विजापूर येथील धर्मकार्य, विजापूर
(उदार धर्माची सभा-विजापूर प्रांतिक परिषद या सभेत प्रार्थना व ब्राह्मसमाजाची बाजू मांडताना.....)
राजकीय प्रांतिक परिषदेसाठी हा भव्य मंडप उभारला जात असताना तिचे अधिवेशन होण्यापूर्वीच अवांतर गोष्टीचा विचार करण्यासाठी ह्या धर्मसभेचे पिलू ह्या मंडपात का सोडण्यात आले असा प्रश्न तर्कप्रिय लोकांकडून करण्यात आलेला माझ्या कानावर आला आहे. व त्याचे उत्तर देण्याला हाच प्रसंग योग्य आहे. आम्हा पौरस्त्य लोकांच्या विशेषत: सनातन म्हणून गाजलेल्या हिंदू धर्मीयांच्या कीर्तीचा नगारा असा आहे की, आम्ही कोणतेही काम ईश्वराचे नाव आणि धर्माचा संस्कार केल्याशिवाय करीत नाही. जेवणाचा घाससुद्धा नारायण असे नाव घेऊन घेतो. उद्या तर ह्या ठिकाणी मोठमोठे राष्ट्रीय निश्चय होणार आहेत, त्यापूर्वी ईश्वरस्मरण न करणे हे आपल्या सनातन धर्माभिमानास शोभेल काय? ह्यावरून आजची ही धर्मसभा उद्याचे राष्ट्र कार्याचे पुण्याहवाचन म्हटल्यास हरकत नाही आणि त्याच्याविषयी कुतर्क काढणे म्हणजे आमच्या पूर्वपरंपरेला झुगारून देणेच होय. ज्या प्रार्थना समाजाचा एक सभासद म्हणून मी आता बोलत आहे, त्याने पूर्वपरंपरेला धरून सनातन धर्माचेच कार्य आजवर केले आहे. त्याच्या ध्येयावर ऐक्य, श्रेय, आणि सामाजिक उन्नती आणि त्याच्या पायावर राष्ट्राची प्रगती ही तत्वे फडकत आहेत. ज्या धर्माला ही तत्त्वे मान्य नाहीत. त्याला धर्म म्हणण्याची माझी तरी तयारी नाही. केवळ व्यक्तीची उन्नती करणे हे प्राचीन हिंदू धर्माचे लक्षण होते आणि केवळ समाजाच्या उन्न्तीसाठी झटणे हे आधुनिक खिस्ती धर्माचे ब्रीद आहे. ह्या दोहोंचा गोड मिलाप करण्याची हाव प्रार्थनासमाज बाळगीत आहे. आणि त्या ध्येयाच्या आड येणे म्हणजे अधर्म अशी माझी अल्पमती आहे. इतकेच नव्हे तर परवा मुंबईस भरलेल्या अस्पृश्यता निवारक सभेमध्ये प्रत्यक्ष रा. टिळकांनीही असे सांगितले की, हल्ली अस्पृश्य समजलेल्या लोकांची अस्पृश्यता जावी हा पवित्र हेतू देवालाही प्रिय असला पाहिजे. आणि तसे नसेल तर तो देवच मला मान्य नाही. वरील चार तत्वे ज्या पंथाला मान्य नाहीत, तो धर्मपंथच नाही, असे म्हणण्यात प्रार्थनासमाज तरी काय धाडस करीत आहे? असे सांगून रा. शिंदे ह्यांनी अशा आणीबाणीच्या प्रसंगी कोणाही पुढा-यांनी अथवा अनुयायांनी आपल्या जातीच्या मताच्या किंवा पंथाच्या सबबीवर आमच्या ह्या हतभागी देशात दुहीचे, द्वेषाचे किंवा भ्रांतीचे साम्राज्य माजवू नये, अशी विनंती केली.
विजापूरसारख्या ठिकाणी इतक्या लोकांना प्रार्थना व ब्राह्मसमाजाची माहिती करून देण्याची संधी आमच्या बंधूंना साधता आली हे फार ठीक झाले. हा योग मुख्यत: रा. शिंदे यांनी जुळवून आणिल्याचे कळते.