लुटूपुटूची पार्लमेंट
धर्म व नीतिशिक्षणावरील वाद
यंग थिइस्टस् युनिअन संस्थेने ह्या महिन्यापासून काही उपयुक्त विषयावर पार्लमेंटच्या पद्धतीने वादविवाद करण्याची पद्धत सुरू केली आणि असे प्रसंग तूर्त महिन्यातून एक वेळ घडवून आणण्याचे ठरले. ह्या उद्देशास अनुसरून तारीख २३ रोजी ह्या पार्लमेंटची पहिली बैठक झाली. बरीच मंडळी हजर होतो. ‘स्पीकर’ चे जागी युनिअनचे अध्यक्ष रा. रा. शिंदे ह्यांची योजना झाली होती. धार्मिक व नीतिशिक्षणाची आवश्यकता आहे किंवा नाही हा वादाचा विषय नव्हता. तर असे शिक्षण सार्वजनिक शाळांतून व कॉलेजांतून द्यावे किंवा कसे हा प्रश्न आज पार्लमेंटपुढे असल्याचे स्पीकरनी प्रथमच बजावून सांगितले. रा. रा. भांडारकर व रा. शिराजी ह्यांनी धर्मशिक्षण शाळातून दिले पाहिजे ह्या बाजूची भाषणे केली. अपोझिशनच्या वतीने रा. त्रिवेदी व रा. नाईक ह्यांची भाषणे झाली. पहिल्या पक्षाचे असे म्हणणे पडले की, आमची सर्व घडी जी बिघडली आहे ती धर्म शिक्षणाच्या द्वारे सुधारता येण्यासारखी आहे. उलट पक्षाचे म्हणणे असे की, धर्मशिक्षण हा शाळा व कॉलेजे ह्यांचा विषय नव्हे. त्याच्या योगे आम्ही भलत्याच अडचणी उपस्थित करू.
दोन्ही पक्ष अशा रीतीने पुढे आल्यानंतर विषय वादविवादास मोकळा झाला असे स्पीकरने ठरविले. प्रथम डॉ. सुखटणकरांचे भाषण झाले. त्याचा सारांश असा होता की, भारतधर्म महामंडळाने ह्या प्रश्नाची उचल जरी घेतली आहे तरी केवळ त्या मंडळास मान्य असणारा धर्म शाळांतून शिकवावा असे आमचे म्हणणे नाही. सर्वमान्य धर्मतत्त्वाचे शिक्षण द्यावयाचे ते लायक शिक्षकांच्या द्वारे द्यावयाचे आहे आणि आमच्या सुशिक्षित मंडळीतूनच अशी मंडळी निपजेल असा मला पूर्ण भरवंसा आहे. (अशी मंडळी निपजेपर्यंत ही व्यवस्था अंमलात येऊ नये असा सभागृहातून ध्वनी निघाला) आणि आम्ही ह्या मार्गाला लागल्यावाचून एकदम अशी लायक मंडळी निपजणार आहेत असे आपल्याला वाटते काय? अस्पृश्य वर्गाविषयी सहानुभूती नाही म्हणून ती ऐती तयार होऊन तिचा गठ्ठा हातात येईपर्यंत रा. शिंदे आपल्या कामास प्रारंभ करण्याचे थांबले काय? चांगले शिक्षक मिळत नाहीत म्हणून निराश्रितांसाठी शाळा उघडण्याचे त्यांनी थांबविले काय? नाही.
नंतर रा. केळकरांनी शाळांतून धर्मशिक्षण देणे केवळ अशक्य आहे म्हणून हा ठराव अगदी व्यर्थ आहे असे प्रतिपादले. रा. नाडकर्णी ह्यांचेही उलटपक्षास अनुकूल असे भाषण झाले.
स्पीकरच्या जागी थोडावेळपर्यंत रा. भांडारकर ह्यांची योजना झाल्यावर रा. शिंदे ह्यांचे भाषण झाले. त्याचा सारांश असा की, धर्मशिक्षण घरी मिळण्याची व्यवस्था होणे हा उत्तम पक्ष. निरनिराळ्या समाजाच्या खाजगी मंडळीनी ह्या शिक्षणाची जबाबदारी आपणावर घेणे हा गौप्पपक्ष आणि सार्वजनिक करावर चाललेल्या संस्थांतून ते द्यावे असे म्हणणे हा अशक्य व अनिष्ट पक्ष होय असे इतिहास सांगत आहे. हे शिक्षण शाळांतून शिकविताना परिणामकारक व्हावे असे जर वाटत असेल तर ते ऐच्छिक असून चालवायाचे नाही. आवश्यक केले पाहिजे. ऐच्छिक असल्यास ते बिनपरिणामी होण्याचा विशेष संभव आहे.
ह्यानंतर रा. भाजेकर वकील, डॉ. कामत व रा. केसकर यांची भाषणे झाली. अखेरीस मते घेण्यात आली. ९ सभासदांनी धर्मशिक्षण शाळा व कॉलेजे ह्यांत दिले पाहिजे असे मत दिले. २१ सभासदांनी विरूद्ध मत दिले व ९ सभासद तटस्थ राहिले. अशा रीतीने वादविवादात विरूद्ध पक्षाची सरशी झाली.