बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड येथील उल्हास
मँचेस्टर कॉलेज, ऑक्सफर्ड
परीक्षेच्या घाईमुळे हे पत्र एकदोन आठवड्यांचे शिळे झाले आहे. तथापि मजकूर शांतीसंबंधाचा असल्याने इतकी घाई केली नाही म्हणून काही हरकत नाही.
दक्षिणारण्यातील नरमेध तर संपला. त्याची आता गत गोष्ट झाली. आपले सुमारे ९६ हजार कामास आले. पैकी सुमारे चौथाई तर यमाने जागच्या जागी वसूल केली. हा जो इतक्यांना मोक्ष मिळाला तोही काही फुकट नव्हे. तर मागे हळहळणा-यांना त्याबद्दल जवळजवळ ३ अब्जांचा खर्च आला आहे. प्रथिपक्षाचे काय काय नुकसान झाले ह्याचा अद्याप पत्ता नाही. भावी इतिहासकार रिकामपणई त्याचा हळूहळू छडा लावतील!
धर्मयुद्ध असो वा कसेही असो, युद्ध म्हणजे अनिष्ट. सतत विकास पावणा-या मानवी आयुष्यात सांग्रामिक कालाची आवश्यकता असेल. पण आवश्यकतेवरून त्याचा चांगुलपणा सिद्ध होत नाही. एके काळी मानवजातीस विद्या, कला, शास्त्र ह्यांपेक्षा युद्धाचीच प्रौढी विशेष वाटत होती. आणि हल्लीच्या काळी, स्पेन्सरसारख्या सात्विक ब्राह्मणांनी सांग्रामिक युगाहून औद्योगिक युग अधिक श्रेयस्कर व उन्नत आहे असे कितीही प्रस्थापिले तरी वरील प्रौढी अद्यापी व्हावी तितकी कमी झाली नाही. इतकेच नव्हे तर त्याच स्पेन्सरसाहेबांनी नुकताच आपला अगदी शेवटचा म्हणून जो ग्रंथ प्रसिद्ध केला आहे त्यात सुधारलेल्या जगात हल्ली ज्या अनार्यपणाच्या लाटा उसळत आहेत त्यांचे चांगले दिग्दर्शन केले आहे. पशुदशेतून मानवदशेचा विकास झाला आहे हे डार्विनचे मत कित्येक कोमल अंत:करणाच्या माणसांस पसंत नाही. तरी जोवर राष्ट्राराष्ट्रांतील वाद आम्हांस रक्तपाताशिवाय मिटविणे अशक्य दिसते तोवर आमच्या पूर्वज-पशूंचे अवशेष आमच्यात अद्यापि कायम आहेत हे कबूल करणे निदान समंजसपणाचे आहे.
सुबोध पत्रिका, ता. २०-७-१९०२.
काही असो, दक्षिण खंडाला शोभणारे हे रणकंदन एकदाचे आटपले म्हणून ह्या उत्तर द्वीपात सर्वत्र आनंदी आनंद झाला आहे. आबालवृद्ध, स्त्रीपुरूष, सुधारक-उद्धारक ह्या सर्वांना अजुनी आनंदाचे उमाळे येत आहेत.
ह्या लोकांची आनंद प्रदर्शित करण्याची त-हा काही अप्रतिमच! युद्ध चांगले की वाईट हे सांगणे फार सोपे आहे. पण ते संपल्यावर ह्यांनी जो आपला राष्ट्रीय उल्हास दाखविला-आणि तोही ऑक्सफर्डसारख्या पवित्र आणि शांत शही-तो पाहून परकीयाने त्यास बरा अगर वाईट म्हणणे फार जोखमीचे काम आहे! म्हणून प्रथम एकदोन दिवशी-विशेषत: रात्री येथे जो प्रकार घडला-नव्हे मला दिसला तो लिहीत आहे. वाचकांनीच आपापले तर्क जपून करावेत.
तहाची तार येथे रविवारी रात्री पोहोचली, म्हणून तेव्हा काही विशेष घडले नाही. दुसरे दिवशी सकाळी मी माझे खोलीत न्याहारीस बसलो असता आमची घरवाली हातात एक मोठी रंगीबेरंगी पताका घेऊन अवचित माझ्यापुढे उभी राहिली. तिच्या तोंडावर विजयश्री स्पष्ट दिसत होती. नंतर खालील छोटासा संवाद झाला:
मी-कायहो तुम्हा (बायकां) लाही आनंद होतो ना!
ती-हो!हो! हे काय विचारणे.
