मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
मंगळूर शहर
प्राचीन अथेन्स शहर सात टेकड्यांवर वसले होते असे इतिहासकार सांगतात. एडिंबरो हेही टेकड्यांवर वसलेले आहे म्हणून स्कॉच लोक त्यास अर्वाचीन अथेन्स असे अभिमानाने म्हणतात. पण मंगळूर शहर सातांहून अधिक टेकड्यांवर वसलेले असून वरील दोन्ही अथेन्सलाही स्वाभाविक सौंदर्याने खात्रीने लाजवीत आहे. तशात पावसाळा संपून दसरा झाला की, मंगळापुरी (मंगळूर) दरवर्षी जणू उपवरच होते. प्रेक्षकांनी तिला ह्याच वेळी पहावयाला यावे. दंतकथा सांगते की, गोरखनाथाची कोणी मंगळा नावाची दासी होती, तीच आता मंगळापुरी (मंगळाXउरू=शहर=मंगळूरू) ची अधिष्ट देवता झाली आहे. तिचे मोठे जुने देऊळ शहराच्या नैर्ऋत्य कोनाला प्रसिद्ध आहे. आता देवी होऊन सर्वांना पूज्य होऊन बसलेली मंगळा ती पूर्वी गोरखनाथाची बटीक होती हे काय गौडबंगाल! पण समजूतदार माणसेही आपल्या जिभेची जबाबदारी न ओळखता स्वेच्छेप्रमाणे काहीतरी सांगत सुटतात, मग ती जी बोलून चालून दंतकथा तिच्या जिभेला हाड कोठून असणार? कसेही असो. मंगळादेवीचे नवरात्र आम्ही येथे पोचल्यादिवशीच संपून दसरा चालला होता. पण मंगळूरचे नवरात्र सर्व हिंवाळाभर चालणार आहे. चहूंकडे हिरवेगार गवत म्हणजे अगदी मी म्हणत आहे. बहुतेक मुख्य रस्ते टेकड्यांच्या बगलांतून बोगदेवजा खणून काढलेले असल्यामुळे त्यांच्या दोहों बाजूंस ७-८ फूट उंच ज्या भिंती आहेत त्यांवरही दोन-दोन हात लांब गवताच्या झिप-या लागलेल्या व त्यांवर बारीक शुभ्र फुले लटकलेली दिसतात. शहर म्हणजे एक निबिड अरण्यच जसे. छपरावरील एकही कउल असे मिळणार नाही की ज्याला अर्धा तास सारखे सूर्यदर्शन मिळते, मग बाहेर कडक उन्हाळा का असेना! दोन घरे ओलांडली नाही तोच एक खाचर लागते व त्यात मस्तावलेला भात झुलत असलेला दिसतो. हिंदु, मुसलमान, ख्रिस्ती हे तीन धर्म, तुलव, मलिआळी, कानडी व कोकणी-शिवाय मोडक्या तोडक्या इंग्रजीचे शिंतोडे रस्तोरस्ती उडतात ते वेगळेच-अशा या ‘साडेचार भाषा”. ह्यांतून येथील सुमारे ४० हजार लोकसंख्या बहुतेक सारखीच विभागलेली आहे. असल्या ह्या विचित्र पुरीत ऐक्य पाहू जाणारा ‘तो एक मूर्खच.’ ‘सारस्वत’ आणि ‘कोकणी’ हे अगदी जवळचे जातभाई. पण त्यांच्यात अगोदरच प्रेमाचा उल्हास होता त्यात तेथे जन्मास आलेल्या संयुक्त परिषदेने फाल्गुनमासाची भर घातली आहे. जे सख्य सारस्वतांत व कोकण्यांत तेच येथील शेकडो वर्षांपूर्वी कॅथोलिक झालेल्यांत व नुकताच बाझल मिशनने बाप्तिस्मा दिलेल्या ख्रिस्त्यांत.
ब्राह्मसमाज
अशा ह्या कोनाकोप-यातील शहरातही ब्राह्मसमाजाची स्थापना होऊन ३०-४० वर्षे झाली. कालिकतच्या बाजूने येथे आगगाडी तर अगदी अलीकडेच आली. तोपर्यंत येथे यावयाचे तर जलमार्गानेच. तोही मार्ग पावसाळ्यात चार महिने बंद व बाकीच्या आठ महिन्यांत आता कोठे सुखाचा झाला आहे.
