धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
“सर्व भूतांतरी सारिखाचि ईश
सांगा मग अस्पृश्य कोण आहे.”
-ज्ञानगिरीबुवा
अलीकडे शिक्षणात मागासलेल्या ज्ञातीमध्ये आपआपल्या ज्ञातीची उन्नती व्हावी ह्या हेतूने बरीचशी चळवळ सर्वत्र चालू असल्याने आढळून येते. निरनिराळ्या जातींच्या परिषदा, त्यात होणारी भाषणे, तरूणांच्या आकांक्षा ह्या सर्वांचा विचार केला म्हणजे आमच्या वरील उद्गाराची सत्यता पटल्यावाचून राहणार नाही. ‘आणखी प्रस्तुत ब्राह्मणेतर वर्ग जागृत झालेले पाहून ज्याला आनंद होणार नाही तो मुळी मनुष्यच नव्हे’ हे एका ब्राह्मण नटाचे उद्गार वाचले म्हणजे या जागृतीबद्दल सर्वत्र कमी सहानुभूती उदित होत आहे हे आमच्या वाचकांच्या लक्षात येईल.
परंतु मागे पडलेल्या जातींविषयी उच्च वर्णामध्ये जी सहानुभूती आज आढळून येत आहे तिजपेक्षा अस्पृश्य मानलेल्या जातींच्या उन्नत्तीकडे आज सुशिक्षित लोकांचे अधिक प्रमाणाने लक्ष लागले आहे. काही वर्षांपूर्वी शेट दामोदरदास गोवर्धनदास ह्यांनी एक हजार रूपयांची प्रथम देणगी दिल्यामुळे निराश्रित साहाय्यकारी मंडळीच्या कामास जेव्हा प्रारंभ झाला, तिच्या उत्साही सेक्रेटरीने हे मोठ्या जबाबदारीने कार्य जेव्हा शिरावर घेतले त्यावेळी सर्व हिंदुस्थानभर ह्या विषयाची चर्चा होऊ लागेल. सर्व देशभर अस्पृश्य मानलेल्या लोकांविषयी कळवळा उत्पन्न होईल, राजे महाराजे, शेटसावकार, सुधारक व पुराणमतवादी सर्वच ह्या कार्यास हातभार लावावयास जरी सिद्ध झाले नाहीत. तरी प्रसिद्धपणे आपली सहानुभूति व्यक्त करू लागतील. असे वाटले नव्हते. परंतु ज हे सर्व होऊनही एका अनपेक्षित बाजूने ह्या कार्यासंबंधाने मोठी जागृती झाल्याची चिन्हे दिसत आहेत. काही वर्षांपूर्वी आमच्या सुशिक्षितांचे ह्या विषयाकडे बिलकूल लक्ष नव्हते. नीच मानलेल्या जातींना अस्पृश्य मानणे म्हणजे आपण मोठा अन्याय करणे होय असे कबूल करावयास कोणी सिद्ध नव्हते आणि ज अंत्यजोद्धार करणे हेच खरे धर्मरहस्य आहे असे प्रतिपादन करणारे नाटक तयार होते, त्याचा प्रयोग येथे एक नावाजलेली मंडळी करते, सर्व नाटकगृह प्रेक्षक समुदायाने गच्च भरून जाते व लोकसमुदाय नाटक चालू असता तल्लीन होऊन वारंवार अनुमतीदर्शक टाळ्यांचा गजर करीत जातो.
वरील उदगार रा. रा. दामोदर विश्वनाथ नेवाळकर यांनी ‘धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार’ या नावाचे जे नाटक रचले आहे त्यास उद्देशून आहेत हे नाटक आम्ही फार काळजीपूर्वक वाचून पाहिले. ह्या जागोजागी रा. नेवाळकरांनी जा स्पष्टोक्ती आपल्या पात्राच्या तोंडी घातली आहे. तितकी स्पष्टोक्ती अंत्यजोद्धारासंबंधाने होणा-या जाहीर व्याख्यानामध्येही आढळणे शक्य नाही. आणखी ह्या नाटकामध्ये केवळ स्पष्टोक्तीच आहे असे मात्र नव्हे. ह्यातील युक्तीवादही मोठा प्रशंसनीय आहे. न्हाव्यासारखी जात महाराला अति नीच समजते. आणि ब्राह्मणेतर आपल्या श्रेष्ठत्वाच्या अभिमानात सदा गर्क असतो. परंतु खरे पहाता महाराचे रक्त हिरवे नाही, न्हाव्याचे रक्त पिवळे नाही आणि ब्राह्मणाचे रक्त पांढरे नाही. असे असून उच्चनीचपणा संबंधाचा झगडा मात्र मोठ्या निकराने चाललेला पाहून प्रस्तुत नाटकातील ‘वेडापीर’ नामक प्रमुख पात्राने पुढील उदगार काढले आहेत.’ आमच्या हाडामांसात खिळलेले हे जातिद्वेषाचे जालीम विष कधी नाहीसे होईल ते होवो पण आमच्या राष्ट्राला ही एक भयंकर कीड लागलेली आहे ही गोष्ट काही खोटी नाही. एकाच देशात राहणारे एका मातृभूमीची लेकरे सख्खी भावंडे ह्यांनी एकमेकांना कट्ट्या दुष्मनाप्रमाणे लेखावे ही किती शोचनीय गोष्ट आहे? ह्याबद्दल आमची आम्हाला शरम वाटली पाहिजे.”
