लंडन शहर

मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
ता. १०-१-१९०२

आमच्या कॉलेजास नाताळची रजा मिळाल्याबरोबर ती लंडन येथे घालवावी म्हणून तिकडे निघालो. ज्या पाश्चात्य सुधारणेचे गोडवे आपण शाळांतून, कॉलेजांतून, ग्रंथांतून, गुरूमुखांतून ऐकतो-इतकेच नव्हे, तर जे हे सुधारणाचक्र, खाऊन पिऊन घरी स्वस्थ राम राम म्हणत बसणा-या आमच्या साध्याभोळ्या राष्ट्रास आज सुमारे १०० वर्षे सारखे चाळवीत आहे. त्याची काही कळसत्रे वरील अचाट शहरात दिसतील ती पहावी असा एक हेतू निघतेवेळी मनात दडून राहिला होता. कारण, ऑक्सफर्डचे विद्यापीठ हे एक थोरले आश्रम असल्यासारखे आहे. येथे विद्याव्यासंगाशिवाय दुस-या कसल्याही भानगडीचे वारे नाही. आणि आधुनिक सुधारणारूपी चीज तयार होण्याची लंडनएवढी मोठी वखार तर जगात दुसरीकडे कोठे नाही. तेव्हा निघताना माझ्या मनात वरील हेतू असणे साहजिक आहे. पण लंडन येथे गेल्यावर निराळाच प्रकार झाला! सुधारलेल्या उद्योगी लोकांचे ५६ लाख वस्तीचे हे मुख्य शहर. ह्यात प्रथम गेल्याबरोबर मानवी महासागरात आपण जणू गटांगळ्या खातो आहो की काय असे वाटू लागते! आमच्याकडील पारमार्थिक कवींनी भवसागराविषयीची आपली भीती वारंवार प्रदर्शित केली आहे. त्यांपैकी एकादा जर ह्या साक्षात भवसागरात येऊन पडला, तर बिचा-याची कोण त्रेधा उडून जाईल! कुठल्याही रहदारीच्या रस्त्यात गेल्याबरोबर स्त्री-पुरूषांच्या लाटांवर लाटा थडकत असताना पाहून जगावर मनुष्यप्राणी सवंग झाला आहे, असे वाटते आणि त्याविषयी फारशी पूज्यबुद्धी राहत नाही. शेकडो मंडळ्या, हजारो संस्था, अनेक भानगडी व असंख्य चळवळी, सार्वजनिक हिताकरिता चाललेल्या आहेत हे गाईडबुकावरून कळते. पण त्या कोणत्या आहेत व त्यांचे ह्या जनसमूहावर काय कार्य घडते, ह्याचा काही बोध होत नाही. अशा स्थितीत माझ्या वरील हेतूची काय वाट झाली असावी, हे निराळे सांगावयास नको. शिवाय स्पेन्सरने आपल्या ‘समाजशास्त्राचे अध्ययन’ ह्या ग्रंथात लिहिलेले आठवते की कोणी एक फ्रेंच प्रवासी इंग्लंडात येऊन आठ दिवस राहिल्यावर त्यास इंग्रजांविषयी एक ग्रंथ लिहावा असे वाटून तो लिहू लागला. एका महिन्याने त्याच्या मतांविषयी त्यालाच खात्री वाटेना. एक वर्षभर राहिल्यावर तर ग्रंथ लिहिण्याचे काम त्याने अजीबात टाकून दिले! तात्पर्य विश्रांतीकरिता मिळालेल्या सुटीत नुसते तर्क लढविण्याची दगदग न करिता ह्या अक्राळविक्राळ शहरात नजरेस पडतील ते चमत्कार मुकाट्याने पाहण्याचा मी निश्चय केला!

