विनययोग
अलीकडे नीती आणि धर्मशिक्षण ह्यांची चोहोकडे मोठी हूल उठली आहे. ह्या महत्त्वाच्या विषयासंबंधी आमच्या राष्ट्रामध्ये जागृती होत आहे, ही बरी गोष्ट आहे. पण अशा सनातन विषयाचा ऊहापोह केवळ प्रासंगिक कारणावरून आणि आनुषंगिक हेतून हल्लीच्याप्रमाणे होत आहे ही मात्र त्यातल्या त्यात गौण गोष्ट आहे. म्हणून आपण हे लक्षात आणून आपल्या मनावर जे काही प्रासंगिक आणि तात्पुरते संस्कार झाले असतील ते दूर सारून अगदी निर्लेप अंत:करणाने ह्या विषयाकडे वळूया.
मनुष्याचा स्वभाव आणि त्याचे शील ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत. खाणीतून जसा दगड काढावा तसा हा मनुष्य ह्या सृष्टीत निर्माण होत नाही. अनेक अज्ञात आनुवंशीक कारणांनी मनुष्याच्या मनामध्ये संचिताचे ठसे जन्मत:च उमटलेले असतात. ह्या ठशामुळे मनुष्याच्या व्यक्तिस्वभाव बनलेला असतो. ह्या स्वभावाचा विकास आणि रूपांतरे व्यक्तीला स्वप्रयत्नांनी तिच्या भावी शीलामध्ये करावयाची असतात. ह्यावरून स्वभाव हा ईश्वरदत्त वारसा आणि शील ही स्वकष्टार्जित मिळकत असे म्हणावयास हरकत नाही. कारागिराने तयार केलेला विणा आणि गायनाच्या पूर्वी गवयाने लावलेला विणा ह्यांमध्ये जो फरक आहे, तोच स्वभाव आणि शील ह्यांमध्ये आहे. गायन व्हावयाचे असल्यास गवयास बराच वेळ आपल्या वाद्याची जुळवाजुळव करावयाची असते. लाकडाचा गुण, भोपळ्याचा गुण, तारांचा गुण इत्यादिकांची जोड कारागिराने केलेली असते. ती त्या विण्याचा एक स्वभावच म्हणावयाचा; पण गवयाने एवढ्याने भागत नाही. त्याला प्रसंगानुसार व आपल्या आवाजाच्या आटोक्याप्रमाणे तारा कमीअधीक खेचाव्या लागतात. मृदंगाचे तंग ताणावे लागतात. ह्यास त्या विण्याचे शील म्हणता येईल. तद्वतच व्यक्तीलाही आपल्या उपजत मानसिक गुणांची ओढाताण ह्या जगिक व्यवहारात करावी लागते. गवयाचाही गाण्यापेक्षा केव्हा केव्हा विणा लावण्यातच जास्त वेळ जातो, तर संसारातील साधकास आपले व्यवहारोपयोगी शील पूर्ण बनविण्यास पुष्कळ दिवस आणि पुष्कळ अनुभव सोसावे लागतात ह्यात नवल ते काय? शिवाय, संसारात व्यवहार करणे म्हणजे नुसते विणा लावून ठेवण्याप्रमाणे नाही, तर त्या विण्याच्या साहाय्याने आपल्या स्वरांचे आलाप काढून गवई ज्याप्रमाणे श्रोत्यांच्या मनामध्ये निरनिराळे इष्ट भाव उत्पन्न करतो त्याप्रमाणे सांसारिक जनांसही इतरांस निरनिराळ्या प्रकारचे शासन अथवा वळण द्यावयाचे असते.
