राजशासन

प्रार्थनासमाजासंबंधी कित्येक समंजस लोकांचा असा एक आक्षेप येतो की, प्रार्थनासमाज हा ईश्वराचा अवतार मानीत नाही. जुन्या धर्माच्या कित्येक समजुती प्रार्थनासमाजाने सोडलेल्या आहेत, त्या असोत. पण ईश्वराचा अवतार मुळी न मानण्यामध्ये प्रार्थना समाज सर्वसाधारण धार्मिक भावनेचे एक मुख्य अंगच मानीत नाही आणि त्यामुळे समाजात प्रवेश करण्यास मोठी खरोखर अडचण येते अशी ह्या आक्षेपकाची तक्रार असते. विचार करून पाहिले असता ह्या तक्रारीस जागा नाही. अवतारवादास प्रार्थनासमाजानेच काय, किंबहुना आधुनिक उदारधर्माभिमान्यांपैकी कोणीही अजीबात फाटा दिला आहे असे मुळीच आढळून येणार नाही. परमेश्वर सावयवरूपाने अवतार घेत नाही, एवढेच प्रार्थनासमाजाचे म्हणणे आहे. येशूख्रिस्त किंवा राम, कृष्ण इत्यादी ऐतिहासिक किंवा पौराणिक व्यक्ती तेवढ्याच ईश्वराचे अवतार अशी आकुंचित कल्पना उदारधर्मवाद्यांस पटत नाही, परंतु अदृश्यरूपाने सर्व विश्व व्यापून रहाणारा परमात्मा हळूहळू विश्वामध्ये आपले सात्विक मंगलमय आणि शक्तिशाली स्वरूप उघड करीत आहे, असा अनुभव उदारधर्मवाद्यांसही येत आहे. आणि ह्या दृष्टीने अवतारवादाचे अधिक विस्तृत, पूर्ण आणि साधे स्वरूप त्यांना मान्य आहे असे समंजस लोकांस सहज दिसून येईल.

धर्म आणि नीतिशिक्षणाच्या संबंधाने हल्ली जी विशेष चर्चा चोहींकडे चालू आहे तिला अनुलक्षून मागे पाच सात खेपेला विनययोग आणि शासनयोग ह्या मथळ्याखाली आम्ही ह्या पीठावरून जी विवेचनमालिका गुंफिली तिचाही रोख ह्या वरील विस्तृत अवतारवादाचे पर्यायाने उद्घाटन करण्याचाच होता. पितृशासनाविषयी विचार करीत असताना आपण पाहिले की, आपल्या पोटी उत्पन्न झालेल्या मांसाच्या गोळ्याचे माता चारपाच वर्षांची त्याची कुमारदशा संपेतोपर्यंत शारीरिक संरक्षण करते आणि पिता दहा पंधरा वर्षांची त्याची किशोरदशा संपेपर्यंत त्याची मानसिक जोपासना करून त्याची पुढील वाढ त्याच्या गुरूकडे सोपवितो. गुरूगृही त्याच्या बुद्धीची वाढ होऊन पंचवीस-तीस वर्षांचा प्रौढ पुरूष होऊन संसार भूमिकेवर प्रवेश करतो. अशा रीतीने क्रमाक्रमाने व्यक्तीच्या स्वत्वाची वाढ होते. जड सृष्टीतून सजीवसृष्टी, सजीव सृष्टीतून ज्ञानवान मनुष्ययोनी, आणि त्या योनीतील वरील क्रमाने प्रौढ दशेप्रत प्राप्त झालेल्या व्यक्ती अशी ही सृष्टीची हळूहळू सततची उत्क्रांती चाललेली आहे. ज्यास प्राचीन धर्मतत्त्वज्ञानामध्ये अवतारवाद असे नाव होते त्यास आधुनिक वाड्मयामध्ये विकासवाद हे नाव हळूहळू येत चालले आहे. विकास म्हणजे पूर्वी जी वस्तूंची साधी घटना असते ती उत्तरोत्तर अधिकाधिक संकिलत होत जाणे एवढाच अर्थ नव्हे, तर त्या घटनेमध्ये पूर्वी अदृश्य असलेले सूक्ष्म पण कार्यकारी असे काही एक नवीन तत्त्व उघडकीस येत असते, अशी आधुनिक विकासवाद्याची समज पडत चाललेली आहे आणि तेणेकरून प्राचीन अवतारवादाला जशी अधिकाधिक विशदता येत आहे, तशीच आधुनिक विकासवादाला अधिकाधिक भरीवता येत चाललेली आहे. किंबहुना अवतारवाद आणि विकासवाद ह्यांची तोंडमिळवणीच होत चाललेली आहे. “यद्यद्विभूतिमत्सत्वं श्रीमदूजिंतमेव वा| तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोशसंभवम्||” हे श्रीकृष्णाचे म्हणणे जितके अवतारवादाचे द्योतक आहे, तितकेच विकासवादाचेही आहे.

