साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे

(केशवचंद्र सेन ब्राह्मसमाजात आले त्यावेळी) हिंदुस्थानात अवघ्या १२ ठिकाणी ब्राह्मसमाजाच्या शाखा होत्या. त्या साधारण ब्राह्मसमाज स्थापन झाल्या वर्षी म्हणजे १८७८ (मे महिन्याच्या १५ तारखेस) साली १२४ शाखा हिंदुस्थानच्या निरनिराळ्या प्रांतांतून व भाषांतून झाल्या. ह्या तिस-या पुढा-याने केवळ संस्थेच्या दृष्टीनेच समाजाची अशी असामान्य वाढ केली असे नव्हे, तर त्यानेच ह्या धार्मिक सुधारणेस हिंदुस्थानात प्रत्यक्ष सामाजिक जीवनाचे स्वरूप दिले. त्याच्यावेळी हिंदुस्थानाच्या निरनिराळ्या प्रांतांत इतरही स्वामी रामकृष्ण, दयानंद सरस्वती, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा जोतीबा फुले, ज. रानडे, तेलंग इत्यादी धार्मिक व सामाजिक सुधारक होते. पण ते केवळ पुरुषांच्याच सभांकरिता आणि त्यांच्याशीच वादविवाद करून सुधारणा घडवू पाहात, पण केशवचंद्राने आबालवृद्धांना, बायकापुरुषांना, सुशिक्षितांना, फार तर काय, स्वकीय परकीयांनाही हालवून जागे केले व त्यांचा ब्राह्मसमाज स्थापिला !

मग इतक्या प्रभावशाली पुढा-याच्या उलट साधारण ब्राह्मसमाज नावाची अधिक विकसित स्वरूपाची ब्राह्मसमाजाची तिसरी आवृत्ती का काढावी लागली ? हा मोठा चित्ताकर्षक प्रश्न आहे खरे ! कोणत्याही चळवळीच्या आरंभी एकाच प्रेरक विभूतीचे प्राधान्य असते. तसेच ब्राह्मसमाजाच्या पहिल्या ५० वर्षांत बहुतेक एकतंत्रीपणाच होता. मग त्या एकतंत्राचे अधिष्ठान राजा राममोहन रॉय असो, देवेंद्रनाथ असो किंवा केशवचंद्र असो, एका धीरोदात्त व्यक्तीने हालवावे व इतरांनी हालावे असा प्रकार होता. पण ब्राह्मसमाज ही प्रधानतः स्वातंत्र्यजनक संस्था होती. अर्थात ह्या ५० वर्षांत ब्राह्मसमाजातच नव्हे तर अखिल भारतात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय विचारांच्या (ता. ८ एप्रिल १९२८ रोजी पुण्यास कौटुंबिक उपासना मंडळापुढे जे विचार प्रदर्शित केले त्याचा सारांश ‘विजयी मराठा’ ह्या पत्रात आला आहे. त्यातील काही भाग. सुबोध पत्रिका, २९ एप्रिल १९२८.

स्वातंत्र्याची प्राणप्रतिष्ठा झाली होती. ह्या पूर्वतयारीचे श्रेय राममोहन, देवेंद्र आणि केशवचंद्र आणि त्यांच्या प्रभावळीतील निकट अनुयायांस देणे अवश्य आहे. पण ५० वर्षांनंतर ह्या स्वातंत्र्योन्मुख चळवळीची सर्व सूत्रे एकाच हातात राहणे शक्य नव्हते, मग तो हात कितीही पराक्रमी असो, की पूज्य असो, की पवित्र असो ! वरवर पाहणा-यास साधारण ब्राह्मसमाजाची स्थापना कुचबिहारच्या लग्नाच्या वादामुळे झाली, असे वाटणे साहजिक आहे. केशवचंद्रांनी ब्राह्मवधूचे वय किमानपक्षी १४ वर्षांचे असावे, असा आपणच सरकारी कायदा पास करून घेतला आणि स्वतःचीच मुलगी जेव्हा कुचबिहारच्या तरुण राजकुमारास दिली, तेव्हा तिचे वय १४ वर्षांहून किंचित कमी आणि त्या राजकुमाराचे वय १८ वर्षांहून कमी होते, म्हणून घनघोर वाद उत्पन्न झाला. इतकेच नव्हे तर त्यामुळेच त्यांच्या कित्येक अनुयायांनी त्यांचे पुढारीपण झुगारून देऊन आपली ब्राह्मसमाजाची निराळी शाखा काढली हे खरे, परंतु ही लढाई केवळ व्यक्तींची नसून तत्त्वांची होती. मताप्रमाणे वागणूक झालीच पाहिजे. मग ती व्यक्ती कर्तुं अकर्तुं अन्यथा कर्तुम् समर्थ केशवचंद्र झाली म्हणून काय झाले ! प्रश्न केवळ ब्राह्म मताचाच नव्हता, तर त्याच्या अनुष्ठानाचा होता.

