आख्यान

(पद : चाल-उद्धवा शांतवन कर जा.....)
बंधूहो भवाचा किल्ला| सर करणे आम्हा सकला||धृ||
सिंहगड तो एकचि नोहे| महाराष्ट्रामधला साचा
तानाजी नव्हे एकुलता| शेलारमामाचा भाचा
श्री शिवाजी होऊनी गेला| कधिकाळी इतिहासाचा
 अशी गोष्ट न बोला कधिही
जीवन हे युद्धचि पाही
दिनरात अंतरी बाही
मग काहो स्वस्थसे बसला| बंधुहो भवाचा किल्ला||१||
संत आजवरी जे झाले| ते संत नव्हत शिपाई
भवरणांगणा माझारी| झुंजति ते ठाई ठाई
येर येरां देती हाका| या म्हणती आम्हालाही
आम्ही पहा कसे हे भ्रांत
ठेवून कपाळी हात
करितसो स्वत:चा घात
चला उठा लागू कामाला| बंधुहो भवाचा किल्ला||२||
जग नव्हे मराठ्यांपुरते| पसरे ते अनाद्यनंती
रहाणीचे जे जे साधे| स्वार्थाबाहिर जे पाहती
सत्याची भूक जयांना| अन्याय जे ना साहती
ते सर्वचि अस्सल मराठे
देशकाळा केव्हा कोठे
सोडा हे विचार झूटे
महाराष्ट्र धर्म हा अपुला| बंधुहो भवाचा किल्ला||३||
रामदास स्वर्गातुनिया| ऐकुनि हे आनंदेल
तानाजी शिवाचा कलिजा| राखेतुनि पुन:उठेल
तुक्याची मराठी वाणी| कानी मनि गुंजारील
मग मी तू पणाचे वारे
निवारूनी जाइल सारे
जागा उठा तुम्ही बारे|
महाराष्ट्र की जयजय बोला| बंधूहो भवाचा किल्ला||४||
(२) जुनी श्रद्धा व नवीन सुधारणा ह्यांचा संवाद
(चाल-लावणी)
श्रद्धा-अगे नवनारी! तू चाललीस कुठं! जरा थांबना||धृ||
सुधारणा-ताई झाली कशी घाई, वेल बोलायची काई
तुला ठावं कसं नाही, मला जायाच सेवासदना||१||
अगे नवनारी||धृ||
श्रद्धा-वरखाली झकपक, मागपुढं टकमक
अशी कशी बहिर्मुख, अंतरी वाइस तरी बघना||२||
अगे नवनारी||धृ||
सुधारणा - झाले परीक्षा पास, मते मिळाली खास
राजी नेहरूदास, उद्या कौन्सिल उघडेल बघना||३||
अगे नवनारी||धृ||
श्रद्धा – नाक नाही तिथं वर करी काय नथ
नुसती चोळी नाही हात, खाली डोळे ना वरती चष्मा||४||
अगे नवनारी||धृ||
पोर नेसली दाट *म्हणू विसरली वाट|
ही नवी वहिवाट, कशी भटकते रानोराना||५||
अगे नवनारी||धृ||

(३)
(चाल-जग हे आळवावरचे पाणी)
जगत हे रोग्यांचे मंदिर| रोग्यांचे मंदिर||धृ||
बाइल रोगी, बहीण रोगी, रोगी इष्ट मैतर||
रोगी नवरा, रोगी सासरा, रोगी भाउजी दीर||१||
बाप जिवाचे मूळ परी तो कोठवरी पुरणार||
आई प्रीतिची खाण परी ती मोहाचे माहेर||२||
राजा रोगी, प्रधान रोगी, रोग्यांचे लष्कर||
शाळा रोगी, देउळ रोगी, रोगी नाटकघर||३||
पोथी रोगी, पुराण रोगी, रोगी तीर्थमंतर||
श्रोतावक्ता दोगे रोगी, कोण बरे करणार||४||
सुधारक रोगी, सनातनि रोगी, रोगट शिष्टाचार||
