संपादकीय

धर्म ही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ह्यांच्या जीवनातील मूलभूत प्रेरणा होती. त्यांचे सारे जीवनच ह्या मध्यवर्ती प्रेरणेने घडविलेले आहे. परंतु त्यांची धर्मासंबंधीची कल्पना परंपरागत कल्पनेपेक्षा वेगळी होती. त्यामुळे त्यांचे जीवनविषयक तत्त्वज्ञानही पुष्कळसे वेगळे होते. महर्षी शिंदे ह्यांनी आयुष्यभर धर्म, जीवन आणि तत्त्वज्ञान ह्यासंबंधी जे चिंतन केले आहे ते ह्या ग्रंथामध्ये एकत्रित स्वरूपामध्ये प्रथमच प्रसिद्ध होत आहे.

जीवनातील तीन कालखंड

महर्षी शिंदे ह्यांच्या जीवनाचा एकत्रित विचार केला तर ढोबळ मानाने त्यांच्या जीवनाचे तीन कालखंड दिसतात. १९०३ ते १९१६ पर्यंत त्यांनी मुख्यत: धर्म, अध्यात्म ह्यासंबंधी चिंतन केले आहे. त्यांचे ह्या प्रश्नाबाबतचे लिखाण प्रामुख्याने ह्याच कालखंडातील आहे. १९१७-१८ नंतर त्यांचे लक्ष वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय व आर्थिक चळवळींकडे जाऊ लागले. १९३५ पर्यंत त्यांनी वेगवेगळ्या चळवळींमध्ये आघाडीवर राहून भाग घेतला. ह्या काळात त्यांनी इतिहास, भाषाशास्त्र, आर्यपूर्व संस्कृती, भारतातील भक्तिसंप्रदाय इत्यादीसंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. ह्या काळात त्यांनी सामाजिक तत्त्वज्ञानाचा अधिक विचार केला. ह्या कालखंडातच १९२३ ते १९३५ ह्य काळात अधिक सातत्याने लेखन, वाचन व चिंतन केले. हा त्यांच्या जीवनातील दुसरा कालखंड होय. १९३५ नंतर त्यांच्या जीवनातील तिसरा कालखंड सुरू झाला. ह्या काळात ते आजाराने अथरूणावर खिळूनच होते. १९३५ ते १९४४ पर्यंत त्यांना त्यामुळे फारसे क्रियाशील जीवन जगता आले नाही. तरी देखील ह्या तिस-या कालखंडातही आणि आजारीपणातही त्यांनी थोडे फार लेखन व चिंतन केले आहे.

भागवत धर्माचे संस्कार

महर्षी शिंदे ह्यांचा धर्मशील पिंड त्यांच्या कौटुंबिक जीवनातच तयार झाला. त्यांचे आई-वडील हे वारकरी संप्रदायाचे एकनिष्ठ अनुयायी होते. घरामध्ये सतत धार्मिक वातावरण असायचे. वारकरी मंडळींची भजने व इतर धार्मिक कार्यक्रम अव्याहत चालू असायचे. त्यांच्या संस्कारक्षम वयात भागवत संप्रदायासारख्या उदारमतवादी धर्मपंथाचे त्यांच्यावर जे संस्कार झाले त्यातून त्यांचा पुढील मन:पिंड तयार झाला. महर्षी शिंदे ह्यांच्या मनावर आगरकर, भिल्ल, स्पेन्सर ह्यांच्या विचाराचे संस्कार झाले होते. त्यामुळे १८९१ ते १८९७ ह्या काळात त्यांचे मन नास्तिकवादाकडे झुकू लागले होते.

