कवित्व आणि भरारी
आमचे मित्र रा. विठ्ठल रामजी शिंदे यांची कवित्वाच्या जोरावर भरा-या मारण्याची शैली विलक्षण आहे ह्यात संशय नाही. एका काळी ......फार दिवसापूर्वी नव्हे....... हे जातवार प्रतिनिधीच्या विरूद्ध होते. आता अंत्यजासाठी काही विवक्षित जागा कायदे काउनसिलात राकून ठेवाव्या अशा प्रकारची त्यांची फ्रांचोइज कमिटीपुढे साक्ष झाल्याचे प्रसिद्ध झाले आहे. हे त्यांचे खाजगी मत असल्याचे समजते. त्यांनी आजपर्यंत ब्राह्मणांनी व ब्राह्मणेतरांनी सलोख्याने वागण्याबद्दल अनेक ठिकाणी उपदेश केलेला असून थोडे दिवसापूर्वी ब्राह्मणेतरांनी ब्राह्मण जर आपल्या स्वातंत्र्याच्या आड येतील तर त्यांचा सशस्त्र प्रतिकार करावा, मात्र प्रेमाने त्यांची डोकी फोडावी अशा अर्थाचे भाषण केल्याचेही प्रसिद्ध झाले आहे. ह्या त्यांच्या भाषणाने ब्राह्मणद्वेष्ट्या काही वृत्तपत्रांना आनंद झाला असून श्री. शिंदे माहेरी आल्याबद्दल त्यांचा शाब्दिक उत्सव सुरू आहे. मि. विठ्ठल रामजी शिंदे ह्यांना आम्ही पूर्णपणे ओळखीत असल्यामुळे त्यांच्या वर निर्दिष्ट केलेल्या भाषणचा हेतू काय असावा ह्या विषयी आम्हाला संशय नाही. परंतु सर्वच जणांना त्यांनी उत्साहाच्या जोरात केलेल्या भाषणाचा अर्थ समजण्याइतकी त्यांच्याविषयी माहिती असणे शक्य नाही. रा. शिंदे ह्यांनी अंत्यजोद्धाराचे हाती घेतलेले कार्य इतके मोठे आहे की, त्यांनी त्या व्यतिरिक्त अन्य उठाठेवीत पडणे म्हणजे आपली कार्यक्षमता कमी करून घेणे होय. आमच्या सूचनेच रा. शिंदे अव्हेर करणार नाहीत अशी आम्हाला आशा आहे.