व-हाड मध्यप्रांतील सत्यशोधक हीरक महोत्सव
स्वागत मंडळाचे सभासद व सन्मान्य बंधु भगिनींनो,
मी दौ-यावर असताना आपले उत्साही चिटणीस श्री. बाबूराव भोसले ह्यांनी मला सापळ्यात पकडले व मी हजर राहण्याची कबुली दिली. आजच्या त्या सामाजिक व धार्मिक प्रसंगी राजकारण टाळाल व त्यातही आपले स्थानिक राजकारण बाजूला ठेवाल अशी मी अपेक्षा करतो. सत्यशोधनाचे काम करणे फार कठीण झाले आहे. तरूणाला ते फार सोपे वाटेल, पण माझ्यासारख्या
म्हाता-याला मात्र ते कठीण आहे. समाजकार्य करणा-याला मोठ्या अडचणी असतात. जगाला सोडून धर्मकारण करणे सोपे व सहज आहे. पण तसे समाजकारण नाही.
सत्यशोधक समाजाचे पर्यालोचन
प्रथम सत्यशोधक समाजाच्या ऐतिहासिक पर्यालोचनाकडे पाहिल्याशिवाय या समाजाचे महत्त्व लक्षात येणार नाही. ब्राह्मोसमाज व सत्यशोधक समाज ह्यांचा संबंध फार जवळचा असा आहे. तसेच गेल्या तीन शतकांतील राजा राममोहन रॉय, महात्मा जोतीराव फुले व महात्मा गांधी ह्यांचे जन्मसाल व ह्यांच्या सामाजिक जीवनाच्या सनावळीत पुढील सर्व इतिहास घुटमळत आहे. हे निव्वळ विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात सनांचे असलेले महत्त्व म्हणून नव्हे. विकासवादाप्रमाणे एक व्यक्ती येते व ती जाते, मागून दुसरी व्यक्ती येते. प्रत्येक व्यक्तीच्या कार्याचे महत्त्व कायम असून ते परस्परांना सहाय्यक असे असते. रॉय, फुले व गांधी ह्यांच्या सामाजिक जीवनाचाच मी येथे प्रामुख्याने विचार करणार आहे. ह्याचा अर्थ मी राजकारणाला भितो असा आपण गैरसमज करून घेऊ नका.
महात्मा जोतीराव हे आधुनिक महाराष्ट्राचे राजा राममोहन रॉय होत. रॉय, फुले व गांधी ह्या महापुरूषांच्या जीवनाचा इतिहास हा एक महान चमत्कार आहे. राममोहन १७७२ साली जन्मले. त्यांनी १८२८ साली ब्राह्मोसमाजाची स्थापना केली व ते १८३३ साली परलोकवासी झाले. ब्राह्मोसमाजाच्या स्थापनेच्या एक वर्ष पूर्वी म्हणजे १८२७ साली महाराष्ट्रात जोतीबा जन्माला आले, त्यांनी १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली व ते १८९० साली दिवंगत झाले. सत्यशोधक समाजाच्य स्थापनेपूर्वी केवळ तीनचार वर्षे अगोदर गुजरातेत महात्मा गांधींचा जन्म झाला.
राजा राममोहन रॉय हा आधुनिक भारताचा जनक व ती जागतिक कीर्तीची विभूती होती. रॉय व गांधी ह्या सुसंस्कृत विभूती होत. म्हणजे जोतीराव काही अशिक्षित व्यक्ती नव्हते. तर ते प्राकृत (Natural man) होते. नवभारताचा जनक जसा राममोहन रॉय तसा नवमहाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचा आद्य प्रवर्तक जोतीबा फुले होय. सामाजिक चळवळीच्या कालमापनाची विभागणी करावयाची झाल्यास ती पुढीलप्रमाणे होईल. १७७२ ते १८३३ हा काळ राममोहन रॉय, देवेंद्रनाथ प्रभृती ब्राह्मोसमाजानुयायांचा. १८७३ ते १९३३ हा महात्मा फुले ह्यांच्या सत्यशोधकांचा व नंतर महात्मा गांधीचा काळ होय. म्हणजे रॉय युग, फुले युग व गांधी युग असे हे सुधारणेचे भाग पाडावे लागतील.