असो. ह्याप्रमाणे विश्वविकासाची मजल मनुष्ययोनीतील प्रौढव्यक्तीपर्यंत आल्यावर ह्यापुढे दुसरीच महत्त्वाची एक मजल सुरू होते. व्यक्तीच्या स्वत्वाची पूर्ण वाढ झाल्यावर ह्या प्रौढ व्यक्तीच्या लहान मोठ्या घटना बनून ह्यापुढे समाजाच्या अथवा राष्ट्राच्या स्वत्वाची वाढ सुरू होते. म्हणजे जीवनशास्त्र आणि मानसशास्त्र ह्यानंतर समाजशास्त्राच्या विषयास आरंभ होतो. नुकतेच हिंदुस्थानातून प्रवास करून गेलेले मि. रामसे मॅकडोनल्ड यांनी राजसंस्थेची व्याख्या खालील दोन साध्या वाक्यांनी केलेली आहे.

“The State is the organised political personality of a Sovereign people-the organisation of a Community for making its common will efficient by political methods.”

राजसंस्था म्हणजे स्वतंत्र राष्ट्राचे संघटित स्वत्व अथवा जिच्याद्वारे राजकीय पद्धतीने एकाद्या राष्ट्राची सामान्य इच्छा अथवा हेतू परिपूर्ण करिता येईल अशी त्या राष्ट्राची घटना ही होय. ह्यावरून व्यक्तीची वाढ होण्याला ज्याप्रकारे पितृशासनाची आणि गुरूशासनाची जरूरी आहे, त्याचप्रकारे राष्ट्राचे स्वत्व संपादण्याला राजशासनाची जरूरी आहे, मग तो राजा एकमुखी असो, बहुमुखी असो किंवा सर्वांचे हितसंबंध राखणारी प्रतिनिधींची सभा असो, त्याचे शासन हे एकच आणि त्याची जरूरी ही सारखीच आहे.