धर्म भावनेचा बळकट आधार

ते ह्या काळात फर्ग्युसन कॉलेजचे (पुणे) विद्यार्थी होते. आगरकरांचा “सुधारक” ते अगोदरपासूनच वाचीत होते. त्यामुळे कॉलेजमध्येही त्यांचा हा कालखंड पुष्कळच वेगळा होता. परंतु १८९७-९८ च्या सुमारास डॉ. भांडारकर, न्या. रानडे ह्यांच्या विचारांच्या सहवासात आले व पुन: ते धर्मभावनेकडे झपाट्याने वळू लागले. लहानपणी कुटुंबात झालेले धार्मिक संस्कार पुन: नव्या जोमाने वर आले. त्यामुळे ते प्रार्थना समाजाकडे आकृष्ट झाले. पुढे लौकरच ब्राह्मोसमाजाच्या वतीने इंग्लंडमध्ये तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी हिंदुस्थानातून त्यांची निवड झाली. त्यानंतर त्यांच्या जीवनातील धर्मभावना अधिक दृढमूल झाली व सबंध आयुष्याला धर्म भावनेचा बळकट आधार मिळाला.

एकोणिसाव्या शतकातील उदार धर्म चळवळी

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात परंपरागत हिंदुधर्मामध्ये महत्त्वाचे बदल झाले पाहिजेत म्हणून तीन चार प्रमुख चळवळी सुरू झाल्या. त्यांमध्ये प्रामुख्याने राजा राममोहन रॉय ह्यांनी सुरू केलेला ब्राह्मोसमाज, स्वामी दयानंद सरस्वती ह्यांनी सुरू केलेला आर्यसमाज, महात्मा फुले ह्यांनी स्थापन केलेला सत्यशोधन समाज, आणि डॉ. बेझंटबाईनी चालविलेली थिऑसाफिकल सोसायटी ह्यांचा उल्लेख करावा लागेल. त्या काळात ध्येयवादी तरूण ह्यांपैकी कुठल्या तरी धर्म सुधारणेकडे किंवा समाज सुधारणेच्या चळवळीकडे वळत होता. अशा ह्या काळात महर्षी शिंदे उदारमतवादी ब्राह्मोसमाज किंवा प्रार्थना समाज ह्यांच्या चळवळीकडे आकर्षित झाले होते.

मी सुधारक म्हणूनच महर्षी शिंदे प्रार्थना समाजाकडे आकर्षित झाले ह्याचे कारण लहानपणी त्यांच्यावर झालेल्या भागवत संप्रदायातील संस्कारांमध्ये सापडेल. भागवत संप्रदायाकडून प्रार्थना समाजाकडे झालेला त्यांचा वैचारिक प्रवास पुष्कळसा स्वाभाविक होता. त्यांनी एके ठिकाणी म्हटल्याप्रमाणे प्रार्थना समाजात गेल्यामुळे ते सुधारक झाले नाहीत तर उलट ते आधी सुधारक होते, म्हणूनच ते प्रार्थना समाजात गेले.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतीय समाजाची पुनर्रचना करावी म्हणून जरी सत्यशोधक समाज, ब्राह्मोसमाज किंवा प्रार्थनासमाज, आर्यसमाज ह्यांची स्थापना झाली असली तरी त्यांच्या भूमिकेमध्ये महत्त्वाचा फरक होता. त्यांच्या प्रेरणा देखील पुष्कळ अंशी भिन्न होत्या.

सत्यशोधक समाज व ब्राह्मोसमाज

ब्राह्मोसमाज आणि सत्यशोधक समाज ह्यांच्या भूमिकेमध्ये एक मूलभूत फरक होता. ब्राह्मोसमाज जगातील सर्व धर्म पवित्र व श्रेष्ठ आहेत अशी भूमिका घेऊन प्रत्येक धर्मातील महत्त्वाचे काय काय आहे ह्याचा शोध घेतो. तौलनिक धर्मशास्त्राचा अभ्यास यातूनच जन्माला आला आहे. सर्व धर्म परमेश्वराने निर्माण केलेले आहेत अशी ह्यामागे ब्राह्मोसमाजाची धारणा आहे. ब्राह्मोसमाज सर्व धर्मांमध्ये समन्वय निर्माण करण्याची भूमिका घेत आहे.

