श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत सयाजीराव गायकवाड
श्रीमंत महाराज सर सयाजीराव गायकवाड ह्यांच्या ७१ व्या वाढदिवसाचा अत्यंत शुभ प्रसंग (ता. मार्च १७ इसवी सन १९३३) जवळ येत चालला आहे. त्या निमित्त त्यांच्या चरित्राचा व कार्याचा एक ग्रंथ तयार करून त्यांना नम्रतापूर्वक अर्पण करण्याचा विचार त्यांच्या चाहत्यांनी केला आहे, ही गोष्ट जितकी आनंददायक आहे, तितकीच सूचक आहे. मीही महाराजांचा एक अत्यंत नम्र चाहताच नव्हे तर त्यांच्याकडून उपकृत झालेला मनुष्य असल्यामुळे सदर ग्रंथकर्त्यांनी मला वरील विषयावर एक लेख त्या पुस्तकात घालण्यासाठी लिहिण्याची विनंती केली, ह्याबद्दल मी त्यांचा मोठा आभारी आहे. परंतु त्या कामासाठी मला अवधी मात्र फार थोडा मिळाला आहे. माझा व महाराजांचा जरी चिरपरिचय आहे व वरील विषय म्हणजे माझ्या सार्वजनिक सेवेचा एक मुख्य भाग आहे, तरी महाराजांनी या विषयात जे अफाट व उदार प्रयत्न व्यक्तिश: व आपल्या दीर्घ कारकीर्दीत चालविले आहेत, त्यांचे संपूर्ण आणि उठावदार शब्दचित्र तयार करण्यासाठी जरूर ती सामग्री तूर्त माझ्याजवळ नाही व ती मिळवून हे माझे आवडते काम करण्यास आता अवसरही मिळणार नाही.
महाराजांनी जे प्रत्यक्ष कार्य केलेले आहे, त्याची नुसती तारीखवार जंत्री तयार करून त्यात महाराजांना ह्या कठीण पण राष्ट्रीय पुण्यसेवेत जी महनीय सिद्धी मिळाली आहे, तिचे कार्यकारणदर्शी पर्यालोचन केले तरी ही कृती मोठी रंजक व प्रेरक होईल ह्यात शंका नाही. पण ही कृती ह्या विषयाचा केवळ बाह्य अथवा अभिधात्मक भाग ठरेल. महाराजांच्या अंतरंगात अवगाहन करून त्यांना ह्या पुण्यकार्याची लहानपणी व तरूणपणी प्रेरणा केव्हा व कशी कशी झाली, ह्या अपूर्व विषयाकडे त्यांच्या विविध कार्यप्रचुर जीवनात त्यांचे मन कसकसे आकृष्ट झाले व ह्या राष्ट्रीय पाप-निष्कृतीचा यज्ञ करीत असताना त्यांच्या मनाला आशानिराशा, हर्षामर्ष व धन्यता कशी वाटत गेली वगैरे अनुभवांचे शब्दचित्र वटविण्याची संधी ज्या कोणा सुदैवी चित्रकाराला मिळेल तो धन्य!
श्रीमंत सयाजीराव महाराजांचे कार्य विस्तृत व दूरगामी आहे. केवळ राज्यकर्ते ह्या नात्याने एक वटहुकूम काढून त्यांना अस्पृश्यतेचे कार्य करता आले असते. लोकमताचा पाठिंबा नसताना असली समाजसुधारणेची कार्मे केवळ हुकुमाच्या जोरावर करणे जवळ जवळ अशक्य, निदान दुर्घट तरी असते. पण जपानचे बादशाह व तुर्कस्तानचे सर्वाधिकारी केमालपाशा ह्यांनी काही झटपट सुधारणा केवळ दंडनीतीच्या द्वारे करून दाखविल्या आहेत. पण ह्या महाराजांना असे एखादे डोळे दिपविणारे दिव्य दाखवावयाचे नसून एका बाजूने हळूहळू लोकमत बनवून दुस-या बाजूने अस्पृश्योद्धाराचा कायमचा पाया घालावयाचा होता, म्हणून त्यांनी प्रस्तुत विलंबाचा पण टिकाऊ मार्ग पत्करला. ह्या विवेचनावरून महाराज हे एक अस्पृश्यतानिवारकच नसून अस्पृश्योद्धारकही आहेत, हे भावी इतिहास भावी पिढ्यांना गंभीर रवाने गर्जून सांगेल ह्याची खात्री पटते.
