पितृशासन
तारीख ७ ऑगस्ट रोजी शासनयोगाविषयी विचार करीत असताना पितृशासन, गुरूशान, आणि राजशासन असे शासनाचे तीन भाग आपण केले होते, त्यांपैकी आज पितृशासनाविषयी थोडासा विचार करू. प्राचीन काळी मनुष्यसमाजाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये पितृशासनाचेच प्राबल्य सर्वस्वी आढळून येत असे. आर्यांची वेदकालीन सुधारणा होईपर्यंतही त्यांच्यात पिता म्हणजे कुटुंबाचा पती, गुरू, उपाध्याय आणि राजा हे सर्वच अधिकार चालविणारी व्यक्ती असे. रोमन लोकांच्याही जुन्या कायद्यात पित्याला कुलपतीची सर्व अनियंत्रित सत्ता गाजवावयास मिळत असे. मुलाच्या मालमत्तेवरच नव्हे तर त्याच्या प्राणावरही त्याची सत्ता चालत असे. पुढे समाज जसजसा विकसित होत गेला तसतसा ज्ञानदानाचा अधिकार गुरूकडे आणि नागरिकशासनाचा अधिकार राजाकडे अशी विभागणी होत गेली. पण शासनाचे मूळ म्हणजे पितृत्व हेच होय आणि गुरू अथवा राजा हा परंपरेने एक प्रकारे पिताच होय.
मनुष्य मनुष्यावर जे शासन चालवीत असतो त्याचा विचार करीत असता सकृद्दर्शनी मनुष्यातील हे शासन आणि मनुष्याचे स्वत्व (अथवा व्यक्तित्व) ह्यांमध्ये विरोध असावा असा भास होतो. मनुष्यसमाजात आढळून येणारे रूढीचे अवार्य प्राबल्य, अल्पसंख्येचा बहुसंख्येवर किंवा बहुसंख्येचा अल्पसंख्येवर चालणारा जुलूम, परंपरागत चालत आलेल्या तत्त्वज्ञानाचे, हटवादाचे, सांकेतिक आणि प्रासंगित नीतीचे, शिष्टसंप्रदाचे इत्यादी अनेक प्रकारची दडपणे, ही सर्व लक्षात आणिता मनुष्य हा एक पारतंत्र्याखाली स्वत:स सतत चिरडून घेणारा स्वत्वशून्य प्राणी असावा असे वाटते. ह्या दृष्टीने पाहता इतर सर्व खालील प्राणी पुष्कळ स्वतंत्र आणि स्वावलंबी आहेत हे पाहून त्यांची धन्यता वाटू लागते. पण हा अगदी वरवरचा विचार होय. किंचित खोल विचार केल्यास ह्याच्या अगदी उलट प्रकार दिसून येऊन, “धन्य धन्य हा नरदेहो| येथील अपूर्वता पहा हो| जो जो कीजे परमार्थ लाहो| तो तो दावे सिद्धीते|” हा रामदासांनी काढलेला उद्गार अगदी यथार्थ आहे अशी खात्री पटते. सूज्ञ, समर्थ आणि आत्मनिष्ठ माणसाची स्वतंत्रता कोणीकडे? पशू शरीराने कितीही बळकट असला तरी निसर्गाचा केवळ दास आहे. पण ज्या मनुष्याची ब्राह्मी स्थिती-
आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं|समुद्रमाप:प्रविशंति यद्वत्|
तद्वस्कामा यं प्रविशंति सर्वे| स शांतिमाप्नोति न कामकामी||
ह्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे भगवद्गीताकारांनी वर्णिले आहे, त्याचा निसर्गच उलट दास आहे.
