यश परिणामात नसून प्रयत्नात आहे
[निराश्रित साहाय्यकारी मंडळीचा १६ वा वाढदिवस म्हणून पुणे येथे वार्षिक उपासना समारंभात केलेले प्रवचन ३१ ऑक्टोबर १९२१].
“निर्वैर व्हावे सर्व भूतासवे| साधन हे बरवे असे एक||” ही मंडळी १९०६ साली पाडव्याच्या दिवशी स्थापन झाली. तिच्यापूर्वी पाच-सहा वर्षे पूर्वतयारीत घालवावी लागली. त्यानंतर सर्व हिंदुस्थानातून प्रत्यक्ष काम आज पंधरा वर्षे सतत चालले आहे. पुढे काय होईल ते हरी जाणे. अस्पृश्याच्या प्रश्नाची नुसती जाणीव देखील पंधरा वर्षापूर्वी नीटशी नव्हती. आता अगदी जुन्या मताच्या लोकांनाही ह्या अन्यायाचे परिमार्जन झाले पाहिजे असे वाटू लागले आहे. इतकेच नव्हे तर अस्पृश्य वर्गाचीही झपाट्याने जागृती होऊ लागली आहे. ठिकठिकाणच्या शाखेतून मिशनमध्ये शिकलेली अस्पृश्य वर्गाची तरूण मंडळी हळूहळू आत्मोद्धाराचे काम करण्यासाठी मिशनमध्ये दाखल होऊ लागली आहे. मिशनला यश येण्याचे तुकारामांनी सांगितल्याप्रमाणे एकच साधन आहे. ते सर्वांशी निर्वैर होणे हे होय. पण हल्ली पहावे तो सर्वत्र वैराचे पीक माजले आहे. राष्ट्राराष्ट्रांतून, प्रांताप्रांतातून जातीजातींतून वैराची शेगडी पेटली आहे. फार तर काय एकाच कुटुंबात देखील कलहाची आग धुमसत आहे. एकाच व्यक्तीच्याठायी देखील द्विधावृत्ती भडकून तिची तारांबळ होत आहे. अशा ह्या कलियुगाचे वर्णन पूर्वीच्या लोकांनी कल्पनेने केलेले आमच्या प्रत्यक्ष अनुभवास येत आहे. चहूकडे वातावरण विषमय झाले असता त्यातच राहून आम्हाला हे निर्वैराचे साधन करणे भाग आहे. ह्या मंडळीच्या चालकांनी गेली पंधरा-वीस वर्षे हे जे तप केले आहे, त्यावरून निर्वैराचे महत्व त्यांना कळले आहे. परंतु वातावरणातच विष पसरल्यामुळे त्यांना हार खावी लागते. मिशनचे यश परिणामात नसून प्रयत्नातच आहे. हल्लीचे चालक विश्रांतीसाठी विराम पावतील, नवीन पुढे येतील. त्यांच्या ठिकाणी स्वत: अस्पृश्य वर्गच काम करू लागेल. पण काही झाले तरी अस्पृश्यतेला लागलेली ओहोटी बंद होणार नाही. तिचा काळ समीप आला आहे. तो आम्ही आमच्याच डोळ्यांनी पहाणार यात संशय नाही.