राजा राममोहन रॉय
हिंदुस्थानचे चरित्र सध्या पडत्या कलेवर आहे, तरी पण आता संपत आलेल्या चालू सहस्त्रकांत इंटरनॅशनल कौन्सिलसारख्या इहलोकीच्या दरबारात हिंदुस्थानचा प्रतिनिधी म्हणून कोणी पाठविण्याच्या योग्यतेचा मनुष्य असेल तर तो एक राजा राममोहन रॉयच दिसतो. त्याच्या जवळजवळचा मान कदाचित अकबर बादशहास देता येईल. पण त्यास भरतभूमीचा औरस वारस म्हणता येणार नाही. आम्हां ब्राह्म लोकांस राजा राममोहन रॉय हा ब्राह्मधर्माचा संस्थापक म्हणूनच मोठा वाटेल, परंतु तो भाग सोडून आपण ब्राह्म नाही समजून, शुद्ध मनाने चिकित्सा केली तरीही माझे वरील विधान कबूल करावे लागेल ह्यात शंका नाही. पण मौज ही आहे की अद्याप आम्हांलाच ब्राह्मसमाजांच्या सभासद लोकांना—त्याची खरी योग्यता नीटशी कळून आलेली नाही, निदान आमच्या कृतीवरून तरी असे दिसते. आधी आम्ही गुरु, ईश्वरात, आम्हात मध्यस्थ कोणी मानीत नाही. राजा राममोहन रॉयाला त्या अर्थाने गुरु नका मानू. पण त्याने केवढे धर्मकार्य, सत्कृत्य केले, हे मनात आणून तरी त्याच्याविषयी किती पूज्यबुद्धी पाहिजे, ती आमच्यात आहे काय ? ज्याने आम्हांला नीट मार्गाला, वर्तनाला लाविले, त्याच्याकरिता आम्ही काही करतो काय ? एक बाजूस जुने लोक तर गुरूची पूजाच करतात, त्याला डोकीवर घेऊन नाचतात, किती अयोग्य असे ढंग माजवितात ! तर उलटपक्षी आमच्या ब्राह्मसमाजाच दुस-या प्रकारचा अतिरेक दिसून येत आहे ! म्हणजे समाजसंस्थापक कोण, काय, इतके साधारण जरी अवगत असले, तरी ते तेवढ्यापुरते माहीत ! आम्ही दर वर्षी त्याच्या पुण्यतिथीचा उत्सव करतो, पण त्याचे स्मारक काय करतो ? कलकत्त्यास तर त्याचे काही अद्याप स्मारक झालेले नाही. आपल्या इकडे हा राममोहन आश्रम आहे, राममोहन सेमिनरी म्हणून बांकीपुरास आहे एवढेच, पण निरपेक्ष बुद्धीने मुद्दाम त्याचे स्मारक म्हणून काही आहे काय म्हणून पाहिले तर काय दिसते ? एका आश्रमाची आपल्याला (फूट नोट – ता. २७ सप्टेंबर १९०५ रोजी सकाळी दिलेले व्याख्यान.) इकडे उणीव भासत होती म्हणून एका उदार बंधूंनी आश्रम बांधून दिला व त्याला नाव काही तरी द्यावयाचे ते राममोहनाचे दिले, तसेच तिकडे शाळेची गरज होती, ती शाळा निघाली व नाव दिले राजा राममोहन सेमिनरी, असेच नाही तर काय ? पण खरोखर काहीच हितसंबंध न ठेवता केवळ राममोहनास अर्पण म्हणून कोठे काही आहे काय ?