ह्यावरून आपल्या शीलाचे अथवा चारित्र्याचे दोन मुख्य भाग होतात हे उघड आहे. एक आपण दुस-याशी कसे वागावे हा आणि दुसरा दुस-यास कसे वागवावे हा होय. आपल्या विषयविवेचनाच्या सोयीसाठी पहिल्या भागास आपण विनययोग म्हणू आणि दुस-यास शासनयोग हे नाव देऊ. शासनयोगाचा विचार पुढे केव्हा तरी करता येईल. आज विनययोगाचे विवेचन करू. गवई आपले गाणे सुरू करण्यापूर्वी प्रसंगाला अनुलक्षून विवक्षित रागदारीची योजना करून प्रसंगातील रसानुरूप आपल्या मनाची भावना करून गाणे गाऊ लागतो, त्याप्रमाणेच ह्या जगामध्ये मार्गक्रमण करू इच्छिणा-यांनी आपली मनोभावना ठरवून तदनुरूप विनययोग साधावा ही भावना कशी असावी ह्याविषयी भगवान श्रीगौतमबुद्धांनी आपल्या विनयपीठकामध्ये स्पष्ट सांगितले आहे:
अतूपमाय सब्बेस सत्तानं सुखकामतम्|
पस्सित्वा कमतो मेत्तं सब्बसत्तेसु भावये||
[आपल्याप्रमाणेच सर्व प्राणिमात्र सुखाची इच्छा करितात, असे जाणून क्रमक्रमाने त्या सर्वांविषयी प्रेमभाव उत्पन्न करावा.]
सुखी भवेय्यं निदु:क्खो अहं निच्चं अहं विय|
हिताच मे सुखी होन्तु मज्झता चथ वेरिनो||
[सदासर्वदा मी सुखी असावे, मी निर्दु:खी असावे, माझ्याप्रमाणे माझे मित्रही सुखी होवोत, मध्यस्थही सुखी होवोत आणि माझे वैरीही सुखी होवो.]
हमह्मि गामक्खेत्ताह्मि सत्ता होन्तु सुखी सदा|
ततो परं च रज्जेसु चक्कवाळेसु जंतुनो||
[ह्या आसपासच्या देशातील आणि ह्या गावातील सर्व प्राणी सर्वकाळ सुखी होवोत. ह्या राज्यातील प्राणी सुखी होवोत. ह्या विश्वातील (सर्व) प्राणी सुखी होवोत.]
तथा इत्थी पुमा चेव अरिया अनरियापि च|
देवा नरा अपायठ्ठा तथा दसविदासु च||
[त्याचप्रमाणे स्त्रिया आणि पुरूष, आर्य आणि अनार्य, देव आणि मनुष्य हे सर्व सुखी होवोत. दुर्गतीप्रत गेलेले प्राणीही सुखी होवोत. दाही दिशांला सर्व प्राणी सुखी होवोत.]
बुद्ध देवांनी वर सांगितल्याप्रमाणे मनुष्यमात्रांनी ह्या जगामध्ये आपली सुखाची आणि मैत्रीची भावना सदोदित ठेवावी असे सांगितले आहे. ही भावना पुढील सर्व विनययोगाचा पाया होय. वरील श्लोकात गौतमाने तीन गोष्टी सांगितल्या आहेत:
(१) आपण नेहमी सुखी असण्याचा प्रयत्न करावा. दु:खी राहण्यात कोणताही धार्मिकपणा किंवा मोठेपणा नाही. (२) दुस-यामध्येही हीच सुखवृत्ती वाढवावी. (३) सर्वांमध्ये सर्वकाळ आणि दशदिशा हे सुखाचे वर्तुळ पसरावे.
हे करण्यास खालील मार्ग साधावा:- (१) आपल्यामध्ये काही उपजतच दुर्गुण असतात आणि आपण जन्मल्यावर आपल्या अज्ञानामुले किंवा दुर्बलतेमुळे काही दुष्कृत्ये आपल्या हातून होतात. ह्या संचित दुर्गुणांपासून आणि क्रियमाण दुष्कृत्यांपासून जर आपली खरी सुटका व्हावयाची असेल तर हे दुर्गुण आणि ती दुष्कृत्ये आपण होऊनच उघडकीस आणिली पाहिजेत. ह्यासाठीच कित्येक धर्मांमध्ये स्वकृत पापनिवेदनाची (Confession) आणि प्रायश्चित्ताची योजना असते आणि ही अवश्य आहे. अशा रीतीने आपणच आपल्या दुर्गुणांचा आणि दुष्कृत्यांचा पुकारा केल्यास दुस-यास ती उघडकीस आणण्यास वावच उरणार नाही आणि