कै. डॉ. संतूजी रामजी लाड

श्री. गणपतराव वामनराव खराटे यांस,
स.न.वि.वि.

आपले तारीख नसलेले पत्र आजच पोचले. प. लो. वा. डॉ. संतूजी रामजी लाड ह्यांचे चरित्र आपण प्रसिद्ध करणार हे वाचून फारच आनंद झाला. ते धनगर समाजासाठी प्रसिद्ध करणार असाल तर मराठीतच करणार असाल म्हणून मी हे आज मराठीतच देत आहे. माफी असावी.

मला स्वत:ला फार माहिती नाही. ते महात्मा जोतिबा फुले ह्यांचे शिष्य व अभिमानी होते. माझे मोठे मित्र होते. मजवर फार ममता करीत होते. मी त्यांना वडिलाप्रमाणे मान देत होतो. इ. स. १९०६ साली मी जेव्हा Depressed Classes Mission Society of India (अखिल भारतीय निराश्रित (अस्पृश्य) साह्यकारी मंडळी) मुंबई  येथे प्रथम काढली तेव्हा प्रथमचे पाच संस्थापक सभासद होते, त्यात डॉ. लाड हे एक होते. परळ येथे ह्या मंडळीच्या शाळा  वगैरे इतर संस्था होत्या. त्यात गरीबासाठी एक मोफत दवाखाना होता. तो डॉ. लाड हे काहीएक वेतन न घेता चालवीत असत. ठाण्याहून ते रोज परळ येथे केव्हा केव्हा अधिक वेळा आपल्या खर्चाने येत असत. फार प्रेमाने हरिजनाला शिवून औषधोपचार करीत असत. अगदी मरेपर्यंत ही सेवा त्यांनी मनोभावाने केली. ते मुंबई प्रार्थना समाजाचे एक फार जुने सभासद होते. कोणत्याही प्रकारे जातिभेद पाळीत नसत. वरील मंडळीच्या समारंभात सहभोजने होत असत. त्यात ते जुन्याकाळी उघडपणे भाग घेत असत. ठाणे शहरी ह्या मिशनच्या जाहीर सभा करीत व प्रार्थना समाजाच्या सभासदांस, उपासनेस, जेवणास वरचेवर आपल्या घरी बोलावीत असत. ठाण्याला एक रात्रीची शाळाही त्यांनी चालविली होती. आपल्या घरी निराश्रित ठेवले होते. ही सर्व सेवा करीत असता त्यांनी माझेविषयी इतकी कळकळ व तळमळ दाखविली की ती आठवण झाली की, माझे डोळ्यातून अश्रू गळतात. जी सेवा केली तिचा त्यांनी कधीच गाजावाजा केला नाही. की, कसल्याही मोबदल्याची आशा ठेविली नाही. महात्मा जोतिबाचे शिष्य व प्रार्थनासमाजाचे मासलेवाईक सभासद होते. त्यांच्यात आळस नव्हता किंवा अहंकार नव्हता. त्यांना ऐकू येत नव्हते. तरी ते आमच्या सर्व सभांना हजर राहून अंगमेहनतीची कामे आनंदाने करीत. दवाखान्यातूनच कामे करून न राहता अगदी गलिच्छ मोहल्यातून जातीने हिंडून समाचार घेत असत. हे कार्यही उदारपणे करीत. असे करीत होते म्हणून या मंडळीच्या शाखा सर्व देशभर पसरून महात्मा गांधीसारख्या मोठ्या पुरूषाचे लक्ष पुढे लागून ह्या कार्यास आता सर्वमान्य राष्ट्रीय स्वरूप आले आहे.

पंढरीनाथ पाटील ह्या व-हाडातील गृहस्थाने जोतिबा फुलेंचे चरित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात काही माहिती आढळेल. ठाणे येथील प्रसिद्ध वकील श्री केशवराव पाध्ये बी. ए. एल एल बी. ह्यांना डॉ. लाडांची बरीच माहिती असावी. त्यानंतर भेसराव सो. लोखंडे (ते स्वर्गवासी होऊन आता बरेच दिवस झाले) त्यांनी गिरणी कामगारासाठी मुंबईत गेल्या शतकात मोठी कामगिरी केली म्हणून लाड सांगत होते. त्यात लाड साहेबांचे साहाय्य असावे. स्त्रीशिक्षणाचे काम त्यांनी केले. त्यांच्या एका मुलीला इंग्रजी शिकविले.

मी हल्ली वृद्ध व आजारी आहे. वातकंपाने दोन्ही हात हालतात. पत्रे लिहवत नाहीत. मला जास्त माहिती नाही पण व्यवहार वाढवू नये. लो. अ. ही. वि. क्षमा असावी, यश लाभो.

आपला नम्र
वि. रा. शिंदे