तिकिटाचा गलबला
वरील तीन महात्म्यांनी चालविलेला लढा फार जुना आहे. उच्चनीचपणा व भेदाभेद हे ह्या लढ्याचे मूळ होय. मोक्षाचे द्वार ब्राह्मणधर्माच्या उत्पातानंतर स्त्रिया, वैश्य व शूद्र ह्यांना बंद करण्यात येऊन ब्राह्मण व क्षत्रियवर्णापुरतेच ते मोकळे होते. पुढे नंदकाळानंतर क्षत्रियापासूनही हे मोक्षाचे तिकीट हिसकावून घेण्यात आले. म्हणजे मोक्षाचे धनी निव्वळ ब्राह्मण ठरले. हे मोक्षाचे तिकीट मिळविण्यासाठीच वारकरी, लिंगायत, जैन, शीख इ. व्यक्तिगत धर्मसंप्रदाय उत्पन्न झाले. प्रथम वैष्णव व शाक्त वगैरे धर्मपंथांना वेदबाह्य ठरविण्यात आले. पण आता ते हिंदुधर्मांतर्गत उपासनापंथी मानले जातात. हीनत्वाच्या श्रेष्ठत्वाच्या भावनेमुळे हा तिकिटांचा काळाबाजार सुरू झाला. भावना ही प्रत्येक मनुष्यात असतेच, जगाचा उद्धार अशा भावनाशील साधारण लोकांकडूनच होतो. ब्राह्म व प्रार्थना समाजासारखाच फुल्यांचा सत्यशोधक समाज हाही हिंदुसमाजात उत्पन्न झालेल्या विषमतेची कीडच काढून टाकणारा एक पंथ आहे.
सत्यशोधक समाज
जोतीबांच्या कार्याचे तीन भाग पडतात. पहिला भाग त्यांच्या कार्याला सुरूवात झाल्यापासून १८७३ पर्यंत. (सत्यशोधक समाजाच्या स्थापनेपर्यंत) दुसरा १८७३ ते १९०० पर्यंत व तिसरा १९०० पासून चालू. पहिल्या काळात ब्राह्मण त्यांना मदत करीत असत, पण सत्यशोधक समाजाच्या स्थापनेने परिस्थिती एकदम पालटली.
सत्यशोधक समाज सुंदर हार्मोनियम
सत्यशोधक समाज हा सुंदर हार्मोनियम आहे. त्यावर व्यवस्थित बोटे ठेविली तर सुंदर मधुर आवाज निघेल. पेटीतून गोड सूर काढणारा कलाभिज्ञ असला पाहिजे. स्वत:चे सूर काढण्याचे अज्ञान लपवून उगीच ओरडण्यात हाशील काय? Vested interested persons नी आडवे तिडवे नव्हे तर पायाची बोटे त्या हार्मोनियमवर ठेविली म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाला पाखंडी ठरविले. पण वस्तुस्थइती तशी नाही. सत्यशोधक समाज हा शिवराळ नाही. तो सुदंर, सुस्वर हार्मोनियम आहे. म्हणून त्यावर सावधगिरीने बोटे फिरविली पाहिजेत. त्याविरूद्ध ओरडण्यात काय अर्थ? रानडे, भांडरकर प्रभृती ब्राह्मण जोतीरावांचे सहकारी व मित्र होते. टिळक, आगरकरांना खटल्यात जोतीरावांनी मदत केली. ती ते ब्राह्मणद्वेष्टे असते तर केली असती काय? टिळक हेही जोतीरावांचे मित्र होते.
प्राकृत माणसांची शिवी
प्राकृत माणसाची शिवी ही संस्कृत माणसाच्या स्तुतीपेक्षा फार चांगली विधायक कार्य करीपर्यंत ठीक पण विध्वंसक, प्रक्षोभक कार्य सुरू झाले की, शिव्याशाप सुरू होतात. जोतीबांनी खालच्या वर्गाची हीनावस्था काढून टाकण्याचा प्रयत्न सुरू करताच वरच्या वर्गाचा सहानुभूतीचा झरा हळू हळू आटू लागला व सत्यशोधक समाज म्हणजे सवता सुभा निर्माण झाला असे त्यांना वाटू लागले. तेव्हा सत्यशोधकांची ठोकाठोकी सुरू झाली.
