भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
१ माझे बालपण
माझा जन्म १८७८ साली कार्तिक महिन्यात जमखिंडी येथे झाला. कै. विठ्ठलराव शिंदे ह्यांच्यापेक्षा मी पाच वर्षाने लहान. त्यावेळी सर्वत्र जुन्या सनातनी रूढाचारांचे प्राबल्य असे. अशा रूढाचारांचा पगडा आमच्या घराण्यावर पडला होता, हे साहजिकच आहे. आमच्या घरी अतिशय गरिबी. आमच्या बाबांना जमखिंडी संस्थानात सरकार दरबारी जामदार म्हणून नोकरी होती. माझ्या आईला एकंदर २० मुले झाली त्यांपैकी विठुअण्णा (कै. विठ्ठलरावांना आम्ही लहानपणी हेच संबोधन लावीत असू) हे आमच्या आईचे पाचवे अपत्य तर मी सातवे. माझ्या पाठीवर तान्याक्का ही बहीण जन्मली. विठुआण्णापेक्षाही भाऊअण्णा नावाचे माझे बंधू माझ्यापेक्षा आठ एक वर्षानी वडीलच. जमखिंडी संस्थान कर्नाटकाच्या सरहद्दीवर, म्हणून आमची नावे कानडी वळणावर गेलेली आहेत.
त्या काळच्या पद्धतीनुसार मुलगी जन्माला आली की, तिच्या लग्नाच्या तयारीस आईबाप लागावयाचे. माझेही तसेच झाले. मी लहानपणी अंगाने बरीच स्थूल असे, पण सा-या भावंडांत रंगाने तितकीच उजळ होते. माझ्या वडिलांचे गोपाळराव कामते हे चांगलेच स्नेही होते. त्यांचा धंदा शेतीचा, पण ते सावकारीही करीत. गोपळराव बरेच मातब्बर गृहस्थ होते. त्यांना पण लक्ष्मीबाई नावाची एक मुलगी होती. गोपाळरावांची इच्छा अशी की, त्यांची मुलगी आमच्या विठुअण्णाला करून घ्यावी, आणि मला त्यांच्या मुलाला द्यावी. पण आमच्या विठुअण्णाची व लक्ष्मीबाईची पत्रिका न जमल्याने तसा विवाह न होता, माझ्या वयाच्या पाचव्या वर्षी माझे लग्न गोपाळरावांच्या मुलाशी-कृष्णरावाशी झाले. विठुअण्णा व कृष्णराव लहाहनपणी एकत्र खेळत. लग्नात त्यांचे वय विठुअण्णा इतकेच म्हणजे दहा वर्षाचे होते. भाऊअण्णा, विठुअण्णा यांच्या लग्नाबरोबरच एकाच मांडवात, माझे पण लग्न उरकून घेण्यात आले. गोपाळरावांच्या इतमामाप्रमाणे माझे बाबांनी सालंकृत कन्यादान केले. माझ्या लग्नात सासरच्या माणसांनी कसलाच रूसवाफुगवा दर्शविला नाही. ह्याचे कारण आमचे समजूतदार सासरे गोपाळराव व सासूबाई द्वारकाबाई. गोपाळरावांचा व बाबांचा अतिशय स्नेह म्हणून मी सासरी लाडातच वाढले. मी सात आठ वर्षाची होताच सासरी गेले. जमखिंडी शहरापासून माझे सासर-आसंगी हे गाव अवघ्या १६ मैलांवर आहे. गोपाळरावांना आमच्या बाबांबद्दल फार आदर असे. बाबांनी आपला मुलगा-विठुअण्णा शाळेत घालून चांगला हुषार केला होता, हे त्यांना फार कौतुकाचे वाटे. त्याचवेळी आपल्या मुलाचे कृष्णरावांचे शिक्षणाकडे अजीबात दुर्लक्ष, उलट ते गावात उनाडक्या करीत म्हणून मनास फार लावून घेत. विठुअण्णांची अभ्यासातील हुषारी व स्वभावातील चुणचुणीतपणा गोपाळरावांच्या मनात फार भरला होता. म्हणूनच त्यांना आपली मुलगी विठुअण्णाला द्यावी असे फार वाटत होते. एकंदरीत शिक्षणाबद्दल त्यांचे फार चांगले मत होते म्हणूनच त्यांनी आपणहून आमच्या बाबांना कळविले की, माझा कृष्णा शिकला नाही तेव्हा जनाला (मला) तरी लिहिणे वाचणे शिकवा, म्हणूनच मला घरीच शिकविण्यात येऊ लागले.
