धर्म-२
धर्माचा संबंध विशिष्ट व्यक्तिपुरताच न राहता तो संबंध सर्वाशी पोचणे आवश्यक आहे ही गोष्ट आम्ही क्षणमात्र विसरलो नाही. इतकेच नव्हे तर मनुष्यमात्रामध्ये एक प्रकारचे ऐक्य जुळवून आणल्याशिवाय धर्माला खरे सामर्थ्य प्राप्त व्हावयाचे नाही हेही आम्ही जाणून आहो.
जे अनुभव सार्वत्रिक आहेत, ज्यांचा आमच्या जीविताशी संबंध पोचतो आणि ज्यांचा साक्षात्कार आम्हांपैकी प्रत्येकास प्रत्यक्ष रीतीने येण्याचा संभव आहे, असेच अनुभव हे धर्माचे विषय होत. धर्माचा विषय प्रतिपादण्यास केवळ तार्किक मीमांसेचे अवलंबन केल्यास धर्मविषयही एक मानवी मनाचे बाहेरील बाब आहे असे समजल्यास ती केवळ काल्पनिक आणि मनोवृत्तिजन्य आहे, अशा आक्षेपास पात्र होईल. अशा ह्या दोन्ही परस्परविरोधी आपत्ती टाळावयाच्या असतील तर ब्रह्मवादाचाच आधार घेतला पाहिजे. ह्या ग्रंथामध्ये ज्याचे विस्तारपूर्वक विवरम झाले आहे, आणि ज्याचा आमच्या अंत:करणात साक्षात्कार पटतो असे स्वयंभू आध्यात्मिक जीवन ह्यालाच आम्ही ब्रह्मवाद हे नाव दिले आहे. आणि त्याचेचमुळे वर सांगितलेल्या दोन्ही आपत्ती टळून धर्मविषयाचा सार्वत्रिक अनुभव घेण्याची पात्रता आमच्यामध्ये येण्यासारखी आहे. ह्या स्वयंभू आध्यात्मिक जीवनाचा अंत:करणामध्ये साक्षात्कार झाल्यावर ह्या संसारातील मनुष्याची सारी धडपड अपुरी, भ्रांतिमूलक आणि व्यर्थ आहे असे कळून आल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत ही धडपड केवळ व्यक्तिपुरतीच असते तोपर्यंत तिची भ्रांतिमूलकता स्पष्ट दिसून येत नाही., परंतु समष्टीच्या दृष्टीने ह्या मानवी धडपडीचे अवलोकन केल्यास खालील प्रकारचा स्यादवाद आपल्यापुढे दत्त म्हणून उभा राहतो. एकतर मनुष्याच्या अंत:करणामध्ये ह्या नवीन जीवनाचा प्रादुर्भाव होऊन तो अंतर्बाह्य समर्थ होतो, नाही तर आध्यात्मिक दृष्टीने मनुष्य केवळ नष्टप्राय होऊन जातो. मनुष्य म्हणजे केवळ एक मोठा भ्रांतिकृत चमत्कार होय! ह्याहून तिसरा पक्ष संभवतच नाही.
आजपर्यंत मानवी इतिहासामध्ये जे जे विशिष्ट धर्म प्रचलित झाले आहेत त्या सर्वाला वरील स्यादवादाची कसोटी लावून पाहता सर्वांमध्ये ख्रिस्तीधर्म श्रेष्ठ आहे असे दिसून येते. आध्यात्मिक जीवनाच्या कसोटीस एक ख्रिस्तीधर्मच उतरतो. आणि ज्या अंशाने तो ह्या कसोटीस उतरतो, तेवढ्याच पुरते त्याचे सत्य निर्भ्रांत आहे. एरवी त्याची जी ऐतिहासिक परंपरा चालून आली हे तिच्यामध्ये असे निर्भ्रांत सत्य आहे असे म्हणवत नाही.
ख्रिस्तीधर्म हा उद्धाराचा धर्म आहे. जुन्या जगातून निघून नवीन जगाचा स्वीकार करावा असे त्याचे सांगणे आहे आणि ह्या कल्पनेचा किंचित अधिक विचार करणे जूर आहे. जगामध्ये जे अशुभ किंवा वाईट आहे, ते हिंदुधर्मात सांगितल्याप्रमाणे माया किंवा आभास आहे, असे नव्हे तर तो नैतिक गुन्हा आहे आणि त्याच्यामुळे जगामध्ये अव्यवस्था होत आहे; असे ज्याअर्थी आहे त्याअर्थी सगळे जगच असत्य आहे म्हणून त्याचा त्याग करावयाचा नाही; तर जगाविषयीची आपली जी एक विशेष चुकीची भावना आहे तिचा त्याग करावयाचा आहे आणि ह्यावरून मानवी जीविताचे काही आध्यात्मिक स्वरूप असावयाचा संभव दिसून येत आहे आणि हा हेतू केवळ ज्ञानाच्या प्रबोधनाने साध्य होण्यासारखा नाही तर ह्यासाठी आपली आमूलात नैतिक पुनर्घटनाच व्हावयास पाहिजे.
