ता. २९ रोजी महाराष्ट्र धर्म ह्या विषयावर रा. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांचे व्याख्यान रा. शामराव देशपांडे ह्यांच्या अध्यक्षतेखाली झाले. व्याख्यात्यांनी महाराष्ट्र धर्माचे विवेचनास आधारभूत अशी “मराठा तितुका मेळवावा| महाराष्ट्र धर्म वाढवावा” ही समर्थांची ओवी घेऊन तिच्या प्रत्येक पदावर विस्तृत प्रवचन केले. मराठा हा शब्द केवळ जातिवाचक न घेता महाराष्ट्रातील सर्व व्यक्तींना लागू पडेल असा व्यापक घ्यावा व ह्या लोकांचा संगटनापूर्वक संग्रह करून आपल्या महाराष्ट्राच्या उन्नतीस आवश्यक असलेली कर्तव्ये करावी असे समर्थांचे म्हणणे होते, असे व्याख्याते म्हणाले. रा. वामन गोपाळ जोशी म्हणाले की, “मुख्य हरिकथा निरूपण| दुसरे ते राजकारण” असे समर्थांनी सांगून परमेश्वराचे अधिष्ठान ठेवून राजकारण करणे हेच महाराष्ट्र धर्माचे लक्षण समर्थांनी केले आहे. मराठा ह्या शब्दाचा व्यापक अर्थ घ्यावयास हरकत नाही, पण असा अर्थ करून “मराठा तितुका मेळवावा” असे सांगताना महाराष्ट्रातील भटभिक्षुकांना किंवा तागडी तमाप्पांना एकत्र करण्यास समर्थांनी सांगितले नाही, तर महाराष्ट्रातील क्षात्रतेजयुक्त अशा वीरांचा-मग ते कोणत्याही जातीचे असोत-संग्रह करण्यास सांगितले व परकीयांनी ग्रासलेल्या मायभूमीची सोडवणूक करण्याकरिता अटकेपर्यंत झेंडे नेऊनसुद्धा परमेश्वरी अधिष्ठानयुक्त अशा महाराष्ट्र धर्माची वृद्धी करावी असा आदेश केला.
“गो ब्राह्मण प्रतिपालन” वैदिक धर्माचरण व स्वराज्य संस्थापन ह्या तीनही गोष्टींचा महाराष्ट्र धर्मात अंतर्भाव होतो असे समर्थांच्या ग्रंथावरूनच दिसून येते, असे अध्यक्ष म्हणाले.