पण आज मी तो नुसता मोठा आहे, मोठा आहे म्हणून रहात नाही. तर ह्या विभूतीचे चरित्र दोन बाजूंनी कसे निरखता येते ते आपण आता पाहू. माझ्या मते राममोहन रॉय सन १७७२ त जन्मला व सन १८८४ त वारला. वास्तविक केशवचंद्र सेन त्या वर्षी वारला, पण मी म्हणतो राजा राममोहन रॉयच तेव्हा वारला. राममोहनरूपी पर्वताची रांग, व त्याची एक शाखा केशवचंद्र आणि एक शाखा देवेंद्रनाथ ह्या तिघांच्या जीवनचरित्रात एकच दैवी हेतू सिद्ध झालेला आहे. तो हेतू सन १८८४ मध्ये परिपूर्ण झाला. इतका हा राममोहन मोठा आहे. साधू निर्माण होतात, त्यांचे चरित्र बहुधा अर्धेच संपलेले प्रत्ययास येते. ज्युलियस सीझरकडे पाहावे, तर त्याचा दगलबाजीने पण अकस्मात मृत्यू होऊन शेवटी तो व त्याच्या पाठीमागचा ऑगस्टस ह्यांच्यायोगे ती एक विभूती पूर्ण झाली म्हणावयाची. पण जो राममोहन १८३३ मध्ये वारला तो सुद्धा किती मोठा होऊन वारला हे आता आपण पाहू. येथे दोन दृष्टी ध्यानात ठेवाव्यात. एक सूक्ष्म दृष्टी व एक स्थूल दृष्टी. वृक्ष सुंदर दिसतो तो स्थूल दृष्टीने, म्हणजे स्थूलसुंदर होय व माझ्या समोरचे हे फर्नचे रोप सूक्ष्मसुंदर समजावे. पर्वत दोन-तीन मैलांवरून पाहिला, तरच सुंदर दिसेल. त्याच्यावर सूर्याचे किरण पडलेले असून जे रंग दिसायचे ते दुरून पाहिले तरच. पण ह्या फर्नचे किंवा ह्याहूनही लहान कोवळ्या फर्नचे पहावे, तो देठ कोमल, बुंधा लहान, कुंडी चहाच्या पेल्यापेक्षा फार मोठी नाही, कोमल कांती, ह्या बारीक बारीक रेषा, असे हे नाजूक झाड, दहा-पाच पावले लांब गेलो की मग ह्याचे सौंदर्य काय दिसायचे आहे ? हे पाहायला त्याच्या जवळ जाऊनच निरखले पाहिजे, न्याहाळले पाहिजे. कारण हे सौंदर्य लहान प्रमाणावर आहे. तोच पर्वत फार जवळ पायथ्याशी जाऊन पाहिला तर काय दिसणार ? ती काटेरी झाडे, दलदलीची जागा वगैरे काष्ठमय देखावाच दिसणार. पण त्याची गंभीर शोभा पाहावयाची असल्यास त्याच्यापासून दूर गेले पाहिजे. राममोहन रॉयांचे दोन्ही दृष्टीने सौंदर्य दिसून येण्यासारखे आहे. ते कसे ते आता थोडक्यात पाहू.
प्रथम तर सूक्ष्म सौंदर्य घेऊ. नुसते राममोहन रॉयाचे शारीरिक स्वरूपच घेतले तर तेसुद्धा किती मनोहर होते ! राजा राममोहन रॉय जरी राजकुलात जन्मला नव्हता तरी तो राजबिंडा असा दिसत होता. ती त्याची सहा फूट उंची, विशाल भाल, सुंदर केस वगैरे त्यांचे जे शरीरवर्णन दिलेले आहे, ते एकाद्या कादंबरीमध्ये जसे सुंदर नायकाचे वर्णन करावे तसे आहे. तो विलायतेस गेला तेव्हा एका इंग्लिश बाईने आपल्या लहानपणी त्याला पाहिले होते. त्या बाईला त्याची चांगली आठवण होती. मला ती भेटली असताना एकदा सांगत होती की राजा राममोहन रॉयमध्ये आमच्या राजापेक्षाही एक प्रकारची विशेष गंभीरता वगैरे दिसत होती. तो गंभीर रीतीने चाले, गंभीर हासे, त्याचे सर्व करणे गंभीरतेने परिपूर्ण असे.
त्याचा स्वभाव पाहिला तर तो त्याच्या शरीराप्रमाणेच उमदा होता. तो वादात कधी जहाल जात नसे. तो पुष्कळ वादी म्हणजे वाद केलेला मनुष्य. पुष्कळ मोठमोठ्या स्वदेशी, विदेशी शास्त्री, पंडितांशी त्याला वाद करावे लागले, पण वाद करताना अशा काही मधुर शब्दांनी तो करावयाचा की दुस-याच पक्षाला, प्रतिवाद्यावर चिडणे वाईट हे दाखवीत असे व आपण चिडत नसे.
तो ज्ञानी व बुद्धिमान किती होता ! कित्येक भाषांत तो पारंगत—संस्कृत, पर्शियन, आरबी, इंग्रजी, लॅटीन, ग्रीक इ. आणखी जगला असता तर आणखी काय काय शिकणार होता कोणास ठाऊक ! बंगाली भाषाही त्याने उत्पन्न केली, व्याकरण ग्रंथ लिहून ती नियमबद्ध करून ठेवली, म्हणून बंगाल्यात त्याला बंगाली भाषेचा जनक मानतात व मान देतात. आधुनिक धर्मशास्त्र जेव्हा बनत होते तेव्हा त्याचा संस्थापक तो, असे मॅक्समूलरने म्हटले आहे.