सार्वजनिक सत्य

महात्मा फुले ह्यांच्या सत्यशोधक समाजाची भूमिका मात्र मूलत: वेगळी आहे जगातील सर्व प्रचलित धर्म मानवी समतेचे शत्रू आहेत असे ते आवर्जून म्हणतात. “या पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढी म्हणून मानवांनी धर्मपुस्तके केली आहेत, त्यांपैकी एकाही ग्रंथात आरंभापासून शेवटपर्यंत सारखे सार्वजनिक सत्य नाही.” ह्या संबंधीचे विवेचन करिताना सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात ते म्हणतात, “प्रत्येक धर्मपुस्तकामध्ये काहीएक व्यक्तींनी त्यावेळच्या प्रसंगास अनुसरून हेकडपणा केल्यामुळे, ते धर्म एकंदर सर्व मानवी प्राण्यास सारखे हितकारक न होता सहजच त्यामध्ये अनेक फळ्या होऊन त्या एकमेकांचा मनापासून हेवा व द्वेष करू लागल्या. (महात्मा फुले समग्र वाड़मय पृष्ठ ३५३)

सत्यशोधक समाज ही मूलत: समाजिक चळवळ

ब्राह्मोसमाज आणि सत्यशोधक समाज ह्यांच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा फरक आहे. ब्राह्मोसमाज मुख्यत: आध्यात्मिक समाज आहे. परमेश्वराचे स्वरूप, द्वेतवाद, अद्वैतवाद, जीवनाचे अंतिम उद्दिष्ट, इत्यादी पारलौकिक मूल्यासंबंधी हा समाज अधिक विचार करितो आणि ह्याचा अनुषंगिक भाग म्हणून सामाजिक, आर्थिक चळवळींचा पाठपुरावा करितो. सत्यशोधक समाज ही मूलत: सामाजिक चळवळ आहे. पारलौकिक प्रश्नासंबंधी चर्चा गौण आहे असे सत्यशोधक मानितो. त्यामुळे महात्मा फुले ह्यांच्या विचारातून १९१७-१८ नंतर महाराष्ट्रात मोठे आंदोलन उभे राहिले. अशी सामाजिक चळवळ ब्राह्मोसमाज किंवा प्रार्थना समाज ह्यांच्याकडून निर्माण झालेली नाही. सत्यशोधक समाजाने शेतकरी, सावकार, दुष्काळामुळे शेतीची विस्कटली गेलेली जीवनाची घडी, नोकरशाहीकडून गरिबांची होणारी छळवणूक इत्यादी प्रश्नांची पोटतिडिकीने चर्चा केली आहे. कारण ही चळवळ सामाजिक चळवळ होती. प्रार्थना किंवा ब्राह्मोसमाजात अशी चर्चा झाल्याचे दिसत नाही. ब्राह्मोसमाज व्यक्तिगत शुद्धता व व्यक्तिगत सुधारणा यांवर भर देतो. त्यामध्ये समाजाची अर्थव्यवस्था बदलावी, सामाजिक जीवनाचा पायाच बदलावा अशी चर्चा फारशी दिसत नाही. उलट सत्यशोधक समाजाचा भर सामाजिक व आर्थिक जीवनाचा पायाच बदलावा व समाजाची पुनर्रचना करावी यांवर आहे. व्यक्तिगत जीवनातील उपासना, सुधारणा ह्यांना फुल्यांच्या चळवळीत दुय्यम स्थान आहे. त्यामुळे महात्मा फुले ह्यांची सर्व चर्चा शिक्षणाचा पाया कसा बदलता येईल, सावकारी कशी नष्ट करिता येईल, अस्पृश्यता, जातिव्यवस्था कशी निपटून काढता येईल. ह्या प्रश्नासंबंधीच प्रामुख्याने आहे.

