नीती-३
आम्ही ज्या आध्यात्मिक जीवनाच्या नीतीचे प्रतिपादन करीत आहो तिची इतर नीतीच्या तुलनेने पाहता काही विशिष्ट लक्षणे दिसून येतात. त्यांपैकी काही थोडी येथे सांगता येतील.
आध्यात्मिक नीती संयोजक आणि प्रागतिक आहे, केवळ नियामक नाही. अनेकविध नियमांच्या साखळीने जीवनाला बद्ध करून त्या नियामांच्या परिपूर्तीवरच कर्तृत्वशक्तीचे सर्व अभिसरण अवलंबून ठेवण्याचा ह्या नीतीचा हेतू नाही, उलट आमच्या सर्व शक्तींचा विकास करून त्यांच्या विजयाला अवसर देणे आणि तद्वारा मानवी क्षेत्रांतर्गत प्रत्येक व्यवहाराचे बाबतीत चैतन्यसाम्राज्याच्या मर्यादा विस्तृत करणे हा ह्या नीतीचा महान हेतू आहे. आध्यात्मिक जीवनाप्रमाणे तज्जन्य नीतीदेखील मायातीत स्वरूपाचीच अर्थात असणार. नीती म्हणजे आमच्या ज्या केवळ कालपरत्वे बदलत जाणा-या गरजा असतील त्या भागविण्याचे एक साधन असा नीतीचा क्षुद्र अर्थ नाही. कालविच्छिन्न शुभाशुभाची ख-या नीतीला गणना नाही. परंतु यद्यपि आध्यात्मिक नीती कालातीत आहे आणि तिच्या प्रेरणेमुळे अमूक केवळ युगधर्म व अमूक सनातन धर्म अशी विभाग प्रतिपत्ती होते तरी तिच्या स्वत:च्या कार्यक्षेत्रात अमूक कार्य आणि अमूक अकार्य अशा विविक्तीलाही जागा आहेच आणि खरोखर कालवशात आम्हांला जे निरनिराळे अनुभव येतात त्यात खोल शिरून त्याचा अखेरचा ठाव घेतल्यानेच आमच्या नीतीला खरी बळकटी येणार आहे आणि एवढ्याच दृष्टीने पाहता आम्हीही एक प्रकारे आधुनिक नीतीचा पुरस्कार करीत आहो, येरवी जिला प्रस्तुत काळी “आधुनिक” असे नाव मात्र प्राप्त झाले आहे तिचा आम्ही निश्चयाने त्याग करीत आहो. कारण ही “आधुनिक” नीती बहुतांशांनी व्यक्तीच्या इच्छा आणि लहरी ह्यांनाच वश होणारी असते असे आढळून येते.
वरील विवेचनावरून हे उघड होते की आध्यात्मिक नीती म्हणजे निसर्गाचाच एक परिणाम नव्हे. ती मनुष्याच्या नैसर्गिक स्वभावाचा कोणताही भाग किंवा त्याच्या सामाजिक संबंधाचे कोणतेही पर्यवसानही नव्हे, तर जीवनाच्या विकासामध्ये आध्यात्मिक नीतीचा उदय म्हणजे एकादा अतिशय महत्त्वाचा संस्कार होय. तो एक नवीनच उपक्रम म्हणावयाचा. (ह्या उदयाला जीवनाचे प्राकृतातून संस्कृताप्रत आक्रमणच म्हणता येईल.) नीतीच्या पायावर जीवनाची नवीन घटना करावयाची झाल्यास वर सांगितल्याप्रमाणे एक युद्धच व्हावयाला पाहिजे आणि ह्या युद्धामध्ये विरूद्ध पक्षाकडील मुख्य किल्ला कोणता आणि युद्धाचा रोख कोणत्या दिशेने मुख्यत: वळवावयाचा हे ठरविण्यावरच आमच्या आयुष्याचे व आचरणाचे सर्वसाधारण धोरण अवलंबून राहणार आहे. प्रथमत: मनुष्याचा जो इंद्रियस्वाभाव आहे त्याच्याशी ह्या नीतीने आपले धोरण ठाम ठरविले पाहिजे. चैतन्याचा एकदा एक विविक्षित रोख ठरल्यावर त्यापुढे इंद्रियांनी आपली बाजू पडती ठेविली पाहिजे हे खरे. पण आम्ही वर निर्दिष्ट केलेच आहे की निसर्ग आणि इंद्रिये ह्यांच्या हक्कांची योग्य संभावना न करता केवळ वैराग्याच्या भरीस पडून त्याचे नि:शेष निर्मूलन करण्याच्या हटवादास आम्ही बळी पडू तर पुन्हा समष्टिरूप जीवनाची घडी बिघडेल आणि नैतिक कार्याच्या गांभीर्याला धक्का पोहोचेल.
