विभूतीपूजा
असा कोण हतभागी आहे की ज्यास शेक्सपिअर माहीत नाही?’ आणि असा कोण त्याहूनही हतभागी आहे की ज्यास, शेक्सपिअरच्या काव्यांचे ‘भराभर पाठांतर’ करून अगर त्याची नाटके पाहून अनेकवार टाळ्या पिटूनही अखेर त्याची सार्वत्रिकता कळून आली नाही! असा कोणी दुर्दैवी असेलच तर त्याने आपल्या अंधारकोठडीतून बाहेर उजेडात यावे, म्हणजे तात्काळ ही गोष्ट दिसेल.
शेक्सपिअर ही विभूती आहे. इतर विभूतीप्रमाणे ती सर्व जगासाठी आहे अर्थात सर्व जगाची आहे. असे असून इंग्रज जर तिला केवळ स्वदेशीय आणि राष्ट्रीय देणगी असे समजून कवटाळतील तर ते जगाच्या हशास पात्र होतील. ड्रायडन्, पोप वगैरे त्यांचे राष्ट्रीय कवी होत, शेक्सपिअर नव्हे. त्याच्यात सर्व जगाचे प्रतिबिंब आहे. सर्व जगात त्याचे प्रतिबिंब आहे. सर्व जगात त्याचे प्रतिबिंब आहे म्हणून त्यास जग कळते, जगास तो कळतो. शेक्सपिअर जर नुसता इंग्रज ठरेल तर ख्रिस्त हा नुसता ज्यू ठरेल. आणि बुद्ध हाही शाक्य ठरेल. कोपर्निकसाचे सिद्धांत केवळ उलट पक्षास निरूत्तर करण्यासाठी, एडिसनचे शोध केवळ पेटंटसाठी असल्यास ह्या सगळ्या गोष्टींत सारखेच सत्य आहे.
शेक्सपिअर जर सर्व जगाची विभूती आहे, तर सर्व जगाने तिची पूजा केली पाहिजे. ‘दिक्कालाद्यन वच्छिन्न’ जी वस्तू तीच विभूतीपदाला पोहोचते. म्हणजे देशी, विदेशी, राष्ट्रीय, प्रांतिक, प्राचीन अर्वाचीन हे गुण तिला फार थोटे होतात. शेक्सपिअरास इंग्रज राष्ट्रीय म्हणत असतील, किंवा नसतील, पण केवळ ते म्हणतात म्हणून इतरांनी शेक्सपिअरवरचा आपला हक्का सोडणे हा अस्सल मेषपात्रपणा होय. आणि ह्यास स्वदेशाभिमानाचे कारण असेल तर मात्र थट्टेची परमावधीच झाली म्हणावयाची! जगाच्या एका विभूतीस एका राष्ट्राने बळकाविले असे वाटल्यास इतर राष्ट्रांनी अभिमानास पेटून आपापल्या देशात असतील नसतील त्या विभूतींचीच फक्त पूजा करण्याचा हट्ट धरला तर ही विभूतीपूजा होणार नाही. केवळ मोहोरमी डोलेपूजा होईल. कारण हिच्यात पूजेपेक्षा हमरीतुमरीचा अंश अधिक असतो.
असो. जगाच्या ज्या सर्वसाधारण विभूती आहेत त्यांची सर्वांनी मिळून गोडीगुलाबीने पूजा केली पाहिजे. तरच पूजेचे श्रेय येईल. नाही तर हिंदुमुसलमानांसारखे दंगे होणार हे उघड आहे. कोठे शास्त्राचे, कोठे शिव्यांचे, कोठे सभ्य टीकेचे. कोठे आतल्यात धमसत असलेल्या विकारांचे निरनिराळे दंगे चालू राहतील. मानवी अंत:करणास विभूतीच्या पूजेची गरज आहे. कोण नाही म्हणेल? पण ती वरील दंगेधोपे न माजविता भागविणे साध्य आहे हे समंजस लोक तरी कबूल करतील.