अशा अडचणीत ब्राह्मधर्माचे बी कोठून व कसे येऊन पडले व त्याचे झाड आज कसे कसे फैलावले आहे, हे एक नवलच हे. हा सर्व इतिहास फारच मजेचा आहे. तो सर्व येथे देण्यास अवकाश नाही. ह्या समाजाचा वार्षिक उत्सव नुकताच साजरा करण्यात आला. त्यात विशेष हा की, येथील मंदिर लहान असून फार जुने झालेले होते, ते वाढवून पुन्हा बांधण्यात येऊन उत्सवाचे पहिले दिवशी (सप्टेंबर ता. २९ रोजी) उघडण्यात आले. त्या दिवशी समाजाचे अध्यक्ष परमपूज्य रघुनाथय्या ह्यांनी गावातील आमंत्रित प्रत्येक जातीच्या प्रतिनिधीच्या हातांतून अक्षता जमवून मंदिराच्या चारी बाजूला टाकल्या. त्यांत पंचम जातीचाही मनुष्य होता. ब्राह्ममंदिर हे सर्व जातींसाठी आहे. म्हणून हे सर्वांच्या हातांनी शुद्ध व सर्वांच्या आशीर्वादाने धन्य झाले, असा ह्या कृतीचा अर्थ होता. जुन्या मंदिराचा संकोच येथील मंडळीला बरेच दिवस भासत होता. येथील उद्योगी सेक्रेटरी रा. के. रंगराव म्हणाले, ह्याविषयी मी किती दिवस तरी मनात खंती बाळगीत होतो. आमच्या सार्वत्रिक ब्राह्ममंदिरापेक्षा ह्या गावातील ताडीवाल्या बिल्लव लोकांची भूतस्थाने ही कितीतरी विस्तीर्ण आणि सुंदर आहेत, असा मी वेदीवर बसून किती वेळां तरी प्रार्थनेत व उपदेशाचे वेळी आक्रोश केला होता. पण तिकडे कोणाचे लक्ष गेले नाही. शेवटी मंदिराचे बाजूवरील एका मोठ्या आंब्याच्या झाडालाच करूणा आली व ते अकस्मात मंदिराच्या मुख्यशाळेवर कोसळून पडले! मग काय विचारता मंदिराचे देवाने जणू नाकच कापले! आणि आम्हांला हे ऐसपैस नवीन मंदिर बांधावे लागले. ह्या मंदिरासाठी येथील वृद्धतरूण सभासदांनी अगदी अविश्रांत श्रम केले आहेत. आता सुमारे ३०० जण सुखाने बसून उपासना ऐकतील असा आश्रय झाला आहे. पण झालेले कर्ज फेडावयास व भोवतालचे कंपाउंड व आतील सामान विकत घेण्याला अद्यापि निदान दीड हजार रूपयांची फार नड आहे. ती भागविण्यासाठी काही तरूण मंडळी रजा घेऊन बाहेरगावी भिक्षेस निघणार आहेत. कदाचित मुंबईलाही एकादा येईल. का नये येऊ? उत्सवात नेहमीप्रमाणे सर्व प्रसंग झाल्यावर यंदा मराठीत कीर्तन झाले. येथील सारस्वत मंडळीला मराठीचा फार अभिमान वाटतो, विशेषत: बायकांना तरी गिर्वाण भाषेप्रमाणे पूज्य वाटते. म्हणून मंदिराकडे ज्यांनी कधी तोंडही फिरविले नव्हते अशा पुष्कळ स्त्रीपुरूषांची मंदिरात कीर्तनाचे वेळी गर्दी जमली होती.
नये मागे पाहो वाट फिरोनिया| दुसरा संगिया साहकारी||
ह्या तुकाराम वचनाच्या आधारे श्रीकृष्णचरित्राचे आख्यान लावण्यात आले होते. वावगे म्हणावे तर साक्षात श्रीकृष्णाचे चरित्र तुकारामाचे गाइलेले, चांगले म्हणावे तर त्याचा निस्पृहपणा केवळ दु:सह होता. म्हणून जमलेली गर्दी बुचकळ्यात पडून घरोघर गेली.
