राजा राममोहन व बुवाबाजी
श्री. राममोहनाच्या पवित्र कथनाला बुवाबाजीचे अमंगळ शेपूट का लावण्यात आले अशी शंका कोणास येण्याचा संभव आहे. हे चरित्र पुष्कळदा सांगण्यात आले आहे. हल्ली महाराष्ट्रात बुवाबाजीचा वणवा पेटला आहे. त्यावर राममोहन रायांचे चरित्रात काय उपाय सापडण्यासारखा आहे हे पहाण्याचा आजच्या प्रवचनाचा उद्देश आहे. बुवाबाजी हा रोग आजकालचा नाही. धर्माचा दिवा जसा सनातन आहे तसाच त्याच्या खालचा अंधारही सनातन आहे. आणि त्याचा निषेधही पुरातन काळापासून होत आलेला आहे. आमचे मित्र महादेव शास्त्री दिवेकर ह्यांनी जी ह्या रोगावर मोहीम चालविलेली आहे तिला कोण वावगी म्हणेल ? उलट केवळ तमासगिराप्रमाणे ही मोहीम पाहात व व्याख्याने ऐकत न बसता सर्वांनी तिला शक्त्यनुसार हातभार लावावा असेच कोणालाही वाटेल. मात्र ह्या मोहिमेसंबंधाने हल्ली जो सरकारी कोर्टात एक खटला चालला आहे त्याशी आजच्या प्रवचनाचा कसलाही संबंध नाही. अमूक एक बुवा चांगले अथवा वाईट, अमूक एक महाराजांचे अमूक एक कृत्य समर्थनीय आहे की, आक्षेपार्ह आहे, अशा विशिष्ट विचारास आमच्या प्रवचनास जागा नाही. कोर्टात खटला चालला असता त्याचा निकाल होईपर्यंत वादी किंवा प्रतिवादीसंबंधाने कायद्याच्या आधारावाचून सहानुभूती किंवा दूषित ग्रह निर्माण करणे हा शिष्टाचार नव्हे. (हा निर्बंध व्याख्यात्यांनी आपणावर व मागून बोलणारांवर घातला आणि सभेत तो शेवटपर्यंत पाळण्यात आला.) बुवाबाजीच्या मुसळाचे महादेवशास्त्र्यांना जर समग्र उच्चाटन करावयाचे असेल तर त्यांनी आपल्या स्वतःच्या हृदयात विषमतेच्या कुसळास जागा देऊन चालणार नाही. बुवाबाजीचे मूळ जुन्या धर्मातील निवृत्तीवादात आहे, विशेषतः बुद्ध धर्मातील भिक्षूसंप्रदायात आहे, असे मागे एका व्याख्यानात शास्त्रीबुवांनी सांगितले होते, पण ते खरे नाही. वेळोवेळी जे आक्षेपार्ह बुवा उद्भवतात ते (वाई येथे ता. ३० सप्टेंबर १९३४ रोजी केलेल्या प्रवचनाचा सारांश. सुबोध पत्रिका, ७ ऑक्टोबर १९३४) स्वतः निवृत्त मुळीच नसतात. ते प्रवृत्त असतात, इतकेच नव्हे तर दुष्ट प्रवृत्तीचे असल्यामुळे त्यांना निवृत्तीचे सोंग आणावे लागते. ह्या सोंगाची जबाबदारी निवृत्तीवादाकडे कशी येते ? विशेषतः बुद्ध धर्माविरुद्ध पक्षपाती उल्लेख शास्त्रीबुवांनी करावयास नको होता. एवढा इशारा ध्यानात घेऊन शास्त्रीबुवांच्या ह्या धर्मसंशोधनाच्या चळवळीला सर्वांनी पाठिंबा द्यावा. बुवाबाजीचे मूळ अवतारवाद किंवा गुरुसंप्रदाय ह्यात आहे असे कोणी एकाने सुचविले होते ते खरे आहे. ब्राह्मसमाज ह्या अवतारवादाच्या अगदी विरुद्ध आहे. हे खूळ हिंदूधर्मातील असो किंवा बौद्ध, ख्रिस्ती, मुसलमान अगर कोणत्याही इतर धर्मांतील असो, श्री. राजा राममोहन रॉयांनी ह्यावर सारखे खडतर शस्त्र चालविले होते आणि त्यांना सर्व देशाच्या आणि काळाच्या धर्मोद्धारक संतांचा पाठिंबा आहे. तसेच ह्या निषेध करणा-या संत पुरुषांचा लोकांकडून छळही झाला, हेही खरे आहे. ह्या स्पष्टवक्तेपणाबद्दल साक्रेटीसला विषाचा पेला आणि ख्रिस्ताला शूळ मिळाला, बुद्धाची तर अजून नालस्ती चाललीच आहे. आणि तिला डॉ. केतकर आणि दिवेकर शास्त्र्यांचाही हात लागत आहे ! मग राजा राममोहन रॉयांचा ह्या संशोधन कार्याबद्दल छळ झाला ह्यात काही विशेष नाही. संत आणि बुवा हे जणू सावत्र बंधूच आहेत असे दिसते. वारकरी पंथातील ज्ञानेश्वरापासून तो तुकारामाच्या नंतरही तत्कालीन बुवांचा समाचार घेण्यात आला आहे.