उभयपक्षी बरीच तळमळ निवारली जाईल. (२) पण सर्वच काळ आपण आपल्या पापाचा पुकारा करीत राहणे हे व्यवहारात शक्य नसते. अशा वेळी निदान आपण आपली दुरिते अन्य कोणत्या रीतीने उघडकीस येत असली तर लपविण्याचा तरी निदान प्रयत्न करू नये. जो जो छपविण्याचा जास्त प्रयत्न होतो तो तो ती उघडकीस आल्यावर जास्त क्लेशकारक होतात. (३) तसेच आपले काही संचित सदगुण आणि क्रियमाण सत्कृत्येही असतात. ती आपण नेहमी छपविण्याचा प्रयत्न करावा. आपल्यास ज्ञान अथवा कला प्राप्त झाली तर किंवा एकादा नवा शोध लागला असता तर तो छपविण्याचा प्रयत्न करू नये. पण सत्कृत्याची गोष्ट निराळी. (४) हे सदगुण आणि ही सत्कृत्ये सर्वकाळ लपवून ठेवणे शक्य नसले तरी ती निदान आपण होऊन उघडकीस आणण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रयत्नाने ती कमी परिणामकारी होतात. (५) आपले दुर्गुम आणि दुष्कृत्ये ही ज्याप्रमाणे उघडकीस आणावी त्याचप्रमाणे उलटपक्षी दुस-याचे दुर्गुण आणि दुष्कृत्ये नेहमी छपविण्याच प्रयत्न करावा. जेव्हा कारणच पडेल, किंवा अशा रीतीने दुस-याची दुष्कृत्ये उघडकीस आणणे ही आपली सार्वजनिक नेमलेली कामगिरी किंवा नैतिक कर्तव्य असेल तेव्हाच आणि तेव्हाही ती मोठ्या नाइलाजाने आणि अनुकंपेने उघड केली तरच आपल्यास कर्तव्य बजाविल्याचे श्रेय मिळून दुस-याचे हित होते. (६) एरवी दुस-याची दुरिते सर्वकाळ छपविणे शक्य नसले तरी ती आपण होऊन उघडकीस आणण्याची वरील कारणाशिवाय कधीही उठाठेव करू नये. (७) तसेच दुस-याचे सदगुण आणि सत्कृत्ये ही होता होईल तो उघड करण्याचा प्रयत्न करावा. (८) ती निदान छपविण्याचा प्रयत्न करू नये.
विनययोगाचा असा अष्टांगमार्ग आहे. त्या मार्गाने वर गौतमबुद्धांनी उपदिष्ट केलेल्या मैत्रीभावनेची चिरकाल वृद्धी होवो.
विनययोगाची मीमांसा करताना आपल्या आणि दुस-याच्या चांगल्या आणि वाईट गुणांसंबंधी आणि कृत्यासंबंधी आपली वृत्ती कशी राखावी ह्याविषयीच्या अष्टांगमार्गाचे दिग्दर्शन वर केले. आज आपल्यावर आणि दुस-यांवर सुखाचे आणि दु:खाचे जेव्हा प्रसंग येतात त्या त्या वेळी आपली वृत्ती कशी राखावी ह्याविषयी विचार करू.
सुखाचा आपल्यावर एकादा व्यक्तिविषयक प्रसंग आला तर त्याविषयी सूज्ञ माणसाने आपल्या मित्राजवळ देखील वाच्यता करीत बसू नये, ते सुख कोणत्याही दर्जाचे असो, ते जर केवळ आपल्या व्यक्तिपुरते असेल तर दुस-यांनी वाटल्यास आपले अभिनंदन करावे आणि तेव्हाही आपण होता होईल तो थोडक्यात त्यांचे आभार मानून मोकळे व्हावे, हाच सुविनितपणा होय. पण कित्येक अभिनंदनाची वाटही न पाहाता आपल्या व्यक्तिसुखाचा पाल्हाला लावितात आणि ह्यात अविनय आहे हे त्यास कळत नाही. समुद्रकिना-यावर हिंडत असता आपल्या चिमुकल्याला एकादे फुटके शिपले सापडले आणि त्याबद्दल मोठा उल्हास दाखवीत तो आपल्याकडे आला तर आपण त्याच्या उल्हासाचे कौतुक करणे साहजिक आहे. परंतु जगामध्ये सर्वच ठिकाणी माणसाचा संबंध पितापुत्राचा नसतो आणि एकाच्या व्यक्तिसुखाचे कौतुक दुसरा करीलच ह्याचा नियम नाही.