मी-राज्य मिळाले म्हमून की लढाई संपली म्हणून?
ती-दोन्ही रीतींनी.
मी-म्हणजे दुस-या रीतीनेही होतो म्हणावयाचा?
ती-तर हो काय! भाकरीवरदेखील कर बसविण्यापर्यत मजल आली तर लढाई एकदाची संपली म्हणूनही आनंद का वाटू नये?
मी- तर मग ह्या निशाणीचे प्रयोजन काय?
ती- तो भाग वेगळा. ही निशाणी न लाविली तर संध्याकाळच्या आत माझ्या खिडक्यांना तावदाने राहणार नाहीत!
मी- काय म्हणता?
ती- तर काय! मॅफकिंगचा जेव्हा वेढा उठल्याची बातमी आली तेव्हा येथील रस्त्यातील पोरट्यांनी कोण कहर केला!
मी- एकूण ह्या निशाणीची अनेक कारणे आहेत एक, राज्य मिळाले म्हणून, दुसरे, लढाई संपली म्हणून, तिसरे, रस्त्यातील उनाड देशाभिमानास बुजगावणे म्हणून इ. शेवटी बाईने हासत घरावर निशाण लाविले.
नंतर मी दाराबाहेर येऊन पाहतो तो आळीतील प्रत्येक खिडकीतून युनिअनजॅक बाहेर पडत होता. हामरस्त्यावर तर जारीने तयारी चालली होती. दुकानदार, वखारीवाले आणि घरंदाज इत्यादी लोक आपापल्यापरी निरनिराळी जयचिन्हे उभारण्यात गुंतले होते. लहानसान पताका, मोठ बावटे, गुढ्या, तोरणे ह्यांचा थोड्याच वेळात मोठा गहजब उडाला. शहरातील मुख्य रस्त्यात तर रंगाची चंगळ झाली होती. दिवश जसजसा वर येऊ लागला तसतशी अधिक तयारी होऊन अधिक शोभा येऊ लागली. खटारेवाल्यांनी आपल्या खटा-यांवर व बगीवाल्यांनी घोड्यांच्या कानांवर आणि चाबकांच्या शेवटास निरनिराळ्या रंगांच्या फिती लाविल्या! लवकरच बायसिकल्सवरूनही झेंडे फडकू लागले. अखेरीस ही आनंदाची साथ गुलहौशी बायकांच्या कुत-यांपर्यंत पसरून त्यांचे गळे रंगले! अनुकरण आणि चढाओढ ह्यांमुळे हा प्रकार कोठवर वाढेल ह्याचा सुमार लागेना. तिस-या प्रहरी लहान-लहान मुले खांद्यावर पताका ठेवून, तोंडाने कथिलाची शिंगे फुंकून त्यांचा कर्कश आवाज काढीत रस्त्यातून भटकू लागली!
सांजावून किंचित कडोसा पडल्यावर देखावा बदलला. दुकानांवरून व घरांवरून ग्यासच्या चित्रविचित्र दिव्यांची रचना केली होती. त्या सर्वांनी आता पेट घेतला. कित्येक ठिकाणी जपानी कागदी कंदीलांची तोरणे रस्त्यावरून आडवी टांगली होती. काही कॉलेजांवरून कार्तिकाची विशेष शोभा दिसत होती. सार्वजनिक आनंद प्रदर्शनाचे ह्या लोकांचे मुख्य साधन बॉन फायर्स म्हणजे होळ्या. गावात ह्या निरनिराळ्या ठिकाणी ८-१० रचिल्या होत्या. मोडकी पेटारे, डांबर ठेवण्याची पिंपे आणि इतर सटरफटर ह्यांनी काही होळ्या २५ फुटांपर्यंत उंच गेल्या होत्या. ह्यांचाही आता एकच भडका उडाला. इकडील गरीब व खालच्या वर्गाची एरवी देखील सायंकाळी फुरसतीच्या वेळची मुख्य करमणूक म्हणजे गावातील मुख्य रस्त्यातून इकडे तिकडे मनसोक्त भटकणे. त्यात तरूण मुलींचा भरणा विशेष! आज तर ह्या गर्दीला काही निराळाच रंग आला होता. होळ्या पेटल्यावर रस्त्यात अगदी खेचाखेची झाली.
