श्री. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, बडोदे येथील तत्त्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष
[बडोदे येथील साहित्य संमेलनात तत्त्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष-संक्षिप्त लेख]
महाराष्ट्रात हल्ली साहित्यसेवेच्या नावाने निदान दोन तरी मध्यवर्ती संस्था आणि तिच्या शाखा काम करीत आहेत. त्या: (१) साहित्य संमेलन व (२) साहित्यपरिषद, पण एकीचेही काम पद्धतशीर व समाधानकारक चालत नाही, असे ज्यांना तज्ञता व अनुभव आहे अशा साहित्यसेवकांना वाटू लागले आहे. त्याचे कारण एकीचा हेतू केवळ करमणूक म्हणजे समारंभ हा, दुसरीचा गंभीर म्हणजे संशोधन आणि स्वतंत्र ग्रंथनिर्मिती हा. हे दोन्ही हेतू फार महत्त्वाचे आहेत, ह्यात संशय नाही. पण ते इतके भिन्न आहेत की त्यांची जबरीची सांगड बांधल्याने दोन्ही साधेनात. समारंभाचे कार्य मात्र जास्त जोराने चालले आहे. कारण त्यात स्त्रियांची व तरूणांची करमणूक होते म्हणून सालोसाल गर्दी अधिकाधिक जमते. पण तितक्याच प्रमाणात परिषदेचे किचकट काम मागे पडत चालले आहे, हे कोणाचे लक्षात येत नाही. ह्या वर्षी बडोद्यात पुन्हा ह्या दोन्ही उद्देशांना व कार्यांना एकाच साखळीत जखडण्याचा वरवर स्तुत्य पण वस्तुत: अव्यवहारी प्रयत्न करण्यात आला. पण ती एकत्र सुखाने नांदणार नाहीत, असेच अनुभवास येईल.
समारंभाचे कार्य चांगले यशस्वी चालले आहे, ह्यात कोणालाही आनंदच मानावयास जागा आहे. काव्यगायन, फोटो, सहभोजन, सहल करणे वगैरे सोहाळे सर्व जातींचे स्त्रीपुरूष, तरूण, पोक्त चार दिवस एकत्र होऊन उपभोगतात ह्याचा इष्ट परिणाम वाड़मयावर-निदान ललित वाड़मयावर तरी झाल्याशिवाय राहाणार नाही. पण इतिहास, तत्त्वज्ञान, व्युत्पत्ती शास्त्र, व्याकरण अनेक विज्ञाने ह्याची वाट काय? जणू काय ह्यांची गणना साहित्यात होतच नाही, अशा वृत्तीमुळे त्यांची कुचंबणा चालली आहे. ह्यावर्षी बडोद्यात ८-९ विभाग करण्यात आले, पण नुसत्या अध्यक्षीय भाषणांनाही वेळ व स्थळ मिळाले नाही. स्वत: मजकडे आलेल्या तत्त्वज्ञान व समाजशास्त्र ह्या विषयावर एकही निबंध लिहून आला नाही. सेक्रेटरींनी आयत्या वेळी एक खास सर्क्युलर फिरविले, तरी नुसते आयत्यावेळचे वक्तेही मिळाले नाहीत. इतर विषयांचेही जळजवळ हेच हालच झाले. म्हणून काही विभागाच्या अध्यक्षांनी काही महत्त्वाचे ठराव समग्र बैठकीत कसेबसे पास करून घेतले. पण अशा ठरावाने काय लाभणार? अश्लील वड़मयासंबंधी चर्चा केव्हा पुढे येईल, आणि त्यावर वक्तृत्वाचे फवारे केव्हा सोडू व सोडलेले पाहू, अशी ज्या समुदायास तळमळ लागली होती, त्याने वरील कार्यप्रेरक ठराव पास केले काय, न केले काय, सारखेच नव्हे काय? माझी मुळी अपेक्षाच नव्हती, मग निराशा झाली, असे तरी कसे म्हणू?
साहित्यपरिषदेचे महत्त्व मी पूर्णपणे जाणून आहे. तिची घटना वेगळीच झाली पाहिजे. पण तिचेमुळे समारंभात विघ्न आणणे शहाणपणाचे मुळीच होणार नाही. समारंभाची आगबोट जोरात चालली आहे. म्हणून तिचे शेपटीला परिषदेची चिमुकली नाव अडकवणे हेही पण शहाणपणाचे होणार नाही. पूर्वी नाताळात काँग्रेसच्या बैठका जोरात भरत, त्या वेळच्या तमासगिरांच्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी इतर लहान मोठ्या परिषदांचे चालकही ह्या मुहूर्तावर आपले कार्य उरकून घेत असत. पण त्यांना काय यश आले बरे? आता काँग्रेसचे स्तोम बंद झाले तर ह्या सटरफटर परिषदांची पाले केव्हाच दिसेनाशी झाली ना? अशीच गत साहित्य परिषदेची न होवो.
माझी नम्र सूचना मला आलेल्या अनुभवावरून एवढीच की, साहित्यपरिषदेचे काम असे काही शिळोप्याचे नाही, की एकाद्या संमेलनाच्या मागील दालनात बसून उरल्यासुरल्या वेळात, आल्या गेल्यांनी ते उरकून टाकता येईल त्या सभेस तज्ज्ञांनी यावे. त्यांना धनिकांचा व इतर देशभक्तांचा पाठिंबा असावा. प्रत्यक्ष काम जरी तज्ज्ञाचेच असले तरी त्याचा पुरस्कार व नियंत्रणे व्हावे म्हणून इतर योग्य व समर्थ माणसांची योजना निरनिराळ्या समित्यांवर अवश्य व्हावी.
हा लेख अगदी संक्षिप्त प्रमाणात मागण्यात आल्याने ह्यापेक्षा अधिक विस्ताराला जागाच नाही.