कैसा जोग कमाया बे । ये क्या ढोंग बनाया बे ।
जटा बढाई बीभूत चढाई, जगमे कहता सिद्धा ।
सिद्धनको तो बात न जाने, बालपनोका गद्धा ।।
ही कबीरवाणी प्रसिद्धच आहे. (सभेला काही मुसलमान व ख्रिस्ती लोकही आले होते. श्री. शिंदे ह्यांनी जेव्हा खालील पद हिंदीत खड्या आवाजात म्हणून दाखविले, तेव्हा त्याचा फार परिणाम झाला).
बिना फिकर फकीरी करना । क्या जोर जुलूम बतलाना ।
बिना हरफ बिसमिल्ला अल्ला । बिनदम होके कहना... ।।धृ।।
बिना नजर नुक्तोंको देखे, कायको किताब होना । क्या जोर...।।१।।
बिना कलमसे कलमा भरना । बीन कानोंसे सुनना ।
बिना पैर मक्केको जाना । बीन हात मेवा लाना । क्या जोर...।।२।।
बिना रुके हिंदू तुर्के । मुंजखतना क्या करना ।
शामनाथ साहेबको देखे । अबकानूर छिपाना । क्या जोर...।।३।।
ख-या फकिराचे हे आध्यात्मिक उच्च स्थान ध्यानात आणता ढोंगी फकिराची कशी वाताहात होते, अल्लाचे नाव घेण्याला अक्षराचीही जरुरी नाही, ऐकण्याला कानाची जरुरी नाही, मक्केला जाण्याला पाय नकोत, मेवा आणावयास हात नकोत, शुद्ध मुसलमान व हिंदूंना सुंता व मुंज नको व अशुद्ध आहेत त्यांना हे इलाज चालत नाहीत. शामनाथाने अशा चैतन्यमय साहेबाला पाहिल्यावर तो कसा लपवू शकेल. एकंदरीत ख-या फकिराला कसलीही फिकीर नाही आणि इकडे हे बुवा पाहिले तर सर्वांचेच मिंधे असतात.
दिवेकर शास्त्री म्हणतात की बुवा तेथे बाया असतात, पण बुवांचे खरे मूळ बायातच. बाया म्हणजे नुसत्या स्त्रियाच नव्हेत, स्वतंत्र विचार नसलेले, आपल्या मताप्रमाणे वागण्याचे धैर्य नसलेले, व्यावहारिक जगाची माहिती नसलेले असे सगळे मिशाळ पुरुष बायाच समजावेत ! स्त्री असो, पुरुष असो, अशा माणसांचे भरताड बहुजन समाजात झाले की, तेथे बुवा निर्माण व्हावयाचेच ! कचरा झाडला नाही व तेथे थोडासा दमटपणा होऊ दिला तर घरच्या अंगणातही निवडुंग माततो, तसाच प्रकार समाजातही होतो.
दीडशे वर्षांचे पूर्वी राजा राममोहन रॉयांचे वेळी हिंदुस्थानात विशेषतः बंगाल्यात जनतेची स्थिती अशीच केविलवाणी झाली होती. पुरुषांची किंमत बायकांहून कमी व बायकांची निर्माल्याहून कमी झाली होती. शाक्त आणि वैष्णव हे दोघे वाममार्गाला लागले होते. दुर्गा ह्या अधम दैवताने धर्मक्षेत्रात आधिपत्य मिळविले होते. बंगाल्यातल्या अर्ध्या अधिक बोकडांचा बळी ह्या देवतेला दिला जात असे, प्रत्येक शाक्ताला एक अन्य धर्मीय आणि विदेशी बाई शक्ती म्हणून ठेवण्याची रूढीने परवानगी दिली होती. बहुपत्नीकत्वाला ताळच राहिला नव्हता. नवरा मेला की ह्या सर्व बायांना जाळण्यात येत असे. ह्या भयाण बुवाबाजीला राममोहन रॉयांनी तोंड दिले.