ब्राह्मोसमाज आणि सत्यशोधक समाज ह्यांच्यात आणखी एका प्रश्नाबाबत महत्त्वाचा फरक आहे. सत्यशोधक समाज एकाच कुटुंबात वेगवेगळ्या धर्माचे लोक राहू शकतात असे मानणारा आहे. आज एका कुटुंबात समाजवादी, काँग्रेस, शेतकरी कामकरी पक्ष किंवा कम्युनिस्ट पक्षाचे सभासद राहू शकतात. त्याच प्रमाणे एका कुटुंबात हिंदु, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लीम असे वेगवेगळ्या धर्माचे अनुयायी राहू शकतील अशी फुल्यांची धारणा आहे. ब्राह्मोसमाजाला ही भूमिका कितपत पचू शकेल ह्याबद्दल शंका आहे. ब्राह्मोसमाजात वेगवेगळ्या धर्मपंथाचे लोक येऊ शकतात अशी त्यांची तात्त्विक भूमिका आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांना ही भूमिका पचू शकली नाही. महर्षी शिंदे ह्यांनी कलकत्ता येथील ब्राह्मोसमाजाच्या १९२७ च्या माघोत्सवात ब्राह्मो मिशनरींच्या परिषदेत “मी बौद्ध आहे” अशी घोषणा केली तेव्हा कितीतरी खळबळ उडाली होती. (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. १९८)

आर्यसमाज व सत्यशोधक समाज-

आर्यसमाज आणि सत्यशोधक समाज ह्यांच्या स्थापनेच्या प्रेरणाच भिन्न आहेत. वेद हे जगातले सर्वांत पवित्र ग्रंथ आहेत व वैदिक समाजाची पुन: स्थापना केली पाहिजे अशी भूमिका आर्यसमाजाची आहे. ह्यामुळे आर्यसमाज जातिव्यवस्था नाकारतो, पण चातुर्वर्ण्य गुणक्रमांनुसार स्वीकारतो. सत्यशोधक समाजाची भूमिका केवळ वेगळीच नव्हे तर संपूर्णपणे विरोधी आहे. समाजातील सर्व अनिष्ट गोष्टींचे मूळ वेदात आहे. त्यामुळे वेदांचे पावित्र्य नष्ट झाल्याशिवाय आणि वेदांचा प्रभाव नाहीसा केल्याशिवाय ह्या समाजाची प्रगती होणार नाही अशी भूमिका सत्यशोधक समाजाने घेतली आहे. ब्राह्मोसमाजिस्ट अंत:प्रामाण्य मानतो तर आर्यसमाजिस्ट वेद प्रामाण्य शिरोधार्य मानतो.

आर्यसमाज व सत्यशोधक समाज ह्यांच्या प्रकृतीमध्ये आणखी एक फरक जाणवतो. आर्यसमाज हा समार्थ्याचा उपासक आहे. ते सामर्थ्य संस्थेचे किंवा संघटनेचे असेल किंवा शस्त्रांचे असेल. परंतु सामर्थ्याचा पुजारी अशी त्याची भूमिका दिसते. उलट सत्यशोधक समाजाची मूळ प्रेरणा करूणा ही आहे. गरीब माणसाच्या डोळ्यांतील आसवे पुसणे हे उदात्त कार्य आहे अशी महात्मा फुले ह्यांची प्रेरणा आहे. अस्पृश्य, शेतकरी, शेतमजूर, स्त्रिया इत्यादी त्यांच्या सर्व चळवळींचा केंद्रबिंदू ‘करूणा’ हाच आहे. गौतम बुद्धाच्या जीवनात जो करूणेचा प्रत्यय येतो तीच करूणा महात्मा फुले ह्यांच्या जीवनातील दिसून येते. अर्थातच गौतम बुद्धाचे विचाराचे क्षितिज फार विस्तीर्ण होते. त्या मानाने महात्मा फुले ह्यांच्या कार्याचा पसारा मर्यादित होता. परंतु करूणेची प्रेरणा मात्र दोघांमध्ये एकच होती.

आजचे जीवन समजावून घ्यायचे तर ब्राह्मोसमाज, प्रार्थना समाज, आर्यसमाज, सत्यशोधक समाज ह्यांतून निर्माण झालेल्या चळवळी आजच्या सामाजिक जीवनात फारशा प्रभावीपणे दिसत नाहीत. १९२० नंतर त्यांचा प्रभाव काही अंशी कमी झालेला आहे. तरी देखील आजचे महाराष्ट्राचे आणि सर्व देशाचे सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक जीवन समजावून घ्यावयाचे झाले तर ह्या सर्व चळवळींचा मागोवा घेतला पाहिजे. कारण ह्या सर्व चळवळींचा प्रभाव आमच्या जीवनावर कमी जास्त स्वरूपामध्ये उमटलेला आहे. आजच्या आमच्या जीवनाचे वस्त्र ह्या चळवळींच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेले आहे हे नाकारता येत नाही. ह्या चळवळींच्या अभ्यासाला त्यामुळे केवळ ऐतिहासिक महत्त्व नाही तर सध्याचे जीवन समजावून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा असाधारण महत्त्व आहे.