आपल्यावर दु:खाचा प्रसंग येतो, तेव्हाही मनुष्याने आपल्या तोंडाला ‘दृढतर मौनकुलुपच’ लाविले पाहिजे. त्यासंबंधाने हळहळ किंवा हायहाय दुस-यापुढे करणे हे दुर्बलपणाचे लक्षण आहे. पुरूष अथवा स्त्री ज्या मानाने दुबळी असते त्या मानाने ही हळहळ आणि हायहाय अधिक दिसून येते. आपली खासगी दु:खे दुस-यास सांगून तादृश फायदाही होत नाही, असा पुष्कळ वेळा आपणांस अनुभव येतो. आपली दु:खाची कहाणी संपण्याची तर गोष्ट दूरच राहो, पण ती सुरू होते न होते तोच ऐकणारा आपल्या स्वत:ची दु:खे सांगू लागतो आणि ती इतका वेळ सांगत बसतो की, त्यामुळे आपण आपले दु:ख सांगितले ह्याबद्दल आपणांस पश्चात्तापच व्हावा असा कित्येकांना तरी अनुभव आला असेल. यद्यपि दुस-याने स्वत:ची दु:खे न सांगता आपली सर्व दु:खे ऐकून घेतली तरी त्यास ती ऐकून बरे वाटते असेच नेहमी होते असे नाही. शिवाय जरी आपल्या मित्रामध्ये आपणाविषयी अनुकंपा उत्पन्न होण्याचा संभव असला तरी हलक्यासलक्या प्रसंगी आणि वेळोवेळी हा संभव कसास लावून पाहणे हे योग्य नाही.
आपण आपली दु:खे दुस-यास सांगू नये इतकेच नव्हे, तर आपल्या व्यक्तिविषयक व घरगुती गरजा ह्यांचीही चर्चा विनाकारण कधीही न करण्याची जितकी खबरदारी घेववेल तितकी हितकारक आणि भूषणास्पद आहे. ह्याबाबतीत गंभीर मौन धारण केल्याने आपल्या गरजा जितक्या लवकर भरून येतील तितक्या वाच्यतेने भरून येणार नाहीत आणि त्या गरजा आपल्या प्रयत्नाच्या जोरावर भरून काढण्यात स्वत:स भूषण आणि इतरांस शिक्षण जितके मिळेल तितके आपल्या ख-या मित्रांच्या अकंपेनेही मिळणार नाही. ह्यावरून मित्रांच्या सहानुभूतीची किंमत कमी होते असे नाही. उलट तिचे प्रसंग अधिकाधिक कमी झाल्याने तिचे मोल अधिक वाढेल ह्यात संशय नाही. सहानुभूती मुळीच अनावश्यक किंवा अनिष्ट आहे असे नाही, ती अति स्वस्त होऊ नये एवढाच विनयाचा उद्देश आहे.
पण अलीकडे आपल्या राष्ट्रात काही बाबतीत उलटाच प्रकार चाललेला दिसतो. आपल्याला विवाह करावयाचा असल्यास ‘वधू पाहिजे’ अशी जाहिरात वर्तमानपत्रात देणारी मंडळी जेथे आढळते तेथे विनयाची भवति न भवति करीत बसणे हे कदाचित अरण्यरूदनासारखे होणार आहे. स्वयंवराची चाल आपल्या राष्ट्रात पूर्वी असो किंवा नसो, ती काही पाश्चात्य देशांमध्ये पूर्वापार चालत आलेली आहे, पण तेथेही वर्थमानपत्राच्याद्वारे स्वयंवर करण्याची पद्धती अद्याप चालू झाली नसता आमच्यासारख्या पुराणप्रिय लोकांनी ती इतक्या लवकर उचलली ह्यास काय म्हणावे! मर्यादा राखण्याविषयी आमची प्रसिद्धी असून असे का व्हावे? ज्याप्रमाणे आम्ही आपली अंगे वस्त्रांनी झाकावी त्याचप्रमाणे आम्ही आपल्या खासगी गरजाही झाकाव्या. निदान विनाकारण चव्हाट्यावर पाठवू नये ही खरी मर्यादा आहे.