निराश्रित साह्यकारी मंडळी
दुसरा संगिया साह्यकारी याची वाट मागे फिरून न पाहता अस्पृश्य वर्गाच्या उद्धारार्थ काम आज जवळजवळ १३ वर्षे येथील ब्राह्मसमाजाचे सेक्रेटरी रा.के. रंगराव हे निश्चयाने करीत आहेत. हल्ली तर त्यांनी आपला २५|३० वर्षांचा वकिलीचा धंदा गेल्या ऑगस्टात आवरून संपूर्णपणे अंत्यंजांचीच सेवा स्वीकारली आहे. ते आपल्या कुटुंबासह आता ब्राह्ममंदिरासमोरील प्रचाराश्रमात येऊन राहिले आहेत, व नावाशिवाय अनभिषिक्त प्रचारकच बनले आहेत. स्वीकारलेल्या कामात वेळोवेळी त्यांची मित्रमंडळी त्यांचे दोष काढीत आहेत, त्यांना सरसकट एकच उत्तर म्हणून आपल्या टेबलाजळील भिंतीवर ‘Fault finders will find fault even in Paradise’. हे वाक्य भव्य अक्षरांनी एका तांबडद्मा फळीवर कोरून ठेविलेले आहे. त्यांच्या शाळेतील हजरेपटावर ७३ पारियांच्या मुलांची नावे आहेत. रोजची सरासरी सुमारे ६० आहे. एक मुलगा शिकून शिक्षक बनला आहे. मुले २|३ मैलांवरून शिकावयास येतात, म्हणून त्यांस दोनप्रहरचे एक जेवण शाळेत द्यावे लागते. ६ हातमागांपैकी तीन चांगले चालले आहेत. पण कापडाला मागणी चांगली नाही. कारण गिरणीतील हलक्या स्वस्त दराच्या व वरून सारखेच दिसणा-या नगापुढे हातमागाच्या भरीव पण महाग कापडाचा टिकाव लागत नाही. पण एरंडी रेशमाच्या किड्यांची लागवड करण्यात रा. रंगरावांनी बरेच श्रेय व प्रसिद्धी संपादन केली आहे. कोइमतूर येथील शेतकीच्या कॉलेजातून ह्या किड्यांसाठी त्यांच्याकडे पुष्कळ मागणी येत आहे. हे रेशीम तयार करण्याचे कामी उच्च शिक्षण मिळविण्याकरिता मि. मेलोथ नावाच्या एका अनुभवी गृहस्थास रा. रंगरावांनी मिशनच्या मार्फतीने बंगाल्यातील पुसा येथील कॉलेजात पाठविले आहे. मंगळूरच्या कलेक्टरसाहेबांनी ह्या कामगिरीचे महत्त्व जाणून सरकारातून ५०० रू. देणगी देवविली आहे. रा. मेलोथ हे लौकरच परत येतील व पश्चिम किना-यावर जागजागी मिशनची ठाणी उघडण्यात आपल्यास मदत करतील अशी रा. रंगरावांना मोठी उमेद आहे. रा. रंगरावांचे सर्वांत नावजण्यासारखे व मदतीस अवश्य पात्र असे काम म्हणजे मंगळूरहून एका मैलावरील एका सुपीक टेकडीवर त्यांनी घातलेली पारियांची वसाहत होय. तेथे हल्ली १७ कुटुंबाची कशी तरी सोय झाली हे. पैकी चौघांस मात्र पक्क्या इमारती मिळाल्या आहेत. बाकी तात्पुरत्या झोपड्यात आहेत. सरकारने इमारती लाकूड फुकट दिले असल्याने व मजुरी ज्याची त्यानेच पुरवावयाची असल्याने ३६ रूपयांत एका कुटुंबासाठी एक पक्के घर मिळेल अशी रंगरावांनी सोय केली आहे. ५० रू. दिल्यास दोन कुटुंबांची कायमची सोय होईल असे घर तयार होते. एकंदर साठ कुळे राहतील एवढी जागा आहे. इकडे श्रीमंत उदार गृहस्थांचे लक्ष जाईल काय? एक मोटारगाडी म्हणजे २०० पारियांच्या झोपड्या हे रंगरावांचे कोष्टक मुंबईचा एकादा भाटिया शिकेल तर गरिबांचे कोटकल्याण होणार आहे! ह्या वसाहतीत दोन विहीरी काढल्या आहेत. दोन्हींसही गोडे पाणी लागले आहे. पैकी एकीचा खर्च सुमारे ५०० रू. अंदमान बेटातील कैद्यांकडून मि. सदाशिव पिले नावाच्या एका सदगृहस्थाने जमवून दिला आहे; म्हणून तिचे नाव अंदमान विहीर असे पडले आहे. एकूण अंदमानातील कैद्यांना हिंदुस्थानातील पारियांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आहे काय?