ब्राह्मोसमाज किंवा प्रार्थना समाज ह्यांचे धर्मविषयक तत्त्वज्ञान हे परंपरागत धर्मविषयक कल्पनेपेक्षा पुष्कळअंशी वेगळे आहे. ह्यासंबंधी महर्षी शिंदे ह्यांनी आपल्या विस्तृत लेखांतून व भाषणांतून चर्चा केली आहे. त्यामुळे महर्षी शिंदे ह्यांची धर्मविषयक भूमिका इतरांपेक्षा कशी वेगळी आहे ह्याची कल्पना ह्या ग्रंथावरून येते.

अद्वैतवादाला विरोध
भारतीय तत्त्वज्ञान गेली दोन तीन हजार वर्षे अद्वैतवादाच्या भोवती फिरत आहे. उपनिषद काळापासून अद्वैतवादाचा प्रभाव भारतीय मनावर खोलवर उमटलेला आहे. प्रत्येक व्यक्ती ही ब्रह्माची प्रतिकृती आहे. त्यामुळे ब्रह्म आणि प्रत्येक व्यक्ती ही एकरूप होऊ शकतात अशी अद्वैतवादाची भूमिका आहे. प्रार्थनासमाज ह्या प्रश्नाबाबत वेगळी भूमिका घेतो. त्याचा कल द्वैतवादाकडे आहे. मनुष्य हा परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप होऊ शकतो ही भूमिका त्यांना मान्य नाही. अद्वैतवाद आपल्याला का मान्य नाही ह्याची मीमांसा महर्षी ह्यांनी आपल्या काही लेखांतून केली आहे. ह्याबाबत त्यांनी मुख्यत: दोन कारणे पुढे केली आहेत. पहिले एक कारण असे की, परमेश्वर इतका अनंत, सर्वज्ञ व श्रेष्ठ आहे की, मर्त्य मानवाने त्याच्याशी तादात्म्य पावण्याची भाषा बोलणे म्हणजे ते एक प्रकारचे औद्धत्य आहे. त्याचे दुसरे कारण असे की, विश्वाचे ज्ञान सतत वाढत जाणारे आहे. अशा ह्या काळात ब्रह्मवादासारखी स्थितिशील भूमिका घेणे हे चुकीचे आहे. वाढते ज्ञान नाकारण्याचा किंवा गतिमान जगाकडे पाठ फिरवण्याचा तो प्रकार होणार आहे. ह्यासंबंधी मीमांसा करिताना महर्षी शिंदे म्हणतात, “तो (परमेश्वर) अनंत, आम्ही सांताहून सांत, तो सर्वज्ञ, आम्ही आपणास अल्पज्ञ म्हणविणे म्हणजेही आम्ही आमच्या ज्ञानाची घमड दाखविणे होय. तो सर्वसमर्थ, आम्ही त्याचे प्रेमास अपात्र, तो न्यायी आणि आम्ही अन्यायाकडे धावणारे असा त्यांच्यामध्ये व आमच्यामध्ये भेदभाव आहे. हा भेदभाव ओळखून त्यास वचकून असले पाहिजे. त्याच्या पुढे जावयाचे तर अंत:करण शुद्ध करून, मलिन भाव शुद्ध करून आम्ही गेले पाहिजे. निदान अंत:करण मलिन आहे त्याजपाशी अनुतापपूर्वक कबूल केले पाहिजे. देवावर आमचे प्रेम पाहिजे. पण त्याच्यासंबंधाने आपल्या ठिकाणी आदरभाव पाहिजे. भीतीही पाहिजे. आमचा व देवाचा संबंध अवज्ञा करण्यापर्यंत केव्हाही येऊ नये.” (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. २२६-२७)

