मुंबई येथील मानपत्रास उत्तर
काल मी स्टेशनवर उतरल्यापासून माझा जो सन्मान केला जात आहे, तो सन्मान माझा नसून अस्पृश्यतेच्या कार्याचा, माझ्याबरोबर सहकार्य करणा-यांचा तो गौरव आहे, अशा भावनेनेच मी माझ्या मनाविरुद्ध हे मानपत्र स्वीकारण्याचे कबूल केले. माझ्या ह्या कार्यामध्ये मला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, युरोपियन, पार्शी ह्या सर्वांनी मदत केलेली आहे, पण ती माझ्यावर मेहेरबानी होय असे मी समजत नाही. तर त्यांनी आपले कर्तव्यच बजावले, पूर्वऋण फेडले असे मी म्हणतो. हिंदुस्थानातील अस्पृश्यतेच्या ह्या कलंकाबद्दल व घोर अन्यायाबद्दल सर्व जग, सर्व मानवजात अपराधी आहे, असा माझा त्यांच्यावर आरोप आहे. ह्या कार्यास माझ्या भगिनी, आईबाप ह्यांनी रात्रंदिवस झटून मदत केलेली आहे. विरोध तर नाहीच नाही, नुसता आशीर्वादही नव्हे तर ह्या कार्यामध्ये माझे नोकर म्हणून माझ्या आईबापांनी मिशनमध्ये काम केले आहे. ग्लोब मिलच्या आजूबाजूची वस्ती म्हणजे पूर्वी नरकपुरीच होती, त्या ठिकाणी हरिजनांच्या आजारी बायांना आपल्या अंथरुणात निजवून घेऊन माझ्या आईने त्यांची सेवा निरपेक्षबुद्धीने केलेली आहे. महार, मांग, चांभार, धेडही प्रथम आम्हांला शिवून घेत नसत, मी कोणी ख्रिस्ती आहे, किंवा सरकारचा बगलबच्चा आहे, म्हणून ते आमच्याकडे पहात असत. वर्गणी जमविताना शिव्यांची लाखोली ऐकून घ्यावी लागे. कोणा आजा-याचे पथ्यपाणी करण्याकरिता माझ्या भगिनीला घरचा स्टोव्ह घेऊन जावे लागे, कारण आजारी हरिजनाच्या चुलीस शिवण्याची आम्हांस बंदी असे. खरोखरच त्यांच्या चुली पवित्र आहेत म्हणून अस्पृश्यतेच्या कार्याचे पावित्र्य निदर्शनास येत आहे. स्वराज्य मंदिरातील लाकडी दारे मोकळी केल्याने अस्पृश्यतेचा कलंक नाहीसा होणार नाही, पण आत्मिक दारेच उघडण्याने ते कार्य होणार आहे. महात्मा गांधी आज येथे आले असते तर त्यांना पूर्वीच्या एका गोष्टीची मी आठवण करून दिली असती. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, ‘गांधीजी मी मोठा देशद्रोही (फूट नोट – २३ एप्रिल १९२५.) (Traitor) आहे, कारण मला तुमचे स्वराज्य नको आहे, स्वराज्याचा नाद सोडून प्रथम तुम्ही महारवाड्यात जाऊन रहा कसे व प्रथम त्यांची अस्पृश्यता नष्ट करा पाहू, नंतर स्वराज्याच्या पाठीमागे लागा !’ महात्माजी त्यावेळी हसले व म्हणाले, ‘मि. शिंदे तुमचे म्हणणे बरोबर आहे, पण सध्या तरी मला माझ्या मताप्रमाणे वागू द्या.’
तुम्ही इतका खटाटोप करून प्रेमाचे प्रदर्शन केले. तेव्हा मानपत्र न स्वीकारणे म्हणजे माझ्यावर कृतघ्नपणाचा दोष आला असता म्हणूनच मला मान वाकवावी लागली, पण हे मानपत्ररूपी धन मी एक ट्रस्टी ह्या नात्याने ट्रस्ट म्हणून स्वीकारीत आहे. ह्या मानपत्रामुळे मी तुमचा केव्हाही मिंधा रहाणार नाही. मी जनाचे ऐकेन, पण मनाचेच करीन. प्रेमाच्या आंधळेपणामध्ये एका वक्त्याने मला विष्णू, महाविष्णू म्हटले, पण आईने आपल्या मुलास सोन्या, राजा, रत्ना म्हणण्यासारखेच ते आहे. अस्पृश्यता अजून नष्ट झालेली नाही, व ती नष्ट करण्याचा आपण कसून प्रयत्न कराल ह्या अटीवर मी ह्या मानपत्राचा स्वीकार करीत आहे. प्रथम आम्ही मिशन काढले, हरिजनापासून मदत घ्यावयाची नाही, असा आमचा दंडक असे, पण पंधरा वर्षांनी त्यांचा उद्धार करण्यास ते समर्थ आहेत व तसेच झाले पाहिजे म्हणून सर्व मिशन आम्ही त्यांच्या हवाली केले. ईश्वर करो आणि ही अस्पृश्यता लवकरच नष्ट होवो !