चिपळूणकरांची मोर्चेबंदी
विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी सुरू केलेल्या मोर्चेबंदीमुळे ब्राह्मणांनी सहकार्य सोडून सत्यशोधक समाजावर चढाई केली. जोतीबांशी त्यांचा तत्वत: विरोध होता असेही म्हणता यावयाचे नाही. ब्राह्मण समाजाचे धार्मिक, सामाजिक, आर्थिक वगैरे vested interest कायम टिकविण्यासाठी ही कोल्हेकुई होती. त्याचा परिणाम व्हावयाचा तोच झाला. विरोधकांस विरोध ह्या नात्याने जोतीबांच्या सत्यसमाजानुयायांनी आपल्या प्राकृत भाषेत उलट हल्ला चढविला. मोठ्या भावाने लहान भावास चिमटे घेतले नाहीत तर लहान भाऊ रडण्याचे कारण नाही. विक्षोभक कार्याबरोबरच विधायक कार्यक्रम जनतेसमोर ठेवावयाचा जोतीबांचा प्रयत्न अव्याहत चाललेलाच होता.
शाहूयुग
ह्या समाजाचा प्रसार विशेषत: साळी, माळी, कोळी इ. वर्गातच होता. पण १९०७ सालापासून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक समाजास येऊन मिळताच उच्च वर्गात विशेषत: मराठ्यांत जोराने प्रसार झाला व अशा रीतीने शाहूयुग सुरू झाले.
सत्यशोधकांचे बायबल
जोतीबांचा सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ त्यांनी आपल्या डाव्या हाताने लिहिला आहे. हा ग्रंथ खरोखरीच सत्यशोधकांचे बायबल होय. ब्राह्मोसमाजाच्या संस्थापकास मरून शतक लोटले, तर ह्याच वेळी सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस ६० वर्षे पुरी होतात. ह्यावरून ह्यात काही तरी परमेश्वरी संकेत आहे असे मला वाटते. आपण जर ह्या सत्यशोधक समाजाची पाळेमुळे दृढ केलीत तर महात्मा गांधींच्या सध्याच्या अस्पृश्यता निवारणास जो तीव्र विरोध होत आहे तो तितका खास होणार नाही. कारण अस्पृश्यता निवारण, अबलोन्नती व शिक्षणप्रसार हीच समाजाची मुख्य सूत्रे होत.
भटजी किंवा मध्यस्थ दलाल
ह्यानंतर सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचे विस्तृत विवरण केल्यावर महर्षी अण्णासाहेब शिंदे म्हणाले, “परमेश्वर एक आहे. ह्या सत्यशोधक समाजाच्या तत्त्वाबद्दल फारसा विरोध झाला नाही. कारण परमेश्वर एक असो वा हजारो असोत त्यात कोणाचे काही नडत नाही. पण भटजी किंवा मध्यस्थ दलालाची गरज नाही. ह्या जोतीबांच्या तत्त्वावर ब्राह्मण समाज चिडला. जेव्हा एकदा टिळकांनी शाळेतील शिक्षक आमचे गुरू नव्हेत असे म्हटले तेव्हा बरे वाटले. पण फुल्यांनी “कोणी गुरू नाही”, “मध्यस्थ दलाल नको,” असे म्हटले तर त्याज्य. ह्यामुळे दक्षिणा बुडते म्हणून भट बिथरले.
सत्यशोधक समाजाच्या संघटनेची जरूरी आहे. (१) सत्यशोधकांनी तत्त्वाकडे नि:स्वार्थपणे पाहिले पाहिजे. मी हे डिक्टेटर म्हणून सांगीत नाही. २) सत्यशोधक समाजाची घटना पाहिजे. ३) सभासदांची नोंद ठेविली पाहिजेत. ४) प्रतिज्ञापत्रक भरून घेतले पाहिजे. ५) प्रभावी प्रचारक नेमले पाहिजेत. ६) प्रचारकार्यार्थ एक जोमदार संस्था स्थापन केली पाहिजे व ६) वर्तमानपत्र नेटाने चालविले पाहिजे.
ब्राह्मोसमाजात जसे सर्व कुटुंब एक घटक असते त्याचप्रमाणे आपण सत्यशोधकांनी आपापल्या गृहिणीसह सत्यशोधक समाजाचे सभासद झाले पाहिजे. तरच आपण समानतेच्या पायावर खरोखरीच कार्य करितो असे होईल.