प्रेमप्रसाद आणि आदरभाव ह्यांनी युक्त अशा जगताप्रत आपली उन्नती व्हावयास पाहिजे. ख्रिस्तीधर्माच्या मते ह्या उत्क्रमणामध्ये मानवी जीविताचा पाया रोवला आहे कारण देवाचा मनुष्यास साक्षात्कार होऊन राहत नाही तर देव आणि मनुष्य ह्यांमध्ये पूर्ण ऐक्य आहे आणि ते ऐक्य मानवी जीवितामध्ये दिसून येत आहे अशी ह्या धर्माची श्रद्धा आहे. ह्या मूळ सत्याचे स्वरूप ख्रिस्त हा देवमाणूस आहे अशा कोत्या मतामध्ये दिसून येत आहे. तरी ह्या मताच्या सदोषत्वामुळे त्या मूळ सत्याचा प्रभाव नाहीसा होत नाही.
देव आणि मनुष्य ह्यांच्यामध्ये सायज्य आहे अशा कल्पनेनेच धर्माला शुद्ध आणि पूर्ण आधअयात्मिकता प्राप्त होण्याचा संभव आहे. नाही तर देव आणि मनुष्य ह्यांच्यामधील संबंध केवळ बाह्यसंबंध होईल. ख्रिस्ताचे चरित्र आणि त्याच्यामागून झालेल्या त्याच्या अनेक अनुयायांचे परिश्रम, मोठमोठी राष्ट्रे आणि थोर थोर पुरूष ह्यांनी केलेली जगाची श्रेष्ठतम सेवा ह्या सर्वांमध्ये ख्रिस्ती जीवनाचा विकास कसा होत आला आहे ह्याचा विस्तार करून विचार करण्याचे हे स्थळ नव्हे. आम्हाला इथे एवढेच सांगता येईल की, ही सर्व कामगिरी अमुक एका विशेष काळी घडून आलेली नसून ती सर्व युगामध्ये सारखे विकसत आलेले एक सत्कार्य होय आणि सर्व कालातील जी मूळ जीवनशक्ती तिचा जो निश्चित आणि उच्च आदर्श त्याच्या कसोटीला निरनिराळ्या काळी घडलेली कामगिरी लावून पाहावयाचे आहे. निरनिराळ्या युगांमध्ये संस्कृतीची स्वरूपे जरी बदलत जात आहेत तरी वर सांगितलेल्या मूळ जीविताचा उच्च आदर्श कायम ठेवणे धर्माला भाग आहे हे जरी एकपक्षी खरे आहे तथापि दुसरेपक्षी त्या आदर्शाची अंमलबजावणी निरनिराळ्या संस्कृतीवर, कार्यावर आणि मदतीवरच अवलंबून आहे हेही खरे आहे.
हल्लीचे काळी धर्माचे काम अत्यंत कठीण झाले आहे. धर्माशी आधुनिक संस्कृतीचा घोर विरोध येऊ लागला आहे आणि तिच्याशी झगडताना धर्माला आपले वर्चस्व परिश्रमाने राखावे लागत आहे. धर्म आणि आधुनिक संस्कृती ह्यांच्यामध्ये मोठा लढा पडला आहे ही गोष्ट नाकारून किंवा तिच्याकडे डोळेझाक करून चालावयाचे नाही. एकपक्षी आपल्याकडे शुद्ध अंतरिक आणि नैतिक जीविताचा आदर्श आहे तर इतरपक्षी शक्तीचा आदर्श आहे. पहिला आदर्श पौरूषेय जीविताचा तर दुसरा अपौरूषेय जीविताचा आहे. ह्या दोन परस्परविरूद्ध आदर्शामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे केवळ वरपांगीपणा आणि गोंधळ माजविणे होय. कारण खरे पाहता ह्या दोहोंतून कोणातरी एकालाच पूर्ण स्वामित्व मिळाले पाहिजे.
परंतु ज्या आदर्शाचा पक्ष ख्रिस्तीधर्माने स्वीकारला आहे त्याचे स्वरूप अखिल मनुष्यजातीचा अनुभव आणि हल्लीच्या काळची परिणत आध्यात्मिक स्थिती ह्यांच्याशी अनुकूल झाल्याशिवाय त्याचे वर्चस्व कायम राहणार नाही. आधुनिक प्रणित आकांक्षांचे समाधान ख्रिस्तीधर्माच्या केवळ परंपरागत बाह्य गोष्टींनी होणे शक्य नाही.