पण एवढे मोठे स्वत्व आणि व्यक्तित्व अंगी येण्याच्या पूर्वी मनुष्यास अगोदर शासनाच्या तीव्र मुशीतून बाहेर निघावे लागते. शासन व स्वत्व ह्यांच्यामध्ये विरोध नसून शासन हे स्वत्वाची अपरिहार्य पूर्वतयारीच आहे असे समजावे. पशू आणि मनुष्य ह्यांची तुलना करून पाहता इतर सर्व प्राण्यांपेक्षा मनुष्याची बाल्यावस्था इतकी दीर्घकालीन का असावी ह्याचे इंगितही वरील शासनाच्या आवश्यकतेमध्येच आढळून येते. जनावरांची पिले थोड्या आठवड्यांनी किंवा महिन्यांनी आपल्या पायांवर उभी राहून आपल्या आईबापांपासून सडसडीत मोकळी होतात. पण सबंध बारा वर्षांचे एक तपही मनुष्याच्या बाल्यावस्थेस पुरेसे होत नाही. ह्याचे कारण त्याला पुढे जे तेजस्वी पौरूष्य मिळावयाचे असते ते होय. ते पौरूष्य प्राप्त होण्याच्यापूर्वी त्याला खाली सांगितल्याप्रमाणे बाळपणाच्या पाय-या पितरांच्या शासन छत्राखली चढाव्या लागतात:
कौमारं पंचमाब्दांतं पोगंडं दशमावधि|
कैशोरमा पंचदशाद्यौवनं हि तत:परम्||
पाच वर्षाचा होईपर्यंत कुमार, दहापर्यंत पौगंड, पंधरापर्यंत किशोर आणि त्यानंतर पंधरा वर्षे तारूण्याची गेल्यानंतर पुरूषास पोक्तपणा येतो. ह्या पंधरा वर्षांच्या बाल्यावस्थेत त्याला ज्या प्रकारचे शासन मिळेल त्यावर त्याचे भावी स्वत्व अवलंबून राहणार हे उघड आहे. म्हणूनच मनुष्यास पशूपेक्षा दीर्घकाल पितृशासनाखाली रहावे लागते. पशूचा पालक केवळ त्याची माता असते म्हणजे आपल्या अपत्याच्या शारीरिक दुबळेपणाच्य अवस्थेत त्याचे कसेबसे पोषण करून थोड्याच काळानंतर पशूची माता त्याला अफाट जीवनकलहाच्या लाटांवर लोटून देते. पण मनुष्याचे ह्याप्रमाणे एकाच पालकाच्या मदतीने भागत नाही. कुमारदशेची पाच वर्षे आईच्या संगोपनाखाली काढल्यावर पुढे पौगंड आणि किशोरदशेची दहा वर्षे मुलाला आपल्या बापाच्या पालकत्वाखाली घालवावी लागतात. म्हणून पशूला नुसती आई तर मनुष्याला आई आणि बाप अशा दोन पितरांची नैसर्गिक योजना झाली आहे.
ह्याप्रमाणे आपल्या अपत्यास स्वत्वाचे अथवा मनुष्यत्वाचे प्रदान करण्यासाठीच जर पितृशासन हे आहे तर स्वत्वाची पूर्ण तयारी होण्यापूर्वी कोणाही व्यक्तीस पितृत्वाची अवस्था प्राप्त होणे हे अत्यंत अनिष्ट आहे हे निराळे सांगावयास नकोच. स्वत:चीच किसोरदशेतून सुटका होते न होते तोच ज्यांच्यावर पितृत्वाची पाळी येते, त्यांच्याकडून होणा-या पितृशासनाची महती गावी तितकी थोडीच. ह्या न्यायाने पाहू गेले असता जे राष्ट्र पिढ्यानपिढ्या आज कित्येक सहस्त्र वर्षे हे भ्रृण हत्येचे पातक करीत आले, इतकेच नव्हे तर त्याने त्या पातकास आपल्या शास्त्रातही भरपूर आधार करून ठेविला आहे, ते राष्ट्र कायमचे स्वत्वहीन बनले तर त्यात नवल ते काय?