कार्थेज, कैरो, बगदाद, रोम इ. जगाच्या इतिहासावर परिणाम घडविणारी जी प्रचंड शहरे झाली, त्याच तोडीचे पण त्या सर्वाहूनही मोठे लंडन हे होय. आणि ह्याचा प्रताप हल्ली कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे सर्व जगाला भोवत आहे. लोकसंख्येच्या मानाने हे आस्ट्रेलिया खंडापेक्षा सव्वा पटीने मोठे आहे. स्कॉटलंड व वेल्स दोहोंची लोकवस्ती मिळविली तरी इतकी होत नाही. २० वर्षांपूर्वी ह्याच्या भोवती जी खेडी होती ती आता ह्यातील रस्ते झाले आहेत. तरी अद्यापि हे वणव्याप्रमाणे आसमंतात झपाट्याने पसरत आहे. ह्या शहरात वाहनांची जी अचाट योजना केली आहे, तिजकडे परकीयांचे लक्ष आधी जाते. काही आगगाड्या जमिनीवरून धावतात, काही उंच कमानीवरून हवेतून धावतात, तर काही जमिनीखालून खोल बोगद्यातून धावतात. टैम्स नदीवरून एकादी आगगाडी पाखरासारखी फडफडते, तर पाण्याखालून एकदी सरपटते! ह्याशिवाय ट्रॅमबे, ऑम्नीबस् व साध्या गाड्या ह्यांची तर रस्त्यात खेचाखेची! अगदी नुकतीच एक सेंट्रल लंडन रेल्वे म्हणून ८० फूट खोल भुईतून जाणारी विजेची गाडी झाली आहे. प्रत्येक स्टेशनावर उतारू लोकांस लिफ्टने खाली सोडतात व वर घेतात. आतील स्टेशनावर प्रकाशाची व हवेची इतकी सुंदर व्यवस्था केली आहे की, वरच्यापेक्षा खालीच बरे वाटते. तीन-तीन मिनिटांनी एक गाडी अकस्मात् पुढे येते आणि हजारो लोकांना घेऊन एका मिनिटात पसार होते. ही परंपरा सकाळपासून रात्रीच्या १२ पर्यंत घड्याळातील काट्याप्रमाणे नियमाने चालू असते. लंडनच्या जमिनीत खाली कोठे काय आहे हे सांगवत नाही. विजेच्या दिव्यांच्या तारा, धुराच्या दिव्यांच्या तोट्या, पाण्याचे बंब, मैल्याची गटारे आणि आगगाडीचे बोगदे ह्यांनी सगळी जमीन मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे पोखरली आहे. खाली जमिनीत ही नकशी, वरती हवेतून टेलिग्राफ व टेलिफोनचे जाळे पसरले आहे. जागजागी टेलिफोनची ठिकाणे आहेत. त्यांतून जरूरीचे निरोप जाऊन लगेच उत्तर येते, अगर दोघांचे संभाषण चालते.

ह्याप्रमाणे लंडन नावाचे २००-३०० चौरस मैल क्षेत्रफळाचे एक सावयवी शरीर आहे!

इंग्लंड हे बोलून चालून व्यापा-यांचे राष्ट्र. अर्थात त्याचे मुख्य शहर म्हणजे सर्व जगाचे एक भले मोठे मार्केट. तेव्हा त्यातील दुकाने पाहण्यासारखी असतील ह्यात नवल काय? माल तर मोहक खराच. पण तो दुकानात मांडून ठेवण्याची ढब त्यातून मोहक. आमच्याकडील दुकानदार आपल्या मालाचे ढीगाचे ढीग दुकानात लपवून ठेवून आपण दाराशी येऊन बसतात. एकाद्यास वाटावे हे जणू रखवालीच करीत आहेत. इकडे काही निराळाच प्रकार. दुकान म्हणजे एक जंगी पारदर्शक पेटी—अथवा पदार्थसंग्रहालय—अगर एक लहानसे प्रदर्शनच. रस्त्यातून धावतानादेखील दुकानातील सर्व जिन्नस किंमतीसहित दिसतील. हिंदुस्थानात मागे एकदा प्रदर्शनाकरिता मेणाचे सुंदर पुतळे आणले होते, तसले पुतळे येथे प्रत्येक कापडवाल्याच्या दुकानात उभे केलेले असतात. आणि त्यांवर दुकानातील पोशाकाचे मासले चढविलेले असतात. पुतळ्यांकडे पाहून पोशाक घेण्याची इच्छा सहज होते. काळोख पडल्यावर प्रत्येक पदार्थाजवळ एक एक बिजलीची बत्ती चमकू लागते. दुकानावरच्या ज्या पाट्या आणि जाहिराती दिवसा शाईने लिहिलेल्या दिसतात, त्या रात्री दिव्याने अधिक स्पष्ट दिसतात आणि दुकानास अधिकच शोभा येते. जाहिरातीने तर इतका कहर उडवून दिला आहे की पहावे तिकडे अक्षरे, चित्रे आणि पुतळे हीच दिसतात. कित्येक हालतात, कित्येक लकाकतात, तर कित्येक वारंवार आपला रंग बदलतात! शहरास कंटाळून बाहेर पडलो, तर शेतांतून व पिकांतूनही जाहिराती दिसाव्यात काय? भुईखालच्या विजेच्या गाडीकडे जाण्यास मी एकदा लिफ्टमधून खाली उतरत असताना माझी नजर काळोखातून सहज भुयाराच्या भिंतीकडे गेली. तितक्यातच लिफ्टच्या उजेडामुळे भिंतीवर एक जाहिरात दिसली!! अशा ह्या मायावी लोकांपुढे व्यापारात आमचा टिकाव कसा लागेल!