अस्पृश्य जातीला आम्ही दूर सारले, परधर्मीयापेक्षाही त्यास आम्ही नीच ठरविले, त्यांच्या धर्मीयांपेक्षाही त्यास आम्ही नीच ठरविले, त्यांच्या सावलीसही आम्ही उभे रहातनासे झालो, म्हणून त्या भयंकर निकृष्टावस्थेला जाऊन पोहोचल्या. ह्याचा दोष सर्व समंजस लोक सर्व वर्णांत श्रेष्ठ म्हणविणा-या आम्हा ब्राह्मण वर्गाच्याच माथी मारणार” असे या नाटकातील दादासाहेबांनी निक्षून सांगितले आहे.
अस्पृश्य व इतर जाती शिक्षित झाल्या, लोकांची मने उदार झाली. उदात्त विचार त्यांच्या मनात घोळू लागले, आपली उन्नत्ती व्हावी अशी त्यांच्यात चिंता उत्पन्न झाली. त्यांच्यात शुचिर्भूतपणा आला, म्हणजे त्यास ब्राह्मण व्हावयास हरकत नसावी.” ब्राह्मणत्वाला शोभणारे विचार जर शूद्राच्या अंत:करणात घोळू लागले आणि जर त्यांच्या हातून तसे आचार होऊ लागले म्हणजे हस्तपादादिक अवयवांच्या कृतीमध्येच ते निमग्न झाले किंवा शुष्क वैदिकांच्या भोव-यात पडून, निरर्थक तंटे उपस्थित करण्यात आले तर मात्र अंत्यजास ब्राह्मण होता यावयाचे नाही. “संध्यातर्पण आणि वेदपठण” हे काही ब्राह्मणाचे खरे लक्षण नव्हे. या बाहेरच्या गोष्टी कोणीही करू शकेल. विचाराने ज्याने आपले मन शुद्ध केले आहे, निष्पाप केले आहे, तोच खरा ब्राह्मण” असा सिद्धांत या नाटकामध्ये ठरविला आहे.
आता एकीकडे वरिष्ठ समाजाने लाथाडून दूर फेकल्यामुळे सर्वतोपरी हताश झालेली आणि दुसरीकडे दारिद्र्य, दुष्काळ आणि साथीचे रोग इ. तापत्रयींनी होरपळून गेल्यामुळे अगदी टेकीस आलेली जी अस्पृश्य मंडळी त्यांच्यातील पुष्कळ लोक परधर्माचा स्वीकार करतात त्यासही पुन्हा स्वधर्मात घेण्यास हरकत नाही हे शामाबाईच्या पत्रावरून धर्मसहस्यात दाखविले आहे.
अस्पृश्य जातींना अस्पृश्य मानण्यात येऊ नये, त्यांचा विटाळ मानू नये, व्यवहारात साळी, कोष्टी, माळी, कुणबी ह्यांना आपण जितक्या जवळच्या नात्याने वागवितो तितक्याच जवळच्या नात्याने अंत्यजांना वागवावे. अंत्यजांच्या मुलांना आपल्या (ब्राह्मणांच्या) मुलांबरोबर एका वर्गात बसून शिकायला प्रतिबंध नसावा ह्या शंकराचार्यानी घालून दिलेल्या तिन्ही अटी, न्हावी, धोबी, मजूर ह्यांनी बहिष्कार घालताच व ह्या बहिष्कारामुळे सबंध महिन्यात एक कपर्दिका मिळाली असेल तर शपथ असा अनुभव येताच भिक्षुक वर्गाने पटापट कबूल केल्या आहेत.
अशा रीतीने अंत्यजांच्या उन्नतीचा प्रश्न रा. नेवाळकरांनी सोडविला असून धर्मविषयक बाजूही त्यांनी प्रागितक धोरण लक्षात ठेवून पुढे आणली आहे. ख्रिस्ताला आपला तारक असे मान्य केले की, आत्म्याला शांती मिळते, पापापासून मुक्तता होते असे वारंवार सांगण्यात येते. परंतु मनुष्य स्वभावाचा विचार केला तर हे खरे नाही असाच प्रत्यय येतो.
केवळ कोणत्या तरी एका देवतेच्या नावाचा जप करीत बसल्याने धर्मसाधन होते, देवाची प्राप्ती होते असे नाही. शुद्ध भाव पाहिजे. शुद्ध मन पाहिजे. आणि एकनिष्ठेने देवास शरण गेले पाहिजे असे आम्ही म्हणतो. “रामराम म्हटल्याने जर रामाचा अनुभव येतो तर साखर साखर म्हटल्याने साखरेचा, विस्तव विस्तव म्हटल्याने विस्तवाचाही अनुभव आलाचा पाहिजे. आणि तसा अनुभव जर येत नसेल तर रामाचे भजन करण्याची पद्धत याहीपेक्षा काही निराळीच असली पाहिजे. शांतीचा भंग करणारे कामक्रोधादि मनोविकारांचे झटके आवरण्याचा प्रयत्न केल्याशिवाय असल्या प्रार्थनेतल्या शब्दांनी शांती कशी प्राप्त होणार? सर्व धर्मांना सारखे लागू असणारे अस धर्माचे खरे तत्त्व हेच एक आहे.” आणि एके ठिकाणी बेड्या पिरानेच असे स्पष्टपणे म्हटले आहे की, सर्वांना निर्माण करणारा कोणीतरी एकच देव असला पाहिजे.
येथपर्यंतच्या वतरणावरून व आमच्या विवेचनावरून रा. नेवाळकरांच्या मते धर्मरहस्य कशात आहे व ते काय आहे हे वाचकाच्या लक्षात येईल.