पितरांनी आपल्या अंगी पूर्ण व्यक्तित्व संपादन केल्यानंतर पुढे आपल्यास जे शासन द्यावयाचे तेही त्याचे ठिकाणी जे काही बीजभूत व्यक्तित्व असेल त्याचाच पूर्ण परिपाक व्हावा एवढ्याकरिताच; केवळ आढ्यता मिळविण्याकरिता नव्हे. शासनाच्या अतिरेकामुळे किंवा दुरूपयोगामुळे अपत्यातील व्यक्तित्वाची बीजे करपून जाणार नाहीत किंवा चिरडून जाणार नाहीत अशी सतत खबरदारी पितरांनी घ्यावी. इतकेच नव्हे तर त्या बीजांची वाढ झपाट्याने व्हावी म्हणून सर्व वाटा पदोपदी कुशलतेने मोकळ्या ठेवणे ह्याकडेही नजर दिली पाहिजे. अपत्याच्या इच्छेवर शासनाचे जे काय दडपण टाकावयाचे असेल ते त्यास पुढे प्रौढपणी आत्मसंयमन करण्याची संवय व्हावी एवढ्याचसाठी. ह्यापरते अधिक दडपण शासनक्रियेत मुळीच असता कामा नये. शासन म्हणजे दडपम अशी शिशूची भावना सहसा होऊ न देता उलट शासन म्हणजे एक प्रकारचे उत्तेजन आहे अशी भावना जो शास्ता शिशूंच्या ठायी करीत राहील तोच खरा कुशल, आणि पूज्यपादारविंद पिता होय.
ह्यावरून पितृत्वाची जबाबदारी किती थोर; किती कठीण आणि किती पवित्र आहे, हे दिसून येईल. अपत्ये म्हणजे देवाने आपणांस दिलेली खेळणी नव्हेत, किंवा आपल्या निपुत्रिक मित्रापुढे दिमाखाने दाखविण्याचे दागिने नव्हेत किंवा(आपण मरून गेल्यावर) मागे तिळांजळीच्याद्वारे स्वर्गात आपणांस जीवन पोहोचविणारे गुमास्ते नव्हेत, किंवा आपल्यामागे काही तरी लागलेली लिगाडे नव्हेत, तर अत्यंत मंगल ईश्वरी नियमाप्रमाणे ती आपल्यामागे उरणारी आपली किर्ती होत, आपले खरे अमृतत्व होत, ‘स्त्रिया पोरे वंचक चोरे’ या रानटी वचनात काव्य नाही ते नाहीच, उलट अडाणीपणा मात्र भरलेला आहे. कारण पोरे बापडी कधीच चोरे असू शकणार नाहीत. ती, आम्ही चोर आहो की साव आहो, हे कसोटीस लावून दाखविणारे देवदूत आहेत:
तू माझी माउली मी वो तुझा तान्हा| पाजी प्रेमपान्हा पांडुरंगे||
तू माझी माउली मी तुझे वासरू| नको पान्हा चोरू पांडुरंगे||
तू माझी हरिणी मी तुझे पाडस| तोडी भवपाश पांडुरंगे||
तू माझी पक्षिणी मी तुझे अंडज| चारा घाली मज पांडुरंगे||
नामा म्हणे होसी भक्तीचा वल्लभ| मागे पुढे उभा सांभाळिसी||
ही नामदेवाची प्रेमळ प्रार्थना आम्ही ईश्वराजवळ किती सहज रीतीने करू बरे? पण ईश्वरास प्रेमाचा पान्हा मागण्यापूर्वी आम्ही आपल्या तान्हुल्यांना स्वत्वाचा पान्हा दिला आहे की नाही, हे पहावयाला नको का? नुसते लाड, कोडकौतुक आणि फुकट मिळालेल्या धनाचा वारसा दिल्याने आम्ही अपत्यांना स्वत्वाचा पान्हा दिला असे होत नाही. तो देण्यास चुकून, पु: ईश्वरास प्रेमपान्हा आम्ही कोणत्या तोंडाने मागावा? ईश्वरापुढे आम्ही प्रेमपान्हा मागत असू, वा नसू आमच्या पुढे आमची अपत्ये तो नित्य मागत असतात ह्यात संशय नाही. किशोरदशा संपेतोपर्यंत अपत्यांना स्वत्वाचा पानहा मातापित्यांनी स्वत: देऊन पुढे त्याला तरूणदशा प्राप्त झाल्यावर गुरूगृही गुरूशासनासाठी धाडावयाचे असते. त्यापूर्वी उपनयन होऊ शकत नाही. ह्यानंतर गुरूने आपली जबाबदारी कशी पाळावी आणि पुढे पोक्त आणि पौरूषशाली व्यक्तीस राजदरबारी पाठविल्यावर तेथे त्यास तिसरे शासन कसे मिळावे ह्याचा विचार पुढे क्रमाक्रमाने करू.