील पाटीलबुवा व दरबारातील रणधीर सेनानी ह्यांचे तारतम्यदर्शक हावभाव हुबेहुब पण साध्या रेघांनी दाखविले होते. काही निरनिराळ्या घाटांचे गोंडस खोजे व मातीची इतर भांडीही होती. कपाटाखाली झाडाचे एक खोड कित्येक सहस्त्र वर्षापूर्वी भूगर्भामध्ये दडपून जाऊन साक्षात दगड बनलेले पाहण्यासाठी ठेविले होते, इ. सामग्रीच्या साहाय्याने मुलांच्या कुवतीप्रमाणे खालील विषयांवर गोष्टीच्या रूपाने सप्रयोग व साक्षात पदार्थ दाखवून मुलांचे लक्ष वेधले जाई:

बिनयत्ता १,२,३ री इयत्ता ४,५,६,७ वी इयत्ता
ऍपल फळ, एंजिन, सेफ्टी लँप, दगडी कोळसा, मीठ,
सूर्यकमळ, कापड, घड्याळ, वाफेचे यंत्र, पंप,
मध, मधमाशी, छत्री, बेडूक, मेघवृष्टी,
साबणस चामडे, काच, भुई, ‘आमची निशाणे’,
खेड्यातील बाग, झाडाचे भाग, गलबते, समुद्र,
ससा, पोस्टशिपाई, आगकाड्या, इ.इ. गवत, तारायंत्र,
ऑफिस, दीपस्तंभ,   इ. इ.
बर्फ, पाऊस.    

कोणत्याही मुलास फी मुळीच पडत नाही. इतकेच नव्हे तर पुस्तके, वह्या, पाट्या व पेनादेखील शाळेतूनच मिळतात. शाळा सुटताना शाळेच्या वस्तू शाळेतच व्यवस्थेने मांडून ठेवण्याची जी कवाईत होते ती प्रेक्षणीय असते. ह्याशिवाय प्रत्येक कौंटीत २० मुलांच्या आणि २० मुलींच्या स्कॉलरशिपांची दरसाल गुणांप्रमाणे वाटणी होते.

मुलांचा शाळेत जो अभ्यास होतो तेवढाच. घरी धडे बिलकूल देत नाहीत. घरी धडे घोकीत बसलेला एकही कोवळा विद्यार्थी मला अझून तरी दिसला नाही. अलीकडे येथे सर्व शाळांतून ड्रॉईंगवर फारच मेहनत घेतली जाते. १२-१४ वर्षांच्या मुलांनी काढलेल्या चित्रांची सुबकता पाहून मन थक्क झाले. चित्रकलेने हातास कुशलता, डोळ्यांस मार्मिकता व चित्तास रसिकता येते. म्हणून ह्या कलेच्या भौतिक, मानसिक व नैतिक गुणांची ह्या लोकांस मोठी चहा वाटत आहे. निदान कमीत कमी १०-१२ तरी चित्रे जीत नाहीत अशी मला ह्या देशात एकही झोपडी अद्यापि आढळली नाही. शेवटी मुलांकडून काही गाणई म्हणून दाखविली. आरंभी हारमोनिअममधून गाण्याचा सूर मास्तर सांगे. नंतर सर्व मुले अशी ठेक्यात म्हणत की जणू एक बँडच. ह्यावरून लहानग्यांसही सुरांची माहिती झालेली दिसली. बायबलाची साधारण माहिती, कोणत्याही विशिष्ट पंथाची मते अगर धर्मवेड मुलांच्या मनात न भरविता. शाळेतूनच देण्यात येते.

शाळा सुटण्याच्या पूर्वी शिक्षकाने प्रार्थना केली. नंतर ‘हे द्याळू पित्या’....अशी आर्थरवाने ह्या अर्भकांची प्रार्थना सुरू झाली. शेवटी प्रभूप्रार्थना संपून तथास्तू (Amen) म्हटल्यावर माझे डोळे उघडले. ते केव्हा मिटले होते हे मला कळलेच नव्हते.

प्रार्थना आटपल्याबरोबर प्रत्येक मुलगा लष्करी थाटाचा सलाम करून आपली टोपी व्यवस्थेने घेऊन बाहेर पडला. व्यायामशाळेत मुलांस लष्करी व साधे ड्रील आणि डंबेल्स शिकवितात. शाळा सुरू असता मुलांस वरचेवर ५-१० मिनिटे पटांगणात खेळावयास सोडतात.

कोणत्याही मोठ्या शहरापासून दूर व समुद्रकाठच्या डोंगराळ प्रदेशातील ह्या क्षुद्र खेड्यातील शाळेची ही व्यवस्था पाहून माझे डोक्यात विचारांचे व मनात विकारांचे काहूर माजले ह्यात काय नवल बरे! नसते तर मात्र नवल खरे!!