२ दाढीमुळे घोटाळा
कै. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांची १९०५ साली अस्पृश्योद्धारार्थ अखिल भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची (All India Depressed Classes Mission) स्थापना केल्यावर त्या संस्थेच्या अनेक शाखा स्थापण्यात आल्या. त्यांपैकी कर्नाटक शाखेसाठी फंड जमा करण्याकरता श्री. शिंदे आपले साहाय्यक श्री. ए.एम. सय्यद ह्यांचेसह १९११ साली बेळगावला गेले होते. बेळगावला रहात असलेल्या एका सारस्वत गृहस्थांना त्यांनी आपल्या येण्याबाबतचे अगाऊ पत्र पाठविले होते. त्याप्रमाणे श्री. शिंदे व सय्यद बेळगावला पोचले. ती वेळी दुपारी १२ वाजण्याची होती. सारस्वत गृहस्थाच्या घरी पोचताच “मालक आहेत का” अशी पृच्छा केली. घरातील बायकामंडळींनी नोकराकरवी मालक काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी गेल्याचे कळवले. तेव्हा श्री. सय्यद ह्यांनी पुन्हा एकदा नोकराकरवी खुलासा केला की आम्ही येणार असल्याचे अगाऊ पत्राने कळविण्यात आले होते. इतकेच नव्हे तर मालकांनी आपल्याकडेच उतरावे असा आग्रह पुन्हा उत्तरादाखल पत्र पाठवून केल्याचे कळविले. परक्या ठिकाणी अपरिचित माणसांशी विशेषत: बायकामाणसांशी गाठ पडली म्हणजे काय प्रसंग ओढवतो ह्याची जाणीव ह्या दोघांस होऊ लागली. विशेषत: अण्णासाहेबांच्या दाढीकडे घरातील बायकामंडळीचे लक्ष जाताच त्यांनी ते मुसलमान असावेत असा ग्रह करून घेतल्याने नोकराकरवी घराच्या ओसरीवरच सामान ठेवण्यास सांगितले. दुपारची वेळ. भूक सपाटून लागलेली. त्यात प्रवासाचा शीण आलेला, बराच वेळ झाला तरी जेवणास बोलावण्याचे काहीच चिन्ह दिसेना. तेव्हा जेवण नाही, निदान चहाची तरी कुठे सोय होते किंवा नाही ह्याचा तलास घेण्यासाठी श्री. सय्यद सिद्ध झाले. घरासमोरच्याच हॉटेलमधील पो-यास चहा पाठवून देण्यास सांगून श्री. सय्यद परत फिरले. पण बराच वेळ झाला तरी हॉटेलमधून देखील चहा काही येईना. असे पाहून श्री. सय्यद ह्यांनी पुन्हा एकदा ओसरीवरून हॉटेलच्या पो-यास चहाकरता हाक मारण्यास सुरूवात केली. पण तो तर मालकाच्या तोंडाकडे पाहून उभा राही. तेव्हा मालकच आपल्या पो-यावर जोराने खेकसून म्हणाला, “अरे सांगना, त्यात भ्यायचे काय? चटकन् सांगून टाक.” तेव्हा पो-या सय्यदाजवळ येऊन म्हणाला, “साहेब, तुम्हाला चहा देण्याची आमची कोणतीच हरकत नाही. पण.... चमत्कारिक नजरेने श्री. अण्णासाहेबांच्या दाढीकडे पहात त्याने स्पष्ट सांगितले... तुमच्याबरोबर आलेल्या मुसलमान गृहस्थांना मात्र चहा देता येणार नाही. आम्ही फक्त हिंदूनाच चहा फराल देत असतो.” सय्यदांच्या लक्षात सारा प्रकार आला. मालकाला ऐकू जाईल इतक्या बेताने ते म्हणाले, “अरे, तुला ठाऊक नाही? हे तर हिंदू आहेत. केवळ दाढी राखली म्हणून ते काही मुसलमान नाहीत. त्यांचे नाव शिंदे असून ते मूळचे कर्नाटकातीलच रहिवासी आहेत”. हे ऐकताच मालक लगबगीने सय्यदांच्याकडे आला व म्हणाला, “आम्हांलाहो काय माहीत! आता खुशाल चहा घ्या......”
सय्यद कर्नाटकातले असल्याने आतापर्यंत कानडीतूनच. बोलत होते. मालकाने जवळ येऊन वरील वाक्य उच्चारताच सय्यदांनी त्याला श्री. शिंदे ह्यांना चांगल्या प्रकारे कानडी भाषा अवगत असल्याचे कळविले. तेव्हा मालक चांगलाच खजील झाला.
३ अस्पृश्यता निवारणार्थ जाहीरनामा!