शिवाय आतापर्यंत समाजाचे कार्य केवळ भावना आणि प्रेरणा ह्या दैवी तत्त्वांवरच चालले होते. सर्वांची मते घेऊन युक्तायुक्ततेचा विचार करून एकादी कार्यपद्धतीची सनद आखण्यात आली नव्हती. त्यामुळे ह्या वादाला अत्यंत कडू व तीव्र स्वरूप आले आणि शेवटी स्वातंत्र्य तत्त्वाचे शरीर जो सनदशीरपणा त्याचाच विजय झाला. आणि कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये प्रचंड जाहीर सभा करून केशवचंद्राच्या विरुद्ध साधारण ब्राह्मसमाजाची जोरदार स्थापना झाली ! त्या गोष्टीला आज ५० वर्षे झाली.

ह्यानंतर ब्राह्मसमाजात स्त्रिया, तरुण, लहान मुले, वृद्ध, विद्वान गृहस्थ आणि कामकरी वर्ग ह्या सर्वांचा समान दर्जाने कसा प्रातिनिधिक तत्त्वाने समावेश होऊ लागला आणि हिंदुस्थानभर ह्याच शाखेचा विस्तार केशवचंद्राच्या नवविधान नावाच्या शाखेहूनही कसा अधिक झाला ह्याचे सविस्तर वर्णन रा. शिंदे ह्यांनी केले. नंतर ते म्हणाले, ब्राह्मसमाज व बौद्ध धर्म ह्यांतील एक फरक ध्यानात ठेवण्यासारखा आहे. ब्राह्मधर्मात मनुष्यजातीच्या सर्व धर्मपंथांचा समन्वय होतो, ही गोष्ट खोटी नाही. अर्थात ब्राह्मधर्म म्हणून एक निराळा नवाच धर्म आहे, असे मुळीच नव्हे. पण बहुतेक जुने धर्मपंथ—विशेषतः बौद्धधर्म हा व्यक्तिविशिष्ट स्वरूपाचा आहे. बौद्धधर्माचाही संघ प्रत्यक्ष सिद्धार्थाच्या काळापासूनच पुरातन आहे. तरी हा बौद्धसंघ म्हणजे केवळ भिक्षुसंघच म्हणजे केवळ संन्याशांचा संघच होता. गृहस्थाश्रमालाच मुळी बौद्धधर्मात गौण स्थान आहे. मग धर्माच्या कौटुंबिक व सामाजिक स्वरूपाकडे ह्या धर्मात दुर्लक्ष झाल्यास नवल काय ! आदले दिवशी प्रत्यक्ष धर्मानंद कोसंबी ह्यानीच बौद्ध धर्माची अवनती का झाली त्याची कारणे सांगताना स्पष्ट एक कारण असे सांगितले की, बौद्ध भिक्षू व प्रत्यक्ष गौतमबुद्धानेही जातिभेदाच्या मुळावर कितीही आघात केले तरी, बौद्ध गृहस्थाश्रमी ह्यांनी हिंदुस्थानात तरी ह्या जातिभेदाचे निरसन करावे तितके केले नाही, म्हणून शेवटी चार वर्णांच्या आता चार हजारांवर जातींची आणि असंख्य पोटजातींची बजबजपुरी ह्या अभागी देशात माजली आहे. ब्राह्मधर्माचे स्वरूप आणि कार्य ह्याचे उलट आहे. ह्या धर्मात जगद्गुरु तर नाहीच पण साध्या पुरोहिताचेही बंड नाही. ज्याचा तोच राहिला. धर्माच्या सर्व तत्त्वांना सामाजिक प्रत्यक्ष स्वरूप द्यावयाचे झाल्यास केशवचंद्रासारख्या प्रतिभाशाली गुरुलाही केवळ त्याच्या आसनावरून खाली आणावे लागते, इतकेच नव्हे तर आपल्या घरातील मावशीबाई व आजीबाई, तरुण बाबू व लहान बेबी ह्यांचेही सहकार्य सामाजिक अनुष्ठानात साधावे लागते. हे शेवटचे काम अत्यंत कठीण आहे आणि ह्याशिवाय तर कोणतीही शुद्धी अथवा कसलेही संघटन होणे केवळ अशक्य आहे. हा सामाजिक स्वर्ग जर कोणी गेल्या शतकात ह्या पृथ्वीवर आणला असेल, तर तो एका साधारण ब्राह्मसमाजानेच ह्यात मुळीच अतिशयोक्ती नाही.