आता ह्या ठिकाणी हेही ध्यानात ठेविले पाहिजे की, व्यक्तीच्या स्वत्वाची वाढ पूर्ण झाल्यावर मग राष्ट्राच्या स्वत्वाच्या वाढीला सुरवात होते, अशातला मुळीच प्रकार नाही. म्हणजे पितृशासन आणि राजशासन ह्या गोष्टी एका व्यक्तीच्या बाबतीत जरी एका मागून एक अशा येतात, तरी सर्व राष्ट्राच्या दृष्टीने पहाता त्या तिन्ही एकाच काळी चालल्या असतात. इतर पसुजातीहून मनुष्यजातीचा अधिक विकास होऊन तिची राहणी अधिक उन्नत पायावर सुरू झाल्या काळापासून ह्या तिन्ही शासनांची अंमलबजावणी समकालीनच होत आली आहे. किंबहुना व्यक्तीचे स्वत्व (personality) आणि राष्ट्राचे स्वत्व ह्या दोहोंची वाढ अगदी एकमेकांपासून अलग राहून होणेच मुळी अशक्य आहे. प्रस्तुत पुढारी व्यक्तींच्या प्रौढपणावर जसा राष्ट्राचा प्रौढपणा अलंबून आहे तसाच राष्ट्राच्या प्रस्तुत प्रौढपणावर भावी व्यक्तींचा प्रौढपणाही अवलंबून हे. गुरूकुलातून किंवा युनिव्हर्सिटीतून तरूण शिष्य पदव्या मिळवून बाहेर पडतात, आणि मग ते राष्ट्रीय भूमिकेवर देशकार्यासाठी सज्ज होऊन उभे राहिल्यावर त्यांच्या निरनिराळ्या कमीअधिक तेजस्वी स्वत्वाच्या अंशाचे संकलन होऊन त्यातून राष्ट्राचे स्वत्व किंवा राष्ट्रभूती निर्माण होते. म्हणजे थोर थोर राजे, सम्राट मुत्सद्दी, योद्धे आणि वकील ह्यांच्या व्यक्तिविषयक स्वत्वाचा सुसंस्कार सर्व जनतेच्या शीलावर व आचारविचारांवर घडून त्यांचे स्वत्व बनू लागते. ह्या थोर पुरूषांच्या शासनछत्राखाली पितृशासन आणि गुरूशासनाच्या संस्था सुयंत्रितपणाने चालू राहून त्या हळूहळू सुविकसित होत जातात. परंतु उलटपक्षी हेही खरे आहेकी शासित जनतेच्या गुणदोषाचा संस्कार शास्त्यांच्या मनावरही घडतो. शासनशकट चालवीत असता मार्गात त्यांना यशापयश, आशानिराशा, उल्हास आणि उद्वेग इ. भिन्नभिन्न जे अनुभव येतात, त्यामुळे त्यांच्या स्वत:च्या स्वत्वाला अधिक भरीवपणा येत जातो. पितृगृही आणि गुरूगृही शिकत असताना जे अनुभव केवळ पर्यायाने आणि आदर्शरूपाने घडत होते, ते आता प्रत्यक्षपणे आणि वस्तुरूपाने घडू लागल्यामुळे ह्या थोर शास्त्याच्या स्वत्वाला केवळ अधिक भरीवपणा येतो इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष जगताशी झगडत असता जे अश्रुतपूर्व व अकल्पित अनुभव येतात त्यामुळे त्यांच्या स्वत्वास नवीनपणाही येतो आणि पुनरपि शास्त्यांच्या ह्या नवीन आणि भरीव स्वत्वाचा सुसंस्कार शासित जनतेवर घडून त्यांच्याही मनाची वाढ होऊ लागते. असा हा परस्पर गुंतागुंतीचा सुंदर संबंध आहे. आणि ह्या मानाने शासनक्रियेची जबाबदारी प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधिरूपाने जनतेतील अधिकाधिक व्यक्तींवर पडत जाते. त्या मानाने वरील गुंतागुंतीचा व्याप आणि सौंदर्य ही अधिकाधिक वाढत जातात.  