कार्लाईलचे ‘विभूती आणि विभूतीपूजा’ हे पुस्तक ज्यांनी वाचले असेल-निदान वरवर तरी चाळले असेल-त्यास माहीत असेलच की विभूतीपूजेच्या आजपर्यंत तीन पाय-या झाल्या आहेत. पहिली पायरी विभूती म्हणजेच साक्षात देव मानण्याची. हिला साक्ष प्रत्यक्ष श्रीकृष्णाने गीतेच्या दहाव्या अध्यायात दिली आहे. ‘अर्जुना’ विभूती मग ती मनुष्यच नव्हे, पशू, पक्षी, प्राणी, पर्वत, हवा, देव दानव इ. इ. ‘काही असो, विभूती म्हणजे मीच स्वत:’ विभूतीचा अर्थ येथे बराच ताणला आहे. तथापि तात्पर्याला फारसा बाध आलेला नाही. नंतर दुसरी पायरी माणसांना जसा एकच कपडा नेहमी आवडत नाही, तसाच एकच विचारही फार दिवस आवडत नाही, म्हणून दुसरी पायरी, विभूती म्हणजे ज्यांच्याठायी ईश्वराची प्रेरणा होते ते थोर पुरूष असे मानण्याची. देशी भाषेत सांगावयाचे झाले तर हे पुरूष काही निव्वळ देव नव्हेत तर त्यांच्या अंगात केव्हा केव्हा देव येतो. उदाहरणार्थ शिवाजीच्या अंगात अंबाबाई येत असे, महमदाच्या कानांत कबूतर स्वर्गाचा निरोप सांगत असे, साधू पाल ह्यास ख्रिस्ताने उपदेशास बोलाविले वगैरे समजुती. कालांतराने हाही विचार जुना झाला. सर्वच माणसांच्या अंगात देव कमीअधिक प्रमाणाने प्रसंगविशेषी येतो असा अलीकडे शोध लागला आहे! पशूंच्या अंगात देव कधी येत नाही. अंगात देव येणे हेच मुळी माणूसपणाचे लक्षण. ज्यांच्यात हा माणूसपणाचे लक्षण. ज्यांच्यात हा माणूसपणा अत्यंत प्रबळ असतो त्या विभूती, ही तिसरी पायरी होय. मोठे कवी, मोठे मुत्सद्दी, मोठे जनपदहितकर्ते हे विभूती होत. हे देव नव्हेत किंवा माणूस आणि देव ह्यांमधील मिश्रजात देवमाणूसही नव्हेत. तर केवळ विशेष वाढलेली माणसेच होत असे समजण्याचा हल्ली प्रघात पडत चालला आहे. प्रथमपासून आजपर्यंत ज्या विभूती झाल्या त्या सर्व एकच जातीच्या. पण त्यांच्या पूजेच्या भिन्नभिन्न प्रकारांमुळे त्या आम्हास भिन्न भिन्न भासत आहेत.
शेक्सपिअर ही एक चालू पूजेची विभूती आहे. हिच्या पूजेचा प्रकार स्ट्रॅटफर्ड-ऑन-एव्हन ह्या गावी मला जो दिसला, तो थोडक्यात लिहीत आहे. ऑक्सफर्डहून स्ट्रॅटफर्ड हा सुंदर आणि टुमदार गाव ४० मैलांवर आहे. तिकडे निघालो असता वाटेने स्ट्रॅटफर्डचा रस्ता विचारल्यावर लोक कौतुकाने म्हणत. “कायहो, शेक्सपिअरचे घर पहावयाला निघाला? त्याची बायको अँना हातवेट हिची झोपडी पाहण्यास विसरू नका हो”,! ह्याचा अर्थ असा की, आपल्याकडे जसे देहूस जावयाचे झाले तर तुकोबासाठी, पंढरपुरास विठोबासाठी, तसे इकडे स्ट्रॅटफर्डला जाणे ते शेक्सपिअरसाठी. तेथे गेल्यावर तर शेक्सपिअर म्हणजे त्या गावचा कायमचा राजाच आहे असे दिसून आले. एलिझाबेथचे राज्य जाऊन ब्रिटनवर हल्ली एडवर्डचे राज्य आले आहे, पण स्ट्रॅटफर्ड येथील राजनिष्ठ प्रजेवर शेक्सपिअरच राज्य करीत आहे व करीत राहील. रस्त्यातील बायामाणसांनादेखील त्याच्या चरित्रातील खडानखडा माहिती विचारा. तो जन्मला ते घर जसेच्या तसेच राखून ठेविले आहे. तेथे गेल्याबरोबर तुमच्या भोवती कृष्णातटाकी संकल्प सांगणा-या ब्राह्मणाप्रमाणे रस्त्यातील भिकार मुलांची गर्दी जमते आणि ती सर्व एकदमच न विचारता परवचा म्हटल्याप्रमाणे शेक्सपिअरचे त्रोटक चरित्र ठेक्यात पाठ म्हणू लागतात! त्यात शेक्सपिअरने एकदा तरूणपणी एक हरीण कसे चोरले, त्याबद्दल त्यास कसे पकडले वगैरे वगैरे चटकदार वर्णन तर पुढे पुढे येऊन गातात. शेक्सपिअर जन्मला ते घर, तो रहात होता ते घर आणि त्याच्या बायकोची झोपडी ह्या तिन्ही ठिकाणांची उत्तम व्यवस्था शेक्सपिअरस्मारक मंडळीकडून ठेवण्यात येत आहे. प्रत्येक ठिकाण ८|१२ आणे फी दिल्यास पहावयास मिळते. दाखविण्यास व त्यासंबंधाची माहिती सांगण्यास माणसे ठेविली आहेत. घराचा ३०० वर्षांचा जुनेपणा जितका शाबूद राखणे शक्य आहे, तितका राखिला आहे. हा कवी लहानपणी नेहमी चुलीजवळच्या कोनाड्यात बसत असे. तेही ठिकाण दाखविण्यास कोणी विसरत नाही.