बाहेर सामाजिक जीवनामध्ये तसाच आत व्यक्तीच्या अंत:करणामध्ये हल्ली जो आध्यात्मिक जीवनाचा खोटा आणि नकली आविर्भाव होत आहे त्याच्या अगदी उलट ह्या जीवनाची खरी आणि टिकाऊ घटना करणे ही नीतीची मुख्य कामगिरी होय. म्हणून सामाजिक संबंधांचा सर्वस्वी त्याग करून केवळ व्यक्तिगत जीवनाचाच अवलंब केल्यानेही वरील कार्य साध्य होणार नाही. जीवनाची हल्ली जी सामान्य अवस्था पाहण्यात येते तिच्यावरून त्याच्या आध्यात्मिकत्वाचा किंवा स्वातंत्र्याचा विकास होईल असा काही सुमार दिसत नाही. जीवनामध्ये बीजस्वरूपाने असणारी जी मूळ चैतन्याची प्रचोदना, तिचा अन्य गौण हेतू साध्य करून घेण्यासाठी एक साधन अशा भावनेने हल्ली उपयोग करून घेण्यात येत आहे, हा मिथ्याचार होय. तसेच आपण चैतन्याचाच अनुसार करावा आणि त्यासाठी आपल्या इतर सर्वस्वाची होळी करून टाकावी अशा भावनांमध्येच साधारणत: गुंतून राहण्यात मनुष्यमात्रास मोठी गोडी वाटते. ह्या तमोमय आत्मवंचनेतून मुक्त होऊन जीवाने प्रबोध आणि शक्ती संपादन करणे हे ह्या (नूतन) नीतीचे मुख्य लक्षण होय. ह्या असत्याने भरलेल्या जगात सत्य आणि प्रामाणिकपणा रोवण्याकरिता जीवाला प्रथम निष्ठेची आणि असामान्य धैर्याची फार मोठी जरूरी भासते.
अतएव ह्या (नवीन) नीतीमुळे जीवनाचे ठायी मोठा विरोध जुंपून राहतो. औदासिन्य आणि अव्यवस्था ह्यांच्या शय्येवर हल्ली जो जीव झोपी गेलेला आहे त्याला जागा करण्याचे तिचे मुख्य काम आहे आणि म्हणून ह्या भागाचे आरंभी निर्दिष्ट केलेले आणि हल्ली चहूंकडे प्रचलित असलेले नीतीचे जे निरनिराळे प्रकार आहेत त्यांच्याशी ह्या (नवीन) नीतीचा विविक्षित संबंध जडला पाहिजे. ह्या आध्यात्मिक नीतीला आपल्या स्वत: सिद्धस्वरूपाची खात्री पटली असेल तर तिला इतर गौण नीतीमध्येही सध्याचा काही अंश आहे हे सहज ओळखता येईल आणि इतरत्र सत्याचे दिसून येणारे अंश तिने मान्य केल्याने ती स्वत:च केवळ निरनिराळ्या चिंध्या बनविलेली एक वाकळ आहे असा अर्थ निष्पन्न होण्याची भीती नाही. (१) मागील भागात आध्यात्मिक जीवन आणि धर्म ह्यांचा जो संबंध निर्दिष्ट करण्यात आला, त्यावरून धर्माची नीतीला कोणत्या प्रकारे मदत होण्यासारखी आहे हे कळेल. (२) आध्यात्मिक जीवनाला जर सर्वसाधारण स्वरूप यावयाला पाहिजे असेल तर संस्कृतीच्या नीतीचीही त्याला जरूरी आहेच. (३) सामाजिक जीवनाच्या अंतर्घटनेमध्ये सामाजिक नीतीचे महत्त्व कळून येते. (४) शिवाय बौद्धिक नीतीने सुचविल्याप्रमाणे नीती म्हणजे केवळ मानवी गरजा भागविण्याचे एक साधन नसून मनुष्यातील अशी तिची स्वतंत्र पदवी आहे हेही खरे. (५) शेवटी व्यक्तिगत नीतीच्याही सर्व गरजा आध्यात्मिक नीतीमध्ये भागण्यासारख्या आहेत. पण हे सर्व केव्हा शक्य होईल? आमचे जे परस्परविरोधी स्वानुभव आहेत त्या सर्वांच्याही पलीकडे आमच्या जीवनाचे मूळ आहे आणि ते सर्वकाल विच्छिन्न व स्वतंत्र असे आहे. म्हणजे स्वयंभू आध्यात्मिक जीवनामध्येच आमची ही पदवी आहे असा साक्षात्कार जेव्हा घडेल तेव्हाच वरील सर्व प्रकार शक्य होतील; एरव्ही नाहीत. आणि ह्या स्वतंत्र पदवीच्या प्राप्तीविना आमच्या ह्या कालमर्यादित क्षेत्रामध्ये ती पण आण्ही एक पाऊलभरसुद्धा मार्ग वस्तुत: पाहता आक्रमिला असे म्हणता येणार नाही.
विश्वंभरे विश्व सामाविले पोटी|
तेथेचि शेवटी आम्ही असो||