अद्वैतवादावर टीकेचे दुसरे कारण देताना महर्षी शिंदे म्हणतात, “वाढते ज्ञान हे दुसरे तत्त्व होय. आम्ही आपले ज्ञान वाढणारे आहे की नाही ह्याची नेहमी खबरदारी घेतली पाहिजे. अद्वैतवाद्यांचा अद्वैत सिद्धांत हे वाढते ज्ञान नव्हे. जे आहे ते एकच तत्त्व आहे असा एकदा मनाचा ग्रह झाला की, मनाची गती कुंठित होते. ह्या कारणामुळेच ब्राह्मी धर्मानुयायांच्या पसंतीस अद्वैतवाद उतरत नाही. नित्य नवे नवे जे अनुभव येतात आणि शोध लागतात त्यांची किंमत नाहीशी करून टाकाणारा अद्वैतवाद ब्राह्म्यास रूचत नाही. कारण व्यक्तीस येणा-या ह्या एकाद्या लहानशाही ताज्या अनुभवाची किंमत शिळ्या अद्वैतवादापेक्षा मोठी आहे.” (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. २२६-२२७)

अवतारवाद विकासाला मारक

अवतारवादावरही महर्षी शिंदे ह्यांनी कठोर टीका केली आहे. परमेश्वराने अवतार घ्यावा व मग सर्व मानवाचा उद्धार करावा ही कल्पनाच त्यांना मान्य नाही. ही कल्पना व्यक्तीचे कर्तृत्व, इच्छाशक्ती गलितगात्र करून टाकणारी आहे अशी त्यांची भूमिका आहे. प्रत्येक व्यक्तीमधील आत्मविश्वास वाढणे, तिच्यातील कर्तृत्व उमलणे म्हणजे अखेरीला समाजाचा विकास होणे आहे. लाखो व्यक्तींना पंगू बनविणारे अवतारवादाचे तत्त्वज्ञान समाजाला घातक आहे. असेही त्यांनी म्हटले आहे. ह्याबाबत चिकित्सा करिताना महर्षी शिंदे म्हणतात, “आत्मैक आत्मनो बंधु” ह्या तत्त्वाचा स्वीकार करून आपण आपल्याच पायावर उभे राहण्यास शिकले पाहिजे व राहिले पाहिजे. मला इतकेही वाटते की, आज जी आमच्यात आत्मकला अंशभूत आहे. इच्छाशक्ती, बाहुबल, एकेक पाऊल स्वत:पुढे टाकण्याची शक्ती आहे ती जाऊन अवतारी व्यक्तीच्या विद्युत्कार्षणाने एकदम कामे फार होणार असतील तर तो अवतार नको व ती कामेही नकोत. विकासच झाला पाहिजे हे मी धरून बसेन. अवतारवादाने प्रदर्शित केलेला एक फार अंच व इतर सर्व अत्यंत नीच, खालावलेले, असला विषमभाव मला पसंत नाही. सर्वांची, सर्व बाजूंनी व तीही स्वत:च्या प्रयत्नांनी उन्नती होत जावी हेच श्रेयस्कर! अवतारांची गरज भासू लागल्यास समजावे येथे रोग आहे. स्वाभाविक स्थिती ही नव्हे, स्वत:चा दम संपला. स्वयंशक्ती हरपली. स्वत:चा जोर नाहीसा किंवा कमी झाला, पण चांगल्या सुदृढ राष्ट्रात स्वयंस्फूर्ती हा एक गुण असतो. म्हणजे कोणतेही कृत्य स्वत: आपल्यास कळलेल्या दिशेने करण्यास अंगावर घ्यावयाचे. त्या राष्ट्राच्या विभूतीच्या व सामान्य लोकांच्या मध्ये इतके अवाढव्य अंतर नसते हेही लक्षात ठेवले पाहिजे.” (जीवन व तत्त्वज्ञान पृ. १८१-८२)