बुवाबाजी नष्ट करावयाची म्हणजे जनतेतील अडाणीपणा, नेभळेपणा, परावलंबन इत्यादी दोष काढावे लागतात. म्हणून राजा राममोहन रॉयाने अबलोन्नती व लोकशिक्षण ही शस्त्रे उगारली. त्याने जे प्रचंड धर्मसंशोधन केले त्याचा व्यावहारिक हाच हेतू होता. बुवांचे पाठीमागे ज्या बाया लागतात त्या बहुतेक पांढरपेशाच्याच असतात. अशा बायांना पोटासाठी काबाडकष्ट करण्याची जरुरी नसते. दुर्दैवाने जरुरी पडली तरी सवय नसते, पुरुषवर्ग किती ज्ञानी आणि अतिज्ञानी असला तरी ते आपल्या बायकांना अडाणीच ठेवतात. शरीराला काम नाही आणि मनाला ज्ञान नाही, मग अशा बायकांना चाळे सुचावे ह्यात नवल काय ? राममोहन रॉयांनी जो लोकशिक्षणाचा मार्ग स्वीकारला तोच अशा आपत्तीला उपाय आहे.
बुवाबाजीची साथ काबाडकष्ट करून पोट भरणा-या अगदी खालच्या वर्गात उद्भवणे शक्यच नाही. ह्या वर्गात गाढ अज्ञान असले तरी पोटाचा लकडा मागे लागल्यामुळे त्यांना त्यांचे अज्ञान बाधत नाही. म्हणजे त्यांना चाळे सुचत नाहीत. पण ऐतखाऊ पांढरपेशावर्गाची स्थिती निराळी. पुरूष दुबळे असल्याने आपल्या बायकांना संतुष्ट ठेवण्याचे सामर्थ्यच त्यांच्यात नसते. कामधंदा नाही, सारासार विचार नाही, घरी संतोष नाही, अशांनी धर्माचे उपद्व्याप करू नयेत तर काय करावे ?
पुराणिक, कीर्तनकार, देवऋषी, भुताटकी करणारे वगैरे धटिंगणांना ह्या कुरणात चरावयाला आयतीच जागा मिळते. घरात ढेकूण झाले तर एकेक ढेकूण वेचून चिरडीत बसण्याने ते कमी होत नाहीत. साफ-सफाई आणि कीटकविध्वंसक औषधे हाच उपाय आहे. म्हणून राजा राममोहन रॉयांनी समाजसंशोधनासाठी कंबर बांधली, त्यांना प्रचंड यश आले आणि आजकालच्या समाजसंशोधकांना यश येत नाही ह्यांचे कारण ते मोठे आणि आम्ही लहान हे नव्हे. त्यांचा मार्ग खरा होता आणि तो खरा होता हे आम्हांस कळत नाही व कळले तर वळत नाही.
दहा वर्षांत राममोहन रॉयांनी सतीच्या रूढीचे डोंगर पालथे घातले आणि आता महात्माजीसारख्यांना अस्पृश्यतेपुढे हार खावी लागत आहे ! ह्याचे कारण पाहिले तर तितका निर्भिडपणा आणि कठोरपणा आमच्यात नाही. बुवांच्यावर दातओठ खात बसण्यापेक्षा घरच्या बायांना अधिक न्यायाने वागविणे, आपण भोगतो ते स्वातंत्र्य त्यांना देणे, त्यांच्यावर घालतो ते संयमन आपल्यावर घालून पाहणे हा मार्ग बरा नव्हे काय ?
सर्व बाया स्वतंत्र झाल्या, आत्मसंरक्षणास योग्य झाल्या, धार्मिक बाबतीत स्वतः विचार करू लागल्या तर बुवाबाजी आपोआप संपुष्टात येईल. तृण नाही तेथे पडला दावाग्नी । जाय विझोनी आपसया । हे तुकारामाचे विधान अनुभवास येईल. दिवेकर शास्त्र्यासारखे संशोधक ह्या पुण्यतिथीच्या मुहुर्ताने राममोहन रॉयांची कदर ओळखून वागतील तर त्यांचे प्रयत्न भरीव व परिणामकारक होतील व तसे ते होवोत ही प्रार्थना आहे.