नुसत्या भपक्या-भपक्यानेच ह्यांचा व्यापार इतका वाढला आहे, असे म्हणणे केवळ भ्रममूलक आहे. अनियंत्रित व्यापार आणि कायदेशीर स्पर्धा ह्या तत्त्वाचा ह्या लोकांवर असा फायदेशीर परिणाम झाला आहे की गि-हाईकांशी बेशिस्तपणा, आडदांडपणा, बेविश्वास अगर किमतीत अफरातफर केल्यास व्यापारी आपले भांडवल लवकरच गमावून घेईल. आपल्या पेढीची कोणत्याही प्रकारे बदनामी होऊ नये इतकेच नव्हे, तर लहान-थोर दर्जाच्या कसल्याही गि-हाईकाचे क्षुल्लक बाबतीतही मन दुखवू नये म्हणून दुकानदार हरएक प्रयत्न करीत असतात. एकंदरीत सौंदर्य, बुद्धी आणि नीती ह्या तीनही मुख्य तत्त्वांची समान सांगड घालून दीर्घोद्योग व अचाट धाडस व निश्चळ श्रद्धा ह्यांच्या पायांवर ह्या लोकांनी आपल्या व्यापारशास्त्राची इमारत उभारली आहे म्हणून लंडन शहरास हल्लीचे वैभव आले आहे!

हे लोक स्वार्थी आहेत, सुखार्थी आहेत, जडवादी आहेत इ. समज पुष्कळ शहाण्या लोकांचेही आहेत आणि इकडे आल्यावर ह्यांचे वैभव, ह्यांची चैन आणि फॅशन्स पाहून हेच ग्रह कायम होण्याचा पुष्कळ संभव आहे. इकडील बाजारातील एक-चतुर्थांश तरी माल निव्वळ चैनीचा आहे असे दिसेल. परवा ‘ख्रिस्तमस बजार’ ह्या नावाचे केवळ नाताळाकरिता एक जंगी दुकान मांडण्यात आले होते, त्यात तळघरापासून तो वर चार मजल्यांपर्यंत लहान मुलांस नाताळात नजर करण्याची खेळणी मांडून ठेविली होती. हे लाखो रूपयांचे दुकान पाहून मला वाटले की इंग्लंडातील लहान मुलांनी जर नुसती आपली खेळणी विकली तर हिंदुस्तानातील दुष्काळपीडितांचे प्राण वाचतील! असो, तो भाग वेगळा. पण पाश्चात्य सुधारणेचे सर्व रहस्य केवळ चैनीतच नाही. जगात राहून सुख भोगण्याची अत्यंत लालसा ह्या लोकांस आहे हे खरे. पण, पृथ्वीवर राहून आकाशातील स्वर्गाकडे उडी न घेता येथेच स्वर्ग उतरविण्याची ह्यांची दिशा आहे. हे लोक स्वार्थी आहेत हे तर खरेच. पण स्वार्थसाधल्याबरोबर परमार्थास ते कसे लागतात, हे आम्हांस समजून घेणे आहे. असो. आज इकडील भौतिक प्रकार सांगितला. पुढे साधल्यास एक दोन बौद्धिक आणि नैतिक मासले सांगेन.