मुंबईच्या प्रार्थनासमाजाच्या ४३ व्या वार्षिकोत्सवाचा तिसरा दिवस सोमवार ह्या दिवशी सकाळी भजन झाले. सायंकाळी रा. रा. वि. रा. शिंदे ह्यांचे वरील विषयावर व्याख्यान झाले.
गेल्या शतकात राजा राममोहन रॉय ह्यांनी तुलनात्मक धर्मशास्त्राचा पाया घातला. त्यांनी प्रथम निरनिराळ्या धर्मांचे अध्ययनकेले. त्यामुळे आज आम्हाला युरोप किंवा अमेरिका येथील युनिटेरिअन अगर दुसरे कोणी उदारमतवादी लोक ह्यांच्याविषयी किंचित तरी आपलेपणा वाटतो. जपानने एकादे नवीन जहाज तयार केले की, आपण त्याची चौकशी करू लागलो. परंतु इराणसारख्या जवळच्या देशात आपल्याच सारख्या आर्य लोकांनी अनेक प्रकारच्या अडचणी सोसून जी उदार धर्माची पताका फडकविली आहे त्याची आम्हाला काही दाद नसावी व बहाई धर्मामध्ये काही उदार तत्त्वांचा समावेश आहे किंवा कसे ह्याविषयीही आम्हाला शंका असावी हे आश्चर्याचे आहे. आम्ही व्यवहारात दुस-या मनुष्याचे विशेष विचार न करता, सहज उणे काढून जातो, सत्यासत्यतेविषयी फारसा विचार करीत नाही, विशेष वादाच्या प्रसंगी प्रतिपक्षाच्या मन:स्थितीचा विचार करून ज्याप्रमाणे वर्तमानपत्रकर्ता लेख लिहिण्याच्या भानगडीत पडत नाही आणि सहज तडकाफडकी प्रतिपक्षाचे उणे काढतो व वर्मी लागणारे बाण अनेक प्रसंगी विनाकारण सोडतो त्याप्रमाणे ज्या देशातील लोक ४०-५० वर्षांपूर्वी थोड्याशा भांडणावरून सहज डोके उडवीत असत. जेथे भर रस्त्यावर खून होणे व रस्त्यातून रक्ताचे पाट वाहणे म्हणजे अगदी साधारण प्रकार होऊन गेला होता, सारांश, जेथील लोक इतके कडवे होते, त्या लोकांमध्ये उदार धर्माची पताका रोवली जावी, ब्राह्मधर्माइतका जरी नाही तर त्याच्यासारखा उदार भाग ज्यांच्या धर्मामध्ये दिसत आहे, ज्यांची मते, ज्यांचा उत्साह ज्यांची धर्मनीती पाहून शेकडो हजारो अमेरिकन लोक थक्क झाले आहेत युरोपातील कित्येक विद्वान लोकांचे ज्या चळवळीकडे लक्ष लागून राहिलेले आहे, त्या उदार धर्माच्या चळवळीचा आम्हास पत्ता असू नये हे ठीक नव्हे.
अशी प्रस्तावना करून त्यांनी बहाई धर्माचा इतिहास सांगितला व अखेरीस आज त्या धर्माची काय स्थिती आहे हे सांगताना ते पुढे म्हणाले:
बहाई धर्मामध्ये ब्राह्म धर्माची उदार तत्वे सर्वाशांने सापडणे शक्य नाही. त्या धर्माचा धर्मग्रंथासंबंधाने आग्रह नाही. बहाई लोकांनी राजकारणात पडू नये अशी त्यांच्या विद्यमान गुरूंची आज्ञा आहे. जी राजसत्ता चालू असेल ती मान्य करून तीस पोषक अशा चळवळी करावयाच्या. सर्व देशांतील सर्व धर्मांतील दुजाभाव, परकेपणा गेला पाहिजे. आपण सर्व एका पित्याची लेकरे आहोत हा भाव विशेष रीतीने जागृत होऊन सर्वत्र बंधूप्रीती नांदू लागली पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष आहे. मात्र त्यांचा गुरूकडे विशेष कल आहे. कधी कधी १९ ही संख्या पवित्र मानण्याकडे विशेष कल असतो. त्यांच्या हल्लीच्या पुढा-याचे असे म्हणणे आहे की, साधारण माणसे ही लाकडाप्रमाणे आहेत व धर्मगुरू हा विस्तवाप्रमाणे आहे. कित्येक माणसे दगडाप्रमाणे असतात. लाकडाचा अग्नीशी संयोग झाला म्हणजे अधिक भडका होतो पण तोच अग्नी दगडावर पडला म्हणजे काही वेळाने विझून जातो. आणि व्याख्याते म्हणतात की, आमच्यातील काही माणसांमध्ये पाण्याचा गुणधर्म असतो. म्हणजे विस्तवावर पाणी पडताच तो प्रज्वलित अग्नी बापडा विझून जातो, त्याप्रमाणे काही माणसाच्या संयोगाने दुस-याच्या ठिकाणी पेटलेली धर्मज्योतही विझून जाते. परंतु ह्या धर्मामध्ये एका व्यक्तीला धर्मगुरू म्हणून विशेष मान द्यावयाचा हा जरी आमच्या दृष्टीने गौणपक्ष असला तरी साधूसंतांना मान देणारे व त्यांच्याविषयी आदर दाखवतो असे म्हणणारे जे आम्हीते आमच्या स्वत:च्या समाजातील ज्या थोर पुरूषांच्या ठायी धर्मज्योत अत्यंत प्रज्वलित होती त्यांचा कोठे सहवास करून घेत असतो? आमचे राजा राममोहन रॉय, महर्षी देवेंद्रनाथ ठाकूर, आमचे ब्रह्मानंद केशवचंद्र सेन ह्यांच्या विचारांशी यांच्या चरित्राशी आम्ही कितीसा संबंध ठेवीत असतो व आमच्या स्वत:च्या आचरणाच्या द्वारे यांच्याविषयी आम्ही कितीसा आदर दाखवीत असतो?
आज ह्या बहाई लोकांत एकोपा आहे. परस्परांविषयी प्रेम व आदर आहे, सर्वांविषयी सहानुभूती आहे, ह्यांची राजनिष्ठा प्रबल आहे. ह्या सर्व गोष्टी आम्ही लक्षात घेण्यासारख्या आहेत.