तो मनस्वी कर्मीही होता. प्रजेचे पाठबळ घेऊन राजावर तोंड सोडू नये, व राजाचे पाठबळ घेऊन प्रजेवर तोंड सोडू नये ही वृत्ती त्याने आमरण ठेविली होती. त्याने राजा व प्रजा ह्यांमध्ये उत्तम मध्यस्थाचे काम करून परस्परांच्या अडचणी परस्परांस कळवू देऊन दोघांचे मार्ग सुगम करण्याचे श्रेय घेतले. वर्तमानपत्रांचा कायदा निघाला तेव्हा तो राजाशी ह्या धडधडीत अन्यायाबद्दल भांडला. पण निळीची लागवड युरोपियनांकडून करण्यासंबंधाचा प्रश्न निघाला तेव्हा प्रजेशीही भांडून युरोपियनांना वसाहत करून राहू द्या असे स्पष्ट म्हणण्यास तो चुकला नाही. मोगलांकडून राजा हा किताब घेऊन त्यांच्या वतीने भांडण्यास तो पार्लमेंटापर्यंत गेला. सारांश स्वदेशातीलच काय, पण परदेशी राजकीय प्रश्नात तो अग्रेसर होता. त्याचप्रमाणे सामाजिक गोष्टीतही त्याचे प्रयत्न महशूर आहेत. धार्मिक, औद्योगिक आदिकरून सर्वांतच त्याची मती चालत असे.
त्याचप्रमाणे त्याचे अंतःकरण रसिक होते. कोणी कोणी तर्कवितर्कात पडून ब्रह्मास पाहिले असूनही न पाहिल्यासारखे होऊन अंतःकरणाने रुक्ष बनून जातात, पण राजा राममोहन रॉय हा योगी तसा भोगीही होता. कलकत्त्यात त्याची दोन घरे होती. एकात योग्याची संपत्ती तर दुस-यात अगदी नवीन त-हेच्या इंग्रजी सामानसुमानाने अपूर्व शोभा आणलेली. शोभा व सौंदर्य ह्यांचा तो भोक्ता होता. कवित्वही त्याने बरेच केले आहे. हा म्हणजे विषय, हे म्हणजे कनिष्ठ, त्याज्यच असे त्याला वाटले नाही. सर्व विषय देवाने निर्मिले आहेत, त्यांचा त्याने चांगल्या रीतीने स्वाद भरपूर घेतला. असा तो ज्ञानी, कर्मी, रसिक होता. राममोहन म्हणजे जणू तत्कालीन एक सहस्त्रदल कमलच फुलले की ज्याची प्रत्येक पाकळी उमलून गेली होती. त्याने दहा वर्षे सरकारी नोकरी करून हजारो रुपये साठवून इतके धर्मादी कार्य केले. त्यासाठी तो कोणाचा पगारी नोकर नव्हता ! हे सगळे त्याचे सूक्ष्मसौंदर्य. कारण हे सर्व करून तो गेला असता, तर आता मागे तो एवढा राहिला नसता. एकादे फूल कितीही सर्वांगसुंदर व विकसलेले असले, तरी ते एकदा का सुकून गेले, मग त्याचे काही राहत नाही. तेव्हा राममोहन एका दृष्टीने म्हणजे सूक्ष्मसौंदर्याच्या दृष्टीने पाहिले असता सर्वांगसुंदर विकसलेल्या फुलाप्रमाणे होता पण त्याची दुसरी बाजू पाहिली म्हणजे तो पर्वताप्रमाणे स्थूलसुंदर असे सहजी दिसून येईल.
ह्या जगात कोणी एक दिवसाची माणसे असतात, तर कोणी एक आठवड्याची, कोणी वर्षाची तर कोणी एका पिढीची अशा प्रकारची माणसे असतात. परवा प्रसिद्ध मल्ल सँडो आला, तेव्हा मुंबईत त्या आठवड्यात सर्वांच्या तोंडी सँडो होऊन गेला होता. त्याचप्रमाणे राममोहनाचे अंगी नुसते सूक्ष्मसौंदर्यच असते, तर तो आपल्या वेळच्या पिढीचा नायक इतकाच होऊन राहिला असता. पण राममोहन ही विभूती इतक्याचपुरती नव्हती हे आपणांस दिसत आहे.