भारतीय अस्पृश्यता ही एक स्वतंत्र संस्थाच आहे. बौद्ध, जैन, शीख, लिंगायत, वैष्णव वगैरे धर्मपंथांनी व इतर साधुसंतांनी प्राचीन व मध्यकालीन अस्पृश्यांच्या आत्मिक उद्धारासाठी थोडेबहुत प्रयत्न केले आहेत, पण हे सर्व बहुतेक वैयक्तिक स्वरूपाचे होते. सामुदायिक अस्पृश्यता मुळातच नष्ट करून आधुनिक अर्थाने निवारणाचे व त्यापुढचे भौतिक उद्धाराचे काम ह्या पंथांनी किंवा कोणा संतांनी केलेले इतिहासात नमूद नाही. ह्या बाबतीतील चालू प्रयत्न म्हणजे आधुनिक युगाचेच एक विशिष्ट लक्षण आहे, असे म्हटल्यास तज्ज्ञाकडून विरोध होईल असे वाटत नाही. पाश्चात्यांची संस्कृती ह्या पुराणप्रिय देशात अंमल गाजवू लागल्यानंतर गेल्या म्हणजे इसवी सनाच्या एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून अशा ह्या प्रयत्नास सुरूवात झाली. केवळ कालानुक्रमाप्रमाणे पाहिल्यास भारतीय अस्पृश्योद्धारकांमध्ये श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाडांचा नंबर तिसरा लागतो. पहिल्या अस्पृश्योद्धारकाचा मान महात्मा ज्योतिबा फुले ह्यांना, दुसरा मान बंगाल्यातील ब्राह्मसमाजाचे प्रसिद्ध परोपकारी गृहस्थ बाबू शशिपाद बानर्जी ह्यांना आणि तिसरा मान आमचे लेखनायक गुर्जराधिपती श्रीमंत महाराजांकडे जात आहे. फुले ह्यांचे प्रयत्न इ. सन १८५२ साली, बानर्जींचे प्रयत्न १८६५ आणि महाराजांचे प्रयत्न १८८३ साली म्हणजे त्यांना राज्याचे अधिकार मिळाल्यावर दुस-या, तिस-या वर्षापासूनच सुरू झाले.
पहिले फुले व्यक्तिश: गरीब व जातिश: मागासलेल्या वर्गातले; दुसरे बानर्जी व्यक्तिश: संपन्न व जातिश: उच्च वर्णातले होत व तिसरे महाराज सर्वतोपरी थोर स्थितीतले आहेत. पहिल्या दोन व्यक्ती दिवंगत झाल्या. तिसरे आमच्या सुदैवाने अद्यापि धडधाकट व पूर्णपणे कार्यक्षम स्थितीत आहेत. ह्यामुळे कार्याच्या प्रमाणाच्या व सिद्धीच्या दृष्टीने पाहताना वरील दोघांपेक्षा महाराजांचे काम इतके विस्तीर्ण व परिणामकारी झाले आहे की, ह्या तिघांच्या कार्याची तुलना करणेच व्यर्थ आहे, इतकेच नव्हे, अगदी देशभर फोफावत आहे व जिची पाळेमुळे खाली खोल शिरत आहेत, त्या चळवळीची धुराही महाराजांनी सतत आपल्या खांद्यावर घेऊन अगदी अग्रगण्य पुढा-यांतील आपले प्रमुख स्थान कायम राखले आहे. ह्या दृष्टीने पाहता महाराज म्हणजे नुसते एका मोठ्या संस्थानाचे सर्वाधिकारी, अधिपती म्हणूनच नव्हे तर अखिल भारतातील लोकमताचे नेते, समाजसुधारक आणि राजकारणकुशल मुत्सद्दी, इतकेच नव्हे तर आपल्या दोस्त इंग्रज सरकारानाही पदोपदी धडे शिकविणारे अनुभवी सत्ताधारी म्हणून जगापुढे झळकत आहेत.