ह्या घराचा अति महत्त्वाचा भाग म्हणजे कवी ज्या खोलीत जन्मला ती खोली होय. ती अगदी ओबडधोबड आहे. पण तिचे माहात्म्य किती! साधारण अजमासे किती लोक हे स्थळ पहावयास येतात म्हणून नोकरास विचारता त्याने सांगितले की, गेल्या वर्षी जगातील निरनिराळ्या ४० राष्ट्रांचे ३०,३७६ प्रेक्षक ही खोली पाहून गेले! तावदानावर, तुळईवर, भिंतीवर सर वॉल्टर स्कॉट, कार्लाईल, ब्राउनिंग, थॅकरे इत्यादि मोठमोठ्या दस्तुरखुद्द सह्या आहेत! परसातील बागेत शेक्सपिअरने आपल्या ग्रंथात ज्या ज्या वनस्पतींचा व फुलाफळांचा उल्लेख केला आहे, त्या सर्वांची लागवड आहे. घरात दुस-या एका बाजूस शेक्सपिअरच्या ज्या ज्या जिनसा मिळाल्या आहेत, त्यांचा संग्रह करून ठेविला आहे. घरातून बाहेर पडल्यावर रस्त्यातील एका दुकानाकडे पाहिल्यास चहाच्या चिनी पेल्यावर अगर एकाद्या लहानशा गुंडीवरही कवीच्या बायकोच्या झोपडीचा ठसा उमटलेला दिसेल. कवी राहत होता त्या घरातही त्याच्या जिनसांचा मौजेचा संग्रह आहे. चिलमी व दारूच्या पेल्यापासून तो बसावयाच्या खुर्चीपर्यंत. बागेत एके ठिकाणी शेक्सपिअरने स्वत: लाविलेल्या झाडाची एक फांदी लाविली आहे. तिचे आता जुने झाड झाले आहे. शेक्सपिअरबरोबरच त्याच्या झाडालाही अमर करण्याचा त्याच्या भक्तांचा विचार दिसतो. एवढ्यानेच त्यांची इच्छा तृप्त झालेली नाही. शेक्सपिअरस्मारक नाटकगृह नावाची एक भव्य आणि सुंदर इमारत व संस्था एव्हन नदीच्या काठी गावाबाहेर उभी केली आहे. ये पुस्तकालय, संग्रहालय आणि नाटकालय असे तीन भाग आहेत. शेक्सपिअरबद्दल जितके म्हणून वाड्मय अगर सामग्री उपलब्ध आहे, तिचा येथे संग्रह केला आहे. चोहोकडे कवीच्या जन्मापासून तो मरणापर्यंत निरनिराळ्या अवस्थांचे चित्रांनी व पुतळ्यांनी दिग्दर्शन केले आहे. दरवर्षी त्याच्या जयंतीचा उत्सव दोन तीन आठवडे मोठ्या थाटाचा व गर्दीचा होतो. त्यावेळी नाटकालयात प्रसिद्ध मंडळीकडून त्याच्या प्रसिद्ध नाटकांचे प्रयोग होतात. ते पाहण्यास गावोगावचे रसिक लोक येतात. मागच्या ज्युबिलीच्या वेळी तर ह्या गावी शेक्सपिअर पूजेची परमावधी झाली. तिचे मौजेचे वर्णन ऐकण्यात येते. तेव्हा ह्या कवीची मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. एक रथात कवीचा पुतळा बसवून त्याभोवती गावातील तरूणी देवदूतांचा पोषाक करून तुता-या वाजविण्यास उभ्या केल्या होत्या. एकंदरीत हा एक इंग्लंडासारख्या प्रॉटेस्टंट देशातला १९ व्या शतकातला शेक्सपिअरदेवाचा अपूर्व छबिना निघाला होता.
मनुष्यप्राण्याची स्वाभाविक उत्सवप्रियता वेळोवेळी कोणत्या ना कोणत्या तरी वाटेने वर उफाळून येते. वर आल्यावर तिचा प्रवाह कोणीकडे वाहील ह्याचा नियम नसतो. समाजाचे खरे व कळकळीचे नायक असतात. ते ह्या प्रवाहास योग्य वळण लावून हित साधतात. धोरणी व व्यापारी लोक असतात ते ह्या वाहत्या पाण्यात हात धुऊन घेतात. जिवंत मासे प्रवाहातून उलट सुलट पोहून खेळतात. मेलेले मासे लाटांबरोबर वरवरच तरंगत जातात.
ह्या प्रकारे विभूतीपूजेचे माहात्म्य आहे.