राममोहनाचे मोठेपण आम्ही ब्राह्मसमाजाच्या मंडळीनेही अजून पाहिले नाही. ह्याचे एक कारण उघड आहे. कालतः आम्ही जितके दूर गेलो असता ते मोठेपण अधिक प्रमाणावर दिसून येईल तितके अद्याप आपण गेलो नाही. पण ह्यात आपला दोष नाही. सध्याच्या कालमानाने त्याचे महत्त्व जितके आपल्या अंगी बाणले पाहिजे ते जर हलगर्जीपणा किंवा अशा काही कारणांमुळे बाणले नसले, तर मात्र आपण दोषी होऊ. हा मुंबईला राजाबाई टॉवर आहे. उंच आहे, दिसायला सुंदर आहे. पण त्याच्या अगदी जवळ जाऊन उभे रहा, म्हणजे एकावर एक दहा दगड मांडून जेवढी उंची होईल तेवढ्याच उंचीचा भाग आपल्या नजरेत भरेल, जास्त नाही, तेच दूर जाऊ लागा म्हणजे हळूहळू त्याचे समग्र रूप ध्यानात येईल. तसेच आणखी दोनशे वर्षे जातील तेव्हा राममोहनाची कृती अधिक डोळ्यात भरेल. आपण आज त्याचे अंकी, मूल मातेच्या अंकावर चढून बसते त्याप्रमाणे बसलो आहो. पण कालगतीने त्याच्या पासून लांब गेल्यावर काय काय दिसेल ह्याची आपणांस कल्पना करता येते. कारण त्याचे बीज त्याच्या चरित्रातच आहे. बाकीच्या त्याच्या सर्व गोष्टी दोन-तीन हजार वर्षांनी विसरून जाण्यासारख्या आहेत. पण मुख्यतः दोन गोष्टी मला चिरस्थायी दिसतात. एक तर राष्ट्रीयता व सार्वत्रिकता ह्यांच्यामध्ये साधारण लोकांच्या व्यवहारात भेद दिसून येतो, तो राममोहनाचे मतात व वर्तनात कोठे नव्हता. त्याने दोन्ही गोष्टींची संगती कशी सुरेख लावून दिली होती ! राममोहन मोठा राष्ट्रभक्त होता. पण आपल्या मनाचा भाव अमुक एका रीतीने ठेवला पाहिजे की त्या रीतीने ठेवला म्हणजे ह्या दोन गोष्टी एक होऊन जातात हे राममोहनास पक्केपणी कळलेले होते. ज्ञान, भक्ती, कर्म इ. जीवनाचे सर्व भाग व्यापून टाकणारा असा सार्वत्रिक धर्म त्याने मनात आणिला. तो मोघम, केवळ कल्पनेच्या लहरीत तरंगणारा नसून सगळ्या विशिष्ट गोष्टींत तो जाऊन भिनणारा आहे. कोणताही भाव जो व्यक्तीत, तोच कुटुंबात, तोच राष्ट्रात, तोच सा-या जगात असा खरोखरी प्रकार आहे.
राममोहनाच्या स्थूलसौंदर्याचे दुसरे लक्षण म्हणजे त्याने पाहिलेला सार्वत्रिक धर्म अनुसरण्याकरिता प्रत्यक्ष समाजाची स्थापना केली हे होय. हीच दुसरी चिरस्थायी गोष्ट आणि आम्ही ज्या ज्या अंशाने ब्राह्म होऊ किंवा होत जाऊ त्या त्या अंशाने त्याचा मोठेपणा आपणांस दिसून येईल.
अशी ही राममोहन विभूती आहे. ‘अणोरणीयान् महतो महीयान्’ हे जसे ईश्वराचे वर्णन आहे, तसेच जवळजवळ ते त्याच्या विभूतीचेही म्हणता येईल. कोणी विभूती नुसती स्थूलच होऊन जाते, नेपोलियन, शिकंदर, तैमूरलंगादी मूर्ती ह्या प्रकारातील होत. म्हणजे त्यांचे ठायी सूक्ष्मसौंदर्य नव्हते. हे सर्व दूर गेले आहेत म्हणून ठीक आहे. त्यांचे तेवढे ते दुरून सुंदर दिसणारे रूप मात्र पाहून घ्यावे. ज्यू लोकांची संशुद्धी करणारा, नेब्रू केनेझार तोही “Instrument of God” म्हणजे देवाने हातात घेतलेला कोयताच होय. त्याच्या योगाने यहुद्यांना शिक्षा देऊन देवाने जागे केले. प्लेग आपल्याला स्वच्छ राहायला शिकवितो. गावाबाहेरची मोकळी शुद्ध हवा घेण्यास लावितो. हे सर्व चांगले आहे. पण प्लेग काय स्वतः आहे ! तीही ईश्वराची अक्राळविक्राळ विभूतीच ! नानाप्रकारच्या विभूती आजवर झाल्या, पुढे होतील, यांनी मोठी कामे करून टाकली, उत्पात करून सोडले. काही विभूती नुसत्या स्थूल व काही भयंकर म्हणून त्यांची अद्याप आठवण आहे. काही नुसत्या सूक्ष्म. त्यांचा आता कोठे मागमूसही नाही. व कोणी हे दोन्ही गुण अंगी वागविणा-या त्यांमध्येच राजा राममोहन रॉय हे आपल्या सूक्ष्म व स्थूलसौंदर्याने येतात. त्यांच्या पुण्यतिथीचे व एकंदर चरित्राचे महत्त्व आपण नेहमी लक्षात धरावे.