बुवा बाया रोगी, अवघा रोग्यांचा बाजार||५||
सकळ मनाचे रोगी, मनातचि दडलेला एक चोर||
त्यासि ओळखुनि दृढ धरिल्यावर होईल भवरोग दूर ||६||
(४) अवलाईची नवलाई
(चाल-चला चला गड्यांनो जाऊ चला)
अशी कशी तुक्याची अवलाई| ऐका हो तिची नवलाई||धृ||
भजनी असता भांडभांडते|संत आलिया वस् वस् करिते|
विठुला काळ्या ‘वैरी’ म्हणते| भली तिची ती मंगळाई
काय ही नवलाई||१||
खुद्द पुण्याचा अप्पा गुळवा| अस्सल मराठा माणुस बरवा|
साउकार जगजाहिर सर्वा| कन्या त्याची जीजाई, की अवलाई||२||
तरूण तुकोबा शेट समर्थ| संसारी अंतरी विरक्त|
परंपरेचा विठ्ठल भक्त| बाईला त्याची दुसरी ही, ही नवलाई||३||
दोन बाइला त्या समवेता| साधिता असता इहपर वृत्ता|
दुकाळ आला पुढं अवचिता| पहिली मेली रखुमाई, राहिली अवलाई||४||
तुक्याच्या घरा दिवा घ्या दिसा| अवली धरि तरी धीर भरवंसा|  
कर्ज काढिले रूपये दहाविसा| अबला असुनि सबला ही, आइका नवलाई||५||
रूपय अडिचशे नफा जाहला| कर्जाने कुणि ब्राह्मण पिडिला|
देखुनि त्याला तुका कणवला| रूपये दिघले लवलाही, चरफडे अवलाई||६||
तुक्या बैसला भंडा-यावर| पोट उपासी भजनी निर्भर,
अवली हुडकते तया घरोघर| त्याविण न शिवे पाण्याही, विसरे अबोलाही||७||
कोंडाकळणा भाकर मळली| भंडा-यावर त्वरित निघाली|
भर दोपारा तहान लागली| परि थांबेना ती बाई, जाहली कशी घाई||८||
तीक्ष्ण सडाने पाय विंधिला| वाहू लागले रक्त भळाळा|
भोवळली पडली धरणीला| ब्रह्मज्ञानी पति पाही, जिंकिले त्यालाही||९||
मोक्षाहुनिही प्रपंच बाका| तुक्या येतसे नवा अवाका|
अवली झाली प्रतिसहायिका| उघडे त्याचा डोळा ही, पहा हो नवलाई||१०||
तुक्या आम्हा सर्वा संत| परि तुक्याला अवली संत|
नसे तियेला त्याची खंत| सोडून गेला तरि राही, तीच ती अवलाई||१||
इतर सती त्या चिते जळाल्या| संसारीच्या ज्वाळा गहि-या|
अवलीने पण त्याही गिळिल्या| डगमगली ना केव्हाही, कशी मग अबला ही||१२||
तुका पळपुटा अवली धीटा| कर्मयोगी सत्याग्रही स्पष्टा|
पंढरीचा विठु केला खोटा| खरी ठरविली मंगळाई घ्या मनी नवलाई||१३||
परब्रह्म ते सुखीच राहे| प्रपंच परि हा कठिण आहे|
ह्या सगुणामधइ निर्गुण पाहे| शिकविते ही अ, आ, ई, ब्रह्मज्ञान्यांही||१४||
आम्ही तुकोबा सदैव वंदू| परि अवलाई कधी न निंदू||
तया तियेचा ऋणानुबंध| जगि पसरो ही आख्याई, मागणे लई न्हाई||१५||
प्रकृतीपासुनि पुरूष जन्मला| भोगुनि तिजला जागा झाला|
पुन्हा निर्गुणी झोपी गेला| बाइल त्याची ती आई, संपली नवलाई||१६||