रात्रीचा पूर्ण अमल बसल्यावर ह्या देखाव्याचे तिसरे आणि भलतेच रूपांतर झाले! सकाळी पाडवा, संध्याकाळी दिपवाली तर रात्रीच्या काळोखात ह्या उत्सवाने आमच्या शिमग्यासही लाजविले! ह्या शिमग्यातील मुख्य पार्ट युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी बजाविला!! संध्याकाळनंतर विद्यार्थी युनिव्हर्सिटीचा झगा आणि टोपीशिवाय खोलीबाहेर कोठेही दिसल्यास त्यास दंड, ११ वाजल्यावर बाहेर दिसल्यास दंड, १२ वाजल्यावर दिसल्यास जबर दंड, इ. ह्या युनिव्हर्सिटीचे नेहमीचे अगदी कडक कायदे आहेत. पण मॅफकिंगच्या रात्रीच्या अनुभवावरून आज हे सर्व कायदे तहकूब करण्यात आले होते. मग काय विचारता! दहादहा बाराबारा रंगेल गडी हातात हात घालून लांब रांगा बनवून गर्दीतून अर्धे उघडे बोडके हैदोस करीत निघत. गावठी तरूण मुलींच्याही अशाच रांगा चालल्या! ह्या भिन्न जातींच्या रांगा जेव्हा समोरासमोर भिडत तेव्हा रांगांचे वर्तुळ बनत असे. मग क्षणमात्र “चुंबति कामपि श्लिष्यति कामपि कामपि रमयति रामामं” ही अस्सल गोकुळी रासक्रीडा होई! अशा प्रसंगी सभ्य मुली बाहेर पडत नाहीत. पडल्या तर त्यांचा सभ्यापणा कायम राहत नाही. थोडा वेळ त्याचा भंग झाला म्हणून त्याचे त्यांस वाईट वाटत नाही. वाटले तरी कोणी विचारीत नाही. अलीकडे आमच्या शिमग्यासंबंधी निदान सुधारक पत्रातून तरी थोडी टीका होते. पण तशी देखील इकडे काही दिसली नाही. कारण बोलून चालून हा तात्पुरता पोरकटपणा, असा येते सर्वानुमते ठराव झालासे दिसते. काही असो, नवख्यास एकंदरीत हा प्रकार पाहून धक्का बसल्याशिवाय राहत नाही.
डोळ्यांचा भडका जसा कमी होऊ लागला तसे आजूबाजूचे फालतूक अडगळीचे सामान आत येऊन पडू लागले! एके ठिकाणी तर एका मोडक्या घरावर हल्ला झाल्यामुळे, पोलीसास मध्यस्थी करावी लागील! अशा प्रकारच्या आनंदाच्या वेळी ऑक्सफर्डमध्ये दुसरा एक विशेष मौजेचा प्रकार दृष्टीस पडतो. तो असा, विद्यार्थ्यांच्या टोळ्या रस्त्यातून हिंडत असता गावातील टोळ्यांशी काही तरी कुरापत काढून मरामारी करतात. ह्या तंट्यास येथे ‘टाऊनीज एँड गाऊनीज प्यड्स’ म्हणजे झगेकरी व गावकरी ह्यांचे तंटे असे म्हणतात. हीच चाल फार पुरातन काळापासून आहे. पूर्वी खरोखरीचे मोठे दंगे होत असत. ह्या वेळीही एका कॉलेजच्या दारात. सुमारे तासभर दंगामस्ती झाली. ह्याचे प्रथम मला फार आश्चर्य वाटून इकड पोलीस का दुर्लक्ष करतात ह्याबद्दल मी एका शिपायास विचारिले. येथील पोलीस म्हणजे धिप्पाड, कर्तव्यदक्ष, शांत आणि अतिसभ्य लोक असतात. त्यांपैकीच एक म्हणाला..... “अशावेळी आम्ही जास्त सवलत देतो. आम्हीच जर चिडलो तर सारा गाव खवळेल. हे दंगे विशेष विकोपास पेटले तरच आम्ही शांतपणे मिटवितो” त्याने असेही हासत हासत सांगितले-“भांडण मिटविताना मला स्वत:लाच तीनदा मार खावा लागला!” ह्यावरून हा शेंदाड शिपाई होता असे नव्हे. तर चिडखोरपणा व अरेरावी ह्या गुणांची पोलिसास आवश्यकता नाही, इतकेच त्याने फार गोडपणे सुचविले!
असो, ह्या प्रकारे पहिल्या एकदोन रात्री येथे अनेक तमाशे दिसले. पण हीच तमासगीर विद्यार्थी मंडळी दुस-या दिवशी नेहमीप्रमाणे म्युझिअम, लायब्र-या लॅबोरेटरी वगैरे ठिकाणी आपापल्या व्यासंगात गुंग झालेली दिसली!!