निवृत्तिवाद म्हणजे नाश

भारतीय मनावर संन्यासवादाचा प्रभाव शेकडो वर्षे आहे. त्याच्या छायेखाली भारतीय समाजाने शेकडो वर्षे वाटचाल केली आहे. शंकराचार्याच्या उदयानंतर ह्या संन्यासवादाने भारतीय मनाची विशेष पकड घेतली. महर्षी शिंदे ह्यांना हा संन्यासवाद किंवा निवृत्तीवाद अमान्य आहे. ह्या जगाचे हे जीवन आपण चांगल्या प्रकारे जगले पाहिजे अशी त्यांची धारणा आहे. प्रवृत्तीवादाची भूमिका स्पष्ट करिताना महर्षी शिंदे म्हणतात, “मी तरी समजतो, निवृत्ती म्हणजे नाश आहे. कृष्णाने अर्जुनाला अखेर निरोप अट्टाहासाने प्रवृत्तीविषयकच सांगितला आहे. तो त्याला म्हणतो, “अरे, ह्यापेक्षा तुला काय सांगू? मी जर अव्यक्त असून व्यक्त होत आहे. मी प्रवृत्त आहे, तो पर्यंत तू निवृत्तीची कथा सांगू नकोस.” (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. १८१-८२)

अंत:प्रामाण्य हेच श्रेष्ठ प्रामाण्य

ब्राह्म समाजाचा ग्रंथप्रामाण्याला किंवा इतर कोणत्याही ब्राह्म प्रामाण्याला विरोध आहे. अंत:प्रामाण्य हेच श्रेष्ठ प्रामाण्य आहे अशी त्याची भूमिका आहे. ह्या संबंधीची चर्चा करिताना महर्षी शिंदे म्हणतात, “ब्राह्म्यास त्याच्या बाहेर प्रमाणभूत वस्तू अशी काय ती एक ईश्वरच! त्याच्या प्रामाण्याचा बोध जो ब्राह्म्यास होतो, तो बाहेरून नव्हे, तर त्याच्या अंतर्यामातून आणि विवेकबुद्धीतून. ह्यावरून ब्राह्म्याना प्रमाणभूत असे काहीच नाही. ते स्वैर आहे असेही होत नाही. उलट ब्राह्म्याचे असे म्हणणे आहे की, ज्यांना हे अंत:प्रामाण्य मान्य नाही किंवा पुरेसे ते ज्यास भासत नाही तेच बाहेरच्या अनेकविध प्रामाण्यांच्या भानगडीत पडतात. आता जर कुणी ब्राह्म्यास विचारतील की, अंत:प्रामाण्यास सर्वत्र सारखेपणा व निश्चितपणा कोठे आढळतो? तर त्यांचे सांगणे असे पडते की, ब्राह्म पुस्तकात व आचारात आपल्याहून अधिक धरसोड, उडवाउडव आढळते व ती निवारण्यास पुन: आपल्यास शुद्ध व सात्विक बुद्धीचाच उपयोग करावा लागतो.” (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. १८१-८२)

धर्मनिरपेक्ष राज्याचा तात्त्विक आधार

ब्राह्मोसमाजाने जगातील सर्व धर्म सारखेच आहेत अशी भूमिका घेतली आहे. आज आपल्या देशात आपण जी धर्मनिरपेक्ष राज्याची कल्पना स्वाकारली आहे तिला पोषक अशी भूमिका ह्या धर्मपंथाने शंभर वर्षांपूर्वीच स्वीकारली आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्ष राज्याचा तात्त्विक आधारच त्यांच्या विवेचनातून मिळतो, सर्व धर्म समान आहेत. ह्याची चर्चा करिताना महर्षी शिंदे म्हणतात, ईश्वराच्या राज्यात हा हिंदू, हा मुसलमान, हा ख्रिस्ती असा खात्रीने भेद होणार नाही. हल्ली इंग्रजांच्या राज्यात जर हा भेद पाळण्यात येत नाही तर ईश्वराचे राज्य जे खात्रीने पवित्र असणार त्यात कसा पाळण्यात येईल? इंग्रज सरकार हे स्वत: ख्रिस्ती धर्माचे आहे व आपल्या धर्माची किंमत ते जाणत नाही, असे नाही. पण आजपर्यंतच्या अनुभवाने जर केवळ धर्म निराळा म्हणूनच एखाद्यास आपल्या दरबारात निराळीच जागा न देण्याइतके शहाणे झाले आहे, तर देव काय त्यापेक्षा कमी शहाणा असेल की, त्याच्या दरबारात असा भेदभाव होईल? मग स्वत: देवच जर धर्मभेद पाळीत नाही तर मनुष्याने तो पाळणे किती सत्यास धरून होईल बरे?” (धर्म, जीवन व तत्त्वज्ञान पृ. १७७-७८)

“साधारण ब्राह्म समाज” च का?