ह्या दृष्टीने पाहता सध्याचे काळी ख्रिस्तीधर्मामध्ये तीन प्रकारांनी बदल झाला पाहिजे:- (१) जुन्या ख्रिस्तीधर्मात वर्णिलेली जगाची कल्पना आता बिलकूल निराधार ठरली आहे, ह्या बाबतीत जुन्या-नव्याची तडजोड करण्याचा नाद सोडून देऊन नव्यामध्ये जे सत्य आहे त्याचा आम्ही निर्भयपणे पूर्ण स्वीकार करावयास पाहिजे आणि ह्यासाठी आमच्या धर्मविषयीच्या कल्पनेतच फरक पडला पाहिजे आणि ह्या पुनर्घटनेचे सामर्थ्य आणि धैर्य आम्ही आमच्यामध्ये आणल्याशिवाय गत्यंतर नाही. (२) जुन्या काळच्या प्रगतीमुळे सांप्रदायिक धर्माची विधाने आम्हांला अगदी क्षुद्र आणि आकुंचित वाटू लागली आहेत. त्या विधानांवरच अवलंबून राहिल्याने आमची अवनती होण्याची भीती आहे. विशेषकरून “आध्यात्म”, “पौरूष” आणि “नीती” ह्या तिन्हींचे स्वरूप अधिक विस्तृत आणि खोलदृष्टीने ओळखावयास पाहिजे. आध्यात्मिक जीविताचा पाया स्वानुभवावर रचला पाहिजे. (३) जुन्या ख्रिस्तीधर्माचे स्वरूप हे एका थकून हतवीर्य झालेल्या युगाचे कार्य होते म्हणून त्याचे मूळ धोरण विशेषत: निवृत्तीपर आणि निषेधात्मक असे होते. मनुष्यस्वभावाची खरी थोरवी न ओळखल्यामुळे त्याचा उद्धार सर्वस्वी ईश्वरी कृपेवर अवलंबून ठेवण्यात आला. पापापासून मुक्ती मिळावी ह्याच गोष्टीकडे जुन्या ख्रिस्तीधर्माचे सर्व लक्ष वेधून गेल्यामुळे मनुष्यस्वभावाची शुभाप्रत कशी उन्नती होत चालली आहे हे त्याच्या लक्षात येण्याचा मार्ग राहिला नाही व आनंदवादाचा त्याला पूर्ण स्वाद मिळेना. अवनती आणि दुरास्थिती ह्यातून मनुष्याची सुटका झाली तरी त्यास स्वतंत्र आणि स्वयंप्रेरित नवीन कर्तृत्वशक्तीची जोड मिळवून देण्यास जुना ख्रिस्तीधर्म असमर्थ आहे. हल्ली जी पूर्ण प्रकारे पुनर्घटना व्हावयास पाहिजे ती ही की, तिच्याद्वारे केवळ अंध शक्तीच्या पायावर रचलेली नैसर्गिक नीती तिच्याशी कोणत्याही अंशाने विरोध कमी न होता कर्तृत्वशक्ती आणि आनंदवाद ह्यांचे महत्त्व पूर्णपणे समजून येईल.
थोडक्यात सांगावयाचे म्हटले तर ख्रिस्तीधर्माला अगदी नवीन स्वरूप प्राप्त व्हावयास पाहिजे. दुर्बलतेची बाजू सोडून ख्रिस्तीधर्माने आध्यात्मिक जीवनाचा पक्ष पूर्णपणे स्वीकारला पाहिजे आणि ज्या जीर्ण झालेल्या अनावश्यक गोष्टींचा त्याला प्रगतीच्या मार्गात अडथळा येतो त्याचा त्याने निश्चयाने त्याग केला पाहिजे. त्याच्या स्वरूपाची जी सार्वत्रिक आणि सनातन अंगे असतील त्यासच प्राधान्य देऊन जीविताचा प्रामाणिकपणा त्याने शाबूत राखला पाहिजे. धार्मिक पायावर मनुष्याची एकी एकदम होईल अशी आमची अटकळ नाही, परंतु आमच्या मार्गामध्ये काय अडथळे आहेत ह्याची आम्हांस योग्य कल्पना झाली तरी मोठा कार्यभाग होणार आहे. धार्मिक बाबतीतील सर्व अप्रामाणिकपणा नष्ट करून आम्हांला आध्यात्मिक निरामय साधावयाचे असेल तर ह्या प्रकारच्या सम्यक् ज्ञानाची जरूरी आहे.