ह्याप्रमाणे आम्ही आपल्या खासगी सुखदु:खाची चर्चा दुस-यापुढे वेळी अवेळी करू नये असे म्हटले, ह्यावरून आम्ही दुस-यांची सुखदु:खे ऐकू नयेत असे होत नाही. ह्यावर कदाचित असा आक्षेप येईल की जर आम्ही दुस-यास सांगू नयेत तर दुस-यांनीही आम्हांस सांगू नये हे योग्य, आणि जर आम्ही ऐकू तर दुस-यांस सांगावयास उत्तेजन दिल्याप्रमाणे होणार; म्हणून आपण ऐकण्याचेही वर्ज्य करावे हा उत्तम मार्ग; पण हा आक्षेप योग्य नाही. दुस-यास विनय शिकवावयाचा तो आपल्या विनयानेच चांगला शिकविला जाईल. आम्ही स्वत:च्या दु:खाची चर्चा कधीच न करून उलट दुस-यांची सुखदु:खे ऐकावयास तयार आहो हे ध्यानात येऊन दुसरे जितके लवकर विनयवान होतील तितक्या लवकर आम्ही त्यांच्या कहाणीचा अनादर केल्याने होणार नाही. उलट आम्ही कठोर अंत:करणाचे आहो असा मात्र दुस-यांचा गैरसमज होईल. शिवाय प्रसंगविशेषी परस्पर सहानुभूती अवश्य-निदान इष्ट आहे असे पूर्वी सांगितलेच आहे.
आतापर्यंत आमच्या साधारण लौकिक सुखदु:खाचा विचार झाला, पण ह्याशिवाय आपल्यास आध्यात्मिक सुखदु:खाचा अनुभव येतो. त्याविषयी आपली वागणूक वरच्याहून अगदी वेगळी असली पाहिजे. ती कधीच आम्ही आपल्याशी झाकून ठेवू नये. योग्य अवसर पाहून त्याचा फायदा दुस-यास द्यावा. आध्यात्मिक दु:खे तीन प्रकारची असण्याचा संभव आहे. पहिला प्रकार कृतकर्माबद्दल केव्हा केव्हा आपणास होणारा पश्चात्ताप होय. केव्हा केव्हा आपल्या आध्यात्मिक जीवनक्रमात निराशा वाटू लागते, हा दुसरा प्रकार व केव्हा केव्हा आपल्या अत्यंत प्रिय आदर्शासंबंधीदेखील संशय उत्पन्न होतो. ह्या तीनही अनिष्ट प्रकारांमुळे आपल्यास थोर वेदना आणि यातना होतात. त्यावेळी आपल्या वडील माणसांजवळ किंवा सुहृदजनांजवळ विसावा, शांती आणि नवीन मार्ग शोधण्यास आपण अवश्य जावे. श्रद्धादृष्टीने पाहता वरील तीनही अनिष्ट प्रकार अंती आपल्यास हितावहच होतात. मात्र एवढी सावधगिरी घेतली पाहिजे की, अशा प्रसंगी आम्ही लपवालपव किंवा उडवाउडव न करता मन अगदी आरशाप्रमाणे मोकळे ठेवावे आणि आपल्या शत्रूसही आत येण्यास द्वार खुले करावे. पण जनरूढी पाहता लोक साधारणत: अशा प्रसंगी अनुभव नसताना उगीच पोकळ सुखवादाच्या आणि आशावादाच्या गोष्टी सांगत असतात. आध्यात्मिक बाबतीत असा औपचारिकपणा करू नये. आपल्या मनास संशयाचा स्पर्श झाला किंवा त्यावर निराशेची छाया पडली की आम्ही खात्रीने अपवित्रच झालो असे समजू नये. केव्हा केव्हा प्रामाणिक संशयाची योग्यता आणि पवित्रता प्रामाणिक श्रद्धेइतकीच असते, मग ती अंधपरंपरागत श्रद्धेहून अधिक आहे हे सांगावयास नकोच. संशय ही मनोविकाराची एक पायरीच आहे, इतकेच. ह्या पायरीवर पोहोचलो असतो तेथेच थबकण्याची किंवा खाली पाहण्याची चुकी करू नये. कोणी आसपासचा सांगाती किंवा कोणी वरच्या पायरीवरचा गुरू ह्यांची कास धरण्यास धावावे. अशा संशयस्थितीचा संसर्ग आपल्याहून कमी अधिकाराच्या माणसास न लागेल अशी खबरदारी घ्यावी.