पुण्यातील मानपत्रास उत्तर
“मनुष्याच्य चरित्रात ज्या कित्येक आपत्ती येतात त्यातील आपली झालेली अकटोविकट स्तुती, आपल्याच कानाने ऐकणे ही होय. जेव्हा जेव्हा असे दुर्धर प्रसंग माझ्यावर येतात तेव्हा ते सहन करण्याच्या एकच तोडगा माझ्याजवळ आहे. तो हा की, इतर वेळा माझी जी निंदा व अपमान झालेला असतो त्याची मी आठवण करितो आणि या स्तुतीनिंदेचे ओझे ब्रह्मांर्पण करून मी माझ्या कार्यास मोकळा होतो, विठ्ठल रामजी शिंदे आणि मानपत्र| आणि तेही पुण्यासारख्या शहरात! हा प्रकार विचित्र खरा. नेहमी जाच करून घेण्याची एखाद्या गाढवाला सवय असावी, त्याला एखाद्याने कुरवाळून झूल घातली तर ती त्यास जशी असह्य होईल तद्वतच आजचे मानपत्र मला झाले आहे. ज्या मला देणग्या मिळाल्या आहेत त्या दंड वा कंमडलूच्या रूपाने माझ्या आयुष्यात रहस्य सांगत आहेत, शिक्षकांच्या आणि स्नेह्याच्या पक्षपाताची चिन्हे म्हणून मी त्या संग्रही ठेवीत आहे. मानपत्रामध्ये माझ्या पुढील कर्तव्याच्या काही दिशा सुचविल्या गेल्या आहेत. शेतकरी व कामगार वर्गाची संघटना आणि इतिहास लेखन त्याविषयी यथाशक्ती प्रयत्न करीन. इतिहासलेखन हा माझा खरोखरच आवडीचा विषय असून त्यासंबंधी काहीतरी व्हावे अशी माझी उत्कट इच्छा आहे. मी स्वत:, माझी पत्नी, भगिनी व इतर मंडळी ह्यांचा जो तुम्ही गौरव केला त्याबद्दल मी मन:पूर्वक आभार मानून आपली रजा घेतो.