१९१८ साली मार्च महिन्याच्या २३ तारखेस पुण्यात भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद बडोद्याचे महाराज श्रीमंत सर सयाजीराव गायकवाड ह्यांचे अध्यक्षतेखाली भरली होती. आमच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या आतापर्यंत ज्या काही परिषदा झाल्या त्यात ही परिषद मोठ्या थाटामाटाने पार पडली. सभेस बाबू बिपिनचंद्र पाल, बॅ. जयकर, अँड. भुलाभाई देसाई, श्री. जमनादास मेहता, सर नारायणराव चंदावरकर, लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, श्री. न. चिं. केळकर वगैरे मोठमोठी मंडळी हजर होती. परिषदेच्या अभिनंदनार्थ अनेक मोठमोठ्या लोकांच्या तारा आल्या. त्यांत म. गांधी, कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज, करवीर मठाचे शंकराचार्य ह्यांच्याही तारा होत्या. द्वारकापीठाच्या शंकराचार्याकडून एक विलक्षण तार आल्याचे मला चांगलेच आठवते. त्यात, “सर सयाजीराव महाराज आणि रा. विठ्ठल रामजी शिंदे हे आधुनिक काळातील कलिपुरूष आहेत” अशा शब्दात त्यांचा तीव्र निषेध केला होता.
सभेत बॅ. जयकरांनी एक मुख्य ठराव मांडला, तो असा की “अस्पृश्यतेचे समूळ उच्चाटन व्हावे, ह्यासाठी प्रत्येक प्रांतातील विचारी व जबाबदार कार्यकर्त्या पुढा-यांच्या सह्यानिशी एक जाहीरनामा काढण्यात यावा. आणि त्याअन्वये शाळा, दवाखाने, सार्वजनिक खर्चाने चालविलेल्या सर्व संस्था पाणवठ्याच्या जागा, म्युनिसिपालिटीचे नळ, करमणुकीची ठिकाणे आणि देवालये ह्यांमध्ये अस्पृश्यांना कसलाही प्रतिबंध न राहता ती पूर्णपणे मोकळी असावी.” ह्या ठरावावर लोकमान्य टिळकांनी जे भाषण केले ते फारच महत्त्वाचे व उत्कृष्ट असे ठरले. ते म्हणाले की, “नीच मानलेल्या जातीच्या मनुष्यास स्पर्श झाला म्हणजे पाप लागते ही समजूत साफ चुकीची आहे. अस्पृश्यता वेदात नव्हती. होती असे सिद्ध झाल्यास मी वेदप्रामाण्य मानणार नाही. मनुष्याने अस्पृश्यता पाळणे हे ईश्वरासही मान्य नाही. मान्य असल्यास अशा ईश्वरासही मी मानणार नाही”. लो. टिळकांनी अशा प्रकारचे आवेशयुक्त भाषण करताच परिषदेतून टाळ्यांचा एकच कडकडाट झाला, तो इतका की आपले भाषण पुरे होण्यासाठी टिळकांना ‘टाळ्या बंद करा’ असे सांगावे लागले, तरी लोक टाळ्या वाजवण्याचे थांबवेनात. लो. टिळकांच्यानंतर त्यांचे कट्टर अनुयायी दादासाहेब खापर्डे ह्यांनाही स्फुरण चढून त्यांनी असे सांगितले की, स्पर्शास्पर्श किंवा रोटीबेटी व्यवहार ह्या गोष्टींचा चातुर्वर्ण्याशी काहीच संबंध नाही. पूर्वी ब्राह्मणाच्या मुली सर्रासपणे क्षत्रियांना देत व क्षत्रियांच्या मुली ब्राह्मण करून घेत. असे असल्याने आपण अनिष्ट रूढाचार सोडून देऊन अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे.
लवकरच परिषदेतल्या जाहीरनाम्याचा मसुदा तयार करण्यात आला. त्याच्या शेकडो छापील प्रती प्रांतोप्रांतीच्या पुढा-यांकडे सह्यांसाठी पाठविण्यात आल्या. मसुद्यात एक विशेष टीप होती. ती अशी की, “मी खाली सही करणार वरील ठरावातील अटी स्वत: अक्षरश: पाळीन आणि मी स्वत: हरप्रयत्न करून दुस-याकडूनही त्या पाळल्या जातील असे प्रयत्न सतत करीन. जवळ-जळ ३०० च्या वर सर्व प्रांतांच्या ठळकठळक पुढा-यांच्या सह्या झाल्या. पहिली सही कविसम्राट रवींद्रनाथ टागोर ह्यांची पडली. पण सांगण्यास खेद वाटतो की, लो. टिळकांची काही सही मिळेना. ती देण्यास त्यांच्या कट्टर अनुयायांकडून त्यांना अनुमती मिळेना. नवलाची गोष्ट ही की, हे अनुयायी आपल्या सह्या देऊनचुकले होते. जणू काही त्यांच्या पक्षातील प्रमुखाने सही दिली नाही तर त्यातच त्यांच्या सा-या पक्षाची इज्जत शिल्लक राहत होती. ह्या गोष्टीचा सा-या महाराष्ट्रात बराच गवगवा होऊन राहिला होता. ही एकच गोष्ट सोडून दिल्यास अस्पृश्यता निवारणाचे कामी आमच्या मिशनशी लो. टिळकांनी मोठ्या उदार मनाने सहकार्य केले आहे हे मला चांगलेच आठवते.