इ. स. १९१८ साली आमच्या भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीची मुंबईस एक खास अखिल भारतीय अस्पृश्यतानिवारक परिषद भरली; तिचे अध्यक्ष श्रीमंत महाराजच होते. त्यांचे अध्यक्षीय भाषण झाले ते ह्या विषयावरील एक महत्त्वाचे वाड़मय झाले आहे. त्यांचे भाषण आटोपल्यावर त्यांचे दिवाण मनुभाई मेथा ह्यांनी बडोदे संस्थानात अस्पृश्यांसाठी तेव्हापर्यंत काय काय केले ह्याच्या संक्षिप्त माहितीचा एक खर्डा माझ्या हाती दिला. त्यात म्हटले होते की, श्री. महाराजांनी इ. स. १८८२ सालीच ही सुधारणा आपल्या राज्यात सुरू करून लवकरच निरनिराळ्या भागांत १८ शाळा ह्या अंत्यज लोकांसाठी उघडल्या. शाळांची ही संख्या वाढत १८९६ साली २० झाली. सन १८८२ साली ह्या कामात हात घालताना महाराजांचे वय अवघे २० वर्षांचेही नव्हते. दुस-या कोणत्या संस्थानिकाचे लक्ष इतक्या कोवळ्या वयात ह्या हतभागी लोकांच्या दीन स्थितीकडे गेले असेल बरे? प्रत्यक्ष ब्रिटिश इलाख्यात तरी त्यांच्या शिक्षणाची सोय अशा कळकळीने व इतक्या प्रगतीने झाली आहे काय? इतर संस्थानांतून जी थोडीबहुत अशी अपूर्व कृत्ये होतात, त्यांचे श्रेय एखाद्या प्रागतिक दिवाणाकडेच असते. पण ह्या महाराजांची गोष्ट तशी नाही. ह्यांनी वरील परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले, “मला ह्या कामी अनेक अडचणींशी झगडावे लागले. कितीही पगाराचे आमिष दाखविले तरी कित्येक वर्षे हिंदू शिक्षकच मिळेनात.” मुसलमानांकडून व नंतर आर्यसमाजिस्टांकडून हे काम करून घ्यावे लागले.
ह्या अत्यंत कठीण सुधारणेत महाराजांनी अपूर्व यश संपादन केल्याबद्दल सन १९२१ साली परोपकारी सभा नावाच्या एका संस्थेचे महाराजांना पतितपावन अशी पदवी दिली. त्यावेळी उत्तरादाखल केलेल्या भाषणात महाराज म्हणाले, “ह्या पदवीला मी पात्र आहे, असे मला तरी वाटत नाही. उलट माझ्यावर ह्या पदवीमुळे एक अवघड जबाबदारी लाधली जात आहे. त्या क्षेत्रात मी एकटाच खपत आहे, असे नसून इतर जे कोणी आहेत, त्यांच्याकडेही हा मान जातो. राज्याच्या काळजीमुळे व परिस्थितीमुळे ह्या कामी मला जितके करावयाचे होते तितके माझे हातून घडले नाही. माझे अधिकारी मला जे सांगतात त्यावर मला अवलंबून रहावे लागते, आणि ते जे करतात त्यावरच तृप्त रहावे लागते. मानवी प्रयत्नाला मर्यादा असतात, विशेषत: हिंदुस्थानातील राजे लोकांना, ते सर्वाधिकारी असूनही ह्या मर्यादा भोवतात!” अशा अस्पष्ट उदगारावरून अवघ्या १९ वर्षांच्या तरूण महाराजांना ह्या नवीन सुधारणेची मेढ रोवताना अधिका-यांकडून व लोकांकडून पाठिंबा किती मिळाला व अडथळे किती आले ह्याची अंधुक कल्पना वाचकांनीच करावी. महाराजांनी विद्वान व प्रागतिक अधिकारी वेळोवेळी हाताशी धरले खरे, पण महात्मा गांधीसारख्या वृद्ध देवमाणसाला ज्या गुजरात देशाने थोड्याच वर्षापूर्वी अस्पृश्यांच्या बाबतीत जुमानले नाही, त्या देशातील लोकमत ५० वर्षांपूर्वी ह्या अनुभवी तरूण राजाला अगदी सतावून सोडल्याशिवाय राहिले असेल हे संभवत नाही. काहीही असो, ह्या सत्कार्याची मेढ तर या खंबीर पुरूषाने पहिल्या धडाक्यासरशी रोविली तिचा विस्तार पुढे कसा झाला ते आता पाहू.