असो. ‘शासनाचे,’ हे सर्वही प्रकार केवळ प्रगतीच्या साधनीभूत पाय-या आहेत, ह्या सर्वांचे अंतिम साध्य व्यक्तीचे स्वत्व आणि तद्वारा राष्ट्राचे व मनुष्यजातीचे स्वत्व आणि पुन: त्याच्या द्वारा व्यक्तीचे स्वत्व ह्यांची परंपरित वाढ होणे हेच आहे. अशी एक म्हण आहे की मुलगा १६ वर्षांचा झाला की, त्याच्या बापाचा जोडा त्याच्या पायाला येतो. हिचा अर्थ इतकाच की १६ वर्षांनी बापाचे मुलावरचे राज्य संपून त्याच्या तो बरोबरीचा होतो. दुसरे असेही एक वचन आहे की, ‘शिष्यादिच्छेत् पराजयम्’ म्हणजे गुरूपासून विद्या शिकून चेला गुरूहूनही सवाई शहाणा झाला आणि त्याकडून गुरूचा पराजय झाला, तर उलट गुरूच्या शासनाचे सार्थक झाले, किंबहुना त्याचा दिग्विजयच झाला म्हणावयाचा. हाच न्याय राजशासनाचाही आहे. प्रत्येक व्यक्तीला पूर्ण स्वातंत्र्य मिळावे व ती पूर्ण स्वत्ववान बनावी हाच हेतू राजशासनाचा आहे व त्याचा परिणामही  असाच होत आला आहे, हे इतिहास सांगेल. राशासनाच्या तालमीतून गेल्याशिवाय व्यक्तीची पूर्ण वाढ होणे शक्य नाही. ज्या व्यक्ती किंवा जाती जंगलातून स्वैर भटकत असतात त्यांच्या अंगी परिस्थितीशी झुंजण्याचे सामर्थ्य आलेले नसते. पण त्याच व्यक्ती आणि जाती संपादन करितात त्यांना अखेरीस परिस्थितीवर जय मिळतो, इतकेच नव्हे तर पुढे शासनाचीही जरूरी राहत नाही. पोलीस आणि लष्कर ही राजसंस्थांची काय ती दोनच खाती राहावीत, बाकीची सर्व खाती लोकांनी आपली आपणच स्थानिक पद्धतीने संभाळावीत असे प्रसिद्ध समाजशास्त्रवादी स्पेन्सर ह्यांनी प्रतिपादले आहे. तुलनात्मक समाजशास्त्राचे नीट परिशीलन केल्यास दिसून येईल की, एकछत्री राजसंस्थाची घटना काही मोठमोठ्या प्रमाणावर होत जाऊन अवाढव्य बादशाह्या अस्तित्वात आल्या. त्यांच्या योगाने व्यक्तीच्या स्वत्वाला त्या त्या काळी मदत झाली. पण ही वाढ पुढ खुंटून राजसंस्थेच लहान लहान मंडळे आणि त्यांची संयुक्त मंडळे बनणे अधिक इष्ट झाले हे हल्लीच्या अमेरिकेतील संयुक्त संस्थानांच्या इतिहासावरून उघड होईल. म्युनिसिपालिट्या व लोकलबोर्ड इ. स्थानिक स्वराज्याच्या विस्ताराच्या बाबतीत मोठमोठ्या अजस्त्र शहरांवर व प्रांतांवर एकाच मंडळीचे अवजड छत्र चालू ठेवून पुष्कळ प्रतिनिधींना निवडण्याच्या धांदलीत काळाचा व शक्तीचा उगीच व्यय करण्यापेक्षा आळीआळीने स्वतंत्र म्युनिसिपालिट्यांची स्थापना करणे हेच पुढे बहुतकरून अधिक सोयीचे आणि प्रगतीला शोभणारे होणार आहे. एकंदरीत ह्या दृष्टीने विचार करिता दिसून येते की व्यक्ती आणि सर्व मनुष्यजात राजशासनाच्याही पायरीवर चढत जाऊन पूर्णत्व पावणार आहे. ज्या पूर्णावस्थेच्या काळाची प्रतीक्षा आधुनिक द्रष्टे करीत आहेत आणि ज्या मोक्षपदाची अथवा स्वराज्याची (Kingdom of God) प्राचीनद्रष्ट्यांनी आकांक्षा केली त्या सर्वांचा अर्थ हेच स्वत्व होय. आणि ह्या स्वत्वाचे सर्वत्र प्रकट होणे म्हणजेच परमेश्वराचा पूर्णावतार होणे हे होय. बाकी सर्व –“विभूत”मत्सत्वम्" – अंशावतारच समजावेत; ते नुसते “मम तेजोशसंभवम्” असतात.

येणे प्रकारे जो विराट पुरूष अनादिकालापूर्वी अदृश्य होता तो अनंतकालापुढे दिसू लागणार आहे. अदृश्यातून जड, त्यातून चेतनामय व्यक्ती, त्याचे प्रौढ समाज ह्याप्रकारे सर्व सत्वांची उन्नती असे होत होत हल्ली घोरत पडलेला सर्व मृत्युलोक पुढे जिवंत आणि जागा होणार! त्या विश्व-जागृतीची कल्पना कोण करू शकेल! तिला काळाचे माप लागू पडत नाही म्हणूनच ब्राम्ही धर्माने अनंतकाळची उन्नती मानली आहे.

||ओम् शांति:शांति:शांति:||