ब्राह्मोसमाजाचे तत्त्वज्ञान जरी महर्षी शिंदे ह्यांनी स्वीकारलेले असले तरी ब्राह्मोसमाजामध्ये देखील वेगवेगळे विचारप्रवाह होते. महर्षी शिंदे ह्यांचा कल “साधारण ब्राह्मोसमाज” ह्या उपपंथाकडे होता. ब्राह्मोसमाजामध्ये एकोणिसाव्या शतकात ढोबळ मानाने तीन विचार-प्रवाह दिसून येतात. त्यांपैकी एक प्रवाह आदिब्राह्मो समाजाचा. ह्या विचार-प्रवाहचे प्रतिनिधी म्हणून देवेंद्रनाथ ठाकूर ह्यांचा उल्लेख करावा लागेल. दुसरा विचार-प्रवाह नवविधान ब्राह्मोसमाज म्हणून ओळखला जातो. केशवचंद्र सेन हे ह्या दुस-या विचार-प्रवाहाचे जनक होत. ब्राह्मोसमाजातील तिसरा विचार-प्रवाह म्हणजे साधारण ब्राह्मोसमाज होय. ह्या तिस-या विचार-प्रवाहाची स्थापना कुचबिहारच्या राजकुमाराच्या लग्नानंतर झाली. आधीच्या केशवचंद्र सेन ह्यांनी स्थापन केलेल्या नवविधान ब्राह्मोसमाजापेक्षा ह्या नव्या साधारण ब्राह्मोसमाजाची दोन वैशिष्ठ्ये होती. पहिले वैशिष्ठ्य असे की, केशवचंद्र सेन ह्यांच्या काळात ब्राह्मसमाजात अंतर्गत लोकशाहीला वावच नव्हता. केशवाने सांगावे व इतरांनी निमूटपणे ऐकावे असे धोरण होते. वास्तविक ब्राह्मोसमाजानेच १९२८ पासून विचार स्वातंत्र्याचे वारे उत्तेजित करावयाला सुरूवात केली होती. पन्नास वर्षाच्या काळात ब्राह्मोसमाजानेच वाढविलेल्या ह्या विचारशक्ती बलशाली झाल्या. त्यामुळे केशवचंद्र सेन ह्यांच्या एकतंत्री कारभाराला विरोध होणे स्वाभाविक होते. अंतर्गत लोकाशाहीच्या प्रेरणेतून साधारण ब्राह्मोसमाजाचा जन्म झाला. ह्या प्रवाहाचे दुसरे वैशिष्ठ्य असे की, त्याने सर्व कौटुंबिक जीवनच बदलून टाकण्याचा प्रयत्न केला. पूर्वी कुटुंबातला प्रमुख पुरूषच ह्या प्रवाहात सामील झालेला असे. परंतु ह्या नव्या उपपंथाने कुटुंबातील पुरूषाप्रमाणेच स्त्रिया, मुले ह्यांनाही सहभागी करून घेण्याची नवीच पद्धती सुरू केली. ह्यामुळे कौटुंबिक सुधारणेचा नवा कालखंड सुरू झाला. ह्याशिवाय विचार आणि आचार ह्यांच्यामध्ये सुसंगती पाहिजे असा आग्रह ह्या नव्या उपपंथाने धरला. महर्षी शिंदे ह्यांना साधारण ब्राह्मोसमाजाची वरील तीनही वैशिष्ठ्ये अनुकरणीय वाटली व म्हणून ते साधारण ब्राह्मोसमाजात दाखल झाले. अखेरपर्यंत ते साधारण ब्राह्मोसमाजाचेच अनुयायी म्हणून राहिले.