बडोदे संस्थानाच्या सन १९३१ सालच्या खानेसुमारीच्या हवालात अस्पृश्यांची संख्या खालीलप्रमाणे दिली आहे:-
अ.क्र. |
जात |
लोकसंख्या |
१ | भंगी |
३१,०१८ |
२ | बुरूड व वासफोडो | ४७८ |
३ | चांभार |
४२,८०२ |
४ | गरोडा |
७,७९६ |
५ | होलार |
५४ |
६ | महार |
५७२ |
७ | मांग |
३७ |
८ | नाड्या |
६२२ |
९ | शेणवा | ९,६४३ |
१० | थोडी | ५६ |
११ | तुरी | १,७११ |
१२ | वाकर व धेड |
१,०७,९८८ |
एकूण | २,०२,७७७ |
एवढी मोठी अस्पृश्यांची संख्या राज्याच्या दूरदूरच्या भागांत पसरलेली पाहून महाराजांच्या मनात त्यांच्याविषयी कळवळा आला असेल ह्यात काय नवल? ह्या लोकांसाठी महाराजांनी शाळा काढल्या ‘व सन १८९१-९२ साली बडोदे, अमरेली, पाटण आणि नवसारी येथे वसतिगृहे काढून त्यांच्या जेवण्याखाण्याची व राहण्याची सोय केली. त्यांना कपडेलत्ते, पाट्यापेन्सिली व पुस्तके पुरविण्याचा उपक्रमही महाराजांनी सुरू केला. मुंबई सरकारने पुण्यास एक वसतिगृह उघडले ते ह्यानंतर ३० वर्षांनी म्हणजे सन १९२२ साली! वरील चार वसतिगृहांमुळे अंत्यज वर्गांना उत्तेजन मिळून पुढील ५-६ सालांत शाळांतून शिकणा-या मुलांची संख्या दुपटीने वाढली. ह्या काळी दरवर्षी अंत्यजांचे एक दोन विद्यार्थी गुरजराथी ६ व्या इयत्तेच्या परीक्षेला बसत असत. ह्यानंतर कित्येक वर्षे ह्या प्रयोगाला दुष्काळ आणि प्लेगची मोठी विघ्ने आली. ह्या कंगाल लोकांना हातावर पोट भरावयाचे असते. त्यामुळे मुलांना शाळेला पाठवावयाला त्राण उरेना. ह्यात हिंदू अधिका-यांच्या सहानुभूतीच्या अभावाचीही भर पडली. अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागत नाही अशी हूल उठविण्यात आली. शेवटी ही वसतिगृहे बंद ठेवावी लागली. तरी पण श्री. महाराजांनी खर्चात बचत न करता, बडोदे भागात रूपये ४० च्या व इतर भागात रू. २५ च्या शिष्यवृत्त्या ठेवल्या कसेही करून इ. स. १९०० सालापासून पुढे काही वर्षे शाळांतून ह्या विद्यार्थ्यांची संख्या सरासरीने एक हजारापासून दीड हजार राहील असे केले.
इ. स. १९०३ सालच्या सप्टेंबर अखेर ऑक्सफोर्ड विद्यालयातील धर्मशिक्षण संपवून मी स्वदेशी आलो. महाराज साहेबांनी मला लगेच भेटीला बोलाविले आणि बडोदे शहरातील अंत्यजांच्या त्यावेळी ज्या चार शाळा ब-या चालल्या होत्या त्या तपासून मला काय वाटते ते समक्ष कळविण्याची आज्ञा केली. ह्या शाळांतून शिकून पास झालेली मुले कामाच्या अभावी रिकामी हिंडतात. त्यांना काही योग्य नोक-या देण्याची व्यवस्था होईल काय? असे मी महाराजांना विचारले, पण ते त्या काळी गुजराथसारख्या प्रांतात शक्य नव्हते. मात्र अशा मुलांना अधिक शिष्यवृत्त्या देऊन वरिष्ठ शिक्षणाकडे पाठविण्याचे महाराजांनी कबूल केले. एकंदरीत ह्या थोर पुरूषाच्या अंत:करणात ह्या हतभागी लोकांचा ध्यास सतत लागला होता, हे माझ्या ध्यानात तेव्हाच येऊन चुकले. इतकेच नव्हे तर ह्या महत्त्वाच्या विषयासंबंधी माझ्या स्वत:च्या विचाराला नवीन प्रोत्साहन मिळून ब्राह्म समाजाच्या अखिल भारतातील माझ्या प्रचारकार्याबरोबर ह्या लोकांची निरनिराळ्या प्रांतातील स्थिती स्वत: डोळ्यांनी निरखून अजमावण्याची मलाही प्रेरणा झाली.
इ. स. १९०४ च्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस मुंबईस राष्ट्रीय परिषदेचे अधिवेशन झाले. त्याचवेळी मुंबईत भरलेल्या सामाजिक परिषदेचे अध्यक्षस्थान श्री. महाराजांनी स्वीकारले. इतकेच नव्हे तर ह्या समारंभाचे शेवटी रात्री आमच्या राममोहन आश्रमात सर्व जातींचे मोठे सहभोजन झाले. त्याचे अध्यक्षही महाराजाच होते. त्या बक्षिस समारंभात चांभार जातीच्या एका लहान मुलाने धिटाईने भाषण केले व ज्याचे महाराजांनी आपल्या भाषणात प्रेमाने अभिनंदन केले तोच मुलगा रा. शिवतरकर हल्ली डॉ. आंबेडकरांचा सेक्रेटरी होऊन त्यांच्या स्वजातीच्या उन्नतीच्या कार्यात मदत करीत आहे. स्वत: डॉ. आंबेडकरांना तर महाराजांचा फारच मोठा आश्रय होता. ते बडोदे कॉलेजातून बी. ए. झाल्यावर त्यांना बडोदे संस्थानच्या धारासभेत सभासद नेमले. नंतर लवकरच पुढील शिक्षणासाठी बरीच वर्षे पुष्कळ खर्च करून त्यांना अमेरिकेत ठेवले होते. तेथून पी एच्.डी. होऊन आल्यावर काही दिवस बडोद्यात डॉ. आंबेडकरांनी नोकरीही केली आहे.
वरील सामाजिक परिषदेचा महाराष्ट्रावर व विशेषत: पुण्यातील कार्यकारी पुढा-यांवर जसा शुभ परिणाम झाला, तसाच महाराजांच्या उत्साहशक्तीवरही झालेला दिसतो. लगेच दोन तीन वर्षांत पुणे, मुंबई येथे सर्व्हंट्स् ऑफ इंडिया सोसायटी, सोशल सर्व्हीस लीग, सेवासदन, डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडियासारख्या अखिल हिंदुस्थानच्या राष्ट्रीय जीवनावर परिणाम करणा-या संस्थांचा उद्भव झाला. ह्याच सुमारास महाराजांनी आपल्या राज्यात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा धडा इतर लहान मोठ्या संस्थांनासच नव्हे तर प्रत्यक्ष इंग्रज सरकारासही घालून दिला. बडोद्याच्या इतिहासात हे साल सोन्याच्या अक्षरांनी लिहिले जाईल. बडोद्यास सक्तीच्या शिक्षणाचे प्रस्थान मांडल्याबरोबर उसळीसरशी अंत्यज शाळांची १८ ची २४७ आणि विद्यार्थ्यांची संख्या २००० ची ९२६९ झाली. बंद केलेल्या वसतिगृहांची पुन: गरज भासू लागली आणि एकंदर ह्या वाढलेल्या वाचकांकरिता एका तरबेज आणि वाहून घेतलेल्या कार्यवाहकाची खास निवड करावी लागली आणि लवकरच अंत्यजांच्या सुदैवाने पंडित आत्माराम हे ह्या कार्यास लाभले. १९०७-८ च्या सुमारास बडोद्यास हल्ली असलेले व अखिल भारतात नमुनेदार झालेले अंत्यज विद्यार्थी वसतिगृह उघडण्यात येऊन पंडितजींना त्या गृहाचे सुपरिंटेंडेंट व बडोदे राज्यातील अंत्यज शिक्षणाचे इन्स्पेक्टर नेमण्यात आले.
ह्यापूर्वी एक दोन वर्षे मुंबईस आमच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ् इंडिया ह्या संस्थेची स्थापना ता. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी झाली व प्रांतोप्रांती तिच्या शाखा निघू लागल्या. दरवर्षी जेथे जेथे काँग्रेसची अधिवेशने होत, तेथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषदेचीही अधिवेशने होऊ लागली. सुरतच्या काँग्रेसच्या वेली सन १९०७ साली असेच एक अधिवेशन भरविले होते. महाराजांचे लक्ष आपल्याच राज्यातील अस्पृश्यांकडे लागले होते असे नसून ते अखिल भारताचे एक अग्रगण्य पुढारी असल्यामुळे ते आमच्या ह्या मिशनची प्रगती मन लावून निरखीत होते. म्हणून ह्याच सुमारास त्यांनी मला बडोद्यास बोलाविले. बडोद्याचे न्यायमंदिराच्या भव्य दिवाणखान्यात एक जंगी दरबारवजा जाहीर सभा बोलावून स्वत:च्या अध्यक्षत्वाखाली त्यांनी माझे अस्पृश्योद्धार ह्या विषयावर एक व्यख्यान करविले. हेच व्याख्यान मला पुढे लिहून काढण्यास सांगून ते स्वतंत्र पुस्तकरूपाने प्रसिद्ध करण्याचाही खर्च दिला. बहिष्कृत भारत ह्या नावाने ते प्रसिद्ध झाल्यावर त्याच्या १००० प्रती बडोदे सरकारने विकत घेऊन वाटल्या. ह्याचप्रमाणे पंडित सातळेकर ह्यांनी केलेल्या स्पर्शास्पर्श ह्या पुस्तकालाही महाराजांची मोठी मदत झाली आहे. अर्थात ह्या सर्व गोष्टींचा परिणाम बडोद्यातील कार्यावरही होऊ लवकरच पंडित आत्माराम ह्यांच्या देखरेखीखाली कार्यास मोठा जोर आला.
इ. स. १९०९ साली महाराजांचा मुक्काम पुणे, मुंबईकडे झाला. त्यावेळी सप्टेंबर महिन्यात आमच्या डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या पुणे शाखेच्या शाळांच्या बक्षिस समारंभाचे आणि मुंबईतील टाऊनहॉलमध्ये ता. १८ ऑक्टोबर रोजी भरलेल्या आमच्या मिशनच्या भ्रातृसंस्थेच्या वाढदिवस समारंभाचे महाराजच अध्यक्ष झाले. ह्या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे १००० रूपये व २००० रूपयांची देणगी देऊन महाराज मिशनचे आश्रयदाते झाले. श्री. सयाजीराव गायकवाड स्कॉलरशिप फंड नावाने अद्यापि ह्या फंडाच्या व्याजातून आमच्या शाळांतील विद्यार्थ्यांना नियमित रीतीने शिष्यवृत्या दिल्या जात आहेत. शिवाय आमच्या वसतिगृहातील रा. भटकर नावाच्या एक महार विद्यार्थी मॅट्रिक परीक्षेत पास झाल्यावर त्याला कॉलेजातील पुढील शिक्षणासाठी दरमहा रू. २५ स्कॉलरशिप दिली. पुण्यातील बक्षिस समारंभाचे वेळी पुणे शहर व लष्कर येथे राहणा-या निरनिराळ्या अस्पृश्य वर्गांतील लोकांनी आपसात वर्गणी करून महाराजांच्या अस्पृश्योद्धारक कार्याचा जाहीर गौरव करण्यासाठी एक मानपत्र अर्पण केले. त्यावेळी महाराजांच्या दर्शनासाठी लहान थोर स्त्री-पुरूषांची अलोट गर्दी जमली होती. निरनिराळ्या अस्पृश्यवर्गीय स्त्रियांनी जुन्या रिवाजाप्रमाणे आरती करून महाराजांना मोठ्या प्रेमाने ओवाळिले. महाराजांनीही परत भेट म्हणून आरतीत ५/५ सोन्याच्या मोहरा ठेवून आपली गोड समयज्ञता प्रकट केली. तो एकंदर देखावा अत्यंत हृदयस्पर्शी झाला.
हा समारंभ आटोपून महाराजसाहेब परत बडोद्यास गेल्यावर लगेच पुणे येथील महार समाजाचे प्रमुख पुढारी रा. शिवराम जानबा कांबळे व रा. श्रीपतराव थोरात ह्या दोघांना महाराजांनी बडोद्यास खास आमंत्रण देऊन नेले व त्यांच्याशी विचारविनिमय करून त्यांचा योग्य सत्कार केला व त्यांना उघड रीतीने रामहालात आमंत्रण करून आपल्या टेबलावर सहभोजन केले.
ह्यापुढे ९ वर्षांनी सन १९१८ साली मुंबई येथे आमच्या मिशनची अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद झाली. तिचे अध्यक्ष होऊन महाराजांनी ह्या राष्ट्रकार्यास पुन: नवीन चैतन्य दिले.
अंत्यज वर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता नुसत्या शाळा आणि वसतिगृहे स्थापून महाराज स्वस्थ बसले नाहीत. बडोदा येथील वसतिगृह ही एक अखिल भारतात नमुनेदार संस्था आहे, हे वर सांगितलेच आहे. हा प्राचीन गुरूकुलाच्या धर्तीवर एक पुण्याश्रम आहे. पंडित आत्माराम ह्या आश्रमातच राहत असतात. त्यांच्या मुलांनाही वडिलांचेच समाजसेवेचे वळण लागले आहे. येथील विद्यार्थ्यांच्या (मुलांची वेगळी व मुलींची वेगळी) भोजनाची, स्नानाची, अभ्यासाची व व्यायामाची अगदी उच्चवर्णीयांप्रमाणेच उत्तम सोय केलेली आहे. गुजरातेतील अंत्यज सर्व आपापली धार्मिक गृहकृत्ये आपल्या जातीतल्याच पुरोहिताकडून करून घेतात. त्यांना गरोडा म्हणतात. ह्या गरोड्यांकडून धर्मकृत्ये योग्य रीतीने व्हावी म्हणून त्यांच्यासाठी एक संस्कृत शाळा काढण्यात आली आणि तीत २५ गरोडा विद्यार्थ्यांना दरमहा रूपये ८ च्या स्कॉलरशिपा देऊन तयार करण्यात आले. वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांना वेदमंत्रासह नित्याची उपासना करण्यास शिकविण्यात येते. शिवाय त्यांची दोन बालवीर पथके आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेली आहेत. एकंदरीत हा आश्रम पाहणा-यावर फार उदात्त परिणाम होतो. ह्या देशातील व बाहेरील पुष्कळ प्रसिद्ध पुरूषांनी हा आश्रम समक्ष पाहून आश्चर्य प्रकट केले आहे. कलकत्त्याचे प्रसिद्ध कोट्याधीश रा. ब. जुगलकिशोर बिर्ला ह्यांनी ह्या आश्रमास १९१९ च्या नोव्हेंबरमध्ये भेट दिली; तेव्हा आश्रमातील स्वच्छता आणि विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणविषयक पात्रता पाहून त्यांच्यावर इतका परिणाम झाली की, त्यांनी विद्यार्थ्यांना गीता शिकविण्यासाठी व शिष्यवृत्त्या देण्यासाठी रू. १५,००० ची देणगी दिली. ह्या देणगीतून विद्यार्थ्यांच्या खास परीक्षा घेऊन त्याप्रमामे शिष्यवृत्या देण्यात येतात. ह्या आश्रमाला श्री. महराजांची वरचेवर भेट असते. सन १९१० जानेवारी २३ रोजी बडोद्यातील सर्व अस्पृश्य विद्यार्थ्यांना मोतीबागेतील राजवाड्यात समक्ष जमवून त्यांनी मोठी थाटाची मेजवानी दिली. पुन: १९१२ साली अस्पृश्यांच्या सर्व मुलांना लक्ष्मीविलास राजवाड्यात जमवून खाऊ वाटला. त्यावेळी इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकर पाहुणे आले होते. त्यांना हा प्रकार फार आवडून त्यांनी स्वत: १००० रूपये शिष्यवृत्त्यांसाठी दिले.
खालील कोष्टकावरून बडोद्यातील अंत्यज शाळांची कशी प्रगती झाली हे दिसून येईल.
वर्ष | मुलांच्या शाळा | मुलींच्या शाळा | एकंदर शाळा |
विदयार्थी |
१८८३ | २ | |||
१८८४ | ९ | |||
१८९१ | १० | ७८४ | ||
१९०० | २२ | १,७२६ | ||
१९१०-११ | ४ | २८८ | १५,५४१ | |
१९२०-२१ | २२२ | २५ | २२६ | १२,०९५ |
१९२५-२६ | २२० | ५ | २२५ | १५,४०३ |
१९३०-३१ | १९९ | २ | २०१ | १८,३८८ |
१९३१-३२ | ९० | १ | ९१ | २०,९०३* |
*स्वतंत्र शाळा बंद.
|
वर जी इ. स. १८८३ पासून १९३२ अखेर शाळांच्या व विद्यार्थ्यांच्या संख्येत एकंदरीत प्रगती दाखविली आहे तिच्यात मधून मधून चढउतार दिसत आहे. बडोदे राज्यातील अंत्यजांची एकंदर लोकसंख्या वर दर्शविल्याप्रमाणे २,०२,७७७ आहे. त्यापैकी आजतागायत प्राथमिक शाळांत शिकणा-या एकंदर मुलांची संख्या २०,९०३ आहे.
गेल्गा वर्षापासून अस्पृश्यांकरिता स्वतंत्र निराळ्या शाळा नसाव्यात अशी विद्या खात्याने आपल्या धोरतात दुरूस्ती केल्याचे समजते. ही दुरूस्त होऊन अस्पृश्यांच्या स्वतंत्र ११० शाळा गेल्या वर्षात कमी केल्या गेल्या. तरी गेल्या वर्षी मुलांच्या संख्येत २,५१५ वाढच झाली आहे. ती खरे व टिकाऊ असल्यास ही दुरूस्ती वावगी नाही.
कलाभुवन, ट्रेनिंग कॉलेज, हायस्कुले व कॉलेजे ह्यांतून अस्पृश्यांना शिकण्यास सर्रास मोकळीक होऊन बरीच वर्षे झाली आहेत, तरी पण पदवीधरांची संख्या ११२ हून जास्त आढळत नाही. पण सबंध मुंबई इलाख्यात तरी आज सर्व अस्पृश्य वर्गाच्या पदवीधरांची संख्या ६ वर कोठे गेली आहे? अशा स्थितीत बडोद्यासच नाव कोण ठेवू शकेल? हल्ली हायस्कुलात १५०, कलाभुवनात १५, ट्रेनिंग कॉलेजात १७ मुले शिकत आहेत. दुय्यम शिक्षणार्थ एकंदर ३६ स्कॉलरशिपा आहेत. बडोदे राज्यात सर्व अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षण मोफतच मिळते.
पहिली १०/१२ वर्षे अस्पृश्य वर्गांना शिकविण्याला हिंदू शिक्षकच मिळत नसत. कितीही पगार घेऊन एकादा हिंदू मिळाला तरी तो टिकून रहात नसे. म्हणून अशा शाळांत मुसलमान शिक्षकावर काम भागवावे लागे. असे स्वत: महाराज साहेबांनाच एका संमेलनात उघड सांगावे लागले. पण आता ही स्थिती पालटून हल्ली १६६ अंत्यज वर्गाचेच शिक्षक विद्या खात्यात अध्यापनाचे पवित्र काम करीत आहेत, ही गोष्ट खरोखर महराजांना भूषणावह आहे.
इ. स. १९३२ साली बडोदे राज्यातील २४ खेड्यांत २४ निरनिराळ्या सहकारी पतपेढ्या ३६० अस्पृश्यवर्गीय सभासदांच्या फायद्यासाठी काम करीत होत्या, अशी मला माहिती मिळालेली आठवते. त्यास दरमहा ४ आणे व्याजाने थकलेल्या कर्जफेडीसाठी शेतकीची आउते घेण्यासाठी व हातमाग खरेदी करण्यासाठी रकमा कर्जाऊ देण्यात आल्या.
बडोदे, आमरेली, पाटण, नवसारी येथील चार बोर्डिंगांतील सर्व मुलींना शिवणकाम, कशिदा व स्वयंपाक शिकविण्यात येतो. इ. स. १९१९ साली ह्या बोर्डिंगातील १७ वर्षांच्या एका अनाथ मुलीचा विवाह एका उच्चवर्णीयाशी करून देण्यात आला. तेव्हा दरबाराकडून रू. ३० ह्या वधूला स्त्री-धन म्हणून देण्यात आले.
बडोदे राज्यातील सर्व दवाखाने, कोर्टे, इतर सरकारी कचे-या व ग्रंथालये सर्व अस्पृश्यांना सर्वदा मोकळी झाली आहेत. धारासभेतून अस्पृश्य प्रतिनिधीची मधून मधून नेमणूक होते. मुलकी खात्यात एक पदवीधर व कितीतरी कारकून राजरोस सर्वांबरोबर बसून कामे करीत आहेत.
हल्ली दुमदुमत असलेल्या मंदिर-प्रवेशाच्या दंगलीत ह्या पतितपावन महाराजांनी आघाडी मारून सरशी मिळविली आहे. हल्लीची मंदिर-प्रवेशाची चळवळ सुरू होण्यापूर्वीच त्यांनी आपले खंडेरावाचे मंदिर अस्पृश्यांस खुले केले होते, आणि गेल्या ऑक्टोबर महिन्यात तर सर्व हिंदू धर्मीयांस जातगोत मनात न आणता सरकारी देवळातून प्रवेश करू द्यावा व तसे करण्यास खासगी देवळाच्या मालकांची मने वळवावी, कारण परमेश्वर सर्वांवर सारखेच प्रेम करतो, अशा आशयाचा श्री. महराज साहेबांनी लोझानहून तारेने हुकूम पाठविला. ह्या विरूद्ध काहींनी चळवळ चालविली असली तरी तिला मुळीच जोर नाही. ब्रिटिश हिंदुस्थानातून सध्या चालू असलेल्या मंदिर-प्रवेशाच्या चळवळीस तेथील सनातनी मंडली जोराने विरोध करीत आहेत, पण तितका तीव्र विरोध बडोद्यास नाही असे समजते. सत्कार्य म्हटले म्हणजे त्यात विघ्नेही यावयाचीच. पण त्यामुळे घाबरून न जाता, संकटे ही कार्यसिद्धीची मापेच होत अशी मनात खूणगाठ बांधून समाजधुरीणांनी आपले लोकशिक्षणाचे व लोकोन्नतीचे कार्य सतत करीत राहिले पाहिजे. महराजांनी असे केले व म्हणूनच आज त्यांना अस्पृश्योद्धाराच्या ह्या पुण्यकार्यात अपूर्व यश मिळविता आले.
असो, “परगुणपरिमाणून पर्वतीकृत्य नित्यं| निज-हृदि विकसन्त: सन्ति सन्त: कियन्त:” || ह्या कोटीतील ह्या महान संतास दीर्घायु व पूर्ण आरोग्य लाभो आणि त्यांच्याकडून अस्पृश्यांचा कायमचा उद्धार होवो अशी परमेश्वराजवळ नम्रतापूर्वक मागणी